डॉ. उज्ज्वला दळवी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सगळय़ा जंतूंनी एकमेकांसह उत्तम काम केलं की झालं. जंतुसमुदायाचं संतुलन बिघडलं तर मात्र अनारोग्य वाढू लागतं..

‘‘दहा सेकंदांत ९९ टक्के जंतूंपासून संरक्षण!’’ – साबणाच्या जाहिरातीत धुतलेल्या हातावरचे एकूणएक जंतू नाहीसे होताना दाखवले जातात. जंतू हे शत्रूच असतात, त्यांचा नायनाट करणं उत्तम अशी आतापर्यंत शास्त्रज्ञांचीही खात्रीच होती. पण नव्या वैज्ञानिक तंत्रांमुळे आणि संगणकाच्या मदतीने जंतूंविषयी अनेक नव्या गोष्टी समजल्या आहेत. मित्रजंतूंविषयी भरपूर अभ्यास होतो आहे.

आपल्या मानवी पेशींच्या संख्येच्या तिप्पट, एक कोटी कोटी (एकावर १४ शून्यं) जंतू आपल्या शरीरात कायम वस्तीला असतात. त्यांचा शरीराशी मस्त घरोबा, सुसंवाद चालतो. माणसाची जनुकसंख्या २२ हजार तर शरीरातल्या सगळय़ा मित्रजंतूंचे मिळून जनुक-मॅनेजर्स ३३ लाख! ते सगळे कामसू जनुक एकजुटीने, संगनमताने माणसाचं शरीर ‘मॅनेज’ करतात.

त्या जंतुसमुदायाचा सगळय़ात मोठा भाग असतो मोठय़ा आतडय़ात. त्याची पहिली तुकडी जन्माच्या वेळी, आईच्या योनिमार्गातल्या जंतूंकडून येते. पहिल्या स्तनपानाच्या वेळी आईच्या त्वचेवरचे जंतू पहिली कुमक आणतात. आईचे-सुईणीचे हात, वाटी-चमचा, दूध-पाणी पुढची रसद पुरवतात. खाणंपिणं, आप्तेष्टांचा संसर्ग, प्राणी- माती- झाडं यांचा संपर्क त्या जंतुभारात सतत भर घालतो. आपले जनुक आणि जीवनशैली आपला स्वत:चा खास जंतुसमुदाय घडवतात. तो आपल्या बोटांच्या ठशांइतकाच (िफगरिपट्र्स) एकमेवाद्वितीय असतो. एकसारख्या दिसणाऱ्या जुळय़ांच्याही जंतुसमूहांत खूप वेगळेपणा दिसतो! वजनाने मेंदूच्या, यकृताच्या जवळपास असलेला तो सूक्ष्म जीवसमुदाय आपल्या शरीराचा अविभाज्य, अत्यावश्यक अवयवच असतो!
इंग्लंडच्या किंग्ज कॉलेजने इतर देशांतल्या मोठय़ा संस्थांसोबत त्या जंतुसमुदायाचा मोठा अभ्यास केला आहे. आहाराशी, जीवनपद्धतीशी असलेल्या त्याच्या संबंधांवर अमेरिकेच्या राष्ट्रीय आरोग्य संस्थेनेही (एनआयएच) बरंच संशोधन केलं आहे. आजवर माहीतही नसलेल्या जंतूंच्या जनुकांचे आतडय़ातल्या पेशींवर, रसायनांवर होणारे परिणाम आणि त्याच्यामुळे मानवी आरोग्यात होणारे फेरफार शास्त्रज्ञांना आता समजले आहेत.

आतडय़ात सुमारे एक हजार जंतुप्रजाती असतात. त्या बाहेरून येणाऱ्या उपद्रवी पदार्थाचा आणि जंतूंचा नायनाट करतात. भाज्यांतला, कोंडय़ातला तंतुमय भाग न पचता मोठय़ा आतडय़ापर्यंत पोहोचतो. तिथं जंतूंच्या पाचक रसांमुळे त्याच्यापासून माणसासाठी पोषक, उपकारक घटक बनतात. त्यांचा स्नायूंच्या कामकाजाला फायदा होतो. शिवाय त्यांच्यामुळे कॅन्सर आणि आतडय़ाचे इतरही दुर्धर आजार टाळायला मदत होते. शरीराला लागणारं बरंचसं क-जीवनसत्त्व ते जंतू बनवतात. त्यांनी बनवलेलं ब-जीवनसत्त्व मात्र तिथल्या जंतूंच्या निरोगी वाढीसाठीच वापरलं जातं.

एकमेकांना झटून हातभार लावणाऱ्या त्या जंतूंमध्ये वैविध्य जेवढं अधिक तेवढी माणसाची प्रकृती उत्तम राहाते. भारतातल्या वेगवेगळय़ा भागांतल्या लोकांच्या जंतुसमुदायाचा अभ्यास सुरू आहे. सिक्कीमचे लोक रोज तऱ्हेतऱ्हेच्या रानभाज्या खातात. दक्षिण भारतीयांच्या आहारात वेगवेगळे धान्यप्रकार असतात. त्यांचे जंतुसमूह अधिक वैविध्यपूर्ण! त्यांच्यात हानिकारक जंतू नसतातच असं नाही. पण त्यांनाही सामावून घेतलं जातं. सगळय़ा जंतूंनी एकमेकांसोबत एकदिलाने उत्तम काम केलं की झालं. काही कारणामुळे त्या जंतुसमुदायाचं संतुलन बिघडलं की अधिक आजारपणाची शक्यता वाढते.
संतुलन बिघडायची कारणं जन्मापासूनच सुरू होतात. जन्म नैसर्गिक मार्गाने न होता सिझेरियन करावं लागलं, स्तनपान लाभलं नाही तर जंतुसमुदायाचं फार नुकसान होतं. पुढल्या वयात सांसर्गिक आजार, अॅलर्जी, अँटिबायोटिक्स, जंतुनाशकं, स्टीरॉइड्स, शिशासारख्या जड धातूंची विषबाधा वगैरे आघातांनी हानी होते. बाजारी खाद्यपदार्थात सॅकरीन, अॅस्पार्टेमसारखे कृत्रिम गोडी वाढवणारे पदार्थ असतात. मेयॉनेझ, सॅन्डविच-स्प्रेडमध्ये तेलपाणी एकत्र फेसायला मदत करणारे इमल्सिफायर असतात. त्यांनीही जंतुसमुदायात बंडाळी माजते. खरपूस भाजल्यावर किंवा तळल्यावर तंदुरीला किंवा वडय़ाला जो खमंग रंग चढतो त्याच्यात बनणारी रसायनंसुद्धा तशी इजा करतात.

संतुलन बिघडलं की पोटाचे आजार होऊ शकतात. कधी आतडी चिडचिडी (इरिटेबल बॉवेल सिण्ड्रोम) होतात. वारा धरणं, पोट फुगणं, बद्धकोष्ठ, चिरचिरे जुलाब अशी पोटाची कुरबुर सुरू होते आणि सुरूच राहाते. कधी कधी संतुलन बिघडल्याने लहान आतडय़ात भरमसाट जंतू वाढतात. पोट फुगतं, दुखतं.

मोठय़ा आतडय़ाची संरक्षक फळी बिघडली की तिथल्या जंतुबंडाळीशी शरीरातल्या लढाऊ पेशींचं युद्ध चालू होतं. आतडय़ाला सूज येते, जखमा होतात. अल्सरेटिव्ह कोलायटीस, क्रॉन्स डिसीज (Crohn’s disease) सारखे गंभीर आजार उद्भवतात. हिरडय़ांचे आजार वाढवणारा एक दुष्ट जंतू (F. nucleatum) एरवी तोंडातच राहातो. लाल मांस, बाजारचे गोडधोड पदार्थ वरचेवर खाल्ल्याने तो आतडय़ांत पोहोचतो, फोफावतो. आतडय़ातले टय़ूमर, कॅन्सर वाढवतो.

दुष्ट जंतूंशी लढणारे जंतू

अन्नपाण्यातून येणाऱ्या दुष्ट जंतूंशी लढणाऱ्या पेशींचे महत्त्वाचे बालेकिल्ले आतडय़ात असतात. त्यांचा रहिवासी जंतुसमुदायाशी सतत संपर्क करत असतो. प्रत्येक मित्रजंतू आतडय़ातल्या लढाऊ पेशींना रोगप्रतिकाराचे धडे देतो. संतुलन बिघडलं की तिथले धडे चुकायला लागतात. नेहमीच्या खाद्यपदार्थाशी चकमकी उडतात. नव्या अॅलर्जी तयार होतात.

तसे चुकीचे धडे वारंवार मिळाले तर लढवय्ये गोंधळतात, दुष्ट जंतूंऐवजी मित्रपेशींवर हल्ले करतात. तसे हल्ले आतडय़ापुरते मर्यादित नसतात. सांधे, थायरॉईड, त्वचा. अनेक ठिकाणी धुमश्चक्री होते. शरीरानं स्वत:वरच शत्रुहल्ला केल्यामुळे होणाऱ्या आजारांना आत्मप्रतिकारक आजार (ऑटोइम्यून डिसीझेस) म्हणतात. ते आत्मशत्रुत्व दीर्घकाळ धुमसत राहातं.

आतडय़ातला जंतुसमुदाय गर्भाशयाच्या, स्तनाच्या कॅन्सरला कारणीभूत ठरणाऱ्या हॉर्मोन्सना, इस्ट्रोजेन्सना नियंत्रणाखाली ठेवतो. त्याचं डोकं फिरलं की इस्ट्रोजेन्स वाढतात आणि त्या कर्करोगांची शक्यता वाढते.सीरोटोनिन नावाचं रसायन मानसिक समाधान, झोप, शरीरसुख, वगैरेंसाठी महत्त्वाचं असतं. त्याचं मेंदूपेक्षाही अधिक उत्पादन (७५ टक्के) आतडय़ात होतं! तिथली जंतुव्यवस्था बिघडली की उत्पादन घटतं, मन:स्थिती बिघडते; चिंता, औदासीन्य छळतात. काही अतिउत्साही जंतू तंतुमय पदार्थापासून जास्तीत जास्त पोषक पदार्थ बनवतात. या जंतूंचा वरचष्मा झाला की वजन आटोक्यात ठेवणं कठीण होतं. इन्सुलिनचं कामही नीट होत नाही, मधुमेह होऊ शकतो. शरीरात चरबी वाढते. तशी जादा चरबी लिव्हरमध्ये जाऊन बसली की तिथलं काम बिनसतं.

काही वेळा अँटिबायोटिक्सनंतर जंतुसमूह बिघडून काही भयानक अजिंक्यजंतूंची लागण होते. जीवघेणा अतिसार होतो. तिथं पुन्हा निरोगी जंतुसमूह वसवायला चक्क निरोगी माणसांच्या मळाचा एनिमा देतात! श्रीमंत देशांत तर गुणी मळाची महागडी कॅप्सूल गिळून आतडय़ात नव्याने गुणीजंतू रुजवतात! गुणी मळजंतूंचा महिमा अधिकाधिक समजत चालल्यामुळे काही वर्षांनी वार्षिक प्रकृती-तपासात जंतूंच्या संतुलनाचाही परामर्श घेतला जाईल. योग्य आहार आणि आचरणाने घडणाऱ्या गुणी जंतुसमुदायाच्या मदतीने अनेक आजार टाळणं जमू शकतं. जगभरातल्या आतापर्यंतच्या संशोधनावरून काही नियम समजले आहेत.

प्रीबायोटिक्स आणि प्रोबायॉटिक्स

लाल मांस, साखर-गूळ, खरपूस भाजलेले किंवा तळलेले पदार्थ जितके कमी खावे तितकं बरं. आपल्याला न मानवणारे, अॅलर्जीवाले पदार्थ कटाक्षाने टाळावेत. त्यांनी जंतूंचा समतोल बिघडतो. अनावश्यक अँटिबायोटिक्स/ औषधं घेऊ नयेत. फळं, पालेभाज्या, कच्चा कांदा-लसूण, दालचिनी, मध, कोंडय़ासकटची धान्यं, सालासकट कडधान्यं गुणी जंतूंना अधिक पोषक असतात; त्यांना प्रीबायोटिक्स म्हणतात. त्यांचं अधिकाधिक वैविध्य आहारात आवर्जून ठेवावं.

दही-ताक, केफिर, किमची यांच्यासारख्या आंबवलेल्या पदार्थातून गुणी जंतू मिळतात. तसे गुणी जंतू असलेले डबाबंद बाजारी पदार्थही मिळतात. त्यांना प्रोबायॉटिक्स म्हणतात. त्यांच्या विक्रीची वार्षिक उलाढाल सध्या पाच हजार कोटी डॉलर्सच्या घरात आहे आणि तिला संशोधनाचं पाठबळ आहे. आजारपणा/वार्धक्यामुळे किंवा अँटिबायोटिक्समुळे आतडय़ातले गुणीजंतू घटतात. तान्हेपणी जंतुसमूह नीट घडलेला नसल्यान्नं ते कमीच असतात. अशा स्थितीत प्रोबायोटिक्सचा फायदा होतो. पण एरवी निकोप, तरुण माणसांना त्यांची काही गरज नसते.

हात र्निजतुक करायला शंभरदा धुवू नयेत. मातीत हात घालून बागकाम करताना, पाळीव प्राण्यांना कुरवाळताना लाभदायक जंतूही मिळतात. वजन घटवायचं असलं तर गुणी जंतूंची संगत आवश्यकच.. लठ्ठपणापेक्षा बारीकपणा देणारे जंतू अधिक सांसर्गिक असतात. निरोगी, शिडशिडीत माणसांच्या सहवासात राहिल्याने ते लाभतात! पुरेशी गाढ झोप आणि नियमित व्यायामसुद्धा जंतुसमुदायाचं आरोग्य वाढवतात.
आरोग्यमय, आनंदमय दीर्घायुष्य हवं असलं तर सु-जंतूंच्या संगतीत राहावं हे उत्तम!