डॉ. उज्ज्वला दळवी

प्रत्येकाचे केस वेगळे आणि ते गळण्याची कारणंही वेगळी, त्यामुळे आहे ते स्वीकारावं, जपावं. त्याच्यावर भलते अत्याचार करू नयेत..

Two hundred patients of hair loss problem ICMR team in Shegaon
केसगळतीचे रुग्ण दोनशेच्या घरात; ‘आयसिएमआर’चे पथक शेगावात…
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
young man swallowed nail during carpentry
सुतारकाम करताना तरुण अचानक लोखंडी खिळा गिळतो तेव्हा…
Tilak Street , Pune, vehicle broke door shop ,
पुणे : टिळक रस्त्यावर मध्यरात्री थरार, भरधाव मोटार दुकानाच्या दरवाजा तोडून आत शिरली
nashik land purchase fraud
नाशिक : हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीच्या नावाने फसवणूक, दोन जणांविरुद्ध गुन्हा
buldhana hair loss loksatta news,
पाण्यामुळे नव्हे, ‘फंगस’मुळे केस गळती… आता खुद्द मंत्रीच म्हणाले, बिनधास्त आंघोळ…
The video captured two women in a physical altercation.
दिल्ली मेट्रो तरूणींची केस ओढून मारामारी! जागा दिली नाही म्हणून थेट मांडीवर बसली तरुणी; भांडणाचा Video Viral
Number of patients suffering from hair loss and baldness due to unknown disease exceeds one hundred
बुलढाणा : अनामिक आजाराचा कहर! केसगळती, टक्कलग्रस्त रुग्णांची संख्या शंभरपेक्षा जास्त…

‘‘वैभवी, पुन्हा नवं केशवर्धक तेल मागवलंस! तुझं कपाट तसल्याच तेलांनी ओसंडून चाललंय! जमिनीवर केसांचा सडा पडतोच आहे,’’ बाळंतीण लेकीच्या थेरांनी मीराताई वैतागल्या होत्या. गळणं ही केसांची जित्याची खोड आहे. रोज आपले ५० ते १०० केस गळतातच. पण का? डोक्यावरच्या केसांतल्या शेकडा नव्वदांचीच मुळं एकाच वेळी केस वाढवत असतात. शंभरात एखाद-दुसरं मूळ केस वाढवून थकलेलं, मरगळलेलं असतं. त्याच्या केसाची वाढ थांबते आणि त्याच वेळी शेकडा सुमारे दहा केसांची मुळं तीन महिन्यांच्या सुट्टीवर असतात. त्यांचे केस ‘सईऽ सूट्टय़ोऽ’ म्हणत भुईवर लोळण घेतात. तेच ते शेपन्नास!

पण सुट्टीवरची केसमुळं पुढच्या काही वर्षांच्या कामासाठी भरपूर गृहपाठ करतात. सुट्टी संपल्याबरोबर ती नवे केस बनवून वाढवतात. त्यांच्यातला प्रत्येक केस वर्षांला १५ सेंटिमीटर या गतीने सलग दोन ते सात वर्ष वाढत राहतो. म्हणून मुलींच्या वेण्या लांब वाढून गुडघ्याच्या खाली रुळतात. केसांची वाढ आणि त्यांचा दाटपणा त्यांच्या मुळांवर अवलंबून असतो. मुळांची एकूण संख्या वंशपरंपरेने ठरते. ती उपचारांनी वाढवता येत नाही. केसांच्या गळण्याची गती जेव्हा नव्या केसांच्या उगवण्याच्या वेगाहून अधिक असते तेव्हा केस विरळ होतात, कधी कधी टक्कलही पडतं.

मुळांना रक्तवाहिन्यांतून पोषण मिळतं. आयुष्याच्या वेगवेगळय़ा टप्प्यांवर वेगवेगळी हॉर्मोन्स तिथे पोहोचून काम करतात आणि केसांची वाढ कमीजास्त करतात. पुरुषी हॉर्मोन्सच्या परिणामामुळे राघूअण्णांना चाळिशीनंतर आणि सुदीपला तर वयाच्या सतराव्या वर्षीच टक्कल पडलं. सुदीपच्या बाबांना आणि आजोबांनाही बरोबर त्याच वयात, तसंच आनुवंशिक टक्कल पडलं होतं. त्या टकलावर पुरेशी केसमुळं होती. पण हॉर्मोन्सच्या परिणामामुळे ती व्हेकेशनच्या मूडमधून बाहेर येऊन कामकरी बनली नाहीत. सुदीपला डॉक्टरांनी पुरुषी हॉर्मोन्सना शह देणारं फिनास्टेराइड नावाचं औषध दिलं, केसमुळं कामसू झाली, टकलावर केस आले. पण पुढे लग्नानंतर त्याच्या पुरुषी हॉर्मोन्सच्या इतर कामांत त्या औषधामुळे व्यत्यय आला. त्याच्या मित्राला मात्र कसलाही त्रास न होता फिनास्टेराइडचा फायदाच झाला.

त्याउलट मीराताईंच्या रक्तातली, केशमुळांना ताकद देणारी स्त्री-हॉर्मोन्स पन्नाशीला कमी झाल्यामुळे त्यांचा भांग फाटला. स्पायरोनोलॅक्टोन नावाच्या औषधाने त्यांना फायदा झाला. केसाळ चामखिळांमधलं एक रसायन उंदरांच्या केसमुळांना जोरात कामाला लावतं. हॉर्मोन्समुळे होणाऱ्या केसगळतीवर इलाज म्हणून सध्या त्या रसायनावर प्रयोग सुरू आहेत.

‘केस गळतात,’ म्हटलं की डॉक्टर केसगळतीमागची कारणं शोधतात. त्यासाठी ते प्रश्न विचारतात, केस तपासून गळतीचं प्रमाण जोखतात, रक्ताच्या तपासण्या करतात आणि त्वचेचा-केसांचा सूक्ष्मदर्शकाखाली अभ्याससुद्धा करतात.

सकस आहाराचा अभाव, थायरॉइडसारख्या हॉर्मोनची गडबड, बाळंतपण, मोठा आजार, शस्त्रक्रिया किंवा मानसिक ताणतणाव, कर्करोगाची, रक्तदाबाची, संधिवाताची औषधं, अ-जीवनसत्त्वाचा भडिमार, धूम्रपान यांच्यातल्या कशानेही केशमुळांना थकवा येतो. त्यांची विश्रांती संपतच नाही. नवे केस तयार होत नाहीत. जुने मात्र गळत राहतात. साधारण तीन महिन्यांत केसांचा विरळपणा जाणवू लागतो. योग्य इलाजाने केसगळतीचं कारण दूर झालं की त्यानंतर २ ते ६ महिन्यांत केसमुळांचा थकवा जातो. बहुतेक वेळा केसांची वाढ पूर्वीसारखी होते. कुठल्याशा पोषकतेला मात्र फुकटचं श्रेय लाभतं.

पण ‘केस गळताहेत’ याचा धसका असा असतो की त्यासाठी नानाविध उपायांचा मारा होतो. हे आजचंच नाही. हिपोक्रेटस आपल्या टकलाला कबुतरांची विष्ठा चोळत असे तर सीझरच्या डोक्याला मालिश करायला क्लिओपात्रा घोडय़ाच्या दातांचं आणि हरणाच्या हाडांचं चूर्ण आणि उंदीरभस्म अस्वलाच्या चरबीत घोटून बनवलेलं मलम वापरत असे, अशाही कथा आहेत. गर्भारपणात हॉर्मोन्सनी केशमुळांना दिलेल्या प्रोत्साहनामुळे वैभवीचे केस अधिक दाट झाले. बाळंतपणानंतर हॉर्मोन्स घटली, केसमुळं मरगळली, सुट्टीवर गेली. केस भसाभसा गळून पूर्वीएवढेच झाले. पण ते ‘दाटच हवेत,’ या हट्टामुळे तिने तापवलेल्या बदामतेलाचं, तऱ्हेतऱ्हेच्या पोषकतेलांचं मालिश करून घेतलं.

तेलाच्या हाताने हलकेच मुळांपाशी दाब दिल्याने केशमुळांना प्रोत्साहन मिळतं. उलट कढत तेलाने, जोरदार मालिशने मुळांना इजाच होते, केसगळती वाढते. माफक तेल हळुवार हाताने केसांवर पसरलं तर त्यांचा कोरडेपणा घटून त्यांचं फक्त तुटणं थांबतं, वाढीवर परिणाम होत नाही. रणरणत्या उन्हात भटकलं, घट्ट कापडी टोपीने किंवा रुमालाने डोकं झाकलं की केसांचा कोरडेपणा आणि तुटणं वाढतं. थबथबून तेल लावून ते तसंच ठेवलं तर सेबोऱ्हिक डर्माटायटिस नावाचा खाजरा कोंडा होतो, डोक्यात लाल चट्टे पडतात, केस गळतात.

त्वचेबाहेर दिसणारा केसांचा भाग निर्जीव असतो. त्याला बाहेरून ‘बादाम का पोषण’ देणारं तेल चोपडून, मसाज करून, ‘अँटिहेअरफॉल शँपू’ने धुऊन केसांच्या वाढीत, दाटपणात काहीही फरक पडत नाही. उगाचच व्हिटॅमिन्स, महागडी हेल्थ फूड्स घेऊनही केस गळणं थांबत नाही.

लग्नापूर्वीच्या आल्बमसाठी तृप्ताने आपले दाट, कुरळे केस हट्टाने सरळ करून घेतले; रंगवले. स्वागतसमारंभापर्यंत रोज नव्या घट्ट ताणलेल्या केशरचना केल्या. त्यानंतर ताबडतोब केस पुन्हा कुरळे करून घेतले; वेगळे रंगवले. त्या सगळय़ासाठी केसांना तापवणं, वेगवेगळी हानिकारक रसायनं चोपडणं अति झालं. केसांच्या अनमोल मुळांना इजा झाली, वाढ कायमची खुंटली. चार दिवसांच्या हौसेखातर चेहऱ्याभोवतालच्या महिरपीचा दाटपणा हरपला. ते सहज टाळता आलं असतं. जिथे केसगळती आपसूकच थांबत नाही तिथे वेगळे इलाज असतात.

मिनोतीच्या डोक्यावर, एकाएकी, इथे रुपयाएवढं तर तिथे दहा रुपयांएवढं, असं बेटांबेटांचं टक्कल पडलं. त्याला चाई म्हणतात. त्यात आपल्याच लढाऊ पेशी केसमुळांवर विनाकारण हल्ला करतात. मुळांपासूनची वाढ थांबते. ती लढाई बऱ्याचदा आपल्या आपणच थांबते. मिनोतीला मात्र त्या भागांत काही दिवस स्टेरॉइडची इंजेक्शनं घ्यावी लागली. त्याच्यानंतरच तिथे पूर्वीसारखे केस आले.

१९७०च्या दशकात रक्तदाबासाठी मिनॉक्सिडील नावाचं एक नवं औषध बाजारात आलं. ते घेतल्यावर स्त्रियांना दाढीमिशा यायला लागल्या. म्हणून संशोधकांनी त्या औषधाचं खातंच बदलून ते विरळ केसांवरचा उपाय म्हणून वापरात आणलं. ते नेमाने सहा महिने डोक्याला लावलं की केसमुळं सुट्टी न घेता केस वाढवण्यात अधिक काळ घालवतात. केस दाट होतात. तो सुपरिणाम टिकवायला औषध नियमितपणे जन्मभर लावावं लागतं. मिनॉक्सिडीलने रक्तदाब घटतो हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे.

सूक्ष्म-सुयावालं लाटणं (मायक्रोनीडल रोलर) डोक्यावर हळुवारपणे फिरवल्याने किंवा विशिष्ट लेझर-उपचारांनी सुट्टीवरची केसमुळं लवकर कामावर येतात, दीर्घकाळ केस वाढवत राहतात. रक्त गोठवायला मदत करणाऱ्या पेशी (प्लेटलेट्स) एकत्र वेगळय़ा काढून त्यांची डोक्याच्या त्वचेत इंजेक्शनं दिली की त्यांच्यातल्या केशवर्धक रसायनांनीही केसवाढीचा टप्पा लांबतो.. त्या तिन्ही उपायांसोबत त्वचेवर मिनॉक्सिडीलचं मालिश आणि पोटात फिनास्टेराइड सुरू ठेवलं तर अधिक फायदा होतो. सुदीपच्या डोक्याच्या बाजूच्या, पाठीमागच्या त्वचेत केसमुळांची दाटी होती. डॉक्टरांनी त्या बहुकेशी त्वचेचं पुढे, चेहऱ्याभोवती रोपण केलं. चेहऱ्याभोवताली उठावदार महिरप आली. ती किमान २० वर्ष आणि बहुतेक वेळा आयुष्यभर टिकते. ते सगळे उपचार मुंबई-पुण्यात उपलब्ध आहेत. सुदीपसारखं सतराव्या वर्षीच टक्कल पडलं तर तसे उपाय जरूर करावेत.

गेल पोर्टर नावाच्या स्कॉटिश मॉडेल-अभिनेत्रीला वयाच्या तिशीपासून अॅलोपेशिया युनिव्हर्सलीस म्हणजे केसांचा संपूर्ण अभाव आहे. तिला डोक्यावर अजिबात केस नाहीत, भुवया-पापण्या, साधी लवसुद्धा नाही. त्या केशविहीनतेचा सहज स्वीकार केल्यामुळे तिचं उमदं, कणखर व्यक्तिमत्त्व अधिक प्रभावी झालं. ती अजूनही टीव्हीवर झळकते आणि इतर केशविहीन लोकांचं मनोधैर्य वाढवते.

प्रत्येक माणूस जसा एकमेवाद्वितीय असतो तसेच प्रत्येकाचे केसही वेगळे असतात. विरळ केस किंवा अगदी टक्कलदेखील आपलं म्हणून प्रेमाने स्वीकारावं, जपावं. त्याच्यावर भलभलते अत्याचार करू नयेत. त्याच्यामुळे निराश न होता आपलं मूळ व्यक्तिमत्त्वच अधिक प्रभावी केलं तर भोवतालच्या माणसांना आपल्यात केसभरही उणीव जाणवणार नाही याची बालंबाल खात्री बाळगावी.

Story img Loader