गिरीश कुबेर

‘लिव्ह इन प्रेझेंट’.. वर्तमानात जगा, असा एक सल्ला हल्ली वरचेवर कोणी ना कोणी कोणाला तरी देताना आढळतो. म्हणजे गेल्या क्षणाचा विचार करू नका आणि येणाऱ्या क्षणाची चिंता करू नका.. असं हे तत्त्वज्ञान. नवनव्या काळात नवनवे ‘मॅनेजमेंट गुरू’ म्हणवणारे, इंग्रजीत बोलणारे भोंदू उगवत असतात. त्यातल्याच कोणाची तरी ही मांडणी असावी. खरं तर फक्त वर्तमानाचा विचार करा.. हा सल्ला /सिद्धान्त म्हणून किती भयानक आहे! विचार केला तर जाणवेल की, या अशा फक्त आताचं काय ते पाहा.. या विचारांतूनच तर जल्पक नावाचे ट्रोल तयार होतात. मागचं काही पाहायचं नाही आणि पुढचं काही पाहण्याची कुवत नाही.. याइतकी आदर्श स्थिती जल्पक निर्मितीसाठी दुसरी कोणती नाही. आपल्याकडे या जल्पकांची पैदास इतकी वारेमाप का होऊ लागली आहे या प्रश्नाचा शोध घ्यायला गेलं तर हे त्याच्या मुळाशी ‘फक्त वर्तमानात जगा’ हा सल्ला असेल. असो. हे मॅनेजमेंट गुरू हा काही आपला विषय नाही.

Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
Balasaheb-Thorat
Balasaheb Thorat : बाळासाहेब थोरात यांची सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणावरुन सरकारवर टीका, “सरकारची मानसिकता…”
Loksatta editorial Dr Babasaheb Ambedkar Lok Sabha Elections Constitution Convention
अग्रलेख: कोणते आंबेडकर?
29 559 sarees are still pending in saree distribution scheme of Mahayuti
आचारसंहिता संपूनही मोफत साडी वाटपास मुहूर्त लागेना, उत्तर महाराष्ट्रात २९ हजार साड्या पडून
Interesting story of father-son relationship Shri Ganesha movie Milind Kavade
बापलेकाच्या नात्याची रंजक गोष्ट
Inquiry into cases in Beed Parbhani through retired judges Nagpur news
बीड, परभणीतील प्रकरणांची निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत घोषणा
importance of stability in life
सांधा बदलताना : मैत्र जीवांचे…

तर दोन दिवसांपूर्वी, २३ ऑगस्टला, आपल्या अवकाशयानानं चंद्राच्या दक्षिण गोलार्धावर पाऊल ठेवलं आणि हा जल्पकांचा हैदोस सुरू झाला. जल्पक होण्यासाठी काडीचीही अक्कल लागत नाही आणि अवकाशशास्त्र वगैरे गहन विषय समजून घेण्यासाठी अकलेखेरीज दुसरं काही लागत नाही. त्यामुळे विज्ञानविश्व आपल्या बुद्धिगम्य क्षेत्रात रममाण असतं आणि दुसरीकडे जल्पक बुद्धिशून्य उद्योगात आनंद साजरा करत असतात. अशातल्याच एका मुरलेल्या जल्पकाचा त्या रात्री व्हॉट्सअ‍ॅपवरला संदेश होता : ‘‘चंद्रयानानं परत येताना दोन दगड आणावेत.. एक येडा पुरावा मागणार’’. हा संदेश आणि त्याखाली स्वत:च्याच विनोदावर अजागळपणे खो खो हसतानाच्या दोन स्माईली. आता हे कोणाला उद्देशून असणार वगैरे मुद्दय़ाचा विचार करण्याचं कारण नाही. ते ज्याला उद्देशून आहे त्याचे समर्थक जल्पक हे पाहून घेतील. ‘वर्तमानात जगा’ हा सल्ला गंभीरपणे घेतला की उच्चदर्जाचे बिनडोक जल्पक कसे तयार होतात, याचा हा नमुना. कसं ते पाहूया..

पहिला मुद्दा म्हणजे चंद्रयान परत येणार नाहीये. म्हणजे हे यान चंद्रावर उतरलं, दगडमाती गोळा केलेली भरली आणि निघालं पुन्हा ‘इस्रो’च्या बेंगळूरु मुख्यालयाकडे.. आणि मग एकमेव लाडक्या नेत्याच्या हस्ते यशस्वी चंद्रयानाची पाद्यपूजा वगैरे असं काही होणार नाहीये. ती क्षमता आपल्याला अद्याप मिळवायची आहे. आता जे काही आपल्याला जमतं त्यात चंद्रावर यान उतरवणं इतकंच अपेक्षित आहे. तिथं उतरलेलं यान पुन्हा सदेह पृथ्वीवर आणण्याचं ज्ञान आणि कौशल्य आपल्याला विकसित करायचं आहे. पुढची ‘गगनयान’ मोहीम त्यासाठी आहे. आता ती भविष्यात असल्यामुळे जल्पकानं याचा काही विचार केलेला नसणार.

आणि दुसरं म्हणजे ‘‘एक येडा पुरावा मागणार’’ हे विधान. इतिहास माहीत असण्याची शक्यता नसल्यामुळे जल्पकानं याचाही विचार केलेला नसणार. तो केलेला असता तर मोहीम फत्ते झाल्याचा पुरावा मागणाऱ्यासाठी या जल्पकांनी ‘एक येडा’ असा शब्दप्रयोग केला नसता. कारण असा पुरावा मागणाऱ्याचं नाव आहे एपीजे अब्दुल कलाम. जल्पक सोडले तर यात कोणाही विज्ञानप्रेमीस आश्चर्य वाटणार नाही. कारण पुरावा हा विज्ञानाचा पायाच आहे. विज्ञान म्हणजे कोणातरी अर्धशिक्षित बाबाबापूची चर्पटपंजरी नाही. त्यामुळे पुरावा मागणारे कलाम आणि ज्यांच्याकडे मागितला ते या दोघांनाही जराही त्यात आश्चर्य वाटलं नाही. ज्यांच्याकडे हा पुरावा मागितला तेही कलाम यांच्यासारखे शुद्ध विज्ञानवादी होते. किंवा आहेत. जी. माधवन नायर हे त्यांचं नाव. इस्रोचे माजी अध्यक्ष. विषय असा होता की माधवन हे राष्ट्रपती कलाम यांना ते हाती घेऊ इच्छित असलेल्या मोहिमेची तपशीलवार माहिती देत होते. ही घटना २००८ सालातली आणि त्या मोहिमेचं नाव ‘चंद्रयान-१’.

त्याआधी पाच वर्ष ही अशी काही मोहीम हाती घ्यायला हवी, याचा विचार झाला होता. त्या वेळी चंद्रावर पोहोचून परत येणारं यान तयार असल्याची घोषणा २००३ साली चीननं केली होती. त्या वेळी इस्रोचे तत्कालीन प्रमुख कृष्णस्वामी कस्तुरीरंगन यांनी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्याकडे आपण चंद्रमोहीम हाती घ्यायला हवी अशी मागणी केली. वाजपेयी यांनी तत्क्षणी ती स्वीकारली. इतकंच नाही तर या मोहिमेचं नावही त्यांनी ठेवलं ‘चंद्रयान’. यात त्यांनी ‘१’ जोडला कारण वाजपेयींना जाणीव होती की आपण जे करू पाहतोय ते काही एकमेव नाही. आपल्या आधीही बरंच काही घडलंय आणि नंतरही बरंच काही घडणार आहे. प्रत्येक क्षणी हा असा भूत आणि भविष्याचा सेतू आपण कसे बनू याचा प्रयत्न करायचा असतो, हे लक्षात घेण्याइतकी प्रगल्भता वाजपेयी यांच्या ठायी निश्चित होती. म्हणूनच माझा मीच आणि सर्व काही मी-माझे असं काही कधी त्यांनी केलं नाही. त्यांच्या मंजुरीनंतर चंद्रयानाच्या प्रत्यक्षात उड्डाणासाठी आणखी पाच वर्ष जावी लागली. एव्हाना कलाम राष्ट्रपती भवनात होते आणि पंतप्रधानपदी होते मनमोहन सिंग. राष्ट्रपती या नात्याने नव्हे तर एक विज्ञानप्रेमी या नात्यानं जेव्हा माधवन नायर यांनी कलाम यांना या मोहिमेची माहिती दिली तेव्हा कलाम यांचा हा प्रश्न होता : आपण चंद्रावर वा चंद्रापर्यंत पोहोचलो होतो याचा पुरावा काय असेल? एव्हरेस्ट सर केलं की किंवा अंटाक्र्टिकाच्या हिमखंडावर पाऊल ठेवलं की आपापल्या देशांचा झेंडा तिथं रोवून यायची पद्धत आहे. चंद्रावर असं काय करणार?

 एव्हाना चंद्रयान मोहिमेची तयारी पूर्ण होत आलेली. आणि या टप्प्यावर राष्ट्रपतीपदी असलेल्या वैज्ञानिक कलाम यांचा हा प्रश्न : पुरावा काय? तो टाळण्यासारखा नव्हता. पण करायचं काय? इस्रोच्या वैज्ञानिकांनी ठरवलं आपण झेंडा नाही तरी चंद्रावर ज्या स्थळी जाऊ त्या ठिकाणी ‘काही तरी’ निशाणी सोडून यायला हवी. शेवटच्या क्षणी असा काही बदल अवघड होता. पण मार्ग काढला या मंडळींनी. अ‍ॅल्युमिनियमच्या एका मजबूत चौकोनी खोक्यात स्पेक्ट्रोमीटर, मास इमेजिंग सिस्टिम वगैरे उपकरणं ठेवून ते खोकं धक्कारोधक आवरणात बसवलं गेलं. चौकोनी खोक्याच्या सहाही बाजूंवर भारताचा तिरंगा. तो घेऊन चंद्रयान २२ ऑक्टोबर २००८ या दिवशी अवकाशात झेपावलं. यथावकाश चंद्राच्या कक्षेत शिरून परिक्रमा करू लागलं. चंद्रयान आपल्या चंद्रपरिक्रमेत चंद्रापासून सर्वात लांब जायचं तेव्हा ते आणि चंद्र यातलं अंतर असायचं १० हजार किमी. म्हणजे साधारण मुंबई ते न्यू यॉर्क. आणि चंद्राच्या सगळय़ात जवळ ते यायचं तेव्हा त्या दोघांतलं अंतर असायचं ५०० किमी. म्हणजे मुंबईहून पणजीपर्यंत साधारण. फक्त हे अंतर उभं इतकाच, पण महत्त्वाचा फरक.

तर तेव्हा असं ठरलं की चंद्रयान जेव्हा चंद्राच्या सगळय़ात जवळ- म्हणजे ५०० किमीवर- असेल तेव्हा ते वैज्ञानिक उपकरण-धारी अ‍ॅल्युमिनियमचं खोकं चंद्रावर अलगद उतरवायचं. १४ नोव्हेंबरला चंद्रयान चंद्राच्या समीपतम आलं. सुमारे ५०० किमी उंचीवरनं हे खोकं रात्री ८.०६ मिनिटांनी अलगद चंद्राकडे सोडलं गेलं आणि २५ मिनिटांच्या वातावरणीय घसरगुंडीनंतर ८.३१ मिनिटांनी हे खोकं अलगदपणे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलं. ‘अलगद’ म्हणजे किती अलगद? तर ६१०० किमी प्रतितास इतक्या वेगानं. पण तरीही ते खोकं सुरक्षित होतं. नंतर यथावकाश त्यातली उपकरणं बाहेर निघाली. आणि जवळपास १ वर्षांनी, २५ सप्टेंबर २००९ या दिवशी या उपकरणांनी संदेश पाठवला : चंद्रावर पाणी आहे.

 कोणतंही थेट प्रक्षेपण वगैरे नव्हतं पण हा क्षण अनुभवायला कलाम इस्रोच्या केंद्रात हजर होते. हा रोमांचक क्षण त्यांनी अनुभवला. तो अनुभवताना भारावलेल्या अवस्थेत वाजपेयी सरकारनं राष्ट्रपतीपदी ‘बसवलेल्या’ कलाम यांनी इस्रोच्या माधवन नायर यांना सांगितलं : ‘‘ही तिरंगाधारी अ‍ॅल्युमिनियमची पेटी चंद्रावर ज्या जागी पडली तिचं नामकरण करू या ‘जवाहरस्थळ’!’’ पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी इस्रोसाठी जे काही केलंय त्याची ही कृतज्ञता.

भूतकाळात तयार झालेल्या त्या जवाहरस्थळानं दाखवलेल्या मार्गानं ‘चंद्रयान ३’ चा सध्याचा प्रवास सुरू आहे! केवळ वर्तमानातच जगण्याचा अट्टहास करणाऱ्या वेडय़ापिरांना कसं कळणार हे..? ं

Story img Loader