मराठी प्रेक्षकांनी कलाकाराच्या सौंदर्यापेक्षा कलेलाच प्राधान्याने दाद दिलेली आहे. दादा कोंडकेंपासून दामूअण्णा मालवणकर, शरद तळवलकर ते अशोक सराफ यांच्यापर्यंतच्या कलाकारांप्रती प्रेक्षकांची हीच दिलखुलास, गुणग्राहक वृत्ती दिसून आलेली आहे. गेली पन्नासएक वर्षे चतुरस्रा अभिनयकौशल्याने प्रेक्षकांची करमणूक करणाऱ्या अशोक सराफ यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार मिळाल्याने त्यावर राजमान्यतेचीही मोहोर उमटली आहे.
हेही वाचा >>> व्यक्तिवेध : रामकृष्ण नायक
मुंबईत जन्मलेल्या अशोक सराफांनी आपले मामा गोपीनाथ सावकार यांच्या छत्रछायेखाली नाटकांतून रंगभूमीवरचे पहिले धडे गिरवले. ‘ययाती आणि देवयानी’ या नाटकाद्वारे ते रंगभूमीवर पदार्पण करते झाले. संगीत नाटकांतूनही भूमिका केल्या. विजया मेहतांच्या ‘हमिदाबाईची कोठी’मधील त्यांची काहीशी नकारात्मक भूमिकाही गाजली. ‘डार्लिंग डार्लिंग’, ‘मनोमीलन’, ‘सारखं छातीत दुखतंय’, ‘व्हॅक्युम क्लीनर’ आदी नाटकांतून त्यांनी विविधरंगी भूमिका रंगवल्या. दादा कोंडकेंच्या ‘पांडू हवालदार’ तसेच ‘राम राम गंगाराम’मधील त्यांनी साकारलेला म्हमद्या चिक्कार गाजला. आपल्याला टक्कर देऊ शकणाऱ्या या कलाकाराला आपल्या पुढच्या चित्रपटांत घेणे मात्र दादा कोंडकेंनी टाळले असे म्हणतात. ८० च्या दशकात लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याबरोबर त्यांची विनोदवीर म्हणून जोडी जमली.
सचिन पिळगावकर, महेश कोठारे या दिग्दर्शकांच्या विनोदी चित्रपटांनी हे दशक गाजले. त्यात या जोडीचीही तितकीच कमाल होती. ‘अशी ही बनवाबनवी’, ‘नवरी मिळे नवऱ्याला’, ‘गंमतजंमत’, ‘भुताचा भाऊ’, ‘आयत्या घरात घरोबा’, ‘आत्मविश्वास’, ‘नवरा माझा नवसाचा’, ‘वजीर’, ‘चौकट राजा’, ‘कळत नकळत’, ‘निशाणी डावा अंगठा’ असे विनोदी तसेच गंभीर विषय हाताळणारे चित्रपट त्यांनी केले. ‘हम पांच’, ‘छोटी बडी बातें’, ‘डोन्ट वरी हो जाएगा’ अशा हिंदी मालिकांतूनही त्यांनी अभिनयाची छाप पाडली. याच काळात काही हिंदी चित्रपटांतूनही कामे केली. ‘सिंघम’, ‘करण अर्जुन’, ‘कोयला’, ‘गुप्त’, ‘प्यार किया तो डरना क्या’ ही त्यांतली काही नावे. गंभीर, खलनायकी छटा असलेल्या भूमिकाही त्यांनी समरसून व ताकदीने साकारल्या. विलक्षण बोलका चेहरा, संवादफेकीवरील प्रचंड हुकूमत, परिस्थितीजन्य विनोदाची समज ही त्यांच्या अभिनयाची बलस्थाने. पण त्यांच्या अभिनयाच्या क्षमतेला आव्हान देणारी भूमिका मात्र त्यांच्या वाट्याला फार क्वचितच आली. महाराष्ट्र राज्य पुरस्कारांसह असंख्य पुरस्कार त्यांना या कलाप्रवासात लाभले. अलीकडेच त्यांचे आत्मकथनही प्रसिद्ध झाले आहे. अजूनही ते रंगभूमीवर उत्साहाने सक्रीय आहेत. अशा प्रतिभावान कलाकाराचा राष्ट्रीय पातळीवरील पुरस्काराने केव्हाच सन्मान व्हायला हवा होता. निदान राज्य सरकारने तरी त्यांच्या कलाकीर्दीची दखल घेतली, हेही नसे थोडके.