सन १९२० नंतरचा काळ हा धर्म आणि समाज सुधारणांचा विचार करता परिवर्तन काळ होता. अस्पृश्योद्धार, शुद्धी, धर्मविचाराचे साधन कोणते? इत्यादी प्रश्नांवर विचार करण्यासाठी १९२० ते १९३० या दशकात भारतात अनेक ठिकाणी धर्म परिषदांचे आयोजन करण्यात आले होते. त्यापैकी एक परिषद सन १९२६ मध्ये सोनगीर येथे योजण्यात आली होती. धुळ्यापासून नरढाणा रेल्वे स्टेशनकडे जाण्याच्या मार्गावर सोनगीर नावाचे छोटेसे गाव आहे. तिथे केशवदत्त महाराजांचा मठ आहे. त्या ठिकाणी कुकुरमुंडा (जि. तापी, गुजरात) येथील वैष्णव संस्थानचे अधिपती संतोजी महाराज यांनी धर्म परिषदेचे आयोजन केले होते. या परिषदेस पाचही पीठांच्या शंकराचार्यांना आमंत्रित करण्यात आले होते. धर्माचा सनातन पक्ष मांडण्यासाठी कलकत्त्याचे महावेदांती अनंतकृष्णशास्त्री, काशीचे लक्ष्मणशास्त्री द्रविड, राजेश्वरशास्त्री द्रविड आले होते. पुरीचे शंकराचार्य व करवीर पीठाचे शंकराचार्य डॉ. कुर्तकोटी उपस्थित होते. धर्म परिवर्तनीय असून, मानवी बुद्धीला त्यात बदल करता येतो असा पक्ष मांडणाऱ्या पंडितांचीही मोठी उपस्थिती या परिषदेस लाभली होती. नारायणशास्त्री मराठे, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, महादेवशास्त्री दिवेकर, सदाशिवशास्त्री भिडे, चिंतामणराव वैद्या प्रभृतींचा त्यात समावेश होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

धर्म परिषदेतील चर्चा मीमांसा पद्धती विरुद्ध ऐतिहासिक पद्धती अशा रीतीने झाली. या परिषदेत तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी मानवी बुद्धीला धर्मात परिवर्तन करता येते हे ऐतिहासिक पद्धतीने सप्रमाण दाखवून दिले. इतकेच नव्हे तर वेद ‘अपौरुषेय’ (ईश्वर निर्मित) नसून मनुष्य निर्मित असल्याचे ठाम प्रतिपादन केले, तसेच शंकराचार्य ईश्वर नसून माणूसच आहे हे विशद केले. तसेच हेही स्पष्ट केले की, प्राचीन ऋषी, मुनी, आचार्य प्रभृती त्रिकालदर्शी नसून तेही मनुष्यच होते. या मांडणीनंतर परिषदेत क्षोभ उत्पन्न होणे स्वाभाविक होते. तशात नारायणशास्त्री मराठे यांनी ही वादपद्धती पूर्वापार चालत आली असल्याचे स्पष्ट करून चार्वाक, शंकराचार्य, बुद्ध प्रभृतींनी असाच पूर्वपक्ष इतिहासात मांडल्याचा दाखला देत चर्चा चालू ठेवली.

हेही वाचा >>> समोरच्या बाकावरून : मांजराच्या पावलांनी ती येते आहे…

‘‘आपली बुद्धिमत्ता, स्मरणशक्ती, ग्रहणशक्ती आणि हजरजबाबीपणा या गुणांच्या जोरावर प्राचीन पंडितांचीही त्याच्यापुढे डाळ शिजू शकत नाही, असा अनुभव अनेक धर्म परिषदांतून आणि शंकराचार्यांपुढे झालेल्या वादांतून आलेला आहे. जुन्या पंडितांचे वादविवादाचे विशिष्ट आडाखे असतात. त्या परंपरेतच शास्त्रीबुवा वाढलेले असल्यामुळे केवळ या आडाख्यांच्या चापांत त्यांना कोणीही अडवू शकत नाही,’’ असे निरीक्षण त्यांचे सहाध्यायी श्री. शं. नवरे यांनी तर्कतीर्थविषयक एका लेखात नोंदविले आहे नि खरे आहे, हे अनेक असे वादविवाद वाचताना लक्षात येते. वेदवाङ्मयाचे अध्ययन तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी पठडीत राहून कधीच केले नाही. त्यामुळे वेदांकडे पाहण्याची स्वतंत्र दृष्टी त्यांच्यात विकसित झाली होती. पंडित श्रीपादशास्त्री सातवळेकर यांनी त्यांना ही दृष्टी दिली होती. याबाबत तर्कतीर्थांनी स्पष्ट केले आहे की, ‘‘प्राचीन आणि अर्वाचीन अशा दोन्ही विद्यांचा लाभ मला काही प्रमाणात झाला आहे; पण मी वेदविद्या शिकलो नसतो, तर मला भारतीय संस्कृतीचे गंभीर अध्ययन करता आले नसते. ते एकांगी झाले असते. मी वेद सनातन्यांप्रमाणे प्रमाण मानत नाही. परंतु भारतीय संस्कृतीची ती अनुपम वैचारिक संपत्ती आहे, याबद्दल मला यत्किंचितही शंका वाटत नाही. वेदांचे पावित्र्य माझ्या हृदयात खोल रुजले आहे.’’ लहानपणी वेदांचे पठण आपण अर्थ वाचून केले; पण पंडित श्रीपादशास्त्री सातवळेकर यांच्या ग्रंथवाचनाने अर्थबोधपूर्वक अध्ययन करण्याकडे आपली प्रवृत्ती वाढल्याची नोंद तर्कतीर्थांनी वसंत सातवळेकर यांनी ‘पुरुषार्थ’ मासिकासाठी घेतलेल्या एका मुलाखतीत करून ठेवली आहे. असाच आदर तर्कतीर्थ शंकराचार्यांबद्दल व्यक्त करताना दिसतात. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने तर्कतीर्थ साताऱ्यात शंकराचार्यांची मुलाखत घ्यायला जातात. अगोदर सश्रद्ध साष्टांग दंडवत घालतात आणि नंतर चातुर्वर्ण्य समर्थन होऊ शकत नाही, याबाबत वाद करतात. वाद म्हणजे विरोध अशी समजूत समाजमानसात रूढ आहे. जगात विचार विकास झाला, प्रबोधनाची पहाट उदयाला आली, ती केवळ वादविवाद आणि खण्डनमण्डनातून. ते झाले नसते तर जग स्थितिशील राहिले असते.

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article about dharma parishad organised by santoji maharaj in 1926 zws