डॉ. श्रीरंजन आवटे 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राष्ट्रध्वजाचा सन्मान राखणे हे अनुच्छेद ५१ (अ) नुसार प्रत्येकाचे कर्तव्य आहे…

“व्हर्सायचा शांततेचा करार झाला तेव्हा मी पॅरिसमध्ये होते. ऑपेरा हाऊसमध्ये अनेक राष्ट्रांचा राष्ट्रध्वजाला अभिवादन करत मोठा जल्लोष सुरू होता. त्यावेळी माझ्याजवळ एक भारतीय मुलगा आला आणि माझ्या कानात म्हणाला, आपल्या देशाचा राष्ट्रध्वज कधी अस्तित्वात येईल. त्याच्या डोळ्यात पाणी होतं. मी त्याला म्हणाले- लवकरच!” सरोजिनी नायडू २२ जुलै १९४७ रोजी संविधान सभेत बोलत होत्या. राष्ट्रध्वजाविषयी पं. जवाहरलाल नेहरू यांच्या आत्मीय भाषणानंतर त्या बोलत होत्या.

स्वतंत्र भारताचा राष्ट्रध्वज अधिकृतरीत्या स्वीकारण्याच्या कितीतरी आधी ध्वज ठरवण्यासाठीचे प्रयत्न सुरू झाले होते. स्वातंत्र्याचा मार्ग दिसू लागताच या प्रयत्नांना गती आली. त्याची गोष्ट सुरू होते पिंगाली वैंकय्या यांच्यापासून. हे आंध्र प्रदेशातील कलावंत. वैंकय्या यांनी २५ हून अधिक ध्वजरचनांची पुस्तिकाच गांधींना दाखवली. गांधी म्हणाले, भारतासाठी याहून वेगळी आणि नवी ध्वजरचना हवी. त्यानुसार १९२१ सालच्या काँग्रेस अधिवेशनात वैंकय्या यांनी ध्वजाची रचना दाखवली. तेव्हा त्यात दोन रंग होते. लाल आणि हिरवा. गांधींनी त्यात शांततेचा, अहिंसेचा पांढरा रंग असावा, अशी सूचना केली. त्यात बऱ्याच दुरुस्त्या होऊन पूर्ण स्वराज्याच्या मागणीनंतर काँग्रेस अधिवेशनात राष्ट्रध्वज मंजूर झाला. आज जो आपण तिरंगा पाहतो तसाच झेंडा होता; मात्र त्या ध्वजाच्या मध्यभागी चरखा होता.

हेही वाचा >>> संविधानभान: संविधानाचा अमीट शिक्का

संविधानसभेत तिरंगा सादर करताना नेहरू म्हणाले की धर्माचे रंग म्हणून आपण या रंगांची निवड केलेली नसून कलात्मक दृष्टीने आपला ध्वज सुंदर दिसावा या हेतूने ही रचना केलेली आहे. हा स्वातंत्र्याचा रंग आहे. भारताच्या संस्कृतीची, हजारो वर्षांच्या इतिहासाची ही साक्ष आहे. नेहरूंच्या या भाषणाने अवघे सभागृह भारावून गेले. जोवर या देशातील एक व्यक्तीदेखील गुलामीत असेल, अन्नपाण्यावाचून तळमळत असेल तोवर या स्वातंत्र्याला अर्थ नाही, याची त्यांनी सभागृहाला आठवण करून दिली. केवळ प्रतीकांचे अवडंबर माजवता कामा नये, तर प्रत्यक्ष मूल्य रुजवले पाहिजे, यासाठी नेहरू किती दक्ष होते याचा अनेकदा प्रत्यय येतो.

नेहरूंच्या भाषणानंतर सेठ गोविंद दास यांनी ध्वजाबाबतच्या ठरावाला अनुमोदन देतानाच प्रेम आणि अहिंसा या मूल्यांनी जग जिंकण्याची आकांक्षा व्यक्त केली. सय्यद मोहम्मद सादुल्ला आणि एच. सी. मुखर्जी यांनी मुस्लीम आणि ख्रिश्चन धर्मीय परंपरा सांगतानाच ध्वज धर्माच्या पलीकडे जाणारे मूल्य अधोरेखित करतो आहे, याची जाणीव करून दिली. जयपाल सिंग मुंडा म्हणाले की आदिवासी समुदायाचा लढा हजारो वर्षांचा आहे, त्या सर्वांच्या वतीने मी या ध्वजाला अभिवादन करतो. सुमारे २४ सदस्यांची भारताच्या तिरंग्याविषयीची भाषणे अतिशय भावस्पर्शी होती.

त्यागाचा केशरी, शांततेचा पांढरा आणि मातीशी नाळ सांगत समृद्धीचे गाणे गाणारा हिरवा रंग आपल्या तिरंग्यात आला होता. निळ्याशार रंगात २४ आरे असणारे चक्र सम्राट अशोकाशी नाते सांगतानाच कायद्याच्या राज्याचे सूचन करत होते. चरख्याच्या चाकाचीही ती आठवण होती. खादीतले तिरंग्याचे कापड ही तर स्वराज्याची निशाणी होती. बुद्धाचे बोट पकडून सम्यक मार्गाने वाटचाल करण्यासाठी हा झेंडा सोबतीला आला होता.

असा हा रेशमी आणि खादी कापडातील तिरंगा नेहरूंनी आपल्या छातीशी धरला तेव्हा सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला आणि उत्साहाने भारतीय संविधानसभेने राष्ट्रध्वज स्वीकारला. त्याचा सन्मान राखणे हे अनुच्छेद ५१ (अ) नुसार प्रत्येकाचे कर्तव्य आहे. राष्ट्रध्वजाचा सन्मान राखतानाच प्रत्येक माणसाचा सन्मान राखला पाहिजे कारण माणसांशिवाय राष्ट्र असू शकत नाही. हे आपल्याला कळेल तेव्हाच ‘झंडा ऊंचा रहे हमारा’ हे सार्थ अभिमानाने म्हणता येईल.

poetshriranjan@gmail.com

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article 51a in constitution of india fundamental duties of the citizens of india zws