डॉ. उज्ज्वला दळवी
खडतर बालपण, मोठेपणीचे ताणतणाव, अपयश, अत्याचार.. यातून आलेला चिडचिडेपणा काहींच्या पचनसंस्थेतही उतरतो..
‘‘मी नखरे नाही करत! खरंच फार दुखतं माझ्या पोटात. गॅसेस, जुलाब सगळं खरं आहे. खूप त्रास होतो मला,’’ राजीवीला हुंदका फुटला. चार वर्षांपासून वरचेवर तिच्या पोटात दुखे, वारा धरून पोट डब्ब होई, दिवशी आठ-दहा जुलाब होत. पोटाच्या तक्रारीमुळे प्रत्येक नव्या कामात अडथळा येई. नैराश्यामुळे तिचा कुठल्याही कामासाठी उत्साहच राहिला नव्हता. तिच्या दादावहिनींच्या मते ती ‘घरकाम टाळायला नाटकं करत’ होती.
दुगुमावशींना चाळीस वर्षांपूर्वी मोठी डिसेंट्री झाली होती. तेव्हापासून त्यांना बद्धकोष्ठाचा, गॅसेसचा फार त्रास होई, पोट तडसे. ‘चारचौघांत फजिती नको’ म्हणून त्या लग्नमुंजींना जायचं टाळत. तशा अवघड प्रसंगाची आणि इतर कुठल्याही गोष्टीची त्यांना काळजी वाटे.
दामुअण्णांना वीस वर्षांपूर्वी लघवीच्या इन्फेक्शनसाठी अँटिबायोटिक दिलं होतं. इन्फेक्शन बरं झालं, पण पोटात मुरडा सुरू झाला, चालूच राहिला. एखाद्या सकाळी दहा-बारा वेळा संडासात धावावं लागे तर संध्याकाळी घट्ट खडा होई आणि कुंथावं लागे. पोट केव्हा कसं वागेल याचं ताळतंत्र नसल्यामुळे ते सतत धास्तावलेले, चिंतातुर असत.
त्या तिघांतही पोट साफ होण्याची क्रिया नियमितपणे होत नव्हती. धड कुंथता येत नव्हतं. ते जमलंच तरी तासन् तास संडासात घालवूनही पोट साफ झाल्याचं समाधान नव्हतं. पोटात दुखणं, वारा धरणं होतंच. दर आठवडय़ाला यातल्या किमान दोन गोष्टींचा त्रास त्यांना हटकून होई. त्या तिघांचेही रक्त-संडास-लघवीचे भरपूर तपास झाले. पचनसंस्थेचा क्ष-किरणी आणि दुर्बिणीतूनही अगदी काटेकोर अभ्यास झाला. सग्गळे रिपोर्ट्स नॉर्मल निघाले. त्याने ‘हुश्श’ वाटण्याऐवजी निदान न झाल्याचं, त्रासाला अंत नसल्याचं दु:खच त्यांना अधिक वाटलं.
पण डॉक्टरांनी निदान केलं! तसा त्रास सलग तीन महिन्यांहून अधिक टिकला की त्याला चिडचिडं आतडं (इरिटेबल बॉवेल सिंड्रोम ऊर्फ आयबीएस) म्हणतात. तशा ‘आयबीएस’वाल्या प्रत्येक रुग्णाची तक्रार वेगवेगळी असते. राजीवीसारखा जुलाबी गट, दुगुमावशींचा बद्धकोष्ठी आणि दामुअण्णांचा मिश्रलक्षणी हे त्याच्यातले तीन मुख्य गट. रोजच्या जगण्यातले, अगदी लग्नकार्य- बढती यांच्यासारखे सुखद ताणतणाव वाढले तरी आयबीएसचा त्रास वाढतो.
आयबीएस चेंगट, त्रासदायक असला तरी त्याच्यामुळे जिवाला धोका नसतो, कॅन्सरसारखा कुठलाही गंभीर आजार उद्भवत नाही. तरीही राजीवी-दुगुमावशी-दामुअण्णांच्या डॉक्टरांनी कसून सगळे तपास करून घेतले आणि त्यानंतरच चिडचिडेपणाचं निदान केलं. शिवाय, ‘पोटदुखी न थांबता वाढतच गेली, झोपणं अशक्य झालं, कारणाशिवाय वजन घटतच गेलं, संडासात वारंवार रक्त पडलं, रक्ताच्या तपासात दिसलेला अॅनिमिया वाढत गेला, प्रचंड थकवा आला, टिकला, वाढत गेला, ताप आला, येतच राहिला तर ताबडतोब सांगा. तशी लक्षणं दिसली तर गंभीर आजार असू शकतो,’ अशी सक्त ताकीदच दिली.
यूके-बायोबँक या संस्थेने ऑक्सफर्ड विद्यापीठ, कॅरोलिन्स्का इन्स्टिटय़ूट यांच्यासारख्या जगभरातल्या अनेक मान्यवर संस्थांच्या सहकार्याने ५३४०० लोकांचा चार वर्ष अभ्यास केला. त्याच्यावरून आयबीएसची प्रवृत्ती आनुवंशिक असते हे समजलं.
का होतो तसा त्रास?
आपल्या मेंदूचं आणि पचनसंस्थेचं काम एकमेकांवर अवलंबून असतं. मेंदूत शंभर कोटी मज्जापेशी तर आपल्या पचनसंस्थेच्या भिंतीत पाच कोटी मज्जापेशी असतात. मेंदूचं बहुतेक कामकाज काही महत्त्वाची रसायनं आणि त्यांचे पेशींमधले कामसू दोस्त (रिसेप्टर्स) यांच्यामुळे चालतं. पचनसंस्थेच्या भिंतीतही तशा कामसू दोस्तांची रेलचेल असते. शिवाय आपल्या आतडय़ात एक कोटी-कोटी (एकावर चौदा शून्यं) जंतू कायम वस्तीला असतात. त्यांच्यातले काही जंतू ती महत्त्वाची रसायनं बनवतातही.
पोट आणि मेंदू या दोघांत सलोख्याचे संबंध असले तर दोघांचीही कामं सुरळीत चालतात. घास गिळल्यापासून त्याचं पचन होऊन उरलेला टाकाऊ भाग शरीराबाहेर जाईपर्यंत पचनसंस्थेच्या भिंतीची हालचाल योग्य गतीने होते. पण त्या दोघांत बेबनाव झाला तर तो सुरळीतपणा हरवतो. पोटाची इन्फेक्शन्स, कुठल्याही इन्फेक्शनसाठी घेतलेली अँटिबायोटिक्स, ऑपरेशनसाठी दिलेली वेदनाशामक औषधं, ऑफिसचं मोठं प्रोजेक्ट वेळेत संपवायला आठ-दहा दिवस एका जागी मारलेली बैठक, अरबट-चरबट खाण्याचा अतिरेक किंवा कुठल्याही कारणाने झालेला तीव्र मनस्ताप तसा बेबनाव घडवून आणायला पुरेसा असतो.
मग कधी आतडय़ांतला मल घाईघाईने खाली ढकलला जातो तर कधी तो पुढे सरकतच नाही. चिडचिडं आतडं जागोजागी पिळवटत राहातं. त्याच्यातल्या, एरवी भाज्या- फळां- कडधान्यांनी संतुष्ट होणाऱ्या जंतूंचंही डोकं फिरतं. ते तशा तंतुखाद्यांना तावातावाने आंबवतात, फसफसवतात. पोटात वारा धरतो. आतडय़ाच्या वाढलेल्या संवेदनशीलतेमुळे तशी बारीकसारीक गडबड प्रकर्षांने जाणवते, पोट दुखतं.त्या बेबनावाचा उलटा मेंदूवरही परिणाम होतो. पोटदुखीमुळे वाटणाऱ्या मरगळ- निरुत्साह- काळजीपेक्षाही अधिक चिंता- औदासीन्य- नैराश्य घेरून टाकतं. आयबीएसवर इलाज करताना त्या सगळय़ाचं भान ठेवावं लागतं. त्या सगळय़ा दुखण्यांवर मात करायची असते. शिवाय व्यक्ती तितक्या बेबनाव-रीती भिन्न असतात. सगळय़ांवर एकच रामबाण उपाय नसतो.
तात्पुरते जुलाब थांबवणारी (इमोडियम) किंवा बद्धकोष्ठ मोकळं करणारी(सेन्ना) औषधं निकडीला आहेतच. पण मेंदूतल्या पेशी, आतडय़ातल्या मज्जापेशी, जंतुसमुदाय आणि त्यांच्यातलं दळणवळण साधणारी रसायनं या सगळय़ांना शांतवून त्यांच्यात समन्वय साधावा लागतो. आतडय़ाचा उतावळेपणा (एल्यूक्साडोलीन सारखी) किंवा सुस्तपणा (टेगॅसेरॉड-प्रूव्हिक्ट सारखी) घटवायला वेगळी नवी औषधं असतात. नैराश्यावर, चिंतेवर उपाय करणारी काही औषधं (अॅमीट्रिप्टिलीनसारखी) मेंदूचं आतडय़ाशी सुसूत्र दळणवळण साधायलाही मदत करतात. जंतूंमधली बंडाळी मोडायला आतडय़ातच काम करणारी खास अँटिबायोटिक्स (रिफाक्सिमीन), तंतुखाद्यं (इसबगोल) असतात.
त्या उपायवैविध्यातून योग्य ते तीन-चार उपाय निवडायचे, ते एकजुटीने, निमूटपणे एकमेकांसोबत काम करतील का ते बघायचं, नाही तर नवे उपाय शोधायचे हे वेळखाऊ काम असतं. ते चालू असताना आजाऱ्याचा धीर सुटतो आणि तो डॉक्टर बदलतो. नव्या डॉक्टरकडे पुन्हा पहिल्यापासून सुरुवात होते. यापेक्षा चिकाटीने, सकारात्मकपणे सगळे पर्याय वापरून वाट शोधायला डॉक्टरांना सहकार्य करावं. त्यायोगे आयबीएस आटोक्यात आणणं जमतं.
खडतर बालपण, तरुणपणी सोसलेले अत्याचार, शिक्षणात-नोकरीधंद्यात आलेलं अपयश, जीवनातली मोठी दु:खद घटना, रोजच्या कामातले ताणतणाव अशासारख्या पार्श्वभूमीत तो चिडचिडेपणा रुजलेला असतो असं आंतरराष्ट्रीय अभ्यासांवरून कळलं. राजीवीचं दुखणं तिच्या प्रेमभंगानंतर सुरू झालं होतं. डॉक्टरांनी तिला औषधांच्या सोबत मानसोपचारही (कॉग्निटिव्ह बिहेविअरल थेरपी) दिले.
त्या तिघांनाही डॉक्टरांनी पथ्य सांगितलं. जंतूंची, रसायनांची मनधरणी करायला चहा- कॉफी- चॉकलेट वगैरे कॅफीनवाले पदार्थ वा लॅक्टोजवालं दूधदुभतं टाळायला, वेळेला चाराऐवजी दोनच घास खायला सांगितलं. दामुअण्णांना मद्यपान-धूम्रपान सोडायचा सल्ला दिला.आहारातले काही पदार्थ (फळांतली, दूधदुभत्यातली साखर, मध, गहू, फ्लॉवर- घेवडा- वाटाणा, सालीसकटची कडधान्यं, कांदा- लसूण, काजू- बदाम- पिस्ते) आतडय़ात पोहोचले की त्यांना आंबवून फसफसवायला जंतूंना चेव येतो. तसे सगळे पदार्थ त्या तिघांनी डॉक्टरांच्या देखरेखीखाली, सहा आठवडय़ांसाठी पूर्णपणे वज्र्य केले (लो फोडमॅप डाएट). कसलीही कमतरता न होता चिडचिडलेल्या आतडय़ाला विश्रांती मिळाली. त्यानंतरच्या आठ आठवडय़ांत सावकाशपणे एक-एक पदार्थ पुन्हा सुरू केला. प्रत्येकाला नेमक्या कुठल्या पदार्थानी खरंच त्रास होत होता ते समजलं. मग नेहमीच्या आहारात तेवढेच पदार्थ वज्र्य केले. त्रास टळला. आहारवैविध्य टिकवता आलं. त्या तपश्चर्येत क्षणिक मोहाला, लबाडीला माफी नव्हती. सारं मुसळ केरात गेलं असतं. खऱ्या गरजेसाठी घेतलेलं नवं औषधसुद्धा सगळं पुण्यसंचित लयाला नेऊ शकलं असतं.
तज्ज्ञ डॉक्टरांनी राजीवीला नैराश्यावर, पोटदुखीवर, जुलाबांवर लागू पडणारी औषधं तर दिलीच, पण जीवनशैली बदलायचा सल्लाही दिला. राजीवीने रात्री जागून टीव्ही बघणं बंद केलं. घरकाम उरकून रोज चार- पाच कि.मी. पायपीट आणि योग्य आहार हे आज्ञाधारकपणे पाळलं. भिन्नमती मुलांच्या शाळेत नोकरी धरली. मुलांच्या समस्यांत मन गुंतवलं. दादावहिनींना कौतुक वाटलं. घराचं वातावरणही बदललं. पोटाची कुरबुर पूर्ण थांबली नाही. पण बऱ्यापैकी सुसह्य झाली. दुगुमावशी नातीच्या लग्नात मिरवल्या. दामुअण्णा अमेरिकेला मुलाकडे पोहोचले. आणखी काय हवं?