गिरीश कुबेर
‘अमृत’, ‘पॉल जॉन’ आणि ‘रामपूर’च्या मार्गावर आता ‘इंद्री’ आणि ‘ग्यानचंद’ मोठय़ा आत्मविश्वासानं पुढे निघाल्यात..
ही गोष्ट आहे दोन गावांची. दोन्ही गावं उत्तरेतली. त्यापैकी एक हरियाणा या तशा अर्थाने रांगडय़ा, पुरुषी मनोवृत्तीच्या, सामाजिक अर्थाने मागास राज्यातल्या गावाची. तर दुसरी सतत रक्ताळलेल्या, विकासापासून वंचित, सीमावर्ती म्हणून अस्थिर अशा जम्मू-काश्मीर राज्यातली.
यातल्या पहिल्या गोष्टीतल्या गावाचा इतिहास नोंदला गेलाय चंद्रगुप्त मौर्याचं राज्य होतं तेव्हापासून. त्यावेळीही भारत आणि अन्य अनेक देशांतला व्यापारउदीम चांगला तगडा होता. पश्चिम आशियामार्गे भारतातल्या अनेक वस्तू पार युरोपपर्यंत गेल्याची नोंद आहे. तर याच व्यापारउदिमाला गती यावी म्हणून चंद्रगुप्त मौर्यानं एक महामार्ग बांधायला घेतला. गंगेच्या मुखापासून ते थेट मध्य आशियापर्यंत जाणारा. नंतर सम्राट अशोक आणि पुढे शेर शहा सुरी यांनीही या महामार्गाला हातभार लावला.
उत्तरपथ असं त्याचं इतिहासातलं नाव. सडक-ए-आझम किंवा बादशाही सडक हीदेखील याच महामार्गाची नावं. आज पाकिस्तानात असलेल्या रावळिपडी, पेशावर, आपलं अलाहाबाद— आताचं प्रयागराज — इथपासून थेट म्यानमारच्या सीमेवरच्या बांगलादेशातल्या गावापर्यंत अनेक गावं या महामार्गानं थेट मध्य आशियाशी जोडली जाणार होती. मौर्याचं साम्राज्य ते. तयार झाला तो महामार्ग.
इंग्रजांनी त्याचं नामकरण केलं : ग्रँड ट्रंक रोड.
सुमारे २५०० किलोमीटर लांबीच्या या मार्गावर अगदी वायव्येच्या टोकाला अफगाणिस्तानातलं काबूल आहे. मग पाकिस्तानातलं लाहोर, आपली दिल्ली, पुढे कोलकाता आणि बांगलादेशातलं चित्तगाँव असा इतका सगळा प्रदेश हा महामार्ग कवेत घेतो. हा महामार्ग हरियाणातनंही जातो.
तर १९९५ साली पिकॅडली असं खास ब्रिटिश नाव असलेल्या उद्योगसमूहानं हरियाणातल्या एका छोटय़ा गावात जमीन खरेदी केली. विचार असा की आसपास ऊस चिक्कार येतो, तेव्हा साखर कारखाना टाकावा इथं. त्याप्रमाणे सर्व तयारी झाली आणि साखर कारखाना यथावकाश सुरू झाला.
त्या गावाचं नाव इंद्री.
दुसरी गोष्ट आहे जम्मू या गावाची. त्यातही एका पत्रकाराची. त्याचं नाव दिवाण ज्ञानचंद किंवा उच्चारानुसार ‘ग्यानचंद’. जम्मूचा इतिहास काही नव्यानं सांगायला नको. निसर्गाच्या कुशीतलं हे एक रम्य ठिकाण. जम्मू-काश्मीर राज्याची हिवाळी राजधानी. हिवाळी अशासाठी की या काळात श्रीनगरात बर्फ पडतं आणि त्या हिमवर्षांवात सगळाच परिसर गारठतो. अशा वेळी त्या राज्याचं सरकार जम्मूत स्थलांतर करतं. श्रीनगराच्या तुलनेत जम्मू तसं खालच्या भागात आहे. त्यामुळे तिथं श्रीनगराइतकी थंडी नसते. जम्मूत श्रीनगरासारखे शिकारे वगैरे नसतील. पण तावी नदीचा परिसर मोठा रम्य आहे. त्या नदीच्या काठावर वसलेलं हे गोड म्हणता येईल असं शहर.
त्या गावात दिवाण ग्यानचंद आपली पत्रकारी आणि कलाकारी रेटत होते. पत्रकारिता ही त्यांची हौस. पण त्यांना अनेक विषयांत गती होती. त्यातूनच त्यांनी एक उद्योग सुरू केला. कधी? तर १९४२ साली. म्हणजे देश स्वतंत्रही झालेला नव्हता, तेव्हा. जम्मू-काश्मीरचं सामिलीकरण तर त्यानंतरचं. पण तरीही ग्यानचंद यांना असं काही करावंसं वाटलं.
त्याची सुरुवात अर्थातच लहानशा प्रमाणात झाली. ग्यानचंद यांच्या उत्पादनाला तितकी मागणी आणि राजमान्यता दोन्हीही नव्हती त्यावेळी. पण ग्यानचंद चिकाटीनं आपला हा उद्योग करत राहिले. त्यानंतर जवळपास दोन दशकांनी त्यांच्या लघुउद्योगाचं रूपांतर एका मोठय़ा उद्योगात झालं. आता त्यांचा मुलगा, नातू हा उद्योग सांभाळतात. त्यांनी आपल्या या पूर्वजाचंच नाव त्यांच्या उत्पादनाला दिलंय.
ग्यानचंद. आज संपूर्ण जम्मू-काश्मिरात, काही प्रमाणात हिमाचल, दिल्ली आदी परिसरात ‘ग्यानचंद’ला चांगलीच मागणी असते. दर्दी पर्यटक त्या भागात गेले की एखादी तरी ‘ग्यानचंद’ घेऊन येतात. या उत्पादनाचा लौकिक इतका की अलीकडे जिम मरे याच्यासारख्या आंतरराष्ट्रीय व्यक्तिमत्त्वाला ‘ग्यानचंद’च्या चवीची तोंडफाट स्तुती करण्याचा मोह आवरला नाही. जम्मूसारख्या तुलनेनं अशांत, औद्योगिकदृष्टय़ा मागास परिसरात ‘ग्यानचंद’ तयार होते याचं त्यालाही अप्रूप.
तर ‘इंद्री’ आणि ‘ग्यानचंद’ ही दोन उत्पादनं. त्यापैकी एक गावच्या नावचं आणि दुसरं पूर्वजांच्या नावचं.
या दोन सिंगल मॉल्ट व्हिस्की आहेत. इतके दिवस गोवा वगैरे प्रांतातच आपल्याकडे चांगलं मद्य बनतं असा समज होता. हरियाणा आणि हिमालयाच्या पायथ्याच्या जम्मूनं तो खोडून काढला. ‘इंद्री’ आणि ‘ग्यानचंद’ या दोन्ही व्हिस्की आंतरराष्ट्रीय मंचावर कौतुकाच्या वर्षांवात बुडून गेल्यात.
आधी ‘इंद्री’विषयी.
या व्हिस्कीला यंदा आंतरराष्ट्रीय व्हिस्की आणि वाइन स्पर्धेत रौप्य पदक मिळालंय. ही सिंगल मॉल्ट. या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तिला १०० पैकी तब्बल ९१ गुण मिळालेत. तयार व्हायला लागून एक वर्षही झालं नसेल, पण तिनं चांगलंच नाव कमावलंय. अवघ्या चार महिन्यांत याच्या जोडीला वल्र्ड व्हिस्की अवॉर्ड आणि आणखीही काही पदकं तिनं मिळवलीयेत. ‘पिकॅडली’नं जेव्हा असा विचार मांडला तेव्हा त्यांना सुरुवातीच्या काळात अनेकांनी वेडं ठरवलं. हरयाणा आणि त्यातही इंद्रीसारख्या गावात सिंगल मॉल्ट? असा सर्वाचा तुच्छतादर्शक सूर. आता इंद्रीनं त्यांना ही टीका पोटात घ्यायला लावलीये.
यमुनेचं पाणी पोटात घेऊन आलेली, हिवाळय़ात थरथरणाऱ्या आणि उन्हाळय़ात रापणाऱ्या बार्ली (जवस) धान्यानं समृद्ध झालेली, बोर्बन व्हिस्की आणि वाइन्स बरीच वर्ष पोटात घेऊन मुरलेल्या लाकडांच्या पिंपात राहून श्रीमंत झालेली ‘इंद्री’ स्पर्शात मखमली आहे. ओक, व्हॅनिला, कॅरेमलात लिप्ताळलेल्या अननसाची चव तिला अधिकच हवीहवीशी बनवते. गंमत म्हणजे आपल्या मायभूमीत ती अजूनही सर्वत्र उपलब्ध नाही. पंजाब, दिल्ली, अर्थातच गोवा, मुंबई अशा काही ठिकाणी ती मिळते. पण इंग्लंड, अमेरिकादी देशांत मात्र ती सहज उपलब्ध आहे. गुणग्राहकता, दुसरं काय?
‘ग्यानचंद’बाबतही असंच काहीसं झालंय. अनेकांना ही ‘सिंगल मॉल्ट’ आहे, आपल्या देशात तयार होतीये हे आंतरराष्ट्रीय व्हिस्कीतज्ज्ञ जिम मरे यांनी तिचं जाहीर कौतुक करेपर्यंत माहीतच नव्हतं. ती बनवण्यासाठी ‘ग्यानचंद’ कुटुंबीयांनी जम्मूच्या पठारावर तावी नदीच्या पाण्याचं शिंपण करत खास बार्ली लावली. या बार्लीच्या शेतातलं पीक फक्त आणि फक्त ‘ग्यानचंद’च्याच पोटात जातं. खास स्कॉटलंडचं स्मरण करून देईल असा हा भूप्रदेश.
आणि त्यातल्या अनेकींशी स्पर्धा करेल अशी ‘ग्यानचंद’. तगडय़ा आणि रांगडय़ा हरियाणवी ‘इंद्री’च्या तुलनेत ‘ग्यानचंद’ नाजूकसाजूक आहे. चवीला हलकी, त्याच अलगदपणे पोटात शिरणारी आणि मागे जिभेवर जर्दाळू, मधाळलेल्या टॉफीची चव सोडून जाणाऱ्या ‘ग्यानचंद’चा खास सिंगल मॉल्टी धुरकट स्पर्शही हवाहवासा. आणि पुन्हा पुन्हा घ्यावा असा.
तर अशा या ‘इंद्री’ आणि ‘ग्यानचंद’.
भारतीय म्हणून अभिमान वाटायला हवा, अशा. दोघीही आंतरराष्ट्रीय मंचावर चांगलंच नाव काढताहेत देशाचं. ‘अमृत’, ‘पॉल जॉन’ आणि ‘रामपूर’ या तीन ज्येष्ठ सिंगल मॉल्ट्सनी घालून दिलेल्या मार्गावर ‘इंद्री’ आणि ‘ग्यानचंद’ मोठय़ा आत्मविश्वासानं पुढे निघाल्यात.
बरोबर सात वर्षांपूर्वी २६ डिसेंबर २०१५ या दिवशी याच स्तंभात पहिल्यांदा ‘अमृत’चा परिचय करून दिला होता. ती पहिली स्वदेशी सिंगल मॉल्ट. अनेक संस्कृती रक्षकांनी त्याहीवेळा नाकं मुरडली होती. (काहींची ती अजूनही तशीच आहेत) पण या मुरडलेल्या नाकांची तमा न बाळगता देशात आणखी चार सिंगल मॉल्ट तयार होऊ लागल्यात.
या पंचकन्यांच्या स्मरण-पूजनाचा हा दिवस. ‘पंचकन्या पूजयेत नित्यं, पूर्ण पापनाशनम..’ त्यासाठी प्रयोजन आहेच..!
girish.kuber@expressindia.com
@girishkuber