डॉ. उज्ज्वला दळवी
जैविक शेतीच्या मागे लागणं हा पायावर धोंडा ठरेल. ऐंशीच्या दशकापासून झालेल्या संशोधनातून ‘जैविक’ अन्नाचं श्रेष्ठत्व सिद्ध झालेलं नाही.
‘‘आम्ही ऑरगॅनिक बिस्किटंच खातो. कॅलरीज कमी, प्रोटीन, व्हिटॅमिन्स भरपूर! तब्येतीच्या बाबतीत नो कॉम्प्रोमाइझ,’’ रवीना अभिमानाने म्हणाली. ‘‘ऑरगॅनिक हे केमिस्ट्रीतलं असतं ना? या बिस्किटांत केमिकल्स असतात?’’ कंकणानं विचारलं. रवीना गोंधळली.
ऑरगॅनिक म्हणजे जैविक. सजीवसृष्टीशी नातं सांगणारं. ऑरगॅनिक केमिस्ट्रीचा अभ्यास जैविक रसायनांपासून सुरू झाला. त्याचा ऑरगॅनिक शेतीशी संबंध नाही. ऑरगॅनिक ऊर्फ जैविक शेतीची संकल्पना लॉर्ड नॉर्थबोर्नने १९३९मध्ये मांडली, ‘अख्खं शेत म्हणजे एक सजीव प्राणी आहे. माती, जैविक खतं, पीक, कीटक, शेत-जनावरं हे सगळे त्याचेच अवयव (ऑर्गन्स) आहेत.’ रासायनिक खतं, कीटकनाशकं, धान्यरक्षक रसायनं मातीत, भूजलात, पाणवठय़ांत मुरतात. तिथल्या मातीचा कस, जैववैविध्य, पर्यावरण आणि सामाजिक आरोग्य या साऱ्यांना त्यांच्यामुळे धोका निर्माण होतो. म्हणून जैविक शेतीत त्यांना मज्जाव होता.
नंतरच्या काळात अन्न टिकवण्यासाठी त्याच्यावर प्रभावी किरणांचा मारा करायची पद्धत आली. कोंबडय़ांना, जनावरांना धष्टपुष्ट करायला हॉर्मोन्स, प्रतिजैविकं (अँटिबायोटिक्स) आली. अन्नात कुठल्याही कृत्रिम रसायनांची मिसळण करण्यालाही जैविक शेतीने मनाई केली.श्रीमंत पाश्चात्त्य जगाला आरोग्याचे चोचले परवडत होते. रसायनविरहित जैविक पद्धतीनं जोपासलेलं अन्न तब्येतीला अधिक चांगलं ही समजूत तिथे सहज रुजली. शेतमाल विकत घेण्यापूर्वी शेताची, गायी-कोंबडय़ांची जातीने पाहणी करायची, शेतकऱ्याची उलटतपासणी घ्यायची प्रथाच पडली. १९६२मध्ये डीडीटीच्या दुष्परिणामांमुळे परागवाहक कीटकांची संख्या प्रमाणाबाहेर घटली. त्याचा पिकांवरचा परिणाम कळल्यावर पर्यावरण-संरक्षणाच्या चळवळीला जोर आला. एका कीटकनाशकाची फवारणी फळांवर केल्याने कर्करोगाची शक्यता वाढल्याचं ऐंशीच्या दशकात सिद्ध झालं. तेव्हापासून जैविक अन्नाची मागणी अधिकच वाढली.
पण सुपरमार्केटातून माल खरेदी करणारे शहरी नागरिक शेतकऱ्यांची उलटतपासणी कशी घेणार? म्हणून सर्वव्यापी सरकारी नियंत्रणाची आवश्यकता निर्माण झाली. आता अमेरिकेच्या कृषिखात्याचा किंवा युरोपियन कमिशनचा राष्ट्रीय जैविक प्रकल्प, भारतातलं अन्न-सुरक्षा आणि गुणवत्ता प्राधिकरण तसं नियंत्रण ठेवतात, प्रमाणपत्र देतात आणि ‘जैविक माल’ असा शिक्काही मालावर मारतात.प्रत्येक देशातले निकष वेगवेगळे! परसात माळवं करणाऱ्या सुगृहिणीसुद्धा उपज वाढवायला रासायनिक खतं वापरतात, फवारणीही करतात. म्हणून परदेशात लहान शेतकऱ्यांच्या मालावरसुद्धा ‘जैविक’ शिक्का सक्तीचा असतो. भारतात मात्र ज्यांची वार्षिक उलाढाल १२ लाखांहून कमी असते त्या शेतकऱ्यांना तसला शिक्का घ्यायचं बंधन नसतं. भारतात आंतरजालावरल्या बाजारात मिळणाऱ्या धान्यांवर एफएसएसएआयचा अधिकृत ‘जैविक भारत’ शिक्का असतो पण ‘जैविक’ म्हणूनच विकल्या जाणाऱ्या भाज्या-फळांवर बऱ्याचदा तो नसतो. इतकंच नव्हे तर आठवडी बाजारात आपण जी भाज्या-फळं ताजी म्हणून घेतो त्यांच्याही ‘जैविक’तेची खात्री आपल्याला मिळत नाही.
‘जैविक’ शेतीमुळे रासायनिक प्रदूषण घटतं. पर्यावरणाला फायदा होतो. पण तिचं दर एकरी उत्पादन पारंपरिक शेतीहून कमीच असतं. शिवाय जैविक खतांची, कीटकनाशकांची उसाभर अधिक असते. साहजिकच जैविक उत्पादनं महाग असतात. वाढत्या लोकसंख्येसाठी, जैविक पद्धतीने अधिक अन्न पिकवायला अधिक जमीन लागवडीखाली आणावी लागते. त्यासाठी जंगलतोड होते. जैववैविध्याला, पर्यावरणाला हानी पोचतेच.आपलं शरीर, अन्न, पर्यावरण हे सगळं रसायनांनीच बनलेलं असतं. ‘नैसर्गिक खतांत, कीटकनाशकांत विषारी, हानिकारक पदार्थ नसतातच असं नाही. खुद्द वनस्पतीसुद्धा कीटकांशी-रोगांशी झुंजायला स्वत:ची विषारी रसायनं वापरतात. मानवी अन्नातली ९९ टक्के कीटकनाशकं नैसर्गिक असतात. त्यांचाही अभ्यास व्हायला हवा. उंदरांमधला कर्करोग वाढवायचं पाप रासायनिक फवारणीच्या गळय़ात घालताना सोबतच्या नैसर्गिक कर्कजनक पदार्थाचा विचार झालाच नाही,’ असं ‘सायन्स’ या तालेवार वैज्ञानिक मासिकात ३० वर्षांपूर्वीच छापून आलं होतं. जैविक रसायनं चांगलीच आणि जैविक नसलेली वाईटच असा पूर्वग्रह चुकीचा ठरेल. त्या दृष्टीने संशोधन सुरूच आहे.
२०२०मध्ये म्युनिकच्या तंत्रविद्यापीठात ‘शेतीमधून निर्माण होणाऱ्या दूषित वायूंच्या पर्यावरणावरच्या परिणामां’चा मोठा अभ्यास झाला. ‘पशुसंवर्धनाच्या बाबतीत जैविक आणि पारंपरिक वायुप्रदूषणात काहीही फरक नाही’ असा निष्कर्ष निघाला. गेली ३० वर्ष अमेरिकेत कर्कसंभवक्षमतेचा माहितीकोश बनवणं (कार्सिनोजेनिक पोटन्सी प्रोजेक्ट) सुरू आहे. यात नैसर्गिक आणि कृत्रिम रसायनांची कर्करोग निर्माण करायची कुवत नोंदली जाते. जैविक अन्नामुळे कर्करोग प्रमाण घटतं का ते ठरवायला त्याची मदत होईल.
अलीकडे सारासार अभ्यास होत आहे. त्यावरून, ‘पाश्चात्त्य बाजारातल्या नियंत्रणांमुळे तिथल्या जैविक वा अन्यही शेतमालात कुठलंही घातक रसायन हानिकारक पातळी गाठत नाही’ असा निर्वाळा अमेरिकेचा कृषी विभाग आणि ब्रिटनच्या अन्नसुरक्षा विभागाने दिला आहे. विषारी ठरलेली कीटकनाशकं वेळोवेळी बाद झालीच आहेत. अमेरिकेतल्या पर्यावरण संरक्षण समितीच्या मते फवारलेल्या रसायनांचा हळूहळू ऱ्हास होत जातो. पारंपरिक शेतमाल धुवून घेतला तर त्यावरची उरलीसुरली रसायनंही निघून जातात.
जैविक अन्नामुळे आरोग्याला होणारे फायदे शोधणारे सगळे शोध लहानलहान आहेत. २००९ आणि २०१२मध्ये तशा अनेक शोधांचे कपटे जोडून शास्त्रज्ञांनी दोन मोठी जोडचित्रं (मेटा-अॅनालिसिस) तयार केली. ‘जैविक अन्नातून अधिक पोषण मिळतं,’ असं काही त्या दोन्ही चित्रांतून सिद्ध झालं नाही. जैविक अन्नात गुणकारी स्निग्धांशाचं, काही लाभदायक रसायनांचं प्रमाण थोडं अधिक आणि एका जड धातूचं प्रमाण कमी असतं हे सिद्ध झालं आहे. पण यातल्या संशोधनांमध्ये अनेक तांत्रिक त्रुटी होत्या. २०१९मध्ये ऑस्ट्रेलियात ३५ शोध-पत्रिकांचा एकत्रित अभ्यास झाला. लठ्ठपणा, कर्करोग, वंध्यत्व वगैरेंचं प्रमाण जैविक अन्नसेवनाने कमी होतं असं वाटलं. पण जैविक अन्नसेवन करणाऱ्या जागरूक वर्गाने प्रकृतीची सर्वागीण काळजी घेतली होती. त्याचाही तो परिणाम असू शकतो.
रसायनांइतकेच संसर्गजन्य रोगही घातक असतात. जैविक शेतीत प्राण्यांच्या मलमूत्रापासून केलेली खतं वापरतात. त्यांतून रोगजंतूंचा प्रसार होऊशकतो. २०११मध्ये मोडावलेल्या ‘जैविक’ मेथीदाण्यांतून जीवघेण्या अतिसाराची साथ युरोप-अमेरिकेत सर्वदूर पसरली. एकूण काय, जैविक अन्नाची थोरवी अद्याप संशोधनाने सिद्ध झालेली नाही. पण रासायनिक खतांच्या आणि कीटकनाशकांच्या दुष्परिणामांच्या इतिहासामुळे रवीनासारख्या तरुण, उदारमतवादी कॉलेजकन्यका धास्तावलेल्या आहेत. रवीनाच्या मनातली जैविक अन्नाची महती थोर आहे. तिला जैविक अन्नाभोवती उत्तम आरोग्याचं तेजोवलय दिसतं. त्यातही फळं- भाज्या- दूधदुभतं हेच तिला खरं ‘जैविक’ वाटतं. तेच अन्न तिला अधिक रुचकर लागतं, अधिक पौष्टिकही वाटतं. त्याच्यात कॅलरीज कमी असतात असा गोड गैरसमजही तिने करून घेतला आहे. यातल्या कशालाही सत्याचं, वैज्ञानिक संशोधनाचं पाठबळ नाही.
तरीसुद्धा रवीनासारख्या लोकांत अलीकडे आरोग्याविषयीची, पर्यावरणाबद्दलची जागरूकता वाढत चालली आहे. त्यामुळे जैविक अन्नाच्या मागणीला ऊत आला आहे. २००२ ते २०११ या कालावधीत जैविक अन्नाची जागतिक विक्री १७० टक्क्यांनी वाढली! युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलियाच्या मागोमाग चीनमध्येही जैविक अन्नाला फार मागणी आली. त्यासाठी प्रमाणित केलेली जमीन मात्र जागतिक कृषिक्षेत्राच्या दोन टक्केच राहिली. भाव झपाटय़ाने चढले. जैविक अन्नाची सध्याची जागतिक वार्षिक उलाढाल आठ लाख कोटी रुपयांची आहे!
२०२१मध्ये श्रीलंकेने १०० टक्के जैविक शेती सुरू केली. रासायनिक खतं, कीटकनाशकं, तणनाशकं यांची आयातच बंद केली. शेतकऱ्यांना तो एकाएकी झालेला बदल झेपेना. अन्नाची उपज घटल्यामुळे किमती गगनाला भिडल्या. उपासमार, आंदोलनं, क्रांतीचा प्रयत्न यांनी परिस्थिती चिघळली. जागतिक १०० टक्के जैविक शेतीची ती रंगीत तालीमच म्हणता येईल.
भारत सरकार तशा आत्मघातकी धोरणाने वागेल असं वाटत नाही. भारतातल्या गोरगरिबांचं पोट भरायला इथल्या अन्नाचं पारंपरिक उत्पादनही अद्याप अपुरंच आहे. जैविक शेतीच्या मागे लागणं हा पायावर धोंडा ठरेल. ऐंशीच्या दशकापासून आजवर झालेल्या संशोधनातून ‘जैविक’ अन्नाचं श्रेष्ठत्व सिद्ध झालेलं नाही. आपण रंग-स्पर्श-वास-कसोटय़ांनी पारखलेला शेतमाल घरी आणून, स्वच्छ धुवून वापरावा हे उत्तम!