डॉ. जयदेव पंचवाघ

ज्या गोष्टीमुळे सृष्टी अस्तित्वात आहे त्या कामक्रीडेचा मानवी मेंदूवर काय परिणाम होतो? आधुनिक संशोधनाने याचा मागोवा कसा घेतला आहे?

चेतासंस्थेसंबंधित संशोधनाचा विचार करताना आपण व्यायाम, योग, वेदना, प्रदीर्घ व्यथा, संगीतासारख्या विविध कला इत्यादींचा मेंदूवर कशा प्रकारे परिणाम होतो याचा विचार करत आलो आहोत. तसंच मेंदूत घडणाऱ्या प्रक्रियांचा यांच्यावर उलटा परिणाम कसा होतो, हेही पाहिलं. पण ज्या गोष्टीची समाजाला अनादी काळापासून ओळख आहे, नव्हे तर ज्या गोष्टीमुळे आजची सजीव सृष्टी अस्तित्वात आहे त्या कामक्रीडेचा मेंदूवर काय परिणाम होतो, याचा आधुनिक संशोधनाने कसा मागोवा घेतला आहे?

मध्ययुगात ज्या विषयाला अपमानित केलं गेलं आणि ज्याचा उपयोग खरे खोटे आरोप करून शत्रूंना समाजात नैतिकदृष्टय़ा भ्रष्ट ठरवण्यासाठी केला गेला, तो विषय म्हणजे कामशास्त्र. या विषयाचा वापर शत्रूला शासन करण्यासाठी धर्मसंस्था व इतरही सामाजिक संस्थांतल्या सत्ताभ्रष्ट, मनोविकृत प्रमुखांकडून करण्यात आला. प्राचीन संस्कृतींत हा विषय वज्र्य नव्हता, एवढंच नव्हे तर त्याला ज्ञान व कलेचा दर्जा दिला गेला होता. पण हे आपल्याला सोयीस्कररीत्या विसरण्यास भाग पाडलं गेलं. कामशास्त्राविषयी प्राचीन ग्रंथ व संदर्भ अनेक आहेत. अगदी वेद पुराणांच्या काळापासून आहेत. त्यापैकी वात्स्यायनाचं ‘कामसूत्र’ बहुतेकांना माहीत आहे.

ओशो रजनीश एकदा म्हणाले होते, ‘‘मी आजवर अक्षरश: असंख्य पुस्तकं लिहिली. गीतेवर लिहिलं, श्रीकृष्णाबद्दल काही खंडांमध्ये लिहिलं, अष्टावक्र महागीतेबद्दल लिहिलं, एक नव्हे तर हजारो विषयांबद्दल मी लिहीत आलो, पण माझ्या नावाशी निगडित एकच पुस्तक लोकांच्या लक्षात राहतं, ते म्हणजे ‘संभोग से समाधी तक’. याचं रहस्य माझ्या लिखाणात नव्हे तर समाजाच्या अंतर्मनात लपलेलं आहे.’’

वात्स्यायनाने कामसूत्र ख्रिस्तपूर्व २०० ते ख्रिस्तपश्चात २०० या काळात कधीतरी लिहिलं. नेमकं वर्ष माहीत नाही. पण या पुस्तकात त्याने अतिशय जुने म्हणजे वेद-पुराणाच्या काळातल्या लेखनाचे दाखले दिलेले आहेत. त्यानंतर या विषयावर अरेबिक व इतरही भाषांमध्ये वेगवेगळी पुस्तकं लिहिली गेली. स्त्री पुरुषांमधल्या कामक्रीडेबद्दल आणि एकूणच कामशास्त्रातील बारकाव्यांबद्दल यात विचार झाला. मात्र मध्ययुगीन काळात विविध धर्माच्या तथाकथित धर्मगुरूंनी यात खीळ घातली. १८९७ साली हॅवलॉक इलिस या डॉक्टरने हा विषय शास्त्रीय पद्धतीने मांडला. आल्फ्रेड किन्सीने आणि त्यानंतर मास्टर्स व जॉन्सन या दोघांनी यात प्रयोग केले. ते मुख्यत्वे कामक्रीडेत जननेंद्रियामध्ये घडणाऱ्या बदलांवर होते. मेंदूत होणारे बदल मोजणं तेव्हा शक्य नव्हतं.

कामशास्त्र हा विषय इतका महत्त्वाचा का आहे? याचं साधं उत्तर म्हणजे निसर्गाने अगदी सामान्य व्यक्तींसाठीसुद्धा आत्यंतिक व अत्युच्च आनंदाचा अनुभव घेण्याचा रस्ता यातून उघडलेला आहे. हा अनुभव तात्पुरता असला तरी अवर्णनीय आनंद व समाधानाचा अनुभव देण्याची क्षमता त्यात आहे. अर्थातच निसर्गाचा यातला मूळ उद्देश प्रजनन हा आहे. म्हणूनच इतर प्राण्यांप्रमाणेच मनुष्यालाही कामक्रीडेकडे अत्यंत तीव्रतेने खेचून घेण्याचं तंत्र निसर्गाने निर्माण केलं आहे.

पण फक्त प्रजोत्पादन एवढंच याचं प्रयोजन आहे का? गेल्या काही वर्षांत ‘एफ एमआरआय’ आणि ‘पॉझिट्रॉन एमिशिन स्कॅन’ या दोन चाचण्या आणि रक्तातील विविध संप्रेरकांची पातळी मोजण्याचं तंत्र वापरून मेंदूत प्रत्यक्ष लैंगिक क्रियेदरम्यान काय बदल होतात, यावर मोठय़ा प्रमाणात संशोधन झालं आहे आणि सुरू आहे. मास्टर्स आणि जॉन्सन यांनी लैंगिक अनुभवांच्या चार ठळक पायऱ्या सांगितल्या आहेत. लैंगिक उद्दीपन, त्यानंतर ‘उद्दीपित’ स्थितीचा स्थिर अनुभव, त्यानंतर अवर्णनीय आनंदाचा अनुभव (ऑरगॅझम) त्यानंतर मन व शरीर अत्यंत शिथिल आणि शांत होण्याची स्थिती. या प्रत्येक अवस्थेत मेंदूच्या कुठल्या भागाकडे रक्तपुरवठा वाढतो किंवा कमी होतो, कुठल्या भागातली विद्युत पातळी वाढते, कोणती संप्रेरकं वाढतात किंवा कमी होतात, याचा मानवी मनावर दूरगामी परिणाम काय होतो, अशा अनेक पैलूंवर संशोधन झालं आहे. या संशोधनाचे निष्कर्ष आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे.

कामक्रीडेच्या सर्वप्रथम म्हणजे उद्दीपन स्थितीमध्ये स्वत:च्या विचारांचं आणि वर्तनाचं योग्य-अयोग्य, चूक बरोबर, नैतिक अनैतिक अशा पातळय़ांवर विच्छेदन करण्यात मग्न असलेल्या मेंदूतल्या भागाचं कार्य कमी होतं. फ्रॉईडने या नैतिक ‘बाबागिरीचं’ कार्य करणाऱ्या ऊर्जेला ‘सुपर इगो’ म्हटलं आहे. आपल्यावरील नीती आणि अनीतीच्या कल्पनांचा व धर्माचा पगडा, आपण ज्यांना आपल्या मनाच्या कोपऱ्यात एका नैतिक चौथऱ्यावर बसवलेलं असतं अशांच्या मतांचा व उपदेशांचा पगडा आपल्या वर्तनावर लादण्याचं काम हा भाग करतो. यातल्या ‘लॅटरल ऑरबायटो-फ्राँटल कॉर्टेक्स’ आणि ‘लॅटरल प्रीफ्राँटल लोब’ या मेंदूच्या अगदी पुढच्या भागातल्या दोन केंद्रांचं कार्य आणि त्यांचा मनावरचा पगडा या काळात दाबला जातो. तिथलं चेताविद्युत उद्दीपन आणि रक्तपुरवठा कमी होतो. कामक्रीडेसाठी हे घडणं गरजेचं असणार, हे उघड आहे. त्याचबरोबर मेंदूला ‘अतिसतर्क’ आणि तणावयुक्त ठेवणारा अमिग्डाला हा भागसुद्धा उद्दीपनाच्या स्थितीत शिथिल होतो. मनावरील ‘जाचक’ भाग निकामी होऊन स्वतंत्रतेचा अनुभव येणं ही एक हवीहवीशी वाटणारी मन:स्थिती असते. उलट ज्यांना लैंगिकतेशी संबंधित मानसिक अडथळे असतात त्यांच्यात या भागाचं कार्य थांबत नाही, हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. त्यांच्यात कामक्रीडेविषयीचा अवास्तव भयगंड किंवा नैतिक गंड मेंदूच्या या दोन भांगांची पकड शिथिल होऊ देत नाही.

संशोधनातली दुसरी गोष्ट म्हणजे कामक्रीडेतल्या अत्युच्च आनंदाच्या क्षणी (म्हणजेच ऑरगॅझम) मेंदूतले एकमेकांपासून दूर असलेले अनेक भाग एकाच वेळी उद्दीपित होतात. लैंगिक भागांतील संवेदना जाणणारी केंद्रं, शरीराला विशिष्ट हालचाल करण्याचे संदेश देणारी केंद्रं, ज्या ठिकाणी आनंददायक चेता-रसायनं स्रवतात अशी केंद्रं, शरीरातील विविध संप्रेरकं स्रवणाऱ्या ग्रंथी जिथून नियंत्रित होतात अशी केंद्रं, काही स्मृती-विषयक केंद्रं, विशिष्ट व्यक्तीबरोबर भावनिक बंधन निर्माण करणारं केंद्र असे अनेक भाग एकाच वेळी उद्दीपित होतात. त्याच वेळी आत्यंतिक आनंद निर्माण करणाऱ्या रसायनांचा लोंढा फुटतो. त्यात उद्दीपनाच्या अगदी शेवटच्या काळात डोपामिन आणि त्यानंतर क्षणार्धात अत्यंत सुखद शांततेत ढकलणारे एन्डॉर्फिन्स आणि इतर काही रसायनं पाझरतात आणि त्यामुळे तृप्त शांततेचा अनुभव येतो. थोडय़ा वेळासाठी एक प्रकारची ग्लानी येते. डोपामिन हे आनंद निर्माण करणारं रसायन आहे. डोपामिन आणि एन्डॉर्फिन एकत्र स्रवल्याने मुक्त आणि बेभान करणाऱ्या आनंदाचा अनुभव येतो. या प्रक्रिया इतका वेगळय़ा प्रकारचा अनुभव निर्माण करतात की, या अनुभवाकडे व्यक्ती अत्यंत तीव्रतेने खेचली जाते.

या वेळात पाझरणारे एन्डॉर्फिन्स हे नैसर्गिक वेदनाशामक असतात, म्हणजेच कामक्रीडेदरम्यान कुठल्याही वेदनेची तीव्रता नगण्य भासते. किंबहुना काही वेदना आनंददायक वाटाव्या अशी रासायनिक स्थिती निर्माण झालेली असते. वेदनादायक व्याधींमधल्या शारीरिक वेदना ऑरगॅझमनंतर बऱ्याच काळापर्यंत कमी होतात, हे सिद्ध झालं आहे. ऑरगॅझम आणि नंतरच्या काळात ऑक्सिटोसिन आणि प्रोलॅक्टीन ही संप्रेरकं मोठय़ा प्रमाणात स्रवतात. ही दोन्ही ‘बाँडिंग हॉर्मोन्स’ आहेत. म्हणजेच मेंदूत प्रेम व वात्सल्य निर्माण करण्याची यांच्यात क्षमता आहे.

या सर्व गोष्टी इतक्या तपशिलात जाऊन सांगण्यामागचा उद्देश काय? तर काही अपवाद वगळता (उदा. डॉल्फिन्स) प्रजनन सोडून निखळ आनंदासाठी कामक्रीडेचा उपयोग करणारा माणूस सोडून दुसरा प्राणी नाही. त्यामुळे या प्रक्रियेत मेंदूत नेमके कुठले बदल होतात, हे माहीत असणं उपयुक्तं ठरावं. आनंद, शांतता, तृप्ती आणि प्रेम या ज्या मृगजळाभोवती मनुष्य आयुष्यभर फिरत असतो त्यांचा क्षणभर जरी असला तरी निश्चित अनुभव घेण्याचा मार्ग प्रजनन कार्य सोडून इतर वेळातही माणसासाठी निसर्गाने का उघडून ठेवला असेल? त्याचं आपल्या आयुष्यातलं स्थान काय असावं, हे ज्यानं त्यानं शोधण्याचं उत्तर.. कदाचित ते या रसायनांच्या व मेंदूतल्या बदलांच्या ज्ञानाने शोधणं सोपं जाईल. मेंदूतल्या या रासायनिक प्रक्रियांचा साक्षीपूर्वक अनुभव घेण्याचा प्रयोग केला तर अशा प्रकारचा अत्युच्च आनंद आयुष्यातल्या इतर कुठल्या गोष्टींमधून (उदा. विविध कला, व्यायाम, योग इ.) मिळू शकतो याचा विचार करता येईल. उदाहरणादाखल संगीताचा अत्युच्च अनुभव घेताना मेंदूत होणाऱ्या बदलांचं या बदलांशी बरंच साम्य असतं, असं दिसून आलं आहे.

विचारांच्या अतिनैतिक आणि अतिकर्मठ विचारसरणीचा लैंगिक आनंदाच्या क्षमतेवर का परिणाम होतो हे या संशोधनावरून कळेल. वात्स्यायनासारख्या व्यक्तींनी आणि त्याच्याही आधीच्या लोकांनी या विषयावर आस्थापूर्वक चिंतन का केलं, याचा विसर धाकाखाली आपल्याला पडून चालणार नाही, हे लक्षात येईल. या विषयाबद्दलचा भयगंड दूर झाला तर या अनुभवाच्या प्रत्येक कंगोऱ्यापर्यंत पोहोचता येईल. कामशास्त्रातला डोळस अनुभव हा आनंद निर्भेळपणे आणि तणावमुक्त पद्धतीने स्वीकारायला शिकवेल. तरच या अनुभवाच्या संपूर्ण खोलीपर्यंत पोहोचून आपण आयुष्य अधिक समृद्ध करू शकू.

(मेंदू व मणक्याचे आजार, नवीन संशोधन, भविष्यातील संभावना या विषयांसबंधी प्रत्येक आठवडय़ात लोकशिक्षण करणारे व्हिडीओ Dr Jaydev Panchwagh या यूटय़ूब चॅनेलवर पाहता येतील.)

लेखक मेंदू व मणक्याचे शस्त्रक्रियातज्ज्ञ आहेत.

brainandspinesurgery60@gmail.com

Story img Loader