एल.के.कुलकर्णी

जागतिक भूकंप क्षेत्राचीसंकल्पना जगापुढे येण्यास कारण ठरला, १८९७ मध्ये आसाममध्ये झालेला ८.७ रिश्टर स्केलचा भीषण भूकंप. भूकंपकेंद्र, भूकंपनाभी वगैरेच्या व्याख्या त्यातूनच विकसित झाल्या…

पृथ्वीवर दरवर्षी १० लाखांपेक्षा अधिक भूकंप होतात. त्यापैकी सुमारे नऊ लाख भूकंप एक ते २.९ रिश्टर श्रेणीचे, तर फक्त १० ते २० भूकंप सात ते ७.९ श्रेणीचे असतात. आठपेक्षा अधिक श्रेणीचे महाभूकंप (मेगाअर्थक्वेक) क्वचित होतात. आजवरचा सर्वांत मोठा भूकंप चिलीमध्ये झाला. तो ९.५ श्रेणीचा होता.

पृथ्वीवर भूकंप कुठेही होऊ शकतो हे खरे असले, तरी काही विशिष्ट क्षेत्रांत भूकंपांचे प्रमाण जास्त आढळले. त्याला ‘जागतिक भूकंप क्षेत्र’ म्हणतात. हे क्षेत्र दोन मुख्य भागांत विभागलेले दिसते. एक भूमध्यसागर ते हिमालय असा पूर्वपश्चिम पसरलेला पट्टा आणि दुसरा पॅसिफिक महासागराच्या पूर्व व पश्चिम किनाऱ्यावर पसरलेला अर्धवर्तुळाकार पट्टा. त्यात पुढील भागांचा समावेश होतो. उत्तर व दक्षिण अमेरिका खंडाचा पश्चिम किनारा, मध्य अमेरिका (मेक्सिको, इक्वेडोर, वेस्ट इंडिज बेटे इ.), मध्य अटलांटिक महासागर, भूमध्य सागराचा परिसर (स्पेन, पोर्तुगाल, इटली, तुर्कस्तान इ.) इराण, इराक, हिमालयाचा दक्षिण व उत्तर पायथ्याचा भाग, आग्नेय आशिया, इंडोनेशिया, फिलिपाइन्स, न्यूगिनी इ. आणि आशिया खंडाचा पूर्व किनारा (जपान व आजूबाजूचा भाग). जगातील ९० टक्के भूकंप पॅसिफिक किनाऱ्यावरील पट्ट्यात होतात. तसेच या पट्ट्यात ७५० ते ९०० (म्हणजे ७५ टक्के) जागृत वा सुप्त ज्वालामुखी असल्याने त्याचे नाव ‘अग्निवलय’ (रिंग ऑफ फायर) पडले.

हेही वाचा >>> कलाकारण :  गडद हिरवा; फिकट ‘भगवा’?

‘जागतिक भूकंप क्षेत्राची’ संकल्पना भारतातूनच जगापुढे आली. १८९७ मध्ये आसाममध्ये ८.७ रिश्टर स्केलचा भीषण भूकंप झाला. त्यावेळचे भारतीय भूगर्भसर्वेक्षणाचे (जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया) डेप्युटी सुपरिंटेंडेंट आर. डी. ओल्डहॅम यांनी त्याचा सखोल अभ्यास केल्यामुळे तो ‘ओल्डहॅम भूकंप’ म्हणूनही ओळखला जातो. या भूकंपास कारणीभूत असणाऱ्या ‘चिद्रांग’ या विभंगाचा शोध लावून त्यांनी विभंगांचा भूकंपाशी संबंध प्रस्थापित केला. ‘एस, पी आणि बॉडी’ या तीन प्रकारच्या भूकंप लहरींचाही शोध त्यांनी लावला. भूकंपाची घटना भूकवचाखाली नेमकी ज्या ठिकाणी घडली, त्यास भूकंपकेंद्र (सेंटर) म्हणतात. तर त्याच्या वरच्या भूपृष्ठावरील बिंदूस भूकंपनाभी (एपिसेंटर) म्हणतात. ओल्डहॅमनी त्या भूकंपाचे संभाव्य केंद्र, भूकंपनाभी व प्रभावक्षेत्र नकाशावर निश्चित केले. ही जागतिक भूकंप क्षेत्राच्या नकाशाची सुरुवातच होती. पुढे भूकंपमापक यंत्राचा शोध लागल्यावर भूकंपाचे केंद्र त्वरित निश्चित करता येऊ लागले. तसेच यापूर्वी होऊन गेलेल्या भूकंपाची संभाव्य केंद्रेही नकाशात दाखवली जाऊ लागली आणि ‘जागतिक भूकंप क्षेत्र’ नकाशावर आकार घेऊ लागले.

पण विशिष्ट भागातच ज्वालामुखी व भूकंपाचे प्रमाण जास्त का आहे, हा प्रश्न शिल्लक होता. १९६०च्या दशकात ‘प्लेट टॅक्टोनिक्स’ सिद्धांतातून भूकंप का होतात याचे व विशिष्ट भागात का अधिक होतात याचेही स्पष्टीकरण मिळाले. (याच सदरातील ‘अकल्पिताचे धक्के’ या लेखात ते स्पष्टीकरण दिले आहे.) १९७० मध्ये ‘धसणारी क्षेत्रे’ या संकल्पनेचा शोध लागला. त्यातून भूकंपप्रवण क्षेत्रांत काही विशिष्ट ठिकाणी महाभूकंप का होतात हे समजले. काही ठिकाणी दोन शिलावरण प्लेट्स (टॅक्टोनिक प्लेट्स) एकमेकींना प्रचंड शक्तीने दाबत असतात. त्या आंतरक्रियेत प्रचंड दाबामुळे त्या दोन्हीपैकी एक शिलावरण प्लेट दुसरीच्या खाली हळूहळू धसत जाते. अशा ठिकाणी खोल धसणाऱ्या प्लेटमुळे भूकवचाखाली प्रचंड मोडतोड होऊन महाभूकंप होतात. २००४ चा इंडोनेशिया त्सुनामीस कारण ठरलेला भूकंप किंवा या महिन्यात (ऑगस्ट २०२४) जपानमध्ये झालेला भूकंप ही याची उदाहरणे.

भारतात महाराष्ट्र व दख्खनचे पठार हे लाव्हारसाचे थर साचून कठीण अग्निजन्य खडकांनी बनलेले आहे. त्यामुळे भूकंपीयदृष्ट्या ते अधिक स्थिर आहे असे, ‘जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया’चे संस्थापक थॉमस ओल्डहॅम यांनी १८६९मध्ये सांगितले होते. पण हे सांगताना त्यांनी तुलनेने स्थिर असे सुचवले होते. ते लक्षात न घेतल्याने १९६६ मधील कोयना व १९९३ मधील किल्लारी भूकंपामुळे, दख्खनचे पठार भूकंपापासून सुरक्षित आहे, या अनेकांच्या कल्पनेला धक्का बसला. कोयना येथील १९६६ चा भूकंप व पुढील भूकंपीय धक्के यास तेथील धरणही अंशत: कारणीभूत आहे. दख्खनच्या पठारावर काही ठिकाणी विभंग असल्याने, अधूनमधून भूकंपाचे धक्के बसतात.

हेही वाचा >>> बुकबातमी : स्थलांतरितांच्या वादाची व्यर्थता

१८९७ मध्ये आर. डी. ओल्डहॅम यांनी भूकंप क्षेत्र नकाशावर दर्शवण्यास सुरुवात केली होती. गंमत म्हणजे भारतातील भूकंपप्रवण क्षेत्रे दर्शवणारा पहिला अधिकृत नकाशा ‘भारतीय मानक संस्थे’ने (आयएसआय – इंडियन स्टँडर्ड्स इन्स्टिट्यूट) १९६२ मध्ये प्रकाशित केला. तो जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या १९३५च्या भूकंपीय नकाशावर आधारित होता. त्याचा उद्देश भारतात भूकंपापासून सुरक्षित इमारती उभारण्यासाठी क्षेत्रे ठरवणे हा होता. अशी क्षेत्रे ठरवणारा भारत हा त्या वेळी पहिलाच देश होता. तो नकाशा वरचेवर सुधारित करण्यात आला. सध्या भारताच्या नकाशात एकूण चार भूकंपप्रवण क्षेत्रे दर्शवली असून ती पुढीलप्रमाणे आहेत.

झोन ५ – सर्वोच्च भूकंप जोखीम क्षेत्र – काश्मीर, पश्चिम व मध्य हिमालय, उत्तर व मध्य बिहार, ईशान्य भारत (आसाम इतर प्रांत), कच्छ, अंदमान व निकोबार बेटे.

झोन ४ – उच्च भूकंप जोखीम क्षेत्र – जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम, गंगा- सिंधू खोऱ्यापैकी पंजाब, चंडीगड, पश्चिम उत्तर प्रदेश, टेहरी, बिहार, उत्तर बंगाल, दिल्ली व महाराष्ट्रातील कोयनानगर परिसर

झोन ३ – मध्यम भूकंप जोखीम क्षेत्र – अहमदाबाद, सुरत, वडोदरा, मंगलोर, मुंबई, चेन्नई, कोलकाता, विजयवाडा, कोईम्बतूर इ. शहरे व पूर्ण केरळ

झोन २ – कमी भूकंप जोखीम क्षेत्र – बंगलोर, हैद्राबाद, विशाखापट्टणम, ग्वाल्हेर, जयपूर, मदुराई इ. शहरे

या नकाशात झोन १ (भूकंपापासून सुरक्षित क्षेत्र) दाखवण्यात आलेला नाही. ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे!

तात्पर्य, पृथ्वीवर भूकंप कुठेही होऊ शकत असला तरी त्याची शक्यता कुठे अधिक आहे हे सध्या सांगता येते. शास्त्रशुद्ध अभ्यासाने ते अधिक अचूकपणे सांगता येते. आजवर या क्षेत्रात भारतातील संशोधन महत्त्वाचे ठरलेले आहे. उदा. टॅक्टोनिक प्लेट सिद्धांत, भूकंप लहरी, भूकंप क्षेत्रे, भूकंपरोधक बांधकामांची मानके इत्यादी शोधांची नांदी भारतातच झाली. हा वारसा पुढे नेत, आपली भावी पिढीही त्यात मोलाची भर घालेल, अशी आशा करू या.

लेखक भूगोलाचे अभ्यासक आणिनिवृत्त शिक्षक आहेत.

lkkulkarni @gmail.com