डॉ. उज्ज्वला दळवी

ज्या मानवी पूर्वग्रहांचा फैलाव वर्षांनुवर्षे होत राहिला होता, ते ‘कोविड’च्या लशीनं दूर केले का? समाज-मानसशास्त्र काय सांगतं?

Ancient Egypt medicine Serqet goddess
Ancient Egyptian History: ४,१०० वर्षांपूर्वीच्या इजिप्तमधील फॅरोचे उपचार करणाऱ्या डॉक्टरचा शोध लागला; का आहे हा शोध महत्त्वाचा?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Correlation between geological events and their time
कुतूहल : भूवैज्ञानिक कालमापन
Health Special , HMPV , careful , Health ,
Health Special : एचएमपीव्हीला (HMPV) घाबरू नका पण काळजी घ्या
Supriya sule and pankaja Munde
Supriya Sule : “बीडची बदनामी केली जातेय”, पंकजा मुंडेंच्या टीकेवर सुप्रिया सुळेंचा पलटवार; म्हणाल्या, “कोणताही जिल्हा…”
wardha deoli Shantanu raut
जगातील बारात ‘हा’ एकमेव भारतीय, नोबेल विजेत्याच्या नावे असलेला फेलोशिप सन्मान पटकावला
Toxic semen kill female mosquitoes australia
डासांच्या निर्मूलनासाठी विषारी वीर्याचा वापर; त्यामुळे जीवघेण्या आजारांचा प्रसार कमी कसा होणार?
2 year old girl die while playing due to car accident
नागपूर : दोन वर्षीय चिमुकलीने आईच्या कुशीत सोडला जीव…

‘‘करोनाच्या लशीने पुरुषत्व जातं’’, ‘‘घाईघाईत बनवलेली लस! ती घेऊनच करोना होतो!’’, ‘‘गोंद्याने लस घेतली आणि त्याच्या अंगावरून वारं गेलं.’’- ही विधानं फार तर दोन-अडीच वर्षांपूर्वीची. जगभरात थैमान घालणाऱ्या कोविडशी लढायला शास्त्रज्ञांनी शर्थीच्या प्रयत्नांनी लस बनवली. तिच्याबद्दल नको नको त्या वावडय़ा उठल्या. सुशिक्षितांनाही भयाने पछाडलं मग अशिक्षितांची काय कथा? काही जण ठरल्या दिवशी लसीकरण केंद्रावर पोहोचलेच नाहीत. तेवढी लस वाया गेली. इतकं का भय वाटलं लोकांना?

पूर्वीपासून लस या प्रकाराबद्दलच जगाच्या सामाजिक मानसिकतेत मोठा भयगंड जोपासलेला आहे. खरं तर देवीचा आजार टाळायचा लस हा उपाय २२०० वर्षांपूर्वीपासून आशियात-आफ्रिकेत होता. आजाऱ्याच्या फोडांतली लस टोचली की सौम्य आजार होतो आणि जीवघेणं दुखणं टळतं हे त्या काळातही माहीत होतं. त्या जिवंत लशीला कसलंही नियमन नव्हतं. जादा लस टोचली गेली तर खराखुरा देवीचा आजार होऊन मरणही येत होतं. पण तो स्वेच्छेचा मामला असल्यामुळे त्याला विरोधही नव्हता. उलट उस्मानी साम्राज्यातली तशी लस आपल्या मुलांना टोचून घ्यायचा हट्ट धरून लेडी मॉंटेग्यूने ती लस १७२१मध्ये युरोपात नेली आणि रुळवली.

मग १७९६मध्ये देवीची विज्ञानसिद्ध लस आली. तेव्हाही, ‘ती लस टोचल्यावर माणसाचं गायीत रूपांतर होतं,’ अशी आवई उठली होती. प्राण्यांच्या घाणेरडय़ा फोडांतल्या पुवाने आपलं शरीर विटाळणं अनेकांना पसंत नव्हतं.

अठरा-एकोणिसाव्या शतकात औद्योगिक क्रांतीनंतर कारखान्यांतले कामगार दाटीवाटीनं राहू लागले. साथी फैलावल्या. १८५३मध्ये ब्रिटिश सरकारने देवीचं लसीकरण सक्तीचं केलं तेव्हा ‘आमच्या शरीरात दुसऱ्यांची ढवळाढवळ नको,’ म्हणत लसविरोधी सेना उभ्या ठाकल्या. लाखांच्या जमावाने तान्ह्या बाळाच्या शवपेटिकेसह मोर्चा काढला.  लसविरोधक चळवळ संपूर्ण युरोपात पसरली. १९०२मध्ये अमेरिकेत एका माणसाने ‘लस घेणार नाही,’ म्हणून बंड पुकारलं. ‘कुणा एकाला आपल्या मर्जीने अनेकांचं आरोग्य धोक्यात आणायचा हक्क नाही,’ अशा तत्त्वानुसार सरकारने त्याला कोर्टात खेचलं आणि खटला जिंकला. 

१९५४मध्ये पोलिओची लस आली. पंचावन्न साली लशीमध्ये चुकून जिवंत दमदार व्हायरस राहून गेला. त्याने साथच फैलावली. पण पोलिओच्या अपंगत्वाने हैराण झालेल्या आईबापांना लस हवीच होती. त्यांनी चूक पदरात घेतली. लसीकरण बिनबोभाट चालू राहिलं. नंतर गोवर-गालगुंडांची लस आली. ते आजार लोकांच्या मते सौम्य होते.  म्हणून लसविरोधी मोहीम निघाली. घटसर्प-डांग्याखोकला-धनुर्वाताची लस निघाली तेव्हा तर ‘डांग्या खोकल्याच्या लशीने मेंदूवर परिणाम होतो, स्वमग्नता येते, आकडी येते’ असा बोभाटाच झाला. समाजमाध्यमांनी लोकांची समजूत घालायची सोडून तशा भयानक दुष्परिणामांच्या हृदयद्रावक कहाण्यांचा गदारोळ उठवला. अनेक आईबाप कोर्टात धावले. त्यांना वैज्ञानिक पाठबळ द्यायला त्यांच्याकडून लाच घेऊन एका तालेवार शास्त्रज्ञाने लॅन्सेट या मातबर मासिकात खोटा शोधनिबंध लिहिला! एका आईने आपल्या पीडित बाळावर हृदयस्पर्शी कादंबरी लिहिली. टीव्हीवरच्या लोकप्रिय कार्यक्रमांत त्या आईची मुलाखत झाली. त्या सगळय़ा खटाटोपाचा खोटेपणा नंतर जाहीरपणे सिद्ध झाला. पण समाजमनात लशींविषयी निर्माण झालेला पूर्वग्रह कायम राहिला. वैश्विक खेडय़ात त्याचीच साथ सर्वत्र पसरली.

त्या वैचारिक साथीवर ठिकठिकाणच्या शास्त्रज्ञांनी संशोधन केलं.

ज्यांनी पूर्वायुष्यात अन्याय, अत्याचार, फसवणूक अनुभवलेली असते ते लोक कुठल्याही अनोळखी गोष्टीविषयी साशंक असतात. सरकारच्या सुधारणांतही ते छुपा अन्याय शोधतात.

न्यूझीलंडमधल्या डुनेडिन गावात १९७२-७३च्या वर्षांत जन्मलेल्या हजार मुलांच्या आयुष्याच्या अनेक पैलूंचा आणि टप्प्यांचा अभ्यास संशोधकांनी निरंतर पन्नास वर्ष चालू ठेवला आहे. त्या हजारांपैकी जे १३ टक्के लोक कोविडची लस घेणार नव्हते त्यांचं बालपण व्यसनी आईबाप, उपेक्षा, छळ यांनी खडतर झालेलं होतं.

पिढय़ानपिढय़ा अत्याचारांनी पीडलेले अमेरिकेतले आफ्रो-आशियाई, ऑस्ट्रेलियातले आदिवासी, भारतातले वंचित लस घ्यायला तयार होत नाहीत. ती फुकट देऊ केली की शंका बळावते. त्यातून लसीकरण सक्तीचं झालं की तर बंडाचे झेंडे फडकतात. योग्य शिक्षणामुळे तशा शंकांचं निराकरण होऊ शकतं. पण ज्या  गटांत पूर्वग्रह असतात त्यांच्यात शिक्षणाचं प्रमाणही कमी असतं. समाजमाध्यमांवर पसरणाऱ्या खोटय़ा, भावुक प्रचाराला ते बळी पडतात. एकदा पूर्वग्रह मनात तयार झाला की ते लोक त्या गैरसमजाला पूरक असणारी माहितीच शोधून काढतात आणि तिच्यावरच विश्वास ठेवतात. त्या प्रवृत्तीला ‘डिनग- क्रूगर इफेक्ट’ असं म्हणतात (डेव्हिड डिनग व जस्टिन क्रूगर या अमेरिकी समाज-मानसशास्त्रज्ञांनी या पूर्वग्रहाचा अभ्यास केला). त्यामुळे पूर्वग्रह बळकट होतो. त्यांना रोगाचं गांभीर्य नीट समजत नाही. ‘माझी प्रकृती ठणठणीत आहे. मला काही होणार नाही. उगाच दुसऱ्यांनी ढवळाढवळ करू नये,’ असा खुळा आत्मविश्वास नडतो. ‘लस घेऊन दुष्परिणाम सोसणं म्हणजे स्वत:च्या हाताने पायावर धोंडा पाडून घेणं,’ असाही विचार ते करतात.  

कोविडचा आजार सगळय़ा वैद्यकीय जगालासुद्धा पूर्णपणे अनपेक्षित, अनोळखी होता. अधिकृत वैद्यकीय संस्थांकडून मिळणाऱ्या माहितीत सुसंगती नव्हती. साथीविषयीचं ज्ञान जसजसं वाढलं तसतशा अधिकृत सूचनाच उलटसुलट बदलल्या, ‘बाहेरून येणारी प्रत्येक गोष्ट धुवा’ आणि मग त्याउलट ‘फार धू-पूस करायची गरज नाही’, ‘गरमगरम वाफ घ्या’ म्हणून नंतर ‘वाफेने फायदा होत नाही’. लोक गोंधळले. शिवाय कोविडची लस बनली ती वादग्रस्त असलेल्या जेनेटिक इंजिनीअिरगने! तीसुद्धा फार थोडक्या वेळात! लोकांना साशंक व्हायला अनेक कारणं होती. देशोदेशींच्या स्वार्थी मूर्खानी त्यांचं राजकारण केलं. अनोळखी रोगाच्या भयापेक्षा लशीविषयीचं ओळखीचं भय बलवत्तर ठरलं. टेनिसपटू नोवाक जोकोविचसह अनेकांनी लस नाकारली.

एकविसाव्या शतकातल्या घडामोडी बघता कोविड ही पुढच्या अनेक महासाथींची नांदी म्हणावी लागेल. जंगलतोड करून मनुष्यवस्ती प्राण्यांच्या घरात घुसते आहे. प्राण्यांना हद्दपार व्हायला जागाच उरलेली नाही. त्यामुळे प्राणी-मानव घसट वाढत जाणार. नवे रोग प्राण्यांतून माणसांत येणार आणि वेगवान प्रवासामुळे जगभर पसरणार. वैश्विक तापमानवाढीमुळे ध्रुवांजवळची कायम गोठलेली (पर्माफ्रॉस्ट) जमीन जागी होते आहे. तिच्यात शेकडो सहस्रकं सुप्त राहिलेले जंतू आळोखेपिळोखे देताहेत. त्यांना शह देणारी जय्यत प्रतिकारशक्ती मानव, पशुपक्षी, वनस्पती यांच्यातल्या कुणाकडेही नाही. नवलाईच्या भन्नाट साथी फैलावायची शक्यता मोठी आहे. तशा परिस्थितीत वेगाने बनवलेली लस हाच तरणोपाय ठरेल. त्यावेळी लसविरोधी बंडांचा बीमोड करायला हातात पुरेसा वेळही नसेल. तेव्हा काय करायचं?

त्यावर कोविड-लढय़ानं थोडं मार्गदर्शन केलं आहे. १३ टक्के लसविरोधक असलेल्या न्यूझीलंडच्या गावात ८७ टक्क्यांऐवजी  ९५ टक्के लोकांनी लस घेतली. भारतात मार्च २०२३ पर्यंत सुमारे ८८ टक्के लोकांनी दोन्ही डोस घेतले होते. धारावीतल्या अशिक्षित, गरीब, कमी शिकलेल्या, कमाल दाटीवाटीच्या वस्तीत कोविडची साथ कह्यात राहिली. कसं साधलं ते? 

न्यूझीलंडमध्ये स्थानिक नेत्यांनी लोकांची भीती समजून घेतली, शंका दूर केल्या. प्रत्येक माणसापर्यंत योग्य सल्ला प्रत्यक्ष पोहोचवला. त्या समाजधुरीणांवर लोकांचा विश्वास होता. पूर्वग्रह दूर व्हायला मदत झाली. धारावीत तर राजकीय नेते, डॉक्टर, धर्मगुरू, पोलीस आणि तरुण मुलं यांनी कोविडविरोधी सेनाच तयार केली. लोकशिक्षणावर भर दिल्यामुळे आजाराचं लक्षण दिसल्याबरोबर लोक आपणहूनच दवाखान्यात गेले. सर्वाना शहाणपणाची लागण झाली. लस घेणं आपसूकच घडलं. तिथले एक पोलीस ऑफिसर म्हणाले, ‘‘हा तर पहिला अध्याय आहे. ‘साथ यायच्या आधीपासून कसं सज्ज राहायचं’ या दुसऱ्या अध्यायाची आम्ही तयारी करतो आहोत.’’ 

आता ‘एक्स’ विषाणूची चर्चा असताना तो दुसरा अध्याय प्रत्येक देशाने, गावाने, गल्लीने अंगी बाणवायला हवा. गावोगावच्या साक्षर-निरक्षर, गरीब-श्रीमंत, उच्चभ्रू-दलित सगळय़ांना येऊ घातलेल्या साथींच्या शक्यतेविषयी माहिती आधीपासून द्यावी. ते काम जाणत्या गावकऱ्यांनीच करावं. लोकांच्या शंका, पूर्वग्रह समजून घेऊन त्यांचं निराकरण करावं. त्यांना प्रत्येक नव्या साथीसाठी नवी लस मनापासून स्वीकारायला तयार करावं. फुकटची लस आणि सक्तीची लस यांना आजवर विरोध झाला आहे. प्रत्येक नवी लस कमी किमतीची पण विकतची असावी. लोकशिक्षणामुळे सक्तीची गरज लागू नये.

सरकारच्या आणि शास्त्रज्ञांच्या प्रयत्नांना जनतेचा जाणीवपूर्वक पाठिंबा मिळाला तरच भविष्यातल्या साथींवर सरशी करणं शक्य होईल.

Story img Loader