उत्तर प्रदेशमधील निठारी या गावातील एका कोठीलगतच्या नाल्यात सांगाडे सापडल्यानंतर गेली १७ वर्षे सगळा देश या भयावह आणि निर्घृण हत्याकांडाच्या कहाण्या ऐकत आला आणि अखेर या नृशंस हत्याकांडातील आरोपींना अलाहाबाद उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्त केले. गुन्हा शाबीत करण्यासाठी पुरेसे पुरावे गोळा करण्यात आले नाहीत; अतिशय घाईघाईने, अपुऱ्या माहितीवर आणि निष्काळजीपणे या प्रकरणाचा तपास करण्यात आला, हे न्यायालयाचे मत अधिकच गंभीर स्वरूपाचे आहे. इतक्या महत्त्वाच्या आणि संवेदनशील प्रकरणात तपास यंत्रणांच्या निष्काळजीपणामागे काही विशिष्ट हेतू तर दडलेला नसेल ना, असा संशय प्रत्येकाच्या मनात उभा राहील, अशाच या सगळय़ा घडामोडी आहेत. महत्त्वाच्या प्रकरणातील आरोपी पुराव्याअभावी सुटणे अशी उदाहरणे त्याआधी आणि नंतरही घडलेली आहेत. पण ज्या पद्धतीने हे सारे प्रकरण हाताळले गेले ते पाहता, या यंत्रणांवरच कडक कारवाईचा बडगा उगारायला हवा. तसे होत नाही आणि अशा घटनांमुळे भयचकित झालेल्या समाजाचा तपास यंत्रणांवरील उरलासुरला विश्वासही उडून जातो. या प्रकरणातील मुख्य आरोपी मोनिंदरसिंग पंढेर याला आरोपमुक्त करताना न्यायालयाने जे ताशेरे नोंदवले आहेत, ते सरकारवरील विश्वासाला तडा जाणारे आहेत. निठारी हत्याकांड घडले २००६ च्या सुमारास. त्याच्याच आसपास दिल्लीतील आरुषी तलवार हिच्या हत्येचे प्रकरणही बाहेर आले. १४ वर्षांच्या आपल्या मुलीची आणि घरातील नोकर हेमराज याची हत्या केल्याचा आरोप तिचे वडील डॉ. राजेश आणि आई नूपुर यांच्यावर होता. हत्येचा आरोप असणाऱ्या या दाम्पत्यास चार वर्षे तुरुंगाची हवा खाल्ल्यानंतर अलीकडेच दोषमुक्त करण्यात आले. दिल्लीतील एका हॉटेलमध्ये काम करणाऱ्या जेसिका लालचा खुनी मनू शर्माची तर जन्मठेप असूनही १७ वर्षांनंतर सुटका करण्यात आली. जेसिका लाल काय, निठारी काय आणि आरुषी काय या सगळय़ाच प्रकरणांमधील हिंसा थिजवून टाकणारी होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा