पवनार ते पत्रादेवी म्हणजे नागपूर ते गोवा असा ८०२ किलोमीटरचा शक्तिपीठ द्रुतगती महामार्ग तसा अचानकच जाहीर झाला; त्याला स्थगिती मात्र अपेक्षितपणे मिळाली! १२ जिल्ह्यांतील ३५ तालुक्यांमधील २८ हजार एकर भूसंपादनाचे राजपत्र प्रसिद्धीस देण्यात आले. कोणत्या शेतीतून मार्ग जाणार हे शेतकऱ्यांना समजले आणि राज्यभरातील एक लाखाहून अधिक शेतकऱ्यांमध्ये चलबिचल सुरू झाली. खरे तर महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपासून ना हा मार्ग सुरू होतो ना तिथे थांबतो. तुळजापूरची आई भवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी, अंबाजोगाईची योगेश्वरी आणि माहुरची रेणुका या देवी मंदिरांच्या धार्मिक पर्यटनाला या मार्गामुळे प्रोत्साहन मिळेल असा सरकारचा दावा. १५ तासांचे हे अंतर आठ तासांपर्यंत येईल आणि धार्मिक पर्यटनाला गती मिळेल असे सांगण्यात येते. पण त्यासाठी होणाऱ्या भूसंपादनामुळे सुमारे एक लाख जण बाधित होऊ शकतात, असा शेतकऱ्यांचा दावा. शक्तिपीठाचा मार्ग करण्यापूर्वी नागपूर-मुंबई हा महामार्ग सुरू झाला; पण तो मुंबईपर्यंत पुरेशा गतीचा नाही. त्यामुळे या मार्गाचा आर्थिक उलाढालीस कसा आणि किती फायदा झाला याचा अद्याप कोणी अभ्यास केला नाही. मुंबईपर्यंत पोहोचण्यातच तूर्तास अडचणी असल्याने ‘समृद्धी’चे घोडे तसे अडलेलेच आहे. असे असताना एक नवा मार्ग प्रस्तावित झाला. उपविभागीय अधिकाऱ्यांना जमीन संपादनाचे अधिकारही देण्यात आले. ज्या शेतकऱ्यांची जमीन या मार्गात प्रस्तावित आहे असे शेतकरी एकत्र आले. त्यांनी बैठका घ्यायला सुरुवात केली. नांदेडच्या हदगावपासून ते कोल्हापूरच्या कागलपर्यंतच्या बैठकीत प्रश्न उपस्थित करण्यात आला : धार्मिक पर्यटन महत्त्वाचे की शेती?
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा