वडिलांनी घर सोडलं, तेव्हा मी १३ वर्षांचा होतो… रस्त्यापलीकडून त्यांनी माझ्याकडे पाहून हात हलवला… ती हालचाल ‘आपण कधीही भेटणार नाही’ असंच सांगणारी असल्याचं मला जाणवलं… कदाचित तिथूनच मी अभिनय शिकलो…’ – जीन हॅकमन यांनी सांगितलेली ही सुमारे १९४३ सालची आठवण कुठल्याशा मुलाखतीत पहिल्यांदा छापली गेली, तेव्हा निम्म्याहून अधिक वाचकांना वाटले असावे की, ‘माझे अभिनयगुण वडिलांकडून आले’ असे हॅकमन म्हणताहेत- पण तसे नाही. उलट, त्या वयातही ‘अमुक हालचाल म्हणजेच अमुक भावना नेमकी पोहोचवणे’ हे उमगल्याची ती आठवण होती.

अमेरिकी, हॉलीवूडचे, त्यातही १९६० च्या दशकात मारधाडपटांपासूनच सुरुवात करणारे असले, तरी जीन हॅकमन अभिनय करू शकताहेत- आणि त्यात त्यांची शैलीसुद्धा दिसते आहे, याचा साक्षात्कार १९६७ मध्ये त्यांना सहायक भूमिकेसाठी मिळालेल्या ‘ऑस्कर’ने करून दिला. क्लाइड बॅरो व कुटुंबीय या दरोडेखोर अमेरिकी ‘गँग’वर आधारलेल्या ‘बॉनी अॅण्ड क्लाइड’मधील जीन हॅकमन यांची भूमिका धसमुसळ्या, पण चपळ मोठ्या भावाची. या थोरल्याला काम चोख करता येते, पण कामाचे गांभीर्य लक्षात येत नाही म्हणून तो धाकट्याचा मदतनीसच, हे प्रेक्षकांपर्यंत हॅकमन यांनी नेमके पोहोचवले.

तरुणपणी अमेरिकी नौदलासाठी काम करावे लागल्यानंतर अभिनेता व्हायचे ठरवून ते नाटकांत कामे करू लागले. तेव्हा डस्टिन हॉफमनसुद्धा त्यांच्यासारखेच, धडपडे नट होते. या दोघांवर ‘मोठे नट नाही होता येणार’ असा शिक्का तेव्हा बसलेला होता, पण १९८८ सालच्या ऑस्कर – सर्वोत्कृष्ट अभिनेता- संभाव्य यादीत या दोघांचाही समावेश होता. ‘मिसिसिपी बर्निंग’साठी हॅकमन आणि ‘रेन मॅन’साठी हॉफमन. विजेते हॉफमन ठरले.

सहा फूट दोन इंच उंची, जाडसर चेहरा यांमुळे पोलीस वगैरे भूमिकांत ते शोभत. पण संशय, हताशा, ईर्षा, हाव वा लोभ… असे अनेक भाव या चेहऱ्यावर उमटत. खासियत म्हणजे, दुष्कृत्य करण्याआधीचे त्यांचे कुत्सित हसणे. प्रत्येक भूमिकेवर यामुळे त्यांची छाप पडे. अशीच छापपाडू भूमिका म्हणजे ‘फ्रेंच कनेक्शन’मधला अधिकारी- स्वत:ला गोळी लागल्यानंतर, आता फ्रेंच अमली पदार्थ दलालाला धडा शिकवायचाच, या ईर्ष्येने पेटलेला… दलालाने ज्या मेट्रो-रेल्वेचे अपहरण केले, तिचा पाठलाग हॅकमन रस्त्यावरून करतो, अखेर मेट्रो एका स्थानकात, दुसऱ्या गाडीस आदळून थांबते, तो दलाल उतरत असतानाच हॅकमन त्याच्यावर गोळी झाडतो… दोघेही धाडकन कोसळतात! असेच कोसळले दोघे.

घरातल्या घरातच. जीन हॅकमन (९५) आणि त्यांची पत्नी- पियानोवादक बेट्सी अराकावा (६५). घरात शिरल्यानंतरच्या बंदिस्त व्हरांडावजा खोलीत हॅकमन. वरच्या न्हाणीघराच्या दरवाज्यात अराकावा. न्हाणीघराच्याच एका कप्प्यात या दाम्पत्याकडल्या तीन पाळीव श्वानांपैकी एक, निश्चेष्ट. न्यू मेक्सिको राज्यातल्या सान्ता फे या छोटेखानीच शहरात, भलेमोठे आवार असलेल्या घरात हॅकमन राहात. झाला तो प्रकार १७ फेब्रुवारीलाच घडला असावा, पण २६ फेब्रुवारीस शहररक्षकाने घरात मृतदेह पाहिला, याची २८ फेब्रुवारीला बातमी झाली… ‘घातपात नसावा’ असाच अंदाज असला तरी नक्की झाले काय, कुणालाच माहीत नाही. त्यांच्या मृत्यूचा धक्का बसलेल्यांत, पहिल्या पत्नीपासून झालेले दोन मुलगे व एक मुलगी यांचाही समावेश आहे.

Story img Loader