गिरीश कुबेर, फ्रान्सचे धडे- ३
सुखद पेस्टल कलर्सच्या एकसारख्या इमारती. गच्च झाडीनं भरलेले रस्ते आणि इतक्या बागा-उद्यानं की सुंदरतेच्या अतिरेकानं जीव गुदमरून जावा.. कशी काय इतकी सुंदरता सहन करत असतील हे बिचारे?
पर्यटनाच्या आनंदात सगळय़ात मोठा बिब्बा म्हणजे ‘साईट सीईंग’ नावाचं प्रकरण. माणसं नुसती हातात यादी घेऊन धावत असतात, हे झालं.. ते झालं करत ! काही काही जण तर इतके भारी असतात की ते वाणसामानाच्या यादीत गृहकृत्यदक्ष इसम कशा खुणा करतात तसे ‘टिकमार्क’ करत असतात यादीतल्या नावांपुढे. तेव्हा या साईट सीईंगचा चष्मा काढून जग पाहायला लागलं की ते आहे त्यापेक्षा जास्त सुंदर दिसतं. ‘फ्रेंच रिव्हिएरा’ हे असं दिसलं. फारच सुंदर आहे हे !
फ्रान्सच्या दक्षिणेचा भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावरचा भाग म्हणजे फ्रेंच रिव्हिएरा! आधीच मुळात ‘मेडिटरेनियन सी’च्या, म्हणजे भूमध्य समुद्राच्या परिसराला सौंदर्याचं वरदान! आणि त्यात फ्रान्स !! म्हणजे वातावरणाच्या कुठल्याच पारंपरिक वस्त्रप्रावरणात मावणार नाही इतकी सुंदरता. नीस, कान वगैरे शहरं या रिव्हिएरामधली. ते सगळं अनुभवण्यासाठी फ्रान्समधला दक्षिण दिग्विजय फार महत्त्वाचा. त्यासाठी तंबू ठोकायचं ठरलं मार्सेलमध्ये.
पॅरिस-मार्सेल हे अंतर साधारण ७५०-८०० किमी आहे. म्हणजे मुंबई-गोवा किंवा पुणे-बंगलोर इतकं. ‘टीजीव्ही’ रेल्वेला ते अंतर कापायला जेमतेम अडीच तास लागले. तिकडे रेल्वेच्या प्रत्येक डब्यात एक डिजिटल मॉनिटर असतो. टीव्हीच्या पडद्यासारखा. त्यावर गाडीचा वेग वगैरे माहिती रिएलटाइम दिसत राहते. त्यात कळत होतं ही रेल्वे मध्यंतरी १५ मिनिटं ३१५ किमी प्रतितास या वेगात धावली आणि एरवी तिचा सरासरी वेग २८८ किमी होता. (सहज माहितीसाठी- आपली ‘वंदे भारत’ साधारण १८० किमीच्या वेगानं धावणं अपेक्षित आहे. प्रत्यक्षात ती धावते ८५-९० किमी वेगानं. अलीकडे ओरिसातल्या बालासोरच्या अपघातातली रेल्वे धावत होती १२८ किमी वेगानं) मार्सेलला उतरल्यावर त्या रेल्वेच्या गार्डला सहज विचारलं या गाडीला हिरवा झेंडा दाखवायला कोण आलं होतं का ते. त्याला काही कळलंच नाही. असो. अडीच तासांत ही गाडी पॅरिसहून आम्हाला मार्सेलला घेऊन आली.
तो दिवस रविवार होता. कामाच्या दिवशीही फ्रेंचांची गती आपल्याला कमीच वाटते. दोन-दोन तास ही मंडळी लंच करतात आणि एका कॉफीवर सहज तासभर काढतात. त्यात रविवार आणि मार्सेलसारखं बिगरऔद्योगिक शहर. दुपारचे १२ वाजले तरी माहोल साखरझोपेतल्यासारखा. वातावरणात हलका दमटपणा. घामट वाटावं इतका नाही. पण पॅरिसचा थंडावाही नाही. हॉटेलात बॅगा टाकून शहर अनुभवायला बाहेर पडलो. आसपासचे फक्त काफे आणि बार तेव्हढे उत्साहात ओसंडून जात होते. बारमधे उत्साह आणि शहर मात्र बेहोश असं चित्र. पहिली १०-१५ मिनिटं अशी चाचपडण्यात गेली. फिरत फिरत लहान रस्ता जिथं मोठय़ा रस्त्याला मिळतो त्या दिशेनं आम्हीही वहात गेलो.
..अन् एकदम चित्र बदललं ! समोर चक्क पाण्याचा चौक. म्हणजे त्या गावाच्या मध्यवर्ती चौकातच समुद्र आत आलेला. इंग्रजी ‘सी’ अक्षर जमिनीवर उभारलं तर जसं दिसेल तसा तो चौक. या ‘सी’च्या तीन बाजूंनी मार्सेल आणि समोरचा जो मोकळा भाग तो समुद्र. ‘सी’कडे पाठ करून समोर पाहिलं की या समुद्राच्या उजव्या हाताला ‘याट’ रांगेनं लागलेल्या. शेजारी शिडांच्या बोटींची एक वेगळीच आकाशरेखा, स्कायलाइन तयार झालेली. आणि त्यावर नुसते बागडणारे सीगल्स. एरवी हा पक्षी जाडय़ा कबुतराइतकाच मोठा. पण मार्सेलचे सीगल्स चांगलेच धष्टपुष्ट. ताज्या ताज्या माशांवर पोसलेले. ‘सी’च्या जमिनीवरच्या भिंतीवर एकाच उंचीच्या इमारती. तळमजल्यावर सुंदर काफेज. त्यांच्या छताच्या झिरमिळय़ा फडफडत होत्या आणि वाऱ्यांच्या लाटांवर त्यांचा असा एक वेगळाच नाद कानावर येत होता.
आणि त्या ‘सी’च्या दोन टोकांमधला भाग इतक्या आनंदाने भरलेला की या आनंदानं अचंबित व्हावं! मार्सेलकर सहकुटुंब सहपरिवार तिथं आलेले. सतरंज्या-चटया घेऊन. निवांत बसलेले. आयांनी बाबा गाडय़ांवरच्या मुलांना मोकळं सोडलेलं. ती गोबरी गोबरी मुलं आपापलं ‘चाली..चाली’ करू पाहात होती. त्या मधल्या ‘सी’त एक उंच, भला मोठा, प्रचंड चौकोनी मंडप. असाच. त्यात काही नाही. पण त्याचं छत मात्र आरशासारखं. एक महाकाय आरसा, समुद्रतटी जमिनीकडे तोंड करून लावलेला. त्याचा एक विलक्षण परिणाम जाणवत होता. प्रकाशाच्या पातळीवर आणि दृश्यात्मकतेच्या पातळीवरही. रात्री तर त्या आरशात चमचमती प्रतिसृष्टी तयार व्हायची. माणसं या चौकात विसावलेली. हालचाल त्यातल्या त्यात होती ती सायकलींवरून चहा विकणाऱ्या महिलांची. त्या फ्रेंच वाटत नव्हत्या. विचारल्यावर कळलं त्या सीरियन स्थलांतरित आहेत. जगण्यासाठी देशत्याग केलेल्या आणि फ्रान्सनं त्यांना सहज सामावून घेतलेलं. त्या टर्कीश चहा विकत होत्या. लहानलहान पारदर्शी कपातला चहा त्यांना रोजीरोटी मिळवून देत होता.
बराच वेळ घालवूनही मार्सेलमधल्या त्या ‘सी’चा मोह काही सुटत नव्हता. स्थानिकांप्रमाणे आम्हीही तिथं सुस्तावलो. मध्येच समोरच्या समुद्रातनं एक याट फेरी मारून आलो. समुद्रात बोटीवरनं मार्सेल सुंदर दिसत होतं. परत आल्यावर गावात फेरफटका मारला. त्या ‘सी’कडे येणाऱ्या मुख्य रस्त्यावर मोठमोठे अडथळे टाकून ते रस्ते वाहनांना बंद केलेले. रविवारी रस्ते फक्त चालणाऱ्यांसाठी असा नियम त्या गावात. एका मोठय़ा चौकात तर बुद्धिबळाचे पट मांडून ठेवलेले. एका रांगेत. आणि लोक, यात पर्यटकही आले, एकमेकांशी खेळत बसलेले. लहान मुला-मुलींचे स्केटबोर्डस, स्केटिंगचे प्रयोग जोमात चाललेले आणि ज्येष्ठ मंडळी संध्याकाळचं ऊन रिचवण्यासाठी आरामखुच्र्यात सांडलेली.दुसऱ्या दिवशी भल्या सकाळी एक गाडी भाडय़ानं घेतली आणि या रिव्हिएराच्या कडेला वसलेली गावं पाहायला निघालो. एका गावात जायचं हे नक्की होतं. मेंटॉन.
युरोपातली ही अशी गावं फार वेड लावतात. छळतात. ऑस्ट्रियातली हॉलस्टॅट, झेल-अमसी, इटलीतलं बुऱ्हानो-मुऱ्हानो आणि आता फ्रान्समधलं हे मेंटॉन. लहानखुरं शहरच. समुद्रकिनारी वसलेलं. समुद्र कमालीचा शहाणा. श्रीमंतांघरच्या आज्ञाधारक मुलांसारखा. पाणी इतकं निवळशंख की जमिनीपासनं पाचेक फुटांपर्यंत त्याचा तळ दिसत होता. आणि किनाऱ्यावर सुंदर गुळगुळीत रंगीबेरंगी गोटे. लहानलहानसे. वरवर पाहिलं तर कृत्रिम वाटावेत असे. लहानपणी आजोळी कृष्णानदीकाठी चपटय़ा ठिकऱ्या घेऊन त्यांच्या पाण्यावर भाकऱ्या करायची स्पर्धा लागायची. एका वेगात दगड फेकला की तो पाण्यावर टप्पे घेत घेत पुढे जातो. मेंटॉनच्या किनाऱ्यावर रंगीत दगडांनी समुद्राच्या पाण्यावर त्या भाकऱ्या करता आल्या. गंमत अशी की ते दगड पाण्यात खाली जाताना दिसायचे. पाणीच इतकं स्वच्छ.
मेंटॉनवासीयांचा हेवा वाटावा असं सुंदर हे गाव. सुखद पेस्टल कलर्सच्या एकसारख्या इमारती. गच्च झाडीनं भरलेले रस्ते आणि इतक्या बागा-उद्यानं की सुंदरतेच्या अतिरेकानं जीव गुदमरून जावा. गावातल्या वातावरणासारखेच नागरिक. अगदी बाथरूम फ्रेश वाटणारे. आणि प्रचंड लांब पसरलेल्या समुद्रकिनाऱ्यावर लागून चौपाटीला समांतर एकापेक्षा एक सुंदर काफे-बार्स. ते संख्येनं इतके की दर कुटुंबामागे एक काफे आहे की काय असा प्रश्न पडावा. त्यातल्या कर्मचाऱ्यांकडे पाहिलं की कळत होतं तसं उत्तम चालत असणार या मंडळींचं. मेंटॉनमध्ये घरात चूल पेटतच नसेल बहुधा! अन्यथा इतक्या सगळय़ांचं इतकं बरं कसं काय सुरू असेल असा एक प्रश्न पडून गेला. पण एका घोटाबरोबर तो पिऊन टाकला. वर तो समुद्रकिनाऱ्यावरचा लफ्फेदार रस्ता. चारपाच मरिन ड्राइव्ह्जइतका लांबलचक. एका टोकाला कान आणि मोनॅको आणि दुसरीकडे समुद्राला उजव्या हाताला ठेवून सरळ गेलं की इटली. ते इतकं जवळ की आम्हीही चक्कर मारून आलो असतो. या भौगोलिक सौहार्दामुळे मेंटॉनमध्ये इटलीतलं रांगडेपण आणि फ्रेंचांची अभिजातता यांचं अत्यंत नशिलं कॉक्टेल पावलोपावली आढळतं.
त्याचा आकंठ आस्वाद घेतल्यानंतर परतताना या गावात आठवडाभर तरी राहायला यायचं या अनेक अव्यवहारी इच्छांप्रमाणे अपूर्ण इच्छायादीत एकाची भर घातली. ‘‘कशी काय इतकी सुंदरता सहन करत असतील हे बिचारे मेंटॉनवासी’’ हा, हे गाव सोडताना पडलेला प्रश्न अजूनही पिच्छा काही सोडत नाहीये.