डॉ. उज्ज्वला दळवी

कॅन्सरचं निदान म्हणजे मृत्युदंड नाही. तो आटोपशीर, एकाच जागी असताना त्याचं समूळ उच्चाटन करणं गरजेचं असतं..

13 December Daily Horoscope in Marathi
१३ डिसेंबर पंचांग: पंचांगानुसार शिवयोग १२ पैकी कोणत्या राशीची आर्थिक घडी सुधारणार? तुम्हाला लाभेल का भाग्याची साथ; वाचा शुक्रवारचे भविष्य
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Consuming too many fruits every day can cause various health issues said doctors
तुम्हाला रोज जास्त फळे खाण्याची सवय आहे? मग शरीरावर होऊ शकतो ‘हा’ परिणाम, वाचा तज्ज्ञ काय सांगतात…
tula shikvin changalach dhada adhipati defends mother akshara feels helpless
भुवनेश्वरीचा डाव यशस्वी! अक्षरा घर सोडून जाणार? अधिपतीने धरले आईचे पाय; म्हणाला, “आमच्या आईसाहेब…”
court sentences man to 20 year imprisonment for sexually assaulting girl by making false marriage promise
पुणे: लग्नाचं आमिष दाखवणं पडलं महागात; लैंगिक अत्याचारा प्रकरणी ‘या’ न्यायालयाने सुनावली वीस वर्षाची शिक्षा
benefits of eating saunf before bed
रात्रभर झोप लागत नाही? झोपण्यापूर्वी ‘हे’ खा; शांत झोप लागेल अन् तणावही होईल दूर
shukra guru make navpancham yog
नवपंचम राजयोग देणार पैसाच पैसा; ‘या’ तीन राशींवर शुक्र-गुरूची होणार कृपा
vivek oberoi shares his life changing moment
बॉलीवूडमध्ये काम नव्हतं, आईसमोर प्रचंड रडलो अन्…; विवेक ओबेरॉयचं संपूर्ण आयुष्य ‘त्या’ दिवसापासून बदललं, तो क्षण कोणता?

डॉ. उज्ज्वला दळवी ‘चाळिशी आली! जपायला हवं,’ म्हणत मान्यताने पूर्ण चेक-अप आणि मॅमोग्राफी करून घेतली. मॅमोग्राफीत दोन्ही बाजूंना संशयास्पद गाठी दिसल्या. गाठींच्या प्राथमिक तपासणीत आक्रमक, घातक टय़ूमर आढळला. दोन्ही बाजूंचे स्तन अगदी काखेतल्या गाठींसकट काढून टाकावे लागले. शिवाय केमोथेरपीचे सात हप्ते झाले. काही औषधं चालूच राहिली.

त्या गोष्टीला आता १५ वर्ष झाली. मान्यताची प्रकृती ठणठणीत आहे. ‘‘एका मॅमोग्राफीमुळे माझ्या जिवावरचं संकट टळलं,’’ ती कृतज्ञतेने म्हणते. रोजच्या रोज, योग्य पद्धतीने स्वत:च्या स्तनांचं निरीक्षण आणि चाचपणी केली आणि दरवर्षी मॅमोग्राफी करून घेतली तर स्तनाच्या कॅन्सरचं निदान वेळच्या वेळीच होऊ शकतं. 

कॅन्सरचं निदान म्हणजे मृत्युदंड नाही. कुठल्याही कॅन्सरचं निदान लवकरात लवकर करून तो आटोपशीर, एकाच जागी असताना त्याचं समूळ उच्चाटन करणं गरजेचं असतं. स्तन, मोठं आतडं, गर्भाशयाचं तोंड आणि प्रोस्टेट या चार कॅन्सर प्रकारांना लवकर हेरायला तशा सर्वमान्य तपासपद्धती आहेत.

हेही वाचा >>> आरोग्याचे डोही: लस नाकारण्याची साथ..

हसमुखराय आणि सुमुखराजचे आजोबा, आत्या, आतेभाऊ मोठय़ा आतडय़ाच्या कॅन्सरनेच पन्नाशी-साठीच्या दरम्यान गेले. हसमुख-सुमुख दोघेही भाऊ पंचेचाळिशीपासूनच, दरवर्षी, नियमितपणे, लांब सोंडवजा दुर्बिणीतून  मोठय़ा आतडय़ाचा तपास (कोलॉनोस्कोपी) करून घेतात. त्या तपासात डॉक्टर त्यांच्या मोठय़ा आतडय़ात अळंब्यांसारख्या वाढणाऱ्या बारीक गाठी मुळा-देठासकट काढून टाकतात. तशी काळजी घेतल्यामुळेच हसमुख-सुमुखनी आज सत्तरी-पंचाहत्तरी पार केली आहे. आता त्यांची मुलंही तो तपास करून घेतात. आत्याची नातवंडं तर चाळिशीपासूनच, दरवर्षी तशी दुर्बीण-टेहळणी करून घेताहेत. पोटाच्या आत्मघातकी विकारांतही (इन्फ्लमेटरी बॉवेल डिसीझ) कॅन्सरची शक्यता असते; त्यांच्यातही दुर्बीणतपास दरवर्षी करून घ्यावा लागतो.

आनुवंशिक शक्यता नसली तरी एकदा पन्नाशीला मोठय़ा आतडय़ाचा दुर्बीणतपास करून घ्यावा. तो स्वच्छ निघाला तर दहा वर्षांनी पुन्हा करावा. ते शक्य नसल्यास वर्षांतून एकदा शौचातलं छुपं रक्त हुडकायला ‘एफआयटी’ ही इम्युनॉलॉजीच्या तत्त्वावर आधारित शौचाची चाचणी करून घ्यावी.

गर्भाशयाच्या तोंडाच्या कॅन्सरसाठी पॅप-स्मियर नावाची काही मिनिटांची, वेदनारहित तपासणी करतात. तिच्यासाठी गर्भाशयाच्या तोंडाजवळच्या पेशी हलकेच, न दुखावता, काही मिनिटांतच खरवडून घेतात. त्या पेशींतून कॅन्सरही समजतो आणि त्याचं एक कारण असलेला ‘ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस’(एचपीव्ही)ही सापडू शकतो. आजकाल शहरातल्या रुग्णालयांत ती तपासणी मॅमोग्राफीच्या सोबतच, दरवर्षी करतात. दरवर्षी ६-७ टक्के पॅप-स्मियर तपासण्यांत कॅन्सर सापडतो. त्या स्त्रियांचा गर्भाशय लगेच काढून टाकला की पुढचा अनर्थ टळतो.

पुरुषांच्या मूत्राशयाच्या तोंडाशी असणारी प्रोस्टेट नावाची गाठ वयोपरत्वे मोठी होत जाते. तिच्या कॅन्सरमुळे रक्तात प्रोस्टेट- स्पेसिफिक- अँटीजेन (पीएसए) हे प्रथिन वाढतं. पण ते अनेक साध्या कारणांनीही वाढू शकतं. ‘लांडगा आला रे आला,’सारखी गत होते. म्हणून ते वाढलं असेल तर तज्ज्ञांचा सल्ला आवर्जून घ्यावा. 

हेही वाचा >>> आरोग्याचे डोही: ओंजळीतल्या सांजसावल्या..

अँजेलिना जोली या हॉलीवूडच्या अभिनेत्रीने काही होत नसतानाच, दोन्ही स्तन काढून टाकायचा, भावनिकदृष्टय़ा अत्यंत कठीण निर्णय घेतला. तिच्या आईला स्तनाचा कॅन्सर होता. अँजेलिनाच्या बीआरसीए जनुकात दोष होता. तशा दोषांमुळे स्तनाचा- ओव्हरीचा कॅन्सर व्हायची शक्यता तर मोठी असतेच; त्याशिवाय पॅन्क्रियाज, प्रोस्टेट आणि त्वचेतल्या रंगपेशी यांचाही कॅन्सर होऊ शकतो. ते मोठय़ा संशोधनाने सिद्ध झालं आहे. यानंतर अनेक कॅन्सरग्रस्त स्त्रियांच्या लेकीबहिणींनी तो जनुक-तपास करून घेतला आणि जनुकदोष आढळल्यावर स्तन काढूनही टाकले. काही जणींनी तर मुलंबाळं झाल्यानंतर ओव्हरीजसह गर्भाशयही काढून टाकला. त्यामुळे गर्भाशयाच्या, त्याच्या तोंडाच्या वा ओव्हरीच्याही कॅन्सरची शक्यता शून्य झाली.

इतर कॅन्सर प्रकारांचं काय?  कॅन्सरचा अपशकुन सांगणारे काही लक्षणकावळे असतात. विश्रांतीने न घटणारा पराकोटीचा थकवा; कारणाशिवाय रोज येणारा ताप; कारणाशिवाय पाच किलोहून अधिक वजन घटणं; गिळायला त्रास होणं; चिवट खोकला; शरीरात कुठेही फुगवटा किंवा गोळा हाताला लागणं; कारणाशिवाय नव्याने उद्भवलेली, वाढतच जाणारी वेदना; बरी न होणारी, चिघळणारी, रक्त येणारी जखम; नव्याने आलेला, वाढणारा, रंग एकजिनसी नसलेला, वेडावाकडा, खरबरीत, पटकन रक्त येणारा तीळ; कारणाशिवाय कुठूनही होणारा रक्तस्राव; शौचात डांबरासारखा काळा मळ; शौचाची एकाएकी निष्कारण विस्कटलेली घडी यांच्यासारख्या लक्षणांनी कॅन्सरची धोक्याची घंटा घणघणायला हवी. मग ताबडतोब डॉक्टरांच्या मदतीने कॅन्सरचा कसून शोध घेऊन त्याला निपटणं उत्तम. काही कॅन्सर टाळायला औषधं, व्हॅक्सिन्सही आहेत.

कॅन्सरचा समंध पुन्हा जागा होऊ नये म्हणून मान्यताला ऑपरेशननंतर दहा वर्ष टॅमॉक्सिफेन नावाच्या गोळय़ा घ्याव्या लागल्या. हातापायांवर चामखीळ वाढवणाऱ्या ‘ह्युमन पॅपिलोमा व्हायरस’ (एचपीव्ही) गटातल्या विषाणूंमुळे तोंड, घसा, गुप्तांग, संडासची जागा यांचे कॅन्सरही  होऊ शकतात. पॅपिलोमा गटातल्या विषाणूंविरुद्ध लढायला शिकवणारी लस शास्त्रज्ञांनी शोधली आहे. ती नऊ ते तेरा वर्षांच्या वयादरम्यान दिली गेली तर गर्भाशयाच्या तोंडाचा कॅन्सर ९० टक्के टळतो. पण ती लस अभेद्य कवचकुंडलं चढवत नाही. त्यामुळे पॅप-स्मियरची वार्षिक तपासणी चाळिशीला सुरू व्हायलाच हवी. 

हिपॅटायटिस- बी आणि हिपॅटायटिस- सी या दोन विषाणूंची रक्तातून किंवा सुई टोचल्यामुळे लागण झाली की ते दीर्घकाळ लिव्हरपेशींमध्ये वस्तीलाच राहतात; तिथं कॅन्सर उत्पन्न करतात. हिपॅटायटिस- बीसाठी प्रतिबंधक लस आहे. ती लस जन्मल्याबरोबरच देतात. पण त्या वेळी राहून गेली असली तर आयुष्यात केव्हाही घेता येते. हिपॅटायटिस- सीसाठी तत्परतेने सुरू करायची औषधं आहेत.

आपल्या शरीरातल्या १२० कोटींपैकी प्रत्येक पेशी कुठलं काम करेल; केव्हा मरेल हे सगळं तिच्या जनुककुंडलीत नोंदलेलं असतं. एक्स-रे/ गॅमा-रेसारखे किरण किंवा प्रखर सूर्यप्रकाश; तंबाखू-दारूसारखी विषं; आर्सेनिक- बेंझिन- अ‍ॅसबेसटॉससारखी पर्यावरणातली रसायनं वगैरेंमुळे जनुककुंडलीत दुष्टग्रहांचा वरचष्मा होतो; माथेफिरू कॅन्सरपेशी जन्मतात. त्यांच्याबाबतीत मृत्यूपासून सगळे नियम धाब्यावर बसवले जातात. त्यांच्यापासून जन्मणाऱ्या बेबंद पेशी शरीरभर फैलावतात.

हेही वाचा >>> आरोग्याचे डोही:अडकलेली रेकॉर्ड

सॉसेज-हॅम्बर्गर वगैरे बहुसंस्कारित मांसप्रकार आणि मटणासारखं लाल मांस रोज १८० ग्रॅमहून अधिक खाल्ल्यानेही जनुककुंडलीत दोष निर्माण होतात; आतडय़ातले शत्रुजंतूही फोफावतात; आतडय़ाचा कॅन्सर होऊ शकतो. रक्तात वाढलेल्या साखरेमुळे, इन्सुलिनमुळे इतर पेशींबरोबरच कॅन्सरपेशीही पुष्ट आणि पुष्कळ होतात. तुंदिलतनू माणसांच्या, उदंड जाहलेल्या चरबी-पेशी इस्ट्रोजेन, लेप्टिन वगैरे कॅन्सरधार्जिणी हॉर्मोन्स निर्माण करतात. तंबाखू, दारू आणि अत्युच्च तापमानाला तळलेले, ग्रिल किंवा बार्बेक्यू केलेले पदार्थ हे तर शरीरातल्या कुठल्याही कॅन्सरला आग्रहाने पार्टीचं आमंत्रण देत असतात.

कॅन्सर होऊ नये म्हणून रोजच्या जगण्यात काय करायचं?  व्यवसायामुळे पर्यावरणातल्या कॅन्सरजनक पदार्थाशी निकटचा संबंध येत असला तर मास्क वगैरे सुरक्षासुविधा नीट शिकून काटेकोरपणे वापराव्यात. कुठलीही सुई कारणाशिवाय टोचून घेऊ नये. दारू-तंबाखू, लाल-बहुसंस्कारित मांस, अति गोडधोड वज्र्यच करावं. ग्रिल-बार्बेक्यू-स्मोक केलेले किंवा अत्युच्च तापमानाला तळलेले पदार्थ क्वचितच खावेत. लांब हातापायाचे सर्वझाकी कपडे घातल्याशिवाय, छत्री-हॅटशिवाय दुपारच्या- दहा ते चारच्या उन्हात जाऊ नये. उन्हात पोहणं टाळावंच. वजन आटोक्यात ठेवावं. आहारात रंगीबेरंगी भाज्या-फळं भरपूर घेतली; रोज अर्धा तास चालण्या-पोहण्यासारखा आणि अगदी चारच मिनिटं जरी जोरात धावण्याचा- नाचण्याचा व्यायाम केला तरी प्रतिकारशक्ती वाढते; कॅन्सर पेशींचा मुळातच नायनाट होतो. एचपीव्ही, हिपॅटायटिस- बी यांची लस रीतसर, वेळीच टोचून घ्यावी. हिपॅटायटिस- सीसाठी योग्य उपचार वेळीच करून घ्यावेत. पंचेचाळिशीनंतर आतडय़ाचा तपास नेमाने करून घ्यावा. चाळिशीनंतर स्त्रियांनी दरवर्षी मॅमोग्राम, पॅप-स्मियर, एचपीव्ही-तपास करून घ्यावा.  जगण्याच्या वाटेत कॅन्सरजनक पदार्थाचे काटे पावलोपावली लागतात. ते रुतू नयेत म्हणून  कॅन्सरविरोधी मोहीम जन्मल्याबरोबर, लस घेऊन सुरू व्हावी; रोजच्या रोज धोका टाळत ती आयुष्यभर चालू राहावी. ‘मला कशाला कॅन्सर होईल? झालाच तर होईल म्हातारपणी. आतापासून कशाला काळजी त्याची?’ अशा भ्रमात राहू नये. तसं केलं तरच कर्करोगाची नांगी न डसता आपण म्हाताऽऽरे होऊ शकू.

लेखिका वैद्यकीय व्यवसायातून निवृत्त आहेत.

ujjwalahd9@gmail.com

Story img Loader