उद्योग वर्तुळात रुईया बंधू हा एक दबदबा एकेसमयी होता. शशी आणि रवी या दोन भावांचे कार्य-कर्तृत्व इतके एकजीव की त्यांची ओळखही एकत्रित – रुईया बंधू अशीच. दोहोंच्या नावांतील इंग्रजीतील आद्याक्षरे जुळवूनच ‘एस्सार’ घडले. मुंबईत महालक्ष्मी रेसकोर्ससमोरील भव्य एस्सार हाऊस या त्यांच्या मुख्यालयातील २० व्या मजल्यावर, आसने व मेज वेगवेगळी पण रुईया बंधू एकाच दालनांत बसून कारभार हाकत, हेही असामान्यच. यापैकी थोरले शशिकांत गेल्या आठवड्यात वयाच्या ८० व्या वर्षी निवर्तले. वयाने सहा वर्षांनी लहान, रवी यांचेही सध्या निवृत्त जीवन सुरू आहे.
हेही वाचा >>> चांदणी चौकातून: परवलीचा शब्द…
वयानुरूप शशी हेच एस्सार समूहाच्या अध्यक्षस्थानी होते. त्यांचे वक्तृत्व कौशल्य, आत्मीयता, कणखरपणा, चलाख संवाद साधण्याची त्यांची खुबीही खासच, असे त्यांना ओळखणारे जुनेजाणते आवर्जून सांगतात. बालपण आणि उद्योगाची मुहूर्तमेढ चेन्नईतून झाल्यामुळे अवगत तमिळ भाषेचा ते चांगल्या प्रसंगी चपखल वापरही करत. तमिळी नेते, राजकारणी आणि तमिळ माध्यम प्रतिनिधींशी त्यांचा विशेष जिव्हाळा होता. महत्त्वाकांक्षा, त्यासाठी जोखीम पत्करण्याची धमक ही उद्योजकांत असतेच. पहिल्या पिढीचे उद्योजक असूनही शशी रुईया यांनी त्याचे अथांग रूप दाखवले. जगातील ३५ देशांत त्यांनी उद्योग पसारा फैलावला. स्पर्धक कोण हे न पाहता प्रत्येकाला शिंगावर घेण्याच्या त्यांच्या वृत्तीने पोलाद व ऊर्जा क्षेत्रात टाटा व जिंदल, दूरसंचार क्षेत्रात एअरटेल आणि बंदरांमध्ये अदानी यांना कडवे आव्हान त्यांनी उभे केले.
हेही वाचा >>> समोरच्या बाकावरून : महायुतीचा प्रचार… युक्त्या आणि क्लृप्त्या
रिलायन्सच्या जामनगर रिफायनरीला खेटून वडिनार रिफायनरीचा घाट घालून त्यांनी अंबानींना त्यांच्याच आखाड्यात लोळवू पाहण्याचे ठरविले. विस्ताराच्या धडाक्यातून रुईयांनी मोठ्या प्रमाणात उसनवारी सुरू ठेवली. पुढे तर काहीच निष्पन्न न झालेल्या, कथित २ जी घोटाळ्याच्या चौकशीचा ससेमिरा आणि कलंकही माथी आला. मोठ्या कर्जांच्या भरपाईसाठी रुईयांना अनेक व्यवसायांची विक्री व पुनर्रचना करण्यास देणेकऱ्यांनी भाग पाडले. सन २००० मध्ये देशातील तिसऱ्या क्रमांकाचे उद्योगघराणे ठरलेल्या एस्सार समूहाची कर्जे पुढे पाच पटींनी वाढून सव्वा लाख कोटी रुपयांवर गेली. ही गोष्ट २००७-०८ ते २०१४-१५ दरम्यानची. संकटांचे घाव शशी रुईयांसाठी नवीन नव्हते आणि त्यातून त्यांनी सलामतीने बाहेर पडणेही नवीन नव्हते. त्यांचे कुटुंब हेच त्यांची प्रेरणा व प्राणवायू ठरला. समानता, सहभाग आणि सर्वसमावेशकतेने कुटुंबातील सर्वांनी एकत्र काम करण्याची त्यांची शिकवण, रुईयांच्या सध्याच्या तिसऱ्या पिढीकडून गिरवली जात आहे. आज एस्सार समूह पूर्वीसारखा प्रबळ राहिलेला नाही आणि शशी रुईया यांच्या जाण्याने या समूहाचा ऊर्जास्राोतही हरपला आहे.