भारताचे संविधान १९४६ ते १९४९ या काळात लिहिले गेले असले तरी त्याची मुळे स्वातंत्र्य आणि समतेच्या आंदोलनात होती…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘‘आपण आपली कर्तव्ये योग्य प्रकारे पार पाडली, तर आपण हक्कांना पात्र असतो आणि त्या हक्कांचे संरक्षणही होऊ शकते, हे मी माझ्या अशिक्षित मात्र समंजस असलेल्या आईकडून शिकलो आहे.’’ महात्मा गांधींनी १९४७ साली लिहिलेल्या पत्रात म्हटले होते. हे पत्र लिहिले होते युनेस्कोचे संचालक ज्युलियन हक्सले यांना. हे पत्र लिहिले होते कारण गांधींना निमंत्रण आले होते. मानवी हक्कांच्या जाहीरनाम्याबाबत चर्चेसाठी जगभरातील ६० व्यक्तींना बोलावण्यात आले होते. गांधी हक्क आणि कर्तव्ये यांचा परस्परांशी संबंध आहे, अशी मांडणी करतात. किंबहुना हक्कप्राप्तीसाठी कर्तव्य बजावण्याची पूर्वअट आहे, असेच ते सांगू पाहतात. गांधींच्या या मांडणीविषयी मतभेद असू शकतात; मात्र कर्तव्य बजावण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले, हे महत्वाचे आहे.

त्यामुळे कर्तव्यांचे पालन करणे गरजेचे आहे, हे लक्षात ठेवले पाहिजे. संविधानाच्या अनुच्छेद ५१ (क)मधील पहिलेच कर्तव्य आहे ते संविधानाचे पालन करण्याबाबत. संविधान आणि संविधानाने निर्माण केलेल्या आदर्श आणि संस्थांविषयी आदर बाळगला पाहिजे. प्रत्येक नागरिकाचे हे कर्तव्य आहे. लोकप्रतिनिधीदेखील संविधानाची शपथ घेतात कारण संविधानाचे पालन करणे गरजेचे आहे. संविधानिक पदावरील प्रत्येक व्यक्तीने संविधानानुसार कारभार केला पाहिजेच; पण प्रत्येक नागरिकाने संविधानातील मूल्यांविषयी आदर व्यक्त केला पाहिजे. संविधानाद्वारे स्थापित झालेल्या संस्थांचा सन्मान केला पाहिजे. यासोबतच राष्ट्रगीत आणि राष्ट्रध्वज या दोन महत्त्वाच्या राष्ट्रीय प्रतीकांचाही सन्मान केला पाहिजे, असा उल्लेख पहिल्याच कर्तव्यामध्ये केला आहे. संविधान किंवा राष्ट्रध्वज यांच्याविषयीचा आदर म्हणजे कोणते कर्मकांड नाही; तर त्या मूल्यांविषयी आदरभाव असणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.

हेही वाचा >>> व्यक्तिवेध : एम. एस. वालिआथन

दुसरे कर्तव्य असे की स्वातंत्र्य आंदोलनाला ज्यामुळे स्फूर्ती मिळाली अशा आदर्शांची जोपासना करणे आणि त्यानुसार वागणेे. भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनाने कोणती मूल्ये महत्त्वाची मानली? आपण ब्रिटिशांना विरोध केला नाही तर वसाहतवादी, साम्राज्यवादी, शोषणकारी प्रवृत्तींना विरोध केला. स्वातंत्र्यानंतर कॉमनवेल्थमध्ये सामील झाल्यावर नेहरूंना ब्रिटनमधील पत्रकार परिषदेत प्रश्न विचारला गेला की ब्रिटिशांनी इतकी वर्षे तुमच्यावर राज्य केले तरी तुम्ही कॉमनवेल्थमध्ये कसे काय सामील झालात? यावर नेहरू म्हणाले की, याला दोन कारणे आहेत. एक म्हणजे आम्ही भारतीय लोक दीर्घकाळ द्वेष करत नाही आणि दुसरे म्हणजे आमच्या देशात गांधी जन्मले! नेहरूंचे हे उत्तर खास आहे कारण ते प्रेमाचे आणि उदारतेचे महत्त्व अधोरेखित करते. भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनाने द्वेषाला नाकारले, प्रेमाला स्वीकारले. या आंदोलनाने जमातवाद धिक्कारला आणि धर्मनिरपेक्षतेला कवेत घेतले. विषमतेवर प्रहार केला आणि समतेचा आग्रह धरला. साम्राज्यवादाला विरोध केला आणि स्वराज्याचा मार्ग धरला. जात धर्माच्या ध्रुवीकरणाची वाट सोडून दिली आणि एकतेची वाट चोखाळली. थोडक्यात, स्वातंत्र्य, समता आणि सहभावाची मूल्यत्रयी आपल्या स्वातंत्र्य आंदोलनात अधिक दृढ झाली. हा आपला समृद्ध वारसा आहे. त्याविषयी आदर बाळगणे हे कर्तव्य आहे, हे खरे तर वेगळे सांगण्याचीही आवश्यकता नाही.

भारताचे संविधान १९४६ ते १९४९ या काळात लिहिले गेले असले तरी त्याची मुळे होती स्वातंत्र्य आणि समतेच्या आंदोलनात. त्यामुळे या आंदोलनांमधून संविधानासाठीची जमीन तयार झाली. या जमिनीविषयी कृतज्ञ राहणे हे आपले आद्या कर्तव्य आहे. या मूल्यांची जोपासना करत राहणे गरजेचे आहे. जगदीश खेबुडकरांच्या गाण्यात थोडा बदल करून असे म्हणता येईल:

‘‘संविधानाने दिला मूल्यरूपी वसा

आम्ही चालवू हा पुढे वारसा’’

poetshriranjan@gmail.com