मत’ आणि ‘ज्ञान’ यांतला भेद सॉक्रेटिसनं कसा उघड केला हे लक्षात येण्यासाठी ‘लोगोस’, ‘डायलेक्टिक्स’ या संकल्पनाही समजून घेऊ…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इसवीसनपूर्व पाचव्या शतकात प्राचीन ग्रीक परंपरेत सॉक्रेटिसने फिलॉसफीला नवता, स्वायत्तता आणि प्रतिष्ठा प्राप्त करून दिली आहे. त्यामुळे पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाची विभागणी सॉक्रेटिसपूर्व काळ आणि सॉक्रेटिसोत्तर काळ अशी केली जाते. प्रस्थापित साहित्यात तर सॉक्रेटिसला पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाचं जनकत्वदेखील बहाल करण्यात येतं. मात्र ही बहाली तथ्यसंगत नाही. सॉक्रेटिसपूर्व काळातसुद्धा महत्त्वाचे तत्त्ववेत्ते होऊन गेले आहेत. सॉक्रेटिस पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाचा जनक नसला तरी ‘लोगोस’ ( logos) या ग्रीक संकल्पेला ज्ञानाचं आधारभूत तत्त्व बनवून त्यानं पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाला निर्णायक वळण दिलेलं आहे.

खरंतर, सॉक्रेटिसने आपले विचार मौखिक स्वरूपात मांडलेले असल्यानं तो इतरांच्या लिखाणातून- विशेषकरून त्याचा शिष्य प्लेटोच्या तत्त्वज्ञानातून- आपल्यापर्यंत पोहोचला आहे. सॉक्रेटिस प्लेटोच्या लिखाणात नेहमी प्रमुख पात्र म्हणून अवतरत असतो. झेनोफोन, अॅरिस्टोफेनिस यांच्या लिखाणातील सॉक्रेटिसपेक्षा प्लेटोच्या लिखाणातील सॉक्रेटिसचा पगडा पाश्चात्त्य परंपरेवर अधिक दिसतो. बर्ट्रांड रसेलच्या मते सॉक्रेटिसने फिलॉसफीसाठी पत्करलेलं मरण प्लेटोच्या सॉक्रेटिसशी जास्त सुसंगत आहे. खरंतर, प्लेटोच्या सुरुवातीच्या लिखाणातल्या सॉक्रेटिसशी सुसंगत आहे, असं म्हणणं अधिक सयुक्तिक ठरेल. कारण प्लेटो उतारवयात सॉक्रेटिसच्या सावलीतून पूर्णपणे बाहेर पडलेला दिसतो. उतार वयातील प्लेटोनं आपल्या शिक्षकाला संपवून त्याच्या नावाने परिपूर्णतेचा, अंतिमतेचा आणि अचूकतेचा दावा करणारं समग्रलक्ष्यी आणि ‘परलोकवादी’ तत्त्वज्ञान मांडलेलं आहे. मात्र सॉक्रेटिस शेवटपर्यंत अपोरेटिक ( aporetic) राहिल्यानं तो कधी अंतिम ज्ञानाचा दावा करत नाही.

(अ) सॉक्रेटिसची ऐतिहासिक कृती : लोगोसला ज्ञानाची आधारभूत संकल्पना म्हणून प्रस्थापित करणं सॉक्रेटिसची ऐतिहासिक कृती समजली जाते. पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाला निर्णायक वळण देणारी ही कृती समजून घेण्यासाठी लोगोसची संकल्पना समजून घेणं गरजेचं आहे. ग्रीकमध्ये लोगोसचा अर्थ बुद्धी, विवेक, विचारशीलता, भाषा इत्यादी होतो. खरंतर लोगोसचा अर्थ तत्त्वज्ञपरत्वे बदलत जातो. उदाहरणार्थ, लोगोस म्हणजे गुहाजीवनापलीकडे जाऊन अमूर्त वैश्विक तत्त्वांना पाहण्याची क्षमता (प्लेटो), वैश्विक नियमिततेचं प्रतिबिंब (अॅरिस्टॉटल), ईश्वराचा शब्द (बायबल), मनुष्याचं सारतत्व (देकार्त), स्वातंत्र्याचं क्षितिज (कांट), प्रगतिशील इतिहासाचं होकायंत्र (हेगेल). हेगेलच्या मांडणीनुसार तर, समग्र पाश्चात्त्येतर मानवता ‘लोगोसच्या बाहेर’ अर्थात इतिहासबाह्य आहे. त्यामुळे स्वातंत्र्यासाठी अपात्र ठरते! हेगेलचं हे तत्त्वज्ञान वसाहतवादाच्या समर्थनार्थ वापरलं जायचं.

‘लोगोस’ या संकल्पनेचा सॉक्रेटिक वळणापुरता विचार करायचा झाला तर लोगोस म्हणजे बुद्धीचा सार्वजनिक वापर. लोगोस सार्वजनिक अवकाशात ( agora) प्रश्नोत्तरांच्या (dialectics) मदतीनं ‘सार्वजनिक सत्य’ शोधण्याचं साधन होय. लोगोसचा अर्थ भाषा असा घेतला तरी काही गोष्टी स्पष्ट होतात. भाषा फक्त वास्तव व्यक्त करण्याचं साधन नसून भाषा हेच एक गुंतागुंतीचं वास्तवदेखील असतं. भाषेकडे मानवी इतिहासाचा, आकलनाचा आणि आकलनाच्या शक्यतांचा ‘ब्लॅक बॉक्स’ म्हणूनदेखील पाहाता येतं. भाषा हे मानवी बुद्धीचं आणि विचारशीलतेचं प्रतिबिंब आहे. भाषा एकाच वेळी सामाजिक संस्था आणि वैयक्तिक क्षमता असल्याने ती कधीच पूर्णत: मोनोलोगोस, एकजिनसी आणि पारदर्शक नसते.

त्याअर्थी लोगोस हा नेहमी ‘डायलोगस’ (dialogous) वा ‘हेटरोलोगस’ (heterologous) असतो. लोगोसमध्ये किमान दोन तर्कांचा अंतर्भाव असतो. डायलोग म्हणजे दोन तर्कांचं एका ठिकाणी जुंपलं जाणं. पाश्चात्त्य तत्त्वज्ञानात लोगोसच्या या द्वंद्वात्मक, अंतर्विरोधात्मक, गतिशील वास्तवाला नवनिर्मितीचं उगमस्थान आणि प्रागतिकतेचं द्याोतक देखील समजलं जातं. थोडक्यात, डायलेक्टिस म्हणजे सार्वजनिक प्रश्नोत्तरांतून (आजच्या भाषेत सांगायचं झालं तर प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून) बहुजिनसी सार्वजनिक सत्य शोधण्याचं साधन होय. त्यामुळे प्रेस कॉन्फरन्सची संकल्पना पाश्चात्त्य लोकशाहींचं मध्यवर्ती तत्त्व समजलं जातं. लोकशाहीचं हे मूलभूत तत्त्व नाकारणारे हेगेलच्या उपरोक्त भूमिकेचं समर्थन करणारे ठरतात.

(ब) फिलॉसफी विरुद्ध डोक्सॉसफी : इसवीसनपूर्व पाचव्या शतकात प्रामुख्यानं तीन पारंपरिक क्षेत्रांतल्या ज्ञानाच्या दाव्यांचा पगडा होता. थिऑस (theos) म्हणजे ईश्वरी तत्त्व आणि मिथॉस (mythos) म्हणजे पौराणिक कल्पकता यांच्या साहाय्यानं धर्मशास्त्र आणि मिथकशास्त्रात केल्या जाणाऱ्या ज्ञानाच्या दाव्यांसोबतच प्रस्थापित मतांना (orthodoxy) देखील ज्ञानाचा दर्जा होता. सॉक्रेटिसचा सामना या तीन बलाढ्य क्षेत्रांशी झाला आहे. तत्कालीन सॉफिस्टांनी थिऑस, मिथॉस आणि पेथॉसचं (म्हणजे भावनांचं) प्रभावीपणे मिश्रण करून मतांना (doxa) ज्ञान म्हणून सर्वसामान्यांवर बिंबवलं होतं. सॉक्रेटिसनं या सॉफिस्ट्रीवर म्हणजे ‘प्रस्थापित मतांचा ज्ञान म्हणून व्यापार करण्याच्या कले’वर प्रहार केले आहेत. तसं पाहता सॉक्रेटिसचं लक्ष्य धर्मशास्त्र आणि मिथकशास्त्र नसून या क्षेत्राचं विकृतीकरण करून व्यापार करणारे सॉफिस्ट होते.

सॉक्रेटिसनं तत्कालीन सॉफिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्यावसायिक विचारवंतांचा विरोध का केला आणि त्यांना तत्त्वज्ञानाचे शत्रू का मानलं हे समजून घेण्यासाठी सॉफिस्ट्री म्हणजे नेमकं काय हे पाहणं आवश्यक आहे. आजच्या घडीला सॉफिझम, सॉफिस्ट, सॉफिस्ट्री हे शब्द नकारात्मक अर्थाने वापरले जातात. मात्र सॉक्रेटिसच्या काळात सॉफिस्ट्री मध्यवर्ती सांस्कृतिक शक्ती होती. सॉफिस्ट्रीचं मुख्य हत्यार ऱ्हेटरिक म्हणजे वाक्पटुता असे. सॉफिस्ट शब्दांवर जबरदस्त पकड आणि उत्कृष्ट शब्दयोजना अवगत असणारे व्यावसायिक विचारवंत होते. राज्यकर्त्यांच्या मुलांना भाषणाची कला शिकवणारे खासगी शिक्षक होते. भाषेचा वापर स्तुती करण्यासाठी, राजकीय सभेसाठी आणि खटला जिंकण्यासाठी कसा करावा या तीन गोष्टी ते प्रामुख्याने शिकवत असत. सॉफिस्टांचं लक्ष सत्यशोध नसून सत्ता, पैसा, मानमान्यता मिळवणं असे. ज्ञान त्यांच्यासाठी व्यवसाय होता. त्यांच्याकडे एकाच विषयावर प्रभावीपणे परस्परविरोधी पक्ष मांडण्याची हातोटी होती. जगात वैश्विक आणि वस्तुनिष्ठ सत्य नावाचा प्रकार नसतो आणि सत्य म्हणजे दुसरं तिसरं काही नसून प्रभावीपणे मांडलेलं मत, अशी त्यांची धारणा होती. एका अर्थानं त्यांना आजच्या ‘पोस्टट्रूथ’ तर्काचे पूर्वज देखील म्हणता येईल. थोडक्यात, सॉफिस्ट म्हणजे आपल्या शब्दसामर्थ्यानं अंतर्विरोध लपवून श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारे अतिशय प्रभावी वक्ते होते.

सॉक्रेटिसला या सगळ्या व्यवहारात ठोस ज्ञानप्रक्रियेचा अभाव दिसला. ज्ञानाच्या नावानं चालणाऱ्या या वितंडवादी/भावनावादी व्यापाराचं खरं रूप त्यानं आपल्या डायलेक्टिक्समधून दाखवून दिलं आहे. सॉक्रेटिसनं त्याचं पद्धतीशास्त्र सार्वजनिक केल्यामुळे ‘लोगोस’चा गोठवलेला प्रवाह पुन्हा वाहू लागला आणि अनेकांचे हितसंबंध धोक्यात आले. त्याच्या ऐतिहासिक कृतीची त्याला किंमत मोजावी लागली. त्याला खटल्याला आणि देहदंडाच्या शिक्षेला सामोरं जावं लागलं.

(क) सॉक्रेटिसचा खटला : सॉक्रेटिसवर करण्यात आलेले तीन प्रमुख आरोप असे : सॉक्रेटिसने ईश्वरनिंदा करून नास्तिकता पसरवली, नवीन देवतांचा परिचय करून दिला आणि तरुणांना पदभ्रष्ट केलं. खरंतर, सॉक्रेटिसला देहदंड तिसऱ्या कारणामुळे देण्यात आला. महत्त्वाची गोष्ट म्हणजे सॉक्रेटिसला मृत्यूची शिक्षा अथेन्सच्या लोकशाहीने ठोठावली आहे. तरीसुद्धा प्लेटोसारखा सरळसरळ लोकशाही विरोधी पवित्रा न घेता सॉक्रेटिसनं प्रबुद्ध लोकशाहीची आशा बाळगली आहे. त्याच्यावरील खटल्याची सुनावणी झाल्यानंतर मतदान करण्यात आलं. एकूण ५०० मतदारांपैकी २८० मतदारांनी सॉक्रेटिसच्या विरोधात मतदान केलं आणि २२० मतदारांनी सॉक्रेटिसची बाजू घेतली. बहुमतानं सॉक्रेटिसला अपराधी ठरवण्यात आलं होतं. अठराव्या शतकात फ्रेंच फिलॉसफर व्होल्टेर म्हणतो की अथेन्सच्या लोकशाहीत ५०० पैकी २२० मतदार सॉक्रेटिसच्या बाजूने होते ही खरंतर कौतुकाची बाब आहे!

पण हे मतदानही दोन टप्प्यात झालं होतं. पहिल्या टप्प्यात त्याच्या विरोधात निकाल लागल्यानंतर, दुसऱ्या टप्प्यात त्याला माफी मागून किंवा काही रक्कम भरून देहदंडाच्या शिक्षेपासून स्वत:ला वाचवता येणार होतं. प्लेटोच्या ‘अपॉलॉजी’ या संवादात सॉक्रेटिस दुसऱ्या टप्प्याच्या मतदानाआधी ‘ज्ञानरहित, मताधिष्ठित’ लोकशाही प्रक्रियेची टिंगल करतो. माफी मागून स्वत:ला वाचवणं फिलॉसफीला सॉफिस्ट्रीच्या पातळीवर आणण्यासारखं ठरलं असतं. त्यानं फिलॉसफीला वाचवण्यासाठी मृत्यू पत्करला. सॉक्रेटिसच्या विरोधात निकाल ज्ञानधिष्ठित प्रक्रियेमुळे नव्हे तर मताधिष्ठित सॉफिस्ट्रीमुळे लागला आणि त्याला विष प्यावं लागलं. त्यामुळे प्लेटो लोकशाहीविषयीच आक्षेप नोंदवतो. या सॉक्रेटिक वळणादरम्यान मत (doxa) आणि ज्ञान ( episteme) यांतला भेदही अधोरेखित करण्यात आला आहे. प्रस्थापित मतांना ( doxa) ज्ञान समजणारे ‘डोक्सासॉफर’ आणि फिलॉसफर हा मूलभूत फरक पाश्चात्त्य तत्त्वज्ञानात निर्माण झाला.

थोडक्यात, सॉक्रेटिक वळणादरम्यान ‘लोगोस’चा वापर सार्वजनिक अवकाशात होऊन सार्वजनिक सत्याचा शोध कसा घ्यावा याचं ‘डायलेक्टिक्स’ हे पद्धतीशास्त्र उदयास येतं. खरंतर, सॉक्रेटिस हे पद्धतीशास्त्र झेनोकडून शिकला होता. पण त्याचा मानवी व्यवहारांच्या उलटतपासणीसाठी सार्वजनिक वापर करण्याचं श्रेय सॉक्रेटिसकडे जातं. त्यामुळे सॉक्रेटिसने तत्त्वज्ञानाला ‘राजकीय’ केलं असं म्हटलं जातं. त्यासाठी सॉक्रेटिस पाश्चात्त्य परंपरेतील लोकाभिमुख तत्त्ववेत्त्यांसाठी अग्रदूत ठरतो. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे त्याच्या जीवनाचा आणि विशेषकरून मृत्यूचा विचार केला तर ‘फिलॉसफिकल करेक्टनेस’ ही फिलॉसफीची पूर्वअट असते, या गोष्टीचा तो जणूकाही वस्तुपाठ घालून गेला आहे.

फ्रेंच साहित्य-तत्त्वज्ञानाचे अभ्यासक