डॉ. उज्ज्वला दळवी

नो फॅट, कीटोसारख्या आहारखुळांमुळे वजन कमी होईलही, पण आरोग्य राखलं जाईल का?
‘केव्हा एकदा चिकन विंग्जची मोठ्ठी बकेट खाते असं झालंय मला!’
योषा वजन कमी करण्यासाठी ‘नो फॅट डाएट’ म्हणजेच ‘नि:स्निग्धपथ्य’ करत होती. तेल-तूप-लोणी-चीझ.. सग्गळे स्निग्ध पदार्थ वज्र्य करून, हव्या तेवढय़ा उकडलेल्या भाज्या खाऊन १५ दिवस तपश्चर्या करायची होती. पण चिकन विंग्ज, डाळवडे, सामोसे या रंभा-उर्वशी-मेनका मन:चक्षूंसमोर नाचून सतत तपोभंगाचा मोह जागवत होत्या.

slow walking
Weight Loss : वजन कमी करण्यासाठी हळू चालणे फायदेशीर ठरू शकते? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात….
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
Blood purification center, Kama Hospital,
मुंंबई : जी. टी. आणि कामा रुग्णालयातही रक्तशुद्धीकरण केंद्र
Health Special Stomach gas causes symptoms and control measures hldc
Health Special: पोटातील गॅस: कारणे, लक्षणे आणि नियंत्रण उपाय  (भाग १)
Seven Foods Help To Fight Inflammation
Foods Help Fight Inflammation : शरीरातील सूज कमी करून आजारांपासून राहा चार हात लांब; ‘या’ पदार्थांचा आहारात नक्की समावेश करा, वाचा तज्ज्ञांचा सल्ला
Papaya Leaf Water Benefits in Marathi
Papaya Leaf Water Benefits : आठवड्यातून तीनदा प्या पपईच्या पानांचे एक कप पाणी; जाणून घ्या मधुमेहापासून त्वचा-केसांच्या आरोग्यापर्यंतचे असंख्य फायदे
changing health economics and management are overburdening our government health system
आरोग्यव्यवस्थेचे बदलते अर्थकारण रुग्णाला मेटाकुटीला आणणारे
Four 4 surprising habits would never do
Four habits : तुम्हीसुद्धा काम करताना मांडी घालून बसता का? आरामदायक वाटणारी स्थिती या आरोग्य समस्यांना देते आमंत्रण; वाचा डॉक्टरांचा सल्ला

तसं योषाचं वजन आणि आहारसुद्धा मुळात फार नव्हताच. पण तिला सिनेतारकांसारखी झिरो फिगर हवी होती. म्हणून तिने भरमसाट पैसे खर्चून पर्सनल डाएटिशियनकडून तो नि:स्निग्धपथ्याचा १५ दिवसांचा वसा घेतला होता. वर्षांतून एकदोनदाच चिकन विंग्ज खाणाऱ्या योषाला वसा घेतल्यापासून मात्र त्या मोठ्ठय़ा बकेटच्या विचाराने झपाटलं होतं.

१५ दिवसांत तिचं वजन दोन किलोने घटलं. त्याबरोबर तिने केएफसी आणि आइस्क्रीमवर ताव मारला. ‘वजन नाहीतरी घटलंच आहे. थोडं खायला हरकत नाही,’ अशी मनाची समजूत घालत तिने रोज तो पुख्खा झोडला. पुढच्या महिन्याभरात तिचं वजन चार किलोंनी वाढलं!
मग तिने फक्त पिष्टमय पदार्थ वज्र्य करणारं, हवं तेवढं तेल-तूप-मांस खाऊ देणारं ‘कीटो-पथ्य’ सुरू केलं. त्याने तिची भूक मंदावली. वजन कमी झालं. तिने आनंदाने पथ्य चालू ठेवलं. पण मग तिला मुतखडा झाला. रक्ताच्या तपासण्यांत तिचं कोलेस्टेरॉलही फार वाढल्याचं कळलं. डॉक्टरांनी कीटो डाएट बंद करायला सांगितलं.

तशी आहारखुळं नवी नाहीत. सव्वीसशे वर्षांपूर्वीचे ऑलिम्पिक खेळाडू फक्त चीझ, अंजीर आणि लापशी खाऊन स्पर्धेत भाग घेत. एकोणिसाव्या शतकातल्या रमणी नाजूकपणा टिकवायला आर्सेनिकच्या विषारी गोळय़ा घेत किंवा जेवणासोबत वळवळते जंत गिळत! १८६२मध्ये बँटिंग नावाचा दोनशे पौंड वजनाचा माणूस पिष्टमय पदार्थ वज्र्य करून बारीक झाला. त्याने पत्रक काढून ते जगजाहीर केलं. त्यानंतर मात्र त्याने आयुष्यभर ‘माफक चौरस आहार, नियमित व्यायाम’ हा मंत्र पाळला आणि तेही नमूद करून ठेवलं.

नि:स्निग्धपथ्य, कीटो पथ्य, आदिमानवासारख्या आहाराचं पॅलिओ डाएट (पुरातनपथ्य) यांच्यासारख्या अनेक आहारपद्धती ही विसाव्या-एकविसाव्या शतकाची खास आहारखुळं आहेत. हल्ली मुठीतला अल्लाउद्दीनचा मोबाइल-राक्षस टिचकीसरशी पिझ्झा-बिर्याणी-आइसक्रीम, चित्तथरारक सिनेमे आणि गुंगवणारे संगणकी खेळ समोर हजर करतो. त्या साऱ्याची चटक लागते. बैठं काम, बिझिनेस लंच, शोफर ड्रिव्हन कार यांच्या दुष्टचक्रात अडकलेले यशस्वी व्यावसायिक, ‘मला प्रकृतीची काळजी घ्यायलाच हवी’ असं मनाशी घोकत असतात. पण ‘काळजी’ म्हणजे काय ते समजून घ्यायला त्यांना वेळ नसतो. ‘मोजका आहार, नियमित व्यायाम’ हा वजन घटवणारा साधा उ:शाप लोकांना जुनाट, कंटाळवाणा वाटतो. त्यांना आठवडय़ात वजन झटपट कमी करणारा, फॅशनेबल उपाय हवा असतो.

आहारखुळं बरोब्बर तीच मानसिक गरज भागवतात. लोकांना जादूने एका आठवडय़ात दोन किलो कमी करणारा चमत्कार देऊ करतात. प्रत्येक नवं आहारखूळ ‘रक्तगटानुसार आहार’, ‘अमुक हॉर्मोन’, ‘तमुक चयापचयक्रिया’ वगैरे शब्दबंबाळ जादूई वलय स्वत:भोवती घेऊन जुन्याशी स्पर्धा करतं. त्याची ‘आठवडय़ात किलोभर वजन घटेल’, ‘शरीरातली विषं निघून जातील’, वगैरे जाहिरात नटनटय़ांची, सुप्रसिद्ध लोकांची उदाहरणं देत मोठय़ा खुबीने केली जाते. त्या जादूच्या जालात मासे बरोब्बर अडकतात. ‘आपण मार्गदर्शकांना पैसे देऊन, आवडीचे खाद्यपदार्थ वज्र्य करून आपल्या प्रकृतीसाठी मोठ्ठं काहीतरी करतो आहोत’, ‘तपश्चर्या केली की फळ मिळेल. जितकी तपश्चर्या कठीण तितकंच फळही उत्तम’ या भ्रमाची त्यांना झिंग चढते.
प्रत्येक आहारखूळ कुठल्या तरी खऱ्या-खोटय़ा, अति ताणलेल्या तत्त्वावर आधारलेलं असतं. त्याला शास्त्रशुद्ध प्रयोगांचं फारसं पाठबळ नसतं. पण ‘या एकाच आहार-तपाने लठ्ठपणाच्या पापाचं झटपट परिमार्जन होतं,’ असा त्याचा बराच बोलबाला समाजमाध्यमांतून होतो. नो फॅट डाएट म्हणतं ‘तेला-तुपाचं खाल्लं की त्या स्निग्ध पदार्थाचं सरळ चरबीत रूपांतर होतं. म्हणून थोडे दिवस तेलातुपाचे सगळे पदार्थ वज्र्य करायचे.’ कीटो-पथ्य म्हणतं, ‘भात-पोळी-पाव, गोडधोड खाल्लं की रक्तातली साखर वाढते. ती कमी करायला इन्सुलिन वाढतं. ते त्या साखरेपासून चरबी बनवतं. म्हणून पिष्टमय पदार्थ, गोडधोड अजिबात खायचं नाही. तेल-तूप-मांस-मासे-अंडी हवी तेवढी खा.’ प्रत्येक पथ्याचा महागडा सल्ला देणाऱ्या नामांकित कंपन्या रोज घेण्यासाठी एखादं सूप, व्हिटॅमिन-पूड किंवा चक्क प्रोटीन-चॉकलेट देतात आणि त्याचाही घसघशीत मोबदला घेतात. वजन घटलं नाही तर पुढचा सल्ला अधिक महाग होतो.

पण शरीराला चौरस आहाराची गरज असते. बहुतेक आहारखुळांत चौरस आहारातला एक मुख्य घटक पूर्णपणे वज्र्य करायची अट असते. पण तसं केलं की शरीरात कसली ना कसली कमतरता होते. तिचे गंभीर दुष्परिणाम सतावतात. जो घटक पूर्णपणे वज्र्य केलेला असतो त्याची आठवण अहोरात्र मनाला पछाडते. ‘केव्हा एकदा तो खाईन,’असं होतं. कुटुंबाबरोबर पंगतीत जेवायला बसता येत नाही. वजन कमी करण्याच्या ताणामुळे शरीरातलं कॉर्टिसॉल हे स्टीरॉइड हॉर्मोन वाढतं. भूक वाढते. खाल्लेलं अधिक प्रमाणात अंगी लागतं. शिवाय तो वज्र्य घटक सोडला तर बाकी सगळय़ा खाण्यावर कसलेही निर्बंध नसतात. पण अगदी उकडलेला पालाही हव्वा तेवढा खाल्ला तर वजन वाढू शकतं. तरीसुद्धा आटोकाट प्रयत्न करून वजन घटवलं, तपश्चर्या संपली की धरबंध सुटतो. घटलेलं वजन दामदुपटीने वाढतं.

कीटोपथ्य फार दिवस चालू राहिलं तर मूत्रिपडं निकामी होण्याचीही भीती असते. काही पथ्यं तर म्हणे शरीरातली विषं कमी करतात. पण आपल्या शरीरात रोजच वेगवेगळी विषं बनतात. आपलं यकृत (लिव्हर) आणि मूत्रिपड (किडनीज) दर क्षणाला ती विषं टिपून काढून टाकायचं काम इमानेइतबारे करत असतात. त्यासाठी वेगळी आहार-तपश्चर्या करायची गरज नसतेच.

तरीही मनोभावे तपश्चर्या केली तर आहारखुळांनी १५ दिवसांत, महिन्यात वजन खरोखरच एक-दोन किलोंनी घटतं. पण बऱ्याच वेळा त्यात फक्त शरीरातलं पाणी कमी होतं. शरीर नावाची सुगृहिणी ऊर्जेची काटकसर करायला शिकते. तुटपुंज्या आहारातून मिळणाऱ्या ऊर्जेत आवश्यक कामकाज सुरळीत व्हावं म्हणून कमी महत्त्वाची कामं कमी ऊर्जेत भागवली जातात. पथ्य संपलं तरी शरीर ती काटकसर विसरत नाही. नेहमीच्या माफक जेवणातूनही ऊर्जेची शिल्लक अधिक उरते. मोजक्या जेवणानेसुद्धा चरबीच्या मुदतठेवी वाढतात, वजन चढतं. योषासारखी माणसं जन्मभरात पुन्हापुन्हा पथ्य करत राहतात. प्रत्येक नव्या प्रयत्नात वजन कमी करणं अधिकाधिक कठीण होत जातं. शेवटी, ‘माझं हवेनेही वजन वाढतंच!’ असा निष्कर्ष काढून गरीब बिचारे पथ्याचा नाद सोडून देतात.

अनियंत्रित समाजमाध्यमांनी दिशाभूल केल्यामुळे त्या बिचाऱ्यांच्या आयुष्याचं नुकसान होतं. समाजमाध्यमांवरच्या चुकीच्या जाहिरातबाजीला जाणकारांकडून येणारी अधिकृत माहितीच शह देऊ शकते. जाहिरातींच्या भडिमाराला क्वचित कधीतरी गुळमुळीत उत्तर देऊन फायदा होणार नाही. मोठय़ा वैद्यकीय शिक्षणसंस्थांमधल्या तज्ज्ञांनी याच समाजमाध्यमांतून, सर्वसामान्यांना समजेल अशा सोप्या भाषेत योग्य मार्गदर्शन केलं पाहिजे. त्याच्यात त्यांना सरकारचं पाठबळ मिळालं तर प्रत्येक अवाजवी जाहिरातीतला खोटेपणा जाणकार त्याच माध्यमातून उघडकीला आणू शकतील. त्यातून आहारखुळांचे काळे धंदे करणाऱ्या दुष्टांना जरब बसेल.

मग लोक अवाजवी अपेक्षा, चुकीचे बडेजावी मार्ग, धरसोड वृत्ती सोडून नेहमीच चार घास कमी खातील. माफक जेवणात मेडिटेरानियन पथ्याप्रमाणे भाज्या-फळं-कोशिंबिरीतलं वैविध्य जपतील, वारंवार रुचिपालट करतील. नियमित, सोपा, पुरेसा व्यायाम करतील. तीन-चार वर्षांत १५० किलोंची वजनकहाणी ६० किलोंत सुफळ झाली तरी उतणार नाहीत, मातणार नाहीत, घेतला वसा टाकणार नाहीत.

लेखिका वैद्यकीय व्यवसायातून निवृत्त आहेत.
ujjwalahd9 @gmail. com