ज्ञानेश्वर- तुकाराम, शिवाजी महाराज, फुले आंबेडकरांचा वारसा सांगणाऱ्या आणि त्यामुळेच पुरोगामी, सुसंस्कृत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी आणि पुढाऱ्यांमध्ये तू जास्त अर्वाच्च, शिवराळ बोलतोस की मी, अशी जणू काही स्पर्धा सुरू असावी, ही खरोखरच शरमेने मान खाली घालायला लावणारी बाब. अब्दुल सत्तार या गृहस्थांनी भरदिवसा तोडलेले तारे आणि रामदास कदम यांनी उधळलेली मुक्ताफळे या दोन्ही यातील अगदी अलीकडच्या गोष्टी. हे सगळे नेमके चालले आहे तरी काय? स्त्रियांना समाजात कसे वागवले जाते यावरून त्या समाजाची लायकी कळत असते. त्याबाबतीत आधीच आपली यत्ता फारशी वरची नाही. त्यात आपले लोकप्रतिनिधी जाहीरपणे स्त्रियांबद्दल बाष्कळ आणि बेताल विधाने करत असतील तर ते खासगीत काय बोलत असतील याची कल्पनाच न केलेली बरी. आपल्याला लोकांनी का निवडून दिले आहे, आपल्याला काय करायचे आहे, आपले काम काय याचे भान सोडून लोकप्रतिनिधी असे का वागत आहेत? गेल्या काही महिन्यांत दोनचार पक्षांमधले राजकारण, फोडाफोडी, सरकारची पाडापाडी हे सगळे झाले. करता येईल तेवढय़ा गलिच्छ भाषेत एकमेकांवर टीका करून झाली. आता तरी पुढे चला, आपापल्या खात्याच्या कामाला लागा. तर ते राहिले बाजूला. जनतेने हे सगळे उघडय़ा डोळ्यांनी पाहून घेतले आहे आणि त्याचा हिशेब ती निवडणुकीत करतच असते याचे भान बाळगाल की नाही? तिकडे अतिवृष्टीत हातची पिके जाऊन हवालदिल झालेला शेतकरी डोक्याला हात लावून बसला आहे. त्याला उमेद देण्याची, त्याला उभे करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे आणि याचे आपल्याला भान आहे याची जाणीव व्यक्त होणे अपेक्षित असताना कृषिमंत्री करतात काय तर सार्वजनिक पातळीवर स्त्रियांबद्दल अनुदार विधाने करतात. शिक्षण व्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. अजूनही कित्येक महाविद्यालये सुरूच झालेली नाहीत. सरकारी भरती प्रक्रियेमधल्या घोळांनी बेरोजगार परीक्षार्थीचा पारा चढतो आहे. हे सगळे आता खूप झाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा