प्रत्येक उद्योगाने त्याचे अस्सल सामर्थ्य समजून घेतले पाहिजे आणि त्यांचा फायदा करून घेतला पाहिजे. टाटा समूहाचे वेगळेपण काय कोणी विचारले तर त्याचे उत्तर, त्यांना त्यांच्या सामर्थ्यांची पुरेपूर जाण असणे आणि त्याचा त्यांनी पुरेपूर फायदाही करून घेणे हे आहे. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्षेत्रात स्पर्धात्मक स्थान टिकवून ठेवणाऱ्या गुणवत्तेची कास आणि मोठी स्वप्ने, व्यापक दृष्टी व मूल्यनिष्ठा उपजतच भिनलेल्या या समूहाने अनेकानेक गुणी माणसे हेरली आणि सक्षम नेतृत्व घडविले. हे नेतृत्व त्या समूहाचे सामर्थ्य बनले आणि भांडवलही झाले. ‘टाटा स्टील’चे माजी व्यवस्थापकीय संचालक जमशेद जे. इराणी हे त्यापैकीच एक होत. इराणी आज आपल्यात नाहीत. सोमवारी रात्री जमशेदपूरमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. चार दशकांहून अधिक काळ (तब्बल ४३ वर्षे) टाटा स्टीलचा एक भाग असलेले इराणी हे धातू उद्योगातील मोठे प्रस्थच होते.
विशेषत: रूसी मोदी यांच्यानंतर ‘टाटा स्टील’ची धुरा सांभाळणे ही सोपी गोष्ट नव्हती. पण ही कामगिरी त्यांनी चोख पार पाडली. म्हणूनच भारताचे ‘स्टील मॅन’ हे गौरवपद त्यांनी कमावले. पण त्यांच्या या व्यक्तिगत कर्तबगारीने त्यांनी टिस्कोला (आताची टाटा स्टील) नव्या उंचीवर नेऊन बसविले. नागपूर विद्यापीठातून धातुविज्ञानातून पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर, ब्रिटनमध्ये शेफील्ड विद्यापीठातून याच विषयातील प्रगत अभ्यासक्रम व पीएचडी त्यांनी मिळविली. एकूण कल मूलभूत संशोधनाकडेच होता. त्यामुळे ब्रिटिश आयर्न अँड स्टील रीसर्च असोसिएशनमध्ये वैज्ञानिक अधिकारी म्हणून नियुक्तीसह त्यांची व्यावसायिक कारकीर्द १९६३ मध्ये सुरू झाली. भारताबद्दलची ओढ होतीच आणि ती संधी टिस्कोच्या संशोधन-विकास विभागाच्या प्रमुख पदाच्या प्रस्तावाने त्यांना १९६८ मध्ये मिळवून दिली. तेव्हापासून ते २००१ मधील निवृत्तीपर्यंत इराणी आणि टाटा स्टील यांचे नाते अतूट राहिले, किंबहुना उत्तरोत्तर घट्ट बनत गेले. जून २०११ पर्यंत ते टाटा स्टीलच्या संचालक मंडळावर कार्यरत राहिले.
अनेक प्रकारच्या बाजारपेठांमधून, आर्थिक-राजकीय आवर्तनांतून प्रवास करत टाटा स्टील आज जागतिक भारतीय कंपनी म्हणून टिकून आहे, त्यामागे इराणी यांच्या चार दशकांहून मोठय़ा कारकीर्दीचे योगदान वादातीत आहे. टाटा स्टीलचा जमशेदपूर प्रकल्प आज जगातील सर्वात स्पर्धात्मक आणि तरीही किफायतशीर पोलाद प्रकल्प म्हणून नावाजला जातो. त्याचे संपूर्ण श्रेय हे उत्पादन गुणवत्तेशी कोणतीही तडजोड न करता, इराणी यांनी ऐंशीच्या दशकात योजलेल्या उपाययोजनांना जाते. त्यांनी २००४ साली, कंपनी कायद्यातील सुधारणांसाठी सरकारने नेमलेल्या समितीतही मोलाची भूमिका बजावली. ‘जेजे इराणी समिती’ म्हणूनच ओळखल्या गेलेल्या या समितीच्या शिफारशींनी नव्या पिढीच्या उद्यमशील भारताची पायाभरणी केली. १९९६ मध्ये रॉयल अॅकॅडमी ऑफ इंजिनीअरिंगचे आंतरराष्ट्रीय फेलो म्हणून नियुक्ती आणि १९९७ मध्ये राणी एलिझाबेथ दुसऱ्या यांच्याकडून मानद नाइटहूड, अशा ब्रिटिश गौरवांचे ते मानकरी ठरले. त्यानंतर दशकभराने म्हणजे २००७ मध्ये त्यांना भारत सरकारने त्यांची पोलाद उद्योग क्षेत्रातील विपुल कामगिरीची दखल घेतली आणि त्यांना पद्मभूषण या नागरी सन्मानाने गौरविण्यात आले. त्यांच्या निधनाने भारतीय उद्योगक्षेत्रातील एका लोहनेतृत्वाचा अस्त झाला आहे.