रवींद्र माधव साठे

शिवरायांनी भारतभूचा इतिहास बदलून टाकला, तो दिवस म्हणजेच शिवराज्याभिषेक दिन हा हिंदूंच्या इतिहासातील एक सुवर्ण दिन आहे!

Wardha, crushed notes caught fire,
नोटांचा चुरा भरलेला ट्रक पेटला, तर्कवितर्क सुरू
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Chandrasekhar Bawankule, Chandrasekhar Bawankule ,
महाविकास आघाडीचा जाहीरनामा केवळ घोषणा, बावनकुळेंची टीका
khamgaon buldhana assembly constituency
खामगावात आकाश फुंडकर – दिलीप सानंद यांच्यात चुरशीची लढत; गटबाजी, मतविभाजन निर्णायक
anup dhotre
काँग्रेसची सत्ता असलेली राज्ये शाही परिवाराचे ‘एटीएम’; अकोल्यातील प्रचारसभेत पंतप्रधान मोदींची टीका
home voting in nala sopara
वसई: नालासोपाऱ्यात १२१ नागरिकांचे गृहमतदान
Political parties, election campaign. giant hoarding, Mumbai
फलकबाजी… टोलेबाजी; मुंबईत महाकाय फलकांद्वारे राजकीय पक्षांची श्रेयवादासाठी चढाओढ
The ploy of power by creating conflicts between castes Prime Minister Narendra Modi accuses Congress Print politics news
जातीजातीत भांडणे लावून सत्तेचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काँग्रेसवर आरोप

लोकमान्यांनी शिवजयंती उत्सव सुरू केला व तो त्यांनी राष्ट्रीय स्तरावर पोहोचवला. त्यात त्यांची दूरदृष्टी होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने लोकमान्यांच्या या संकल्पनेस आणखी पुढे नेले. संघ संस्थापक डॉ. हेडगेवार यांनी १९२९ मध्ये शिवराज्याभिषेक दिन म्हणजेच हिंदू साम्राज्य दिन हा उत्सव सुरू केला. आज काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून शिवराज्याभिषेक दिन साजरा होतो.

छत्रपती जन्मास आले त्या वेळी मोगलांचा दबदबा होता. निजामशाही, आदिलशाही, कुतूबशाही थैमान घालत होती. सन ७१२ मध्ये महम्मद बिन कासीमने राजा दाहीरचा पराभव केला. नंतरची ४०० वर्षे उलटल्यावर महम्मद घोरीने पृथ्वीराजाचा पराभव केला. त्यानंतर मुस्लीम म्हणजे विजयी व्यक्ती, तर हिंदू मात्र निराश व पराभूत नागरिक अशीच समीकरणे रूढ झाली होती. या भीषण काळात शिवाजीराजांनी सन १६४५ मध्ये स्वराज्याचे तोरण बांधले व पुढे फक्त तीन दशकांच्या काळात प्रत्यक्ष स्वराज्य स्थापन केले. जेमतेम ५० वर्षे जगलेल्या शिवरायांनी भारतभूचा हजारो वर्षांचा इतिहास ज्या दिवशी बदलून टाकला, तो दिवस हिंदूंच्या इतिहासातील एक सुवर्ण दिन आहे. म्हणून हा ‘श्रीमानयोगी’ भारताची एकात्मता व स्वतंत्रता अक्षुण्ण राहावी यासाठीच हिंदूत्वाचे धागे मजबूत करणारा तारणहार आणि श्रेष्ठ ऐतिहासिक पुरुष ठरतो.

छत्रपतींच्या राज्यस्थापनेमागे त्यांची अखिल भारतीय स्वराज्याची दृष्टी होती. ते आग्य्राला गेले त्या वेळी त्यांनी अनेकांशी सल्लामसलत केली. छत्रसालाशी संबंध प्रस्थापित केले. गुरू गोविंदसिंहांना महाराष्ट्रात यावे असे वाटून महाराजांशी सल्लामसलत करण्याची इच्छा झाली. या सर्व गोष्टींचा विचार केला तर त्यामागे छत्रपतींचा अखिल भारतीय दृष्टिकोन होता, हे लक्षात येते. शिवाजी महाराजांनी छत्रसालाला ज्या प्रकारची सन्मानाची वागणूक दिली तशाच प्रकारची वागणूक पुढे बाजीरावाने दिलेली आहे, यात त्यांच्या अखिल भारतीय धोरणाचे सातत्य आढळून येते.

चंद्रराव मोरे हे विजापूरच्या बादशहाच्या दरबारी सरदार होते. छत्रपती त्यांना आपल्या सैन्यात आणू पाहात होते. चंद्रराव मोरे स्वत:चे घराणे हे छत्रपतींपेक्षा मोठे आहे असे समजत. शिवरायांनी चंद्रराव मोरे यांना पत्र लिहिले व त्यात महाराज म्हणतात, ‘आमच्या स्वराज्य स्थापनेच्या लढाईत आपण आमच्या खांद्यास खांदा लावून लढावे, अशी आमची इच्छा आहे.’ त्यावर मोरे यांनी शिवाजी महाराजांस उत्तर दिले, ‘तुम्ही कुठे, मी कुठे? आम्ही तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहोत. आम्हाला राजा ही पदवी बादशहाने दिली आहे,’ शिवाजी महाराजांना कोणा बादशहाने उपाधी दिली नव्हती. कारण कोणाच्या राज्याश्रयावर चालणारे ते सरदार नव्हते. शिवाजी महाराजांनी चंद्रराव मोरे यांना तत्काळ उत्तर दिले की, ‘तुम्हाला राजाची उपाधी बादशहाने दिली असेल परंतु आम्हांस हे राज्यत्व स्वयं श्री शंभूनी दिले आहे.’

शिवाजी महाराजांनी आपल्या साथीदारास आणखी एक पत्र लिहिले आहे. त्यात ते लिहितात, ‘हिंदूवी स्वराज्य झाले पाहिजे, ही भगवंताची प्रबळ इच्छा आहे,’ त्यांनी असे नाही म्हटले की ही माझी इच्छा आहे किंवा भोसले कुळाची आहे किंवा केवळ महाराष्ट्राची आहे. त्यांनी म्हटले की भगवंताची इच्छा आहे. त्यामुळे शिवाजी महाराजांनी स्वत:स राज्याभिषेक का करून घेतला याचा मथितार्थ आपण समजून घेतला पाहिजे.

शिवराज्याभिषेक दिनामुळे हिंदूस्थानचा कायापालट झाला. गलितगात्र झालेला हिंदूस्थान स्वाभिमानाने पुरुषार्थाची व पराक्रमाची वाटचाल करू लागला. शिवाजीने हिंदूत्वाची मृत्युंजय मात्रा उपयोगात आणली, म्हणूनच नवा इतिहास घडला. त्या काळात येथील समाज निवृत्तिवादात आणि मोक्ष, संन्यास आणि विरक्ती या शब्दांच्या आकर्षणात बुडाला होता. यामुळे एकांगी झालेल्या भारतवर्षांला शिवरायांनी प्रवृत्तीवादी बनविले. निवृत्तीऐवजी प्रवृत्ती, दैववादाऐवजी प्रयत्नवादाचा स्वीकार करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. त्यानंतर शिवाजीराजांनी आपली सेना ही मुस्लीम सेनेपेक्षा सर्वार्थाने वरचढ ठरेल अशी काळजी घेतली.

नरहर कुरुंदकर यांनी ‘श्रीमान योगी’ या पुस्तकाला ६० पृष्ठांची प्रदीर्घ प्रस्तावना लिहिली आहे. त्यात ते म्हणतात, ‘शिवाजी राजांचा उदय होईपर्यंत हिंदू सेना अहिंदूंशी लढताना, केवळ हौतात्म्य स्वीकारायचे’ अशाच मानसिकतेत लढाया करायची. शिवाजी महाराजांनी मात्र आपल्या सैनिकांना विजयाची स्वप्ने दिली. शत्रूवर हल्ले चढवून, शत्रू पुरता गारद करून आपण विजयाची गुढी उभारायची अशी महत्त्वाकांक्षा या स्वप्नांमुळे उत्पन्न झाली.’

शिवरायांनी व्यष्टिधर्माऐवजी समष्टिधर्माचा मंत्र दिला. अनुशासनाचे धडे दिले. मी, माझी कीर्ती, माझी प्रतिज्ञा वगैरे धुळाक्षरे संपुष्टात आणा व आमची सेना, या सेनेची कीर्ती, या सेनेची व्यूहरचना असा वयंकार जागवा, असा संदेश आपल्या कृतीतून दिला.

त्यांनी भाषाशुद्धीची मोहीम चालविली. नवे राजकारण, नवे अर्थकारण, नवे समाजकारण अशी अनेक अभियाने चालविली; पण या सर्व मोहिमांमधून व अभियानांमधून मूळची हिंदू संस्कृती सुदृढ होईल अशीच दक्षता घेतली. हिंदू साम्राज्य दिनानंतर हिंदू समाज जयिष्णू, वर्धिष्णू आणि सर्वसंग्राहक झाला. या साम्राज्याची वैशिष्टय़पूर्ण तऱ्हा जगाला कळली.

औरंगजेबाच्या तावडीतून म्हणजेच आग्य्राहून सुटका करून घेऊन शिवाजी महाराज सहीसलामत महाराष्ट्रात परत आले व त्यांनी हिंदूवी स्वराज्याची विधिवत स्थापना केली. या घटनेचे पडसाद अवघ्या देशभर उमटले. ठिकठिकाणच्या हिंदू मध्ये नवा जोश संचारला. राजस्थानमध्ये सर्व रजपूत राजे परस्परांतील हेवेदावे मिटवून दुर्गादास राठोडच्या नेतृत्वाखाली एक झाले. परिणामत: विदेशी आक्रमकांना राजस्थानची भूमी सोडून जावे लागले. राजा छत्रसाल यांनी तर प्रत्यक्ष शिवाजीराजांची भेट घेऊन प्रेरणा घेतली व स्वधर्माधिष्ठित स्वतंत्र राज्य निर्माण करून वडील चंपतराय यांचे स्वप्न साकार केले. आसाममध्ये राजा चक्रध्वजसिंहाचा उदय झाला. आसामात ना मोगलांचे पाऊल पडले ना इस्लामचे. ‘राजा शिवाजीप्रमाणे धोरण ठेवून मोगलांचे सर्व ठिकाणाहून उच्चाटन केले पाहिजे,’ असे राजा चक्रध्वजसिंहाने लिहून ठेवलेले आहे व प्रत्यक्ष कृतीनेही दाखवून दिलेले आहे. कुचबिहारमधील राजा रुद्रसिंहाचे प्रेरणास्थानही छत्रपती शिवाजी महाराज होते, याची इतिहासात नोंद आहे.

एका मोठय़ा ध्येयाच्या प्राप्तीचे साधन म्हणून त्यांनी राज्याकडे पाहिले. स्वा. सावरकरांनी आपल्या ‘हिंदूपदपातशाही’ या पुस्तकात याची किती तरी उदाहरणे दिली आहेत. ‘हिंदूवी स्वराज्य व्हावे, ऐसे श्रींचे मनात फार आहे,’ असे महाराजांनी म्हटले. त्यांनी असे नाही म्हटले की, माझ्या आईच्या मनात आहे, जातवाल्यांच्या मनात आहे. महाराजांनी मिर्झा राजे जयसिंग यांना ऐतिहासिक पत्र पाठवले. त्यांत त्यांनी मिर्झा राजांना ‘परक्यांची सेवा सोडून देत असाल तर हिंदूवी स्वराज्याच्या स्थापनेसाठी मी तुमच्या नेतृत्वाखाली लढेन,’ असे आवाहन केले होते. हिंदूवी स्वराज्यापुढे व्यक्तिगत स्वार्थाचा त्याग करण्याची शिवाजी महाराजांची भावना होती.

त्यांचा राज्याभिषेक झाला त्या वेळी सर्वाना वाटले की, हा एका मनोवृत्तीचा राज्याभिषेक आहे. जणू काही धर्माचीच सिंहासनावर प्रस्थापना झाली आहे आणि शिवाजी हे केवळ त्याचे प्रतीक आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा लोकार्थ होता. वृत्तीने ते संन्यस्त- विरक्त होते. दक्षिण भारतात कुतुबशाहाच्या भेटीला ते गेले होते तेव्हा त्यांनी श्रीशैल्यमच्या श्रीमल्लिकार्जुन ज्योतिर्लिग मंदिरास भेट दिली होती. तेथे त्यांना एवढी विरक्ती आली होती की स्वत:चे शिरकमल शिविलगावर अर्पण करण्याची त्यांची इच्छा होती. ही भावना शिवाजी महाराजांच्या अंत:करणात असल्यामुळे त्यांना तीन वेळा वैराग्याची ऊर्मी आल्याचे दिसते. संत तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला बसले असताना, श्रीशैल्य दर्शनास गेले असताना आणि एकदा समर्थ भेटीच्या वेळी.

शिवाजी महाराजांना स्वत:च्या प्राणाचाही स्वार्थ नव्हता. त्यांची सारी धडपड- प्रयत्न- संघर्ष हिंदू समाजासाठी होता. याविषयीचा एक ऐतिहासिक पुरावा पोर्तुगीजांच्या ‘लिस्बन’ शहरातील संग्रहालयात गोवा गव्हर्नरच्या पत्ररूपाने मिळतो. गोव्याच्या गव्हर्नरांचा एक सेवक शिवाजी महाराजांचे किल्लेदार रावजी सोमनाथ पत्की यांचा नातेवाईक होता. त्याने किल्लेदार पत्की यांना विचारले, ‘शिवाजी महाराज सुखाने चैनीत न राहता फुकट एवढा संघर्ष का करतात, त्यांचा हेतू काय? असा आमच्या साहेबांना प्रश्न आहे.’ किल्लेदारांनी हाच प्रश्न खुद्द शिवाजीराजांच्या कानी घातला, तेव्हा महाराज म्हणाले, ‘सिंधू नदीच्या उगमापासून कावेरी नदीच्या दक्षिण तटापर्यंतची भूमी ही आमची भूमी आहे. या भूमीतून विदेशी आक्रमकांना हाकलून देणे व त्यांनी उद्ध्वस्त केलेल्या धर्मस्थळांची पुनर्बाधणी करणे हे आपले काम आहे.’ शिवाजीराजांचे हे उत्तर गोवा गव्हर्नरने पोर्तुगीज सरकारला एका पत्रकाद्वारे कळविलेले आहे. (सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे भाषण, २४ जून २०१०) यावरून महाराजांची दृष्टी केवढी व्यापक होती हेच दिसते. आजच्या भाषेत हिंदू धर्म-संस्कृती व समाजरक्षण करून हिंदू राष्ट्राची सर्वागीण उन्नती हेच शिवाजी महाराजांच्या कार्याचे अंतिम उद्दिष्ट होते.

शिवरायांच्या यशानंतर रामदास स्वामींनी संतोष प्रकट केला. समर्थ म्हणतात, ‘पापी औरंगजेबाचा नाश झाला. अभक्तांचा क्षय झाला. अधर्म नष्ट झाला आणि धर्माची स्थापना झाली.’ त्यामुळे शिवराज्याभिषेक दिन म्हणजे धर्माचे राज्यारोहण होते. हिंदूवी स्वराज्याची स्थापना म्हणजे हिंदू राष्ट्राचे सफल प्रत्याक्रमण, हिंदू संस्कृतीचे पुनरुत्थान आणि वैश्विक धर्माच्या पुनप्र्रतिष्ठेची घोषणा होती. 

लेखक रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे महासंचालक आणि सावरकर दर्शन प्रतिष्ठानचे सचिव आहेत.

ravisathe64@gmail.com