‘रखेल’ हा शब्द प्रसारमाध्यमांनी वापरू नये, हा सभ्यतेचा संकेतही गुंडाळून १९६९ साली कुणा अमेरिकी वृत्तपत्राने बातमी दिली – ‘पोलिओवरील पहिल्या यशस्वी लशीचे संशोधक जोनास साल्क हे लवकरच, पिकासो यांची रखेल फ्रान्स्वा जिलो हिच्याशी विवाहबद्ध होणार आहेत’! अर्थात याच फ्रान्स्वा जिलो यांच्या ६ जून रोजी- वयाच्या १०१ व्या वर्षी झालेल्या मृत्यूची बातमी देताना ‘त्या’ वृत्तपत्रालाही पाश्चात्त्य देशांतील अन्य साऱ्या वृत्तपत्रांप्रमाणे, या स्त्रीच्या व्यक्तिमत्वाचे कौतुकच करावे लागले असेल. चित्रकार पाब्लो पिकासो यांचे चरित्र ज्यांनी वाचलेले असते, त्यांना डोरा मार, मारी तेरेझ-ला फॉन्तेन यांच्याप्रमाणेच फ्रान्स्वा जिलो हेही नाव माहीत असते.. या सर्वजणींना पिकासोने कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर स्वत:च्या चित्रांची नायिका – किंबहुना स्फूर्तिदेवता- असा दर्जा दिला होता आणि पिकासोच्या पुरुषी प्रवृत्तींचा त्रास अन्य दोघींना इतका झाला की डोराला मानसोपचार घ्यावे लागले, तर मारीने आत्महत्या केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फ्रान्स्वा जिलो हिला  पिकासोपासून दोन मुलेही झाली- मुलगा क्लॉद आणि मुलगी पलोमा. पण ‘तो सातत्याने माझ्यावर बाळंतपण लादू पाहात होता, हे माझ्या लक्षात आले आणि दोघाही मुलांसह मी बाहेर पडले.. मग पिकासोने, माझ्या चित्रांची प्रदर्शने भरवण्यापासून आर्ट गॅलऱ्यांना परावृत्त करण्याचा सपाटाच लावला’ असे फ्रान्स्वा जिलोने तिच्या ‘लाइफ विथ पिकासो’ या आत्मवृत्तात लिहिले आहे. हे पुस्तकही प्रकाशित होऊ नये असा प्रयत्न पिकासोने केला, पण तरीही दशलक्ष प्रतींच्या खपाचा आकडा अल्पावधीत गाठणारे ते पुस्तक ठरले. त्यावर ‘सव्‍‌र्हायिव्हग पिकासो’ नावाचा चित्रपटही झाला.. त्या चित्रपटात अविस्मरणीय ठरलेला, ‘पिकासोची तत्कालीन धर्मपत्नी ओल्गा खोख्लोवा हिच्याशी फ्रान्स्वाची झटापटच नव्हे तर अक्षरश: हाणामारी होते.. यापैकी एखादीच जगणार की काय, इतकी.. पण पिकासो थंड, शांतपणे हे वरून पाहात असतो’ हा प्रसंग फ्रान्स्वा जगली होती.  तरीही पुढे अमेरिकेला येऊन, ल्युक सायमन या चित्रकाराशी संसार (१९५५ ते ६२) थाटून आणि पुढे ‘आता जोडीदार नको’ असे ठरवून फ्रान्स्वा चित्रकला- डिझाइन या क्षेत्रांत रमली, पण जोनास साल्क यांच्याशी लग्नाचा प्रस्ताव तिने स्वीकारला तो ‘दर वर्षांतले सहाच महिने आपण एकत्र असू’ या अटीवर! ती चित्रकार असली तरी चित्रकलेच्या इतिहासात अमर ठरू शकली नाही, कारण तत्कालीन घनवादी (क्युबिस्ट) चित्रकारांच्या शैलीचे कमीअधिक अनुकरणच तिने केले. परंतु आधुनिक विवाहसंस्थेच्या अभ्यासात मात्र या स्त्रीचे उदाहरण निश्चितपणे उपयुक्त ठरावे. स्वत:च्या स्वातंत्र्यावरील अतूट विश्वास हा तिच्या खमकेपणाचा पाया होता. ‘मतभिन्नतेतून तर संवाद होतो,’ हे पिकासोला ऐकवू शकणाऱ्या या विचारी स्त्रीचे आयुष्य केवळ ‘पिकासोला धडा शिकवला’ म्हणून नव्हे, तर स्वत:च्या क्षमता ओळखल्या म्हणून निरामय झाले होते.