सीरियातील रक्तरंजित वर्तमान जगाला रोज नवे हादरे देत आहे. अशा स्थितीत गेल्या दीड वर्षापेक्षाही अधिक काळ तेथील शांतता प्रयत्नांना हातभार लावण्यासाठी झटणारे ब्रिगेडियर अमिताभ झा यांचे नुकतेच तिथे सेवा देत असताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. भारतीय लष्करात खडतर परिस्थितीत सेवा दिलेल्या ब्रिगेडियर झा यांचा लष्करी मुत्सद्देगिरी, भूराजकीय प्रश्न, पारंपरिक युद्धनीती या विषयांचा सखोल अभ्यास होता.

ब्रिगेडियर अमिताभ झा यांनी गोरखा रायफलचे अधिकारी म्हणून भारतीय लष्करात सेवा दिली. हिमालयातील हिमनद्यांच्या खडतर प्रदेशात काम करताना त्यांनी आपल्या खंबीर नेतृत्वाने आदर्श घालून दिला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेतलेल्या अनेकांनी पुढे विविध स्तरांवर नेतृत्वाची धुरा सांभाळली.

१४ एप्रिल २०२३ पासून ब्रिगेडियर झा सीरियातील गोलान हाइट्स येथील संयुक्त राष्ट्रांच्या निर्सैनिकीकरण दलाचे (यूएनडीओएफ) डेप्युटी फोर्स कमांडर म्हणून रुजू झाले. पुढे त्यांच्यावर अॅक्टिंग फोर्स कमांडर पदाची जबाबदारी सोपविण्यात आली. गोलान हाइट्स हा इस्रायल आणि सीरियामधील खूप पूर्वीपासूनचा बफर झोन आहे. योम किप्पूर युद्धानंतर १९७३ साली इस्रायल आणि सीरियामध्ये निर्सैनिकीकरण करार झाला. त्यानंतर संयुक्त राष्ट्रांनी गोलान हाइट्स हा बफर झोन असल्याचे आणि तो यूएनडीओएफच्या देखरेखीखाली राहील, असे घोषित केले.

हेही वाचा >>> व्यक्तिवेध: शिरीष पटेल

इस्रायल-सीरिया युद्धाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही महिन्यांत तेथील तणाव वाढला. सीरियातील बंडखोर गटांच्या वाढत्या हिंसाचारामुळे येथील परिस्थिती संवेदनशील झाली असून परिणामी शांतता दले आणि स्थानिक जनतेसाठी तेथील वातावरण अतिशय असुरक्षित ठरले आहे. सततचा बॉम्ब वर्षाव, प्रचंड प्रमाणात रक्तपात आणि अस्थिर वातावरणात काम करतानाही ब्रिगेडियर झा यांनी आपल्या जबाबदारीप्रति असलेल्या कटिबद्धतेचा कधीही विसर पडू दिला नाही. त्यांनी आपल्या कार्यकाळात युद्धबंदी कराराची अंमलबजावणी, मानवतावादी दृष्टिकोनातून साहाय्य, युद्धसदृश परिस्थितीत अडकून पडलेल्या सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेची खबरदारी घेणे इत्यादी जबाबदाऱ्या सक्षमपणे पार पाडल्या. अतिशय गुंतागुंतीची नाजूक परिस्थिती असतानाही त्यांची कर्तव्याप्रतिची निष्ठा कायम राहिली. गोलान हाइट्स येथे नेमणूक होण्यापूर्वी ते डेमॉक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या शिष्टमंडळात लष्करी निरीक्षक म्हणून कार्यरत होते. जागतिक शांतता आणि स्थैर्यासाठी त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले. ब्रिगेडियर अमिताभ झा यांना विविध खेळांतही रुची होती. ते अनेक सांघिक खेळ खेळत. पर्वतांमध्ये ट्रेकिंग करत. झा यांच्या निधनाने केवळ भारतीय लष्करालाच नव्हे, तर जागतिक शांततेसाठी सुरू असलेल्या प्रयत्नांनाही मोठा धक्का बसला आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत आणि मृत्यूची खात्रीच असलेल्या प्रदेशातही जागतिक शांततेसाठी प्रत्येक संकटाला नेटाने तोंड देण्याविषयीची त्यांची निष्ठा प्रेरणादायी आहे.

Story img Loader