जगताना निवडलेला कुठलाही मार्ग म्हणजे मनुष्यानं अनंताच्या भेगेला दिलेलं तत्त्वज्ञानात्मक उत्तर, हे लक्षात घेतल्यास तत्त्वज्ञ/ तत्त्वज्ञेतर अशी दरी उरेल?
‘‘In a universe suddenly divested of illusion and light, a man feels an alien, a stranger.’’ – Albert Camus
आपल्या चहूबाजूंना असलेल्या दृश्य तपशिलांच्या वेढ्याला तत्त्वज्ञानाच्या भाषेत ‘पूर्वप्राप्त मानवी अवस्था’ म्हणतात. या पूर्वप्राप्त निसर्गनिर्मित आणि मानवनिर्मित तपशिलांनी ओतप्रोत भरलेल्या अवस्थेत प्रत्येक व्यक्तीचा प्रवेश एखाद्या आगंतुकासारखा होत असतो. दृश्य तपशील स्वत:च्या अर्थाची पाटी घेऊन उभे नसतात. त्यांचा सतत प्रयत्नपूर्वक अर्थ लावावा लागतो. काही ज्ञानपरंपरा या दृश्य तपशिलांचा अदृश्य अर्थ शोधण्यासाठी आकाशाकडे झेप घेऊन आकाशापलीकडे जातात तर काही तपशिलांच्या मुळाशी जाऊन तळ गाठतात. मात्र पाश्चात्त्य ज्ञान परंपरेतील या दोन परस्परविरोधी प्रवाहांची प्राप्त मानवी अवस्थेविषयी किमान एकवाक्यता आहे. ती अशी की, प्राप्त मानवी अवस्थेतील दृश्य तपशिलांमध्ये आगंतुकपणा विखुरलेपण, खंडितपणा, विरोधाभास, क्षणभंगुरता, अपुरेपणा, सापेक्षता, अनिश्चितता, चंचलता आहे. त्यामुळे प्राप्त मानवी अवस्थेचं वर्णन करताना पाश्चात्त्य परंपरेत अभावदर्शक संकल्पनांचा वापर करण्यात आला आहे.
पूर्वप्राप्त मानवी अवस्थेचं वर्णन प्लेटोने गुहाजीवन, सेंट ऑगस्टिनने पतित जीवन, देकार्तने निराधार जीवन, पास्कलने एकाकी जीवन, रूसोने भ्रष्ट जीवन, मार्क्सने परात्म जीवन, फ्रॉइडने बेचैन जीवन, वेबरने बकाल जीवन, हायडेगरने विस्मृतीग्रस्त जीवन, सार्त्रने आगंतुक जीवन तर काम्यूने अब्सर्ड जीवन असं केलं आहे. एका प्रकारे ही अभावदर्शक संकल्पनांची शृंखला पाश्चात्त्य परंपरेतील ‘सब्बम दुख:म् ’ म्हणता येईल.
तर्कतीर्थ विचार : वेदांचे पावित्र्य माझ्या हृदयात
प्राप्त मानवी अवस्थेच्या आगंतुक, क्षणभंगुर, विखुरलेल्या, खंडित, विरोधाभासी, अस्पष्ट, चंचल तपशिलांची पूर्वनिर्धारित चौकटींमध्ये व्यवस्था लावलेली असते आणि अशा स्थलकाल सापेक्ष पूर्वनिर्धारित चौकटीत प्रत्येकाचा जन्म होतो. कुठल्याही प्राप्त चौकटीची तुलना इतर स्थळ आणि काळातल्या चौकटींशी करताना त्यांच्यातली सापेक्षता समोर येते. पण हा तुलनात्मक दृष्टिकोन मोजक्यांनाच लाभतो.
अ) श्रमाची कामं आणि बुद्धीची कामं यांतली दरी :
मध्ययुगीन बंदिस्त युरोपियन समाजात बुद्धीची कामं आणि श्रमाची कामं यात विभागणी करून श्रमाच्या कामांना ज्ञानाचा दर्जा नाकारलेला होता. त्यामुळे श्रमिक समाजाला- जवळपास ८० टक्के लोकांना- ज्ञानकक्षेबाहेर ढकलण्यात आलं होतं. मात्र १८ व्या शतकात प्रबोधन चळवळीच्या क्रांतिकारक वातावरणात बुद्धी आणि श्रम यांतील दरी हळूहळू कमी होत कुठलाही भेदभाव न करता समग्र मानवी व्यवहारातील प्रत्येक कला, कृती, उद्याोग, व्यवसायाला तत्त्वत: ज्ञानाचा दर्जा बहाल करण्यात आला. त्याचं ऐतिहासिक उदाहरण म्हणजे दनी दिदरो (१७१३-१७८४) या फ्रेंच विचारवंतांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेला ‘एनसायक्लोपिडिया’ नावाचा महत्त्वाकांक्षी ज्ञानप्रकल्प. या ज्ञानप्रकल्पाअंतर्गत मानवी व्यवहारातील प्रत्येक पैलूंवर तज्ज्ञांकडून संशोधनात्मक नोंदी लिहून घेतल्या गेल्या.
खरंतर १८ व्या शतकापर्यंत आजच्यासारख्या अनेक ज्ञानशाखा अस्तित्वात नव्हत्या. म्हणून तुलनेनं ज्ञान क्षेत्राचा आकार लहान होता. त्याकाळी एकाच वेळी साहित्यिक, विचारवंत, वैज्ञानिक होता येत होतं. समग्र ज्ञानव्यवहार फिलॉसफी या शब्दाने ओळखला जात असे. नैसर्गिक तथ्यांचा अभ्यास नॅचरल फिलॉसफी अंतर्गत मोडत असे. उदाहरणार्थ विज्ञानात पायाभूत ठरलेल्या आयझॅक न्यूटनच्या ऐतिहासिक ग्रंथाचं नाव ‘द मॅथेमॅटिकल प्रिन्सिपल्स ऑफ नॅचरल फिलॉसफी’ हे होतं. आजदेखील नैसर्गिक, मानवनिर्मित, मानव्य आणि सामाजिक तथ्यांच्या तळाशी जाऊन केलेला सखोल अभ्यास फिलॉसफी अंतर्गतच मोडत असतो. त्यामुळे ज्ञान क्षेत्रातील सगळ्या विषयांमधील सर्वोच्च पदवीला पीएचडी म्हणजेच डॉक्टर ऑफ फिलॉसफी म्हटलं जातं. खरंतर, डॉक्टर हा शब्द लॅटिन क्रियापद docere पासून बनलेला आहे. डॉक्टर शब्दाचा मूळ अर्थ शिक्षक होतो. आणि डॉक्टर ऑफ फिलॉसफी म्हणजे असा शिक्षक ज्याने त्याचा विषय मुळापासून अभ्यासलेला असतो.
ब) इंद्रियगम्य तपशील आणि बुद्धिगम्य ज्ञान यांतली दरी :
वरच्या विवेचनात श्रम आणि बुद्धीला विभागणाऱ्या मध्ययुगीन दरीसोबतच मानवी व्यवहारातील असंख्य तपशील आणि त्या दृश्य तपशिलांना अदृश्य तळापासून वेगळी करणारी आधुनिक दरी, अशा दोन दऱ्यांचा निर्देश करण्यात आला आहे. या दोन्ही दऱ्यांची चर्चा तत्त्वज्ञ आणि तत्त्वज्ञेतर यात अस्तित्वात असलेल्या दऱ्यांचं स्वरूप समजण्यासाठी महत्त्वाची आहे. खरं तर आजचे स्वयंघोषित तत्त्वज्ञ एका प्रकारे बुद्धी आणि श्रम या मध्ययुगीन दरीचाच वारसा चालवताना आढळतात. वास्तवात, प्रत्येक माणूस तत्त्वज्ञ असतो. तत्त्वज्ञेतर असं कुणी नसतं. फरक एवढाच की स्वयंघोषित तत्त्वज्ञेतर त्यांच्या खासगी तत्त्वज्ञानाची मांडणी करताना तपशिलांची वरकरणी व्यवस्था लावतात. आपापल्या परीनं वैयक्तिक पातळीवर समग्रतेचे आडाखे बांधत असतात. मात्र तपशिलांची व्यवस्था लावताना अपरिहार्यपणे कळत-नकळतपणे अशा नियामक तत्त्वांचा आणि संदर्भबिंदूंचा वापर करतात, जे खासगी नसतात. फ्रेंच तत्त्वज्ञ लुई अल्तुसर म्हणतो की, तत्त्वज्ञानातील वैचारिक झटापटी समजून घेण्यासाठी तत्त्वज्ञेतरांच्या अबोध तत्त्वज्ञानाचा सामूहिक संदर्भबिंदू किंवा नियामक तत्त्वांचा शोध घेणं आवश्यक आहे. तत्त्वज्ञानाचे संदर्भबिंदू सरकले किंवा बदलले तर पूर्ण चौकटच हलते किंवा बदलते. तत्त्वज्ञान हे एकार्थाने गृहीत धरलेल्या संदर्भबिंदूंचा शोध, अभ्यास आणि पडताळणी असते.
बहुसंख्य लोकांना पूर्वप्राप्त चौकटीतच आपापल्या परीनं जीवनातील विखुरलेल्या तपशिलांची व्यवस्था लावावी लागते. तपशिलांच्या तळाशी असणारं नियामक तत्त्व मात्र त्यांच्यासाठी एखाद्या खोल डोहाच्या तळासारखं अदृश्य राहतं. त्याचं स्वरूप आणि अर्थ न उमगल्यास, तपशिलांच्या वरकरणी व्यवस्थापनेत केवळ यांत्रिकपणा उरतो. प्रत्येक तत्त्वज्ञेतराला अधूनमधून जगण्यातील यांत्रिकपणाची निरर्थकता जाणवतदेखील असते. पण प्रयत्नपूर्वक सवयींचा यांत्रिकपणा टिकवून ठेवला जातो. केव्हातरी जाणीव होते की आपण केवळ एक यंत्र नसून त्यापलीकडे जाऊन काहीतरी आहोत. तेव्हा मात्र जगण्यातल्या निरर्थक यांत्रिकपणाचा थकवा येतो. आणि नियमित सवयींचा यांत्रिकपणा खंडित होऊन एक फट निर्माण होते. जिथून वास्तव डोळे वटारून पाहतं. त्या विस्मृतीतल्या वास्तवाविषयी विचार करण्याची सवय नसल्यानं खिंडीत सापडल्यागत अवस्था होते.
मग अस्तित्वावादी प्रश्न पडतात. ‘हे सगळं कशासाठी? अशा निरर्थक यंत्राप्रमाणे जगण्याला काही अर्थ आहे काय ?’ आल्बेर काम्यू म्हणतो की, ‘अशी खिंडीत सापडल्यागत मन:स्थिती आणि प्राप्त मानवी अवस्थेच्या अपुरेपणाची आणि विखुरलेपणाची भावना केवळ तत्त्ववेत्त्यांच्या ठायी नसून ती वैश्विक भावना आहे.’ ही भावना कुणाचाही पिच्छा सोडत नसते. म्हणून या भावनेच्या बाबतीत तत्त्वज्ञ आणि तत्त्वज्ञेतर असा भेद करता येत नाही.
क) माणसाचा जन्म म्हणजे अनंताला पडलेली भेग
‘मिथ ऑफ सिसिफस’ या तत्त्वज्ञानात्मक पुस्तकात काम्यू लिहितो की, ‘एका बाजूला माणसांमध्ये समग्रतेची, पूर्णत्वेची, अनंतेची ओढ आणि भूक असते; तर दुसऱ्या बाजूला मात्र माणसं स्वत:ला नेहमी खंडित, अपूर्ण आणि सान्त अवस्थेत पाहतात. माणसाचा जन्म म्हणजे अनंताला पडलेली भेग. ही भेगच राहिली नसती किंवा या भेगेची जाणीवच नसती तर माणूस इतर आगंतुक तपशिलांपैकीच एक तपशील राहिला असता. …एकार्थाने अनंताशी एकरूप ठरला असता. सुखदु:खातीत वस्तू ठरला असता. पण या भेगेच्या स्मृती-विस्मृतीच्या ऊन-सावलीत माणूस आपलं प्राप्त जीवन जगत असतो’. एकाचवेळी ही भेग माणसाच्या दु:खाचं आणि उदात्ततेचं कारण बनलेली आहे. माणसाची ही द्विधा मन:स्थिती शेक्सपियरनं हॅम्लेटच्या ‘टु बी ऑर नॉट टु बी, दॅट्स द क्वेश्चन’ या स्वगतात व्यक्त केली आहे. शेक्सपियरचं हे प्रसिद्ध स्वगत माणसाची निसर्गातलीच एक वस्तू असण्याची क्षुल्लकता आणि सोबतच निसर्गातीत असण्याची उदात्तता अधोरेखित करतं. याच वैश्विक प्रश्नाला काम्यूनं ‘मिथ ऑफ सिसिफस’ च्या पहिल्याच पानावर तत्त्वज्ञानातील एकमेव गंभीर प्रश्न म्हटलं आहे. काम्यू लिहितो की, पृथ्वी सूर्याभोवती फिरते की सूर्य पृथ्वीभोवती, जगाच्या मिती किती आहेत… यासारख्या प्रश्नांना वळसा देत लोक हजारो वर्षे जगत आली आहेत. पण जगणं खरंच अनिवार्य आहे का, या प्रश्नाला कुणी वळसा देऊ शकत नाही. तत्त्वज्ञ असो की तत्त्वज्ञेतर; ‘जगावं की मरावं’ या प्रश्नाला काहीतरी उत्तर देणं अनिवार्य आहे. काम्यू जगण्याच्या तसंच मरण्याच्याही प्रकारांची चर्चा करतो. काहींच्या जगण्यातील उत्कटता कमी होत जाते तर काहींची वाढत जाते. काही जगण्याकडे पाठ फिरवून निवृत्तीमार्ग पत्करतात तर काही जीवनाभिमुख होऊन प्रवृत्तीमार्ग. काही या क्षणभंगुर, विरोधाभासी चंचल तपशिलांनी ओतप्रोत जीवनाला मिथ्या म्हणतात, तर काही या प्राप्त मानवी अवस्थेतच मोक्ष आहे अशी मांडणी करतात. थोडक्यात, जगताना निवडलेला कुठलाही मार्ग म्हणजे मनुष्यानं अनिवार्यपणे अनंताच्या भेगेला दिलेलं तत्त्वज्ञानात्मक उत्तर.
फ्रेंच साहित्य-तत्त्वज्ञानाचे अभ्यासक
sharadcrosshuma@gmail.com