अभिजित ताम्हणे
‘सूर्य आग ओकतो आहे’ अशी परिेस्थिती मराठीजन अनुभवत आहेत आणि ‘यंदाचा उन्हाळा अधिक कडक’ हा दरवर्षी निघणारा निष्कर्ष यंदा नव्या जोमानं निघतो आहे. त्याची कारणं ‘वातावरणीय बदल- क्लायमेट चेंज’पर्यंत भिडतात हे सर्वांना माहीत आहे आणि पर्यावरण-संधारण हा त्यावरचा उपाय असल्याची कल्पनाही सगळ्यांना असणारच. पण चाळीसेक वर्षांपूर्वी जेव्हा क्लायमेट चेंज, पर्यावरण-रक्षण वगैरे चर्चा ही ‘पाश्चात्त्य खुळं’ मानली गेली असतील (तसा रीतीरिवाजच आहे आपला!), तेव्हा – म्हणजे १९८२ मध्ये तिकडच्या पश्चिम जर्मनी नामक देशात, कासेल नावाच्या शहरात ‘डॉक्युमेण्टा’ या नावानं दृश्यकलेचं जे काही पंचवार्षिक महाप्रदर्शन भरायचं, तिथं घडलेली ही गोष्ट. त्या गोष्टीला अंत नाही आणि या अंतहीन गोष्टीची प्रचीती प्रस्तुत लेखकाला २००७, २०१३ आणि २०१७ साली आलेली आहे. ही प्रचीती ‘कलात्मक’ आहे का याचा निर्णय वाचकांनी घ्यायचा आहे. तर गोष्ट अशी…
जोसेफ बॉइस हा मूळचा जर्मन, पण युद्धानंतर अमेरिकेत राहू लागलेला प्रख्यात दृश्यकलावंत. ‘डॉक्युमेण्टा’ या १९५५ सालापासनं दर पाच वर्षांनंतर भरणाऱ्या महाप्रदर्शनासाठी या जोसेफ बॉइसला खास निमंत्रण देण्यात आलं- ‘आपली कलाकृती आमचे येथे प्रदर्शित करून आम्हांस उपकृत करावे’ वगैरे अगदी औपचारिक. यानंही औपचारिकपणेच कळवलं… ‘‘हे महाप्रदर्शन जेथे भरते, त्या कासेल शहरात मी झाडे लावू इच्छितो. प्रत्येक झाडाच्या शेजारी गुडघाभर उंचीचा एक दगडी चिराही असेल. अशी ७००० (अक्षरी सात हजार मात्र) झाडे लावण्याचे प्रयोजन हीच माझी कलाकृती, असे मी मानतो. शहरभर पुढल्या पाच वर्षांत ही झाडे लावण्याचे काम पूर्ण व्हावे आणि ‘डॉक्युमेण्टा’च्या पुढल्या खेपेला, (१९८७ सालचा आठवा ‘डॉक्युमेण्टा’) माझी कलाकृती संपूर्ण तयार असेल. कळावे’’
कसे बुवा कळावे? झाडं लावणं हे काय चित्रकाराचं काम आहे का? म्हणजे त्यानं गॅलरीत, खिडकीत, परसदारी, गच्चीवर किंवा कुठंतरी ‘सेकण्ड होम’ वगैरे घेऊन तिथं करावी की झाडांची हौस. पण आमच्या शहरात येऊन झाडं लावणार आणि वर त्याला आम्ही कलाकृती म्हणायचं ही कसली हौस? बरं त्या हौसेचं मोल कोणी मोजायचं?
– असे कोणतेही प्रश्न न येता, जोसेफ बॉइसचा प्रस्ताव मान्य झाला. बॉइसनं ही सगळी सात हजार झाडं ‘ओक’ची असावीत, असंही प्रस्तावातच म्हटलं होतं. म्हणून या कलाकृतीचं नाव ‘सेव्हन थाऊजंड ओक्स’! कासेल हे १९४२ सालात दोस्तराष्ट्रांच्या बॉम्बफेकीत पुरतं उद्ध्वस्त झालेलं गाव. तिथं नाझींचा लष्करी तळ होता. पण १९४८ नंतर या शहराच्या पुनर्विकासाला जोरात सुरुवात झाली आणि १९५५ पर्यंत हे शहर अस्सं काही तयार झालं की इथं ‘डॉक्युमेण्टा’ हे आंतरराष्ट्रीय दृश्य-कलेचं महाप्रदर्शन भरू शकलं. मुद्दा असा की, कासेलकरांना पाचेक वर्षांत सातेक हजार झाडं लावणं कठीण नव्हतं. कासेलकरांनी फक्त यात एक बदल केला- साधारण साडेचार हजार झाडं ओकची लावली आणि बाकीची झाडं निरनिराळ्या जातींची (पण उंच वाढणारी, सावली देणारीच) लावून सात हजाराची उद्दिष्टपूर्ती झाली. पण पैशाची काय सोय? तीही अमेरिकेतल्या ‘डिया आर्ट फाउंडेशन’नं केली.
हे ‘डिया आर्ट फाउंडेशन’ म्हणजे ‘भूमिकला’ या दृश्यकला-प्रकाराला खंदं प्रोत्साहन देणारी संस्था. रॉबर्ट स्मिथसनची ‘स्पायरल जेटी’ किंवा वॉल्टर डि मारियाचं ‘लायटनिंग फील्ड’ यासारख्या ‘भूमिकलेची उदाहरणे’ म्हणून गूगलबिगलला तोंडपाठ असलेल्या कलाकृती याच ‘डिया’च्या पैशामुळे घडल्या किंवा टिकल्या. तर आपल्या जोसेफ बॉइसलाही कासेल शहरात झाडं लावायला या अमेरिकी संस्थेनं पैसा पुरवला. हे सन १९८२ मध्ये घडण्याआधीची २० वर्षं, ‘दृश्यकलेची – किंवा एकंदर कला-अनुभवाची व्याख्याच पालटून टाकणारा विचारी कलावंत’ अशी बॉइसची धो-धो ख्याती झाली होती. १९७४ साली अमेरिकेतल्या एका कलादालनात ‘कोयोटे’ जातीच्या रानटी कोल्ह्यासोबत फक्त घोंगडीवजा ‘फेल्ट’च्या आसऱ्यानं सात दिवस राहणारा बॉइस हा हिंसकतेला शांत राहूनच प्रत्युत्तर देणारा ठरतो, हे गांधीजींनी पाहायला हवं होतं असं आपल्या अतुल दोडियांना १९९८ मध्ये वाटलं आणि त्यांनी ‘बापू अॅट रेने ब्लॉक गॅलरी-१९७४’ हे अजरामर जलरंगचित्र केलं… अशी या बॉइसची ऐतिहासिकता. त्याहीमुळे असेल, पण सात हजार झाडं एकाच शहरात लावण्याच्या या प्रकल्पाला ‘कलाकृती’ मानलं गेलं.
म्हणजे, ‘त्यांनी’ मानलं… ‘आपण’ मानायचं की नाही हे आपणच ठरवायचंय. पण त्या ‘आपण’मधून या मजकुराच्या लेखकाला आधीच वजा करा. कारण ‘डॉक्युमेण्टा’च्या अकराव्या, बाराव्या आणि तेराव्या खेपांना कासेल शहरात जाणं झालं, तेव्हा या ओक-वृक्षांची सावली (आणि पावसापासून आडोसा) अनुभवला आहे. कधीतरी झाडाखाली जोसेफ बॉइसच्याच ‘कलाकृती’चा भाग असलेल्या दगडावर बसून, ‘वाढणारं, जिवंत झाड आणि त्याच्या शेजारचा ‘निर्जीव’ दगड… दोघेही निसर्गच,’ असं उगाच जाणवत राहिलं आहे.
नंतर कुणाही चित्रकारानं निसर्गचित्रं काढली असतील तर, त्यात झाडाला महत्त्व असल्यास प्रश्नच पडू लागले : संबंधित चित्रकाराचं आणि या झाडाचं काय नातं असेल? झाडाचा आकार महत्त्वाचा मानला असेल? की झाडाचा उपयोग? की झाडासंदर्भातला व्यक्तिगत अनुभव?
असा प्रश्न पडायचा. त्याचं एक जरा पटणारं उत्तर अगदी आत्ता ‘व्हेनिस बिएनाले – २०२४’मध्ये मिळालं!
एकतर व्हेनिसच्या त्या दर दोन वर्षांनी भरणाऱ्या महाप्रदर्शनातल्या दोन्ही भागांमध्ये – म्हणजे व्हेनिसवाल्यांनी भरवलेलं ‘मध्यवर्ती प्रदर्शन’ आणि काही देशांची दालनं अशा दोन्ही ठिकाणी- झाडांबाबतच्या कलाकृती कुठेकुठे दिसल्या. अॅमेझॉन जंगलात आढळणाऱ्या झाडांची यथातथ्य चित्रं आबेल रॉड्रिग्ज यांनी काढली होती, ती लक्षात राहिली. पण झाडात आपण काय पाहायचं, याचं उत्तर मात्र व्हेनिस बिएनालेच्याच आवारात ‘चेकोस्लोव्हाकिया दालन’ म्हणून जी काही इमारत आहे, तिथं मिळालं… अर्थातच, ‘चेकोस्लोव्हाकिया’ असा कोणताही देश सध्या अस्तित्वात नाही. चेक प्रजासत्ताक आणि स्लोव्हाक प्रजासत्ताक असे दोन देश झालेले आहेत. त्यामुळे ही इमारत ते वाटून घेतात, ती वाटणी यंदा ‘आतमध्ये चेक आणि बाहेरच्या भिंतीवर स्लोव्हाक’ अशी होती. स्वत:ला ‘कार्यकर्ता चित्रकार’ म्हणवणाऱ्या ओटो हुडेक यांनी या भिंतीला निळा रंग लावून, त्यावर राखाडी छटांनीच अकरा झाडांची चित्रं काढली होती. या प्रत्येक झाडाला जगण्याची, तगण्याची कहाणी होती, अगदी आपल्या ‘चिपको चळवळी’तलं एक झाडही इथं होतं आणि ही कहाणी जाणून घ्यायचीच असेल तर, ‘क्यूआर कोड स्कॅन करा’ अशी पाटी प्रत्येक चित्राच्या खाली होती. प्रत्येक झाडासाठी ओटो हुडेक यांनी एक (इंग्रजी) गाणं केलं होतं आणि तेही क्यूआर कोडवरून ऐकता येत होतं. ही सगळी गाणी floatingarboretum. sng. sk/ या संकेतस्थळावर ऐकता येतील.
यापैकी एक झाड जाटोबा किंवा यातोबा या वृक्षाचं बाल-रोपटं! ब्राझीलमध्ये यातोबाची कत्तल लाकडासाठी केली जाते. त्यामुळे काही ब्राझिलियनांनी ‘हे झाड निर्वासित आहे, याला तुमच्याकडे आश्रय देऊन जगवा’ म्हणून एका युरोपीय देशाच्या राजदूतावासावर शांततामय मोर्चा काढला होता.
झाडात काय पाहायचं? याचं उत्तर अशा सगळ्या आंदोलनांमधूनही मिळतं. ते उत्तर साधंच आहे : ‘झाडात जीव पाहायचा’!
हा झाडातला जीव आणि आपला जीव यांचं नातं आपल्या शांता शेळकेंनी ‘मातीचे झाड, झाडाची मी, माझी पुन्हा माती’ अशा शब्दांत सांगितलंय पण यानंतर मातीचं पुन्हा झाड होणारच असतं ना?
त्या झाडाच्या जिवाशी तादात्म्य पावण्याचा प्रयत्न ओटो हुडेक यांच्या गाण्यांमधून होतो आहे. पण कासेलमधली ‘७००० ओक्स’ ही जोसेफ बॉइस यांची ‘कलाकृती’ आता तर न्यूयॉर्कमध्येही पुन्हा तेवढीच झाडं लावून साकारण्यात येणार आहे म्हणे. बॉइस यांच्या कलाकृतीतून झाडाच्या जिवाचं मोल कळतं. खेदाची बाब अशी की १९८७ साली कासेलमध्ये जेव्हा ‘प्रकल्पपूर्ती’, ‘उद्दिष्टपूर्ती’ होऊन सात हजार झाडं लागली, तेव्हा ते पाहायला बॉइस हयात नव्हते. आजही ते प्रत्येक झाड, त्याखालचा प्रत्येक दगड बॉइस यांची आठवण देतो इतकंच.