गिरीश कुबेर

समाजमाध्यमांतून जे दिसतं ते सत्य की मिथ्या याचा गांभीर्याने विचार करण्याची, या अनिर्बंध वापराला नियमांचा लगाम घालण्याची वेळ आली आहे, असं नोबेल शांतता पारितोषिकाच्या (२०२१) मानकरी पत्रकार मारिया रेस्सा यांना का वाटतं?

‘‘फिलिपिन्समधील घटनांकडे उर्वरित जगानं काळजीपूर्वक लक्ष द्यायला हवं, हा माझा आग्रह आहे. मी असं का म्हणते हे तुम्हाला नंतर कळेल बहुधा. २०२१ हे वर्ष आमच्यासाठी खूप महत्त्वाचं. हे सलग सहावं वर्ष. हा विक्रमच म्हणायचा. गेली सहा वर्ष आम्ही इंटरनेट वापरण्यात, डाऊनलोड- अपलोड करण्यात, यूटय़ूब पाहण्यात जगात सर्वाधिक वेळ दवडलाय. म्हणजे या गोष्टींसाठी सर्वाधिक इंटरनेट वापर हा आमच्या देशात होतो, तेदेखील आमच्याकडे इंटरनेटचा वेग अत्यंत मंद असताना. विकसित देशांत तो चांगला असतो. आमच्याकडे तो कमी आहे, कारण तशा सुविधाच नाहीत. तरीही २०१३ साली यूटय़ूबवर सर्वात जास्त व्हिडीओ अपलोड करणाऱ्यांत आम्ही आघाडीवर होतो. त्यानंतर चार वर्षांनी आम्ही आणखी एक विक्रम केला. त्यावर्षी एकूण फिलिपिनो लोकसंख्येपैकी ९७ टक्के नागरिक हे फेसबुकचे खातेदार झाले. म्हणजे एकाच वर्षी एवढे सगळे फेसबुक वापरू लागले, असं नाही. त्या वर्षांपर्यंत हे प्रमाण ९७ टक्क्यांवर गेलं. मी हे मार्क झकरबर्गला सांगितलं, तर त्याला आश्चर्यच वाटलं. लगेच म्हणतो कसा- पण राहिलेले तीन टक्के गेले कुठे? त्यावेळी मी कौतुकानं हसले. पण आता मला रडू येतंय..!  देशाची संस्कृती, परंपरा, इतिहास, नियामक यंत्रणा आणि या उप्पर नागरिकांची मानसिकता अशा साऱ्याची धूळधाण समाजमाध्यमं कशी आणि किती करू शकतात, याचं उदाहरण म्हणजे माझा देश- फिलिपिन्स. सुरुवातीला हे माझ्या लक्षात आलं नाही. पण आता दिसतंय की जे आपल्या देशात घडलं तेच आता अन्य देशांत घडतंय. घडणार आहे. एखाद-दोन वर्ष जातात. पण सगळीकडे तसंच घडतंय.

ही साधारण २०१५ सालची गोष्ट असेल. समाजमाध्यमांतल्या या कंपन्यांनी ‘फोन व्हेरिफाइड अकाउंट्स’ (पीव्हीए) असा एक नवाच प्रयोग केला. हैदोस सुरू झाला तो त्यानंतर. कोणाकोणाच्या फेसबुकला लाखा-लाखांनी एकगठ्ठा लाइक्स मिळणं, हे त्यातनंच आलं. यात एक धक्कादायक सत्य दडलं आहे, त्याविषयी लेखाच्या शेवटी.

पण मला सांगायचं आहे ते या आभासी जगातल्या नियमनशून्यतेविषयी. आपण प्रत्यक्षात सदेह एका जगाचे, एका विश्वाचे भाग आहोत जे यम-नियमांनी बांधलेलं आहे. तथापि २१व्या शतकात हे इंटरनेट इतकं पसरलं की त्यातून उलट या जगातली नियमनशून्यताच समोर आली. पण कोणीच काही केलं नाही. त्यामुळे ती आणखीनच बळावली. नियमभंग करणारे त्याला चटावले. याचा परिणाम गंभीर आहे. तो असा की ऑनलाइन नियमभंगाकडे डोळेझाक करता करता आपण प्रत्यक्ष जगातल्या ऑफलाइन नियमभंगाकडेही दुर्लक्ष करू लागलो आहोत. परिणामी इंटरनेटपूर्व जगात असलेली नियमाधारित व्यवहारांची व्यवस्था, त्यातले ‘चेक्स अँड बॅलन्सेस’ इत्यादी सुरक्षावरणे ढासळून पडू लागली. मी गेलं दशकभर बघत आहे, तंत्रज्ञानाच्या या देवत्वसदृश, सर्वव्यापी, अनिर्बंध वापरामुळे असत्याचा विषाणू किती झपाटय़ाने पसरत आहे, हे दिसू लागलं आहे. माणसा-माणसांतले संबंध, एकमेकांविरोधात शत्रुत्वाची भावना, तिचा प्रसार-प्रचार, भीती, क्रोध, द्वेष, सूडभावना इत्यादींचा मनामनांत होणारा फैलाव आणि याच्या पाठोपाठ जगभरात दिसू लागलेला एकचालकानुवर्ती राजवटींचा, हुकूमशाही, धर्माध प्रवृत्तींचा सुळसुळाट. मी २०२१ साली पत्रकारितेसाठी नोबेल मिळवणाऱ्यांतली एक. याआधी एखाद्या पत्रकाराचा नोबेलनं सन्मान झाला होता तो १९३५ साली. कार्ल व्हॉन ओसित्झ्की हा जर्मन पत्रकार नोबेल जाहीर होऊनही ते स्वीकारायला येऊ शकला नाही. कारण नाझी छळछावण्यांत तो बंदिवान होता. यावेळी माझा आणि रशियाच्या डिमित्री मुरातोव याचा नोबेलनं गौरव करून निवड समितीनं एक प्रकारे दाखवून दिलंय, की जगातली आजची परिस्थितीही १९३५ सालासारखीच आहे जवळपास. त्यावेळी लोकशाही वाचणार की नष्ट होणार ही शंका होती. आजही तीच भीती आहे. माझ्या नोबेल सत्कार भाषणात मी म्हणाले की माहिती महाजालात एक अदृश्य अणुबाँब फुटलाय आणि या नव्या तंत्रज्ञानानं विविध राजवटींना एक अधिकार बहाल केलाय.. माहिती-सत्य आपल्याला हवं तसं वळवण्याचा..

नोबेलच्या या समारंभानंतर जेमतेम चार महिन्यांत रशियानं शेजारच्या युक्रेनमध्ये घुसखोरी केली. याला आधार होता गेली कित्येक वर्ष रशियानं समाजमाध्यमांद्वारे केलेल्या खोटय़ा प्रचाराचा- प्रोपगंडाचा. याच प्रचारातून २०१४ साली रशियानं क्रिमियात सत्तापालट करून कठपुतळी राजवट बसवली. या दोन्हींमागची त्या देशाची कार्यशैली तीच. असत्य मोठय़ा प्रमाणावर पसरवायचं. सत्य जमेल तितकं दाबून, गाडून टाकायचं आणि यास जो कोणी विरोध करेल त्याच्या अंगावर या दुष्ट, कराल जल्पकांच्या झुंडी सोडायच्या. या अशा मार्गानं रशियानं सत्य दडपून टाकलंच आणि त्या जागी आपल्याला हव्या त्या कथानकाची बेमालूम पेरणी केली. त्यासाठी त्यांनी अनेकांच्या नावे बनावट ऑनलाइन खाती तयार केली. त्यांतून प्रचंड उलाढाल होत गेली. वास्तविक हे सारं होत होतं अमेरिकी कंपन्यांनी जगाला दिलेल्या विविध माध्यमांतून वा माध्यमांत. पण त्यांना याचा गंधही नव्हता. का? ते खूश होते आपल्या फेसबुक, ट्विटर आदी माध्यमांतली वाहतूक वाढली यात. त्यांना आर्थिक फायदा मिळत होता, म्हणून ते खूश आणि याकडे दुर्लक्ष म्हणून रशिया खूश. दारावरचे रक्षक, चौकीदार आणि चोरी करू पाहणारे यांचे हितसंबंध जुळून आल्याचं इतकं चांगलं दुसरं उदाहरण नसेल.

यानंतर जगाला खऱ्या अर्थानं जाग आली. पण आता हे तंत्रज्ञान फिलिपिन्सचा हुकूमशहा डय़ुटर्टे याच्यापासून ते ब्रेग्झिट ते ट्रम्प यांच्यापर्यंत सर्वाकडून वापरलं जाणार होतं. म्हणजे २०१४ साली जे घडलं त्याच असत्यकथन आणि प्रचार याच्या जोरावर जगात हे सगळं घडणार होतं. त्यानंतर बरोबर आठ वर्षांनी युक्रेनमध्ये दांडगाई करण्यासाठी व्लादिमीर पुतिन यांनी पुन्हा याच तंत्राचा अवलंब केला. त्यानंतर एका महिन्याच्या आत फिलिपिन्स गाळात गेला. ९ मार्च २०२२ हा फिलिपिन्समधला मतदानदिन. लेनी रॉब्रेदो आणि धाकटे फर्डिनंड मार्कोस हे दोनच उमेदवार या निवडणुकीत महत्त्वाचे होते. हा मार्कोस म्हणजे फिलिपिन्सचे हुकूमशहा मार्कोस यांचा मुलगा. हजारो पादत्राणांच्या जोडय़ांसाठी गाजली ती इमेल्डा मार्कोस या उमेदवाराची आई. तर मार्कोसनं मतदानात सुरुवातीलाच मोठी आघाडी घेतली. ती पुढे वाढतच गेली.

या मार्कोसचं हे प्रतिमा-संवर्धन हा माहिती तंत्रज्ञानाच्या बदफैली वापराचा नमुना. यातून एका खलनायकाचं रूपांतर नायकात झालं. यासाठी समाजमाध्यमांतल्या अनेक खात्यांवरनं माहितीची मोठी उलाढाल झाली. यात लक्षात घ्यावी अशी बाब म्हणजे यातली बरीचशी खाती ही फिलिपिन्सबाहेरचीच होती. सगळय़ात जास्त चीनमधली. यातलं एक खातं तर फेसबुकलाच २०२० साली बंद करावं लागलं होतं, इतकं बनावट होतं. या साऱ्या निवडणुकीत इतका सत्यापलाप झाला की त्यास तोड नाही. निवडणुकांत सत्यच दडपलं जाणार असेल तर निवडणुका या खऱ्या निवडणुकाच रहात नाहीत. सत्यापलाप झाला. इतिहास बदलला. मार्कोस जिंकले. इतकं हे साधंसोपं आहे.

आज गरज आहे, ती या समाजमाध्यमातनं प्रसवल्या गेलेल्या आणि अक्राळ-विक्राळ झालेल्या ब्रह्मराक्षसाला आवरायची. त्यासाठी जागतिक पातळीवर काही संस्थात्मक उभारणी करण्याची. यांतून तयार होणाऱ्या फॅसिस्ट हुकूमशहांना रोखण्यासाठी असं काही करायची गरज आहे. कारण लोकशाही नाजूक असते. तिला अलगदपणे जपावं लागतं. जे लोकशाहीला गृहीत धरून चाललेत त्यांनी आमच्या उदाहरणावरून शिकावं. जेव्हा व्यक्तीची/ समाजाची स्मरणशक्तीच इतक्या प्रमाणावर बदलता येते तेव्हा इतिहास आहे तसा टिकवणं हेच आव्हान ठरतं. म्हणून प्रत्येकाला माझा एकच प्रश्न आहे- सत्यरक्षणार्थ तुम्ही काय करू शकता?’’ल्ल ल्ल ल्ल

मारिया रेस्सा या फिलिपिनो तुरुंगात खितपत पडलेल्या नोबेल विजेत्या पत्रकार-लेखिकेच्या आगामी ‘हाऊ टु स्टँड अप टु अ डिक्टेटर’ या पुस्तकावर आधारित. ‘द गार्डियन’मध्ये यावर नुकताच एक वृत्तांत प्रसिद्ध झाला. वरचा मजकूर हा त्याचा काही भाग.

 आणि आता ते सत्य-  डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष होत असताना त्यांचे आभासी जगातले सर्वाधिक फॉलोअर्स हे बिगर-अमेरिकी होते आणि अशा दर २७ फॉलोअर्समधला एक फिलिपिनो होता.

girish.kuber@expressindia.com
@girishkuber

Story img Loader