‘विमेन्स प्रीमियर लीग’ (डब्ल्यूपीएल) या नवीन फ्रँचायझीप्रणीत क्रिकेट स्पर्धेसाठी सोमवारी झालेल्या लिलावानंतर निव्वळ भारतीय महिला क्रिकेटपटूंची स्वतंत्र ‘कोटय़धीश एकादश’ सहज बनू शकेल, अशी स्थिती आहे. या लिलावामध्ये दहा भारतीय क्रिकेटपटूंना एक कोटी रुपये किंवा त्यावरील रकमेची बोली लागली. स्मृती मनधाना (३.४ कोटी), दीप्ती शर्मा (२.६ कोटी), जेमायमा रॉड्रिग्ज (२.२ कोटी), शफाली वर्मा (२ कोटी), पूजा वस्त्रकार (१.९ कोटी), रिचा घोष (१.९ कोटी), हरमनप्रीत कौर (१.८ कोटी), यास्तिका भाटिया (१.५ कोटी), रेणुका सिंग (१.५ कोटी), देविका वैद्य (१.४ कोटी) या दहा जणींची नावे आता अधिक घरांमध्ये पोहोचतील. भारताची माजी कर्णधार मिताली राजने लिलावानंतर काढलेले उद्गार महत्त्वाचे आहेत. ती म्हणते, ‘आजवर केवळ भारतीय संघाकडून खेळण्याच्याच ईर्षेने मुली क्रिकेटकडे वळायच्या. ज्या अनेकींना संधीच मिळाली नाही, त्या निराश होऊन क्रिकेटपासून दूर गेल्या; परंतु डब्ल्यूपीएलमुळे आणखी किती तरी जणी क्रिकेटकडे वळतील आणि दीर्घकाळ खेळत राहतील.’ महिलांच्या क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलिया आजही नि:संशय सर्वोत्तम आहे. इंग्लंड आणि न्यूझीलंडच्या बरोबरीने आता भारतीय संघाची गणना होते; परंतु डब्ल्यूपीएलच्या लिलावात सर्वाधिक वरच्या बोली भारतीय खेळाडूंवर लागल्या. याचा अर्थ निव्वळ गुणवत्तेच्या बाबतीत नव्हे, बाजारपेठीय निकषांवरही महिला क्रिकेटला मागणी आहे हे स्पष्ट होते. महिलांसाठीच्या क्रिकेट लीग सध्या ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये होतात; परंतु नजीकच्या भविष्यात तेथील लीगपेक्षा ‘डब्ल्यूपीएल’चे वलय अधिक उजळ असणार हे आयपीएलच्या उदाहरणावरून सहज लक्षात येईल. महिला क्रिकेटमध्ये यानिमित्ताने निर्माण होणाऱ्या दोन ठळक प्रवाहांचा यानिमित्ताने धांडोळा घेणे गरजेचे आहे.

स्मृती मनधानाला कर्णधार हरमनप्रीतपेक्षा अधिक मोठी बोली लागली. हरमनप्रीत ही भारतीय संघाची कर्णधार आहे. तिच्यापेक्षा आणखी काही भारतीय खेळाडूंनाही अधिक बोली लागल्या आहेत. तेव्हा क्रिकेटच्या मैदानावरील महत्त्व आणि डब्ल्यूपीएलमध्ये फ्रँचायझी चालकांच्या आक्रमक बोलींमधून निर्धारित मूल्य यांचा थेट संबंध असतोच असे नाही, हे स्पष्ट झाले. सध्या भारतीय संघ महिला टी-२० क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत खेळत आहे. लिलावाच्या आदल्या दिवशी भारताने पाकिस्तानवर थरारक विजय मिळवला. लिलावामुळे आणि नंतरच्या काळात केवळ स्पर्धेवर चित्त एकाग्र करता येईल का? हे शक्य नसल्याचे मत न्यूझीलंडच्या संघाची कर्णधार सोफी डिव्हाइनने व्यक्त केले आणि त्यात तथ्य आहे. ऐन विश्वचषकाच्या मध्यावर अशा प्रकारे लिलाव आयोजित करताना येथील क्रिकेटव्यवस्थेला म्हणजे बीसीसीआयला विश्वचषक स्पर्धेचे महत्त्व गौण वाटत असेल, तर तो नवीन युगाचा महिमा म्हणावा लागेल. आयपीएलचे लिलावही महत्त्वाच्या मालिका किंवा स्पर्धादरम्यान झालेले आहेतच. आयपीएल आणि डब्ल्यूपीएलच्या बाबतीतला मुख्य फरक म्हणजे, त्या वेळच्या बहुतेक फ्रँचायझींनी ‘आयकॉन’ किंवा वलयांकित म्हणून भारताच्या पाच ते सात प्रमुख खेळाडूंना मुक्रर केले होते. त्यामुळे किमान मानधनाच्या बाबतीत अव्यक्त स्पर्धा होण्याची शक्यता नव्हती. तशी खबरदारी या वेळी घेतलेली दिसत नाही.

आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आकडय़ांचा. डब्ल्यूपीएलचे पाच वर्षांसाठीचे प्रसारण हक्क ९.५ अब्ज रुपयांना विकले गेले आहेत. पाच फ्रँचायझी संघांसाठी गुंतवणूकदारांनी ४६.७ अब्ज रुपये मोजले आहेत. त्यामुळे मूल्यांकनाच्या निकषावर डब्ल्यूपीएल ही पहिल्याच पर्वात अमेरिकेच्या महिला बास्केटबॉल लीगनंतरची (डब्ल्यूएनबीए) दुसरी महागडी लीग ठरली. भारतीय क्रिकेटपटूचे सरासरी उत्पन्न वार्षिक २.४ लाखांच्या वर पोहोचत नव्हते. त्यात आता नक्कीच बदल होईल. नुकत्याच जगज्जेत्या बनलेल्या मुलींच्या टी-२० संघातील सात जणींना डब्ल्यूपीएलमध्ये चांगली बोली लागली. येथे भारतीय पुरुष संघाच्या क्रिकेटविषयीच्या साम्यस्थळाकडे लक्ष वेधणे आवश्यक आहे. भारतीय संघाने पहिलावहिला टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर आयपीएल भारतात सुरू झाली आणि रुजली. त्यानंतरच्या काळात आजतागायत टी-२० प्रकारात भारताला जगज्जेतेपद मिळवता आलेले नाही. भारतीय मुलींच्या संघाने टी-२० जगज्जेतेपद पटकावल्यानंतर डब्ल्यूपीएल भारतात सुरू होत आहे. जगज्जेतेपदाचा पुरुष संघाचा दुष्काळ महिला संघाच्या बाबतीत दिसू नये, अशी अपेक्षा. महिला क्रिकेटच्या दृष्टीने आजचा दिवस साजरा करण्याचा आहे. कोटींच्या वाटेवरील काटे बोचतील वा न बोचतील, त्याचा परामर्श यथावकाश घेतला जाईलच. पण ज्या देशात १५ वर्षांवरील जेमतेम १९ टक्के मुली व महिलांना रोजगार उपलब्ध आहेत, त्या देशात कौशल्याधारित कोटींच्या बोलींचे स्वागत करावेच लागेल.