वर्षभरात – म्हणजे २०२४ मध्ये- पाहिलेली सर्वोत्कृष्ट दृश्यकलाकृती कोणती? – नाही सांगता येत. वर्ष संपत आलं की वर्तमानपत्रांत ‘टेन बेस्ट बुक्स ऑफ इयर’ वगैरे सुरू होतं. पण तसं कुणी दृश्यकलेबद्दल करत नाही. ‘टेन बेस्ट पेंटिंग्ज ऑफ द इयर’ अशा याद्या कुणी करत नसतं. काही ब्रिटिश वृत्तपत्रं ‘वर्षभरातली दहा स्मरणीय कलाप्रदर्शनं’ अशीही यादी आपापल्या कला-समीक्षकांकडून करवून घेतात. पण त्याला आपण इथं- भारतातल्यांनी किती महत्त्व द्यायचं हा प्रश्नच असतो. त्या मानानं, ‘सरत्या वर्षी लिलावात सर्वाधिक बोली मिळवणाऱ्या दहा कलाकृती’ अशी यादी सहज करता येईल!

चित्रकला, शिल्पकला, छायाचित्रकला, मांडणशिल्पं या दृश्यकलेच्या प्रांतातल्या कलाकृतींचा अनुभव वस्तुनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ एवढाच प्रश्न इथं नाही. कलाकृतीचा नवेपणा वस्तुनिष्ठपणेही ठरवता येतो, कारण आधी होऊन गेलेलं म्हणजे काय, हे माहीत असण्याचे मार्ग उपलब्ध असतात. पण नवेपणा हा एकच गुण कलाकृतीत असून चालत नाही. कलात्मकता हवी, आशयसुद्धा हवा. ‘कलाकारण’ सदरातल्या अलीकडल्या (२३ नोव्हेंबर) एका लेखाचा दाखला इथं देता येईल. मॉरिझिओ कॅटलान या ज्येष्ठ इटालियन कलाकारानं भिंतीवर चिकटपट्टीनं चिकटवलेलं केळं, या कलाकृतीबद्दल ऊहापोह करताना ही ‘चांगली कलाकृती’ आहे, असं कुठेही म्हटलेलं नव्हतं- कारण ते म्हणता आलंच नसतं. पण नवेपणाचे शंभरापैकी शंभर मार्क या कलाकृतीला सहज मिळतील. नवेपणा कमी असला तरी चालेल पण काहीएक कलात्मकता हवी, या अपेक्षेचं उदाहरण म्हणूनही ‘कलाकारण’मधलाच एक (११ मे रोजीचा) लेख पाहता येईल. इजिप्तच्या वाएल शॉली या कलावंतानं यंदा ‘व्हेनिस बिएनाले’मध्ये इजिप्तच्या देश-दालनात प्रदर्शित केलेल्या एका कलाकृतीबद्दल त्या लेखात लिहिलं होतं. इजिप्तमधलं अलेक्झांड्रिया शहर परकीयांच्या ताब्यात कसं गेलं, याचा इतिहास सांगणारी एक फिल्मच साकारली होती वाएल शॉली यानं, पण ती निव्वळ फिल्म नव्हती- नाटकासारखं तिचं नेपथ्य, त्यात वापरलेल्या वस्तू हे एकेकटं पाहिलं तरीदेखील दृश्यकलाकृतीच्या पातळीवर जाणारं होतं. फिल्ममधलं नाट्य एखाद्या संगीतिकेसारखं सादर केलं होतं, म्हणजे सारे संवाद गाण्यासारखेच होते- हा एरवी अतिशैलीदारपणा ठरला असता. पण इतिहासाची ‘गोष्ट’- तीही अशा लोकांना सांगायचीय ज्यांना या इतिहासाबद्दल गम्य असेल वा नसेलही- तरीसुद्धा ती गोष्ट पाहताना लोक खिळून राहिले पाहिजेत, या दृष्टीनं जे काही करता येईल ते वाएल शॉलीनं केलं. लोकगीतं, नाटक, आधुनिक दृश्यरचना, या सगळ्याच्या अनुभवांचं साररूप असलेला- तरीही निराळा अनुभव ही फिल्म पाहताना (अनेकांना) आला. पण म्हणून ही कलाकृती श्रेष्ठ ठरावी काय? अर्थातच नाही. ती यंदाच्या चांगल्या कलाकृतींपैकी एक म्हणता येईल, फार तर. ही झाली दोन उदाहरणं. कुठलीही कलाकृती ‘टॉप’ची ठरवता येणार नाही, एवढंच सांगण्यासाठीची उदाहरणं. त्या मानानं किमतींनुसार- विशेषत: लिलावातल्या बोलींनुसार कलाकृतींची ‘वरपासून खालपर्यंत’ अशी क्रमवार यादी करणं सहज शक्य असतं.

devmanus marathi movie annoucement
‘देवमाणूस’ चित्रपटात झळकणार महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे यांची जोडी, सोबतीला दिसणार सुबोध भावे; ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित
Rinku Singh marriage announcement with mp priya saroj
क्रिकेटपटू रिंकू सिंहचं खासदार प्रिया सरोजशी लग्न ठरलं;…
Samruddhi Highway Thane Nashik tunnels Warli painting
समृद्धी महामार्गावरील बोगद्यांना आकर्षक चित्रांचा साज, ठाणे – नाशिकला जोडणाऱ्या बोगद्यावर स्थानिक वारली चित्रकलेचा आविष्कार
prasad oak baburav paintar biopic
प्रसाद ओक करणार प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक बाबुराव पेंटर यांची भूमिका; पोस्ट शेअर करत म्हणाला, “ही भूमिका साकारायला मिळणं हा श्री…”
javed akhtar got Asian culture award
जावेद अख्तर यांचा २१ व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवात सन्मान, ‘हा’ पुरस्कार मिळाल्यावर म्हणाले, “हल्लीच्या चित्रपटांमध्ये…”
Premachi Goshta actress Swarda Thigale react on troller
“रिप्लेसमेंटवाल्या भूमिका कलाकारांनी घेऊ नये…”, ‘प्रेमाची गोष्ट’मधील बदलावर युजरची प्रतिक्रिया; नवी मुक्ता म्हणाली, “आजही कलेचे…”
Maha Kumbha Mela 2025 Shankar Mahadevan Mahesh kale Rahul Deshpande suresh wadkar and More To Perform at Grand Cultural Festival
Maha Kumbh Mela 2025: महाकुंभ मेळ्यात होणार सुरांची बरसात; शंकर महादेवन यांसारख्या दिग्गज गायकांसह ‘हे’ मराठी कलाकार सादर करणार परफॉर्मन्स
priya bapat shares opinion on marathi industry
“क्षमता असूनही उमेशला मराठी सिनेमे ऑफर झाले नाहीत” प्रिया बापटने व्यक्त केली खंत; कलाकार म्हणून मांडलं प्रामाणिक मत

हेच तर विचित्र आहे, दृश्यकलेबद्दल. इथं एकेकट्या कलाकृती विकल्या जातात, त्यांची पुन्हा विक्री होताना किंमत वाढू शकते. अशा प्रकारे किंमत वाढली की त्यांचं महत्त्वही आपोआप वाढतं किंवा महत्त्वाची कलाकृती असल्यामुळेच तिची किंमत वाढली असं मानलं जातं (हा स्वत:चंच शेपूट चावणाऱ्या सापासारखा गोलगोल युक्तिवाद आहे). कलाकृतीला बाजारात महत्त्व मिळालं म्हणून ती ‘बाजारू’ – अशी टोकाची भूमिकाही नाही घेता येत. पण बाजारच दृश्यकलेत महत्त्वाचा ठरतो असंही म्हणायचं नसतं, म्हणू नयेच. बाजार हा एक महत्त्वाचा घटक. तो सर्वाधिक महत्त्वाचा ठरू नये, याची जबाबदारी मात्र कलावंतांची आणि प्रेक्षक, समीक्षक, कलाप्रदर्शनांचे गुंफणकार (क्युरेटर) यांची.

पण याहूनही चक्रावणारी बाब म्हणजे, बाजाराची तमा न बाळगता काही गुंफणकार धडाडीनं काम करतात. उदाहरणार्थ यंदाच्या व्हेनिस बिएनालेमधल्या मध्यवर्ती प्रदर्शनाचे गुंफणकार अॅड्रियानो पेड्रोसा! या मध्यवर्ती प्रदर्शनाला मोठं महत्त्व असतं. आजवर युरोपीय वा अमेरिकन कलासंस्थांमध्ये (बहुतेकदा, कला संग्रहालयांमध्येच) गुंफणकार म्हणून काम करणाऱ्यांना व्हेनिसनं या मध्यवर्ती प्रदर्शनासाठी संधी दिली होती, पण अॅड्रियानो हे ब्राझीलचे- त्यातही, दक्षिण अमेरिकी देशांतल्या कलेचे जाणकार. त्यांनी दक्षिण अमेरिकेतल्या जमातींची लोककला इथं आणली, शिवाय ‘आधुनिक चित्रकला’ हा युरोपीय प्रकार आणि बाकीच्या सर्व (आशियाई, आफ्रिकन आदी) देशांमधले ‘आधुनिक चित्रकार’ हे युरोपचे अनुयायी, हा समज खोडून काढण्याचा जोरकस प्रयत्न अॅड्रियानो यांनी केला. पण यापुढे काय होईल? अॅड्रियानो यांनी आधुनिक चित्रकला जगभरच्या ‘विकसनशील’ देशांमध्ये कुठे कुठे होत असतानाच्या काळातले (साधारण १९४० ते १९७० च्या दशकांतले) जे अरबी, आफ्रिकी चित्रकार व्हेनिस बिएनालेच्या मध्यवर्ती प्रदर्शनात मांडले, त्या सर्वांना आता ‘व्यासपीठ मिळालं’ म्हणून येत्या वर्षभरात त्यांच्या कलाकृती लिलावांमध्ये ‘चमकताना’ दिसू शकतील!

या संदर्भात, ’कलेचा इतिहास हा कलेच्या बाजारातूनच ठरत असतो का?’ हा प्रश्न उरतो. त्याचं उत्तर आज तरी ‘हो’च आहे.

पण नेमक्या आजच्या या काळात काही अत्यंत आश्वासक प्रयोग होताहेत. पूर्व युरोपातले दृश्यकलावंत बाजारापासून लांब असतील (आहेतच), पण निव्वळ स्वत:च्या अभिव्यक्तीसाठी कलाकृती न करता लोकांसाठी दृश्यकलेचा वापर करणं, कलावंतांनी सांघिक काम करणं, असे मार्ग त्यांनी आपलेसे केले आहेत. पण एवढं लांब कशाला पाहायचं? आपल्याकडे भारतात, महाराष्ट्रातही आश्वासक चित्र आहेच. ‘सेक्युलर आर्ट मूव्हमेंट’सारख्या संस्था लोकांपर्यंत कलाकृती घेऊन जाण्यासाठी काम करतात, तसंच ‘स्ट्रेंजर्स हाउस’ सारखी ना-नफा कलादालनं लोकांमधून आशयघन, अभिव्यक्तीपूर्ण दृश्यकलावंत शोधून त्यांना गॅलरीत स्थान देतात आणि हे काम कुठल्याही संस्थात्मक अवडंबराशिवाय होत राहातं. ग्रामीण जगण्यातली दृश्यं आणि आशय चित्रांमध्ये आणताना शैलीदारपणाला जवळपास फाटा देणारा आणि नवं ग्रामीण चित्र शोधू पाहणारा कुमार मिसाळ कलाक्षेत्रात आपली ओळख निर्माण करताना दिसतो. मोहित शेलारे चिखलातलं, घाणीतलं जगणं जर्दरंगांच्या चित्रांमधून मांडतो आणि कलाबाजारात मान असलेल्या ‘केमोल्ड’ कलादालनापर्यंत पोहोचतो; ‘दलित आर्ट’ अशी श्रेणी थेट मान्य करून, ती लोकांनाही मान्य करायला लावण्याची धमक दाखवणाऱ्या विक्रांत भिसेचं ऐसपैस मोठं प्रदर्शन दिल्लीचं एक कलादालन भरवतं… अशा आशादायी घटना या वर्षात घडल्या. हे चित्रकार काही याच वर्षात उत्पन्न झालेले नाहीत. त्यांच्या उदयामागे अनेक ना-नफा संस्था आहेत, तरुण चित्रकार आणि कलाविद्यार्थी यांना मिळणाऱ्या फेलोशिप आहेत. अशा अनेक साह्यकर्त्या संस्थांची महत्त्वाची अट साधारण एकच- तुम्हाला विचार करता आला पाहिजे आणि प्रसंगी तो शब्दांतूनही मांडता आला पाहिजे. ‘चित्रकारानं शब्दांमधून काही सांगण्याची गरजच काय?’ असं म्हणणं आता चैनीचं ठरू लागलं आहे. कलाकार निव्वळ कौशल्यवंत असू शकत नाहीच, तो काहीएक आशयाकडे प्रेक्षकांना नेत असतो, त्यासाठी अभिव्यक्ती करत असतो, हे आजच्या कलाक्षेत्रानं मान्य केेलेलं आहे (आधुनिक आणि समकालीन कलेच्या संग्रहालयांनी हेच गेल्या कैक वर्षांत रुजवलं आहे) आणि कलाबाजाराचाही नवा टप्पा हा आशय, अभिव्यक्ती यांकडे लक्ष देणारा आहे.

बाजार हा या कलाक्षेत्राचा एक भाग आहे. बहुतेकदा कलाकृतींबद्दल, कलावंतांबद्दल बातम्या होतात त्या बाजारामुळेच, पण त्या बातम्यांच्या पलीकडेही लोक पाहात असतात, पाहू शकतात. बाजारनिरपेक्ष दृष्टीनं कलाक्षेत्राकडे पाहू शकतात ते फक्त प्रेक्षकच. ते प्रेक्षक, जे कधीही चित्र विकत घेणार नसतात- पण कोणत्या चित्रांचा/ अभिव्यक्तीचा- आपल्या जगण्याशी संबंध आहे हे त्यांना कळत असतं. आपण प्रेक्षक आहोत. त्यामुळे चित्रांचा आशय शोधत राहणं हेच आपलं काम. त्यासाठी कोणत्याही कलेचे बारकावे माहीत असण्यापेक्षा, आपल्या काळाकडे पाहता येणं अधिक आवश्यक असतं. आपल्या काळात इतिहासाकडे, समाजातल्या विषमतेकडे, हिंसेकडे, लिंगभावाकडे कसं पाहायचं याची उत्तरं प्रयत्नपूर्वकच मिळवावी लागतात. आपण आपल्या काळाकडे असे प्रयत्नपूर्वक पाहात असताना कोण आपल्या प्रयत्नांना पुढे नेणाऱ्या कलाकृती करतंय, एवढं तर आपल्याला कळतंच. त्यातून आपणही आपापली – फक्त स्वत:पुरती- ‘टॉप टेन यादी’ बनवू शकू… दरवर्षी!

Story img Loader