रवींद्र माधव साठे
सावरकरांआधी टिळक व विवेकानंदांनी केली, तशी मुस्लीम मनोभूमिकेची चिकित्सा काँग्रेसने केली असती, तर..
भारतात स्वातंत्र्यपूर्व काळात राष्ट्रवादाच्या संदर्भात मुख्यत्वे तीन विचारप्रवाह पुढे आले. हिंदी राष्ट्रवाद, हिंदू राष्ट्रवाद आणि द्विराष्ट्रवाद. इंग्रजांविरुद्ध स्वातंत्र्य मिळविण्यासाठी काँग्रेसने सनदशीर लढा उभा केला. यात सर्व जाती-धर्माचा समावेश व्हावा म्हणून हिंदी राष्ट्रवादाची कल्पना जन्मास आली. हिंदी राष्ट्रवादाची कल्पना रम्य होती परंतु १९४७ साली देशाचे जेव्हा विभाजन झाले तेव्हाच हिंदी राष्ट्रवादाचा पराभव झाला होता. हिंदी राष्ट्रवादाच्या पराभवाचे विश्लेषण करताना तीन मुद्दे समोर येतात. (१) मुळात हिंदी राष्ट्रवाद हा स्वयंसिद्ध व तर्कशुद्ध नव्हता. त्यात हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन आदी भेदांना स्थान नव्हते. याचाच अर्थ असा की अखंड भारतात कुठल्याही प्रकारचे भेद नसलेला एकरस, एकसंध समाज मानणे. पण एकरस समाज आहे असे एकदा मानले तर तेथे अल्पसंख्यकत्वाला स्थान शिल्लक राहत नाही. पण प्रत्यक्षात तसे घडले नाही. (२) हिंदी राष्ट्रवादाची कल्पना भारताच्या अखंडत्वाशी म्हणजेच अखिल हिंदूशी संबंधित होती त्यामुळे १९४७ मध्ये अखंड हिंदूस्थानचे भारत व पाकिस्तान असे पडलेले खंड या राष्ट्रवादाचा पंगूपणा सिद्ध करतात. (३) भारत हे हिंदूराष्ट्र म्हणून स्वयंसिद्ध असताना, ब्रिटिश शिक्षण पद्धतीत शिकलेल्या काही धुरीणांनी भौगोलिक राष्ट्रवादाची कल्पना स्वीकारली व त्यांनी हिंदूराष्ट्राचे हिंदी राष्ट्रात रूपांतर केले.
इंग्रजी शिक्षणामुळे हिंदी राष्ट्रवादाच्या प्रभावाखाली जे लोक आले त्यांना ‘हिंदू’ या शब्दाबद्दल ‘अॅलर्जी’ वाटू लागली व हिंदू शब्द हा जातीय म्हणून संबोधला जाऊ लागला. वास्तविक पाहता ‘हिंदू’ हा शब्द भूमिवाचक व राष्ट्रवाचक आहे. अन्यथा या देशाला कोणी हिंदूस्थान म्हटले नसते. परदेशी व्यक्तीसुद्धा या देशातील रहिवाशांना प्राचीन काळापासून ‘हिंदू’ समजत आल्या आहेत. स्वातंत्र्यानंतरही हा क्रम सुरू राहिला. उदा. – दिल्लीच्या जामा मशिदीचे शाही इमाम मक्केला यात्रेसाठी गेले होते. तेथील स्थानिक माणसाने त्यांना विचारले, ‘आपण हिंदू आहात काय?’ या प्रश्नाने इमाम चकित झाले आणि ते म्हणाले, ‘नाही. मी मुस्लीम आहे.’ जेव्हा इमामांनी ‘मला तू हिंदू का म्हणतोस?’ असा प्रश्न विचारला तेव्हा तो माणूस म्हणाला, ‘सर्व हिंदूस्थानी लोकांना येथे हिंदू म्हटले जाते.’ (‘साप्ताहिक हिंदूस्थान’ : १ मे १९७७)
राष्ट्रवादाच्या संदर्भात काँग्रेसच्या नेतृत्वामध्ये वैचारिक गोंधळ होता. राष्ट्रीयत्व ही निराळी गोष्ट आहे आणि म्हणून तिचा विचार वेगवेगळय़ा पद्धतीने झाला पाहिजे; स्वातंत्र्य आणि राष्ट्रीयत्वाचा घोळ घालणे योग्य नाही, असे सावरकर म्हणत. ‘काँग्रेसने त्या काळी हे लक्षात घेतले नाही, की राष्ट्रवाद केवळ भौगोलिक असू शकत नाही, तर त्यासाठी एक संस्कृती, एक इतिहास, एक प्रवृत्ती आवश्यक असते. युरोपचा निरनिराळय़ा देशांचा इतिहास हेच सांगतो. पहिल्या महायुद्धानंतर झेकोस्लोवाकिया राज्य निर्माण करण्यात आले. पण अल्पावधीत ते फुटून सुडेटन जर्मन्स जर्मनीला मिळाले. आर्यलडचे उदाहरणही हाच सिद्धांत सांगते.’ (स्वा.सावरकर, हिंदू महासभा पर्व भाग १- १६६)
काँग्रेसच्या स्थापनेपासून दादाभाई, रानडे, गोखले, टिळक, गांधी या नेत्यांनी पुरस्कार केल्यामुळे हळूहळू हिंदी राष्ट्रवादाचा जनमानसावर प्रभाव वाढला. पण राष्ट्रवादात भूमिनिष्ठा व परंपरेविषयी आत्मीयता यांना प्राधान्य असते, हे काँग्रेसची नेते मंडळी मात्र विसरली. राष्ट्रवाद हिंदी झाला म्हणून या दोन गोष्टी टळत नाहीत. १२ नोव्हेंबर १८९७ ला लाहोर येथे स्वामी विवेकानंदांनी एक भाषण केले. त्यांच्या साहित्यात ते उपलब्ध आहे. ते म्हणतात ‘भारत हे असे राष्ट्र आहे जेथील व्यक्तींच्या हृदयाची स्पंदने एकाच आध्यात्मिक स्वराशी जुळतात.’ म्हणजेच नागरिकांचा एका भूमीवरचा निवास ही राष्ट्राची केवळ एकमात्र कसोटी होऊ शकत नाही.
लोकमान्य टिळकांनी गीतारहस्यात म्हटले आहे की, ‘ज्या समाजातील घटकांना आत्मौपम्य बुद्धीचे तत्त्व मान्य नाही आणि म्हणून ते अन्य धर्मीय व्यक्तींना कस्पटासमान लेखतात, त्यांना वाईट वागणूक देतात त्यांच्याशी आपण कसे वागावे?’ वेगळय़ा शब्दांत लोकमान्य सुचवतात की त्यांच्याशी वागताना जशास तसे वागावे. लोकमान्यांनी या विधानातून मुस्लीम मानसिकतेचे योग्य विश्लेषण केले होते.
स्वामी विवेकानंदांनी लोकमान्यांपेक्षा अधिक नि:संदिग्ध शब्दांत इस्लाम व ख्रिस्ती धर्माचा उल्लेख केला आहे. ते म्हणतात, ‘या दोन्ही पंथांचा वैश्विक बंधुतेविषयीचा दावा हा वाचिक म्हणजे फोल आहे. कारण हे दोन्ही पंथ इतर पंथांना वधार्ह मानतात.’
ज. द. जोगळेकर हे राष्ट्रवादाचे गाढे अभ्यासक होते. ते लिहितात, ‘राष्ट्रवादातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे भूमिनिष्ठा. आंतरराष्ट्रीय सांप्रदायिक निष्ठा नि भूमिनिष्ठा यांत संघर्ष आल्यास काही गटांची निष्ठा कोठे जाईल? ‘हिंदू’ऐवजी ‘हिंदी’, ‘भारतीय’ किंवा ‘इंडियन’ हे शब्द राष्ट्रवादाबरोबर लावले म्हणून त्यांचा आशय बदलत नाही. पण ही गोष्ट हिंदी राष्ट्रवाद्यांना कधीच उमजली नाही. ‘हिंदू राष्ट्र’ या शब्दांऐवजी ‘हिंदी राष्ट्र’ या शब्दांचा वापर केल्याने समान परंपरेचा अभिमान, समान इतिहासाविषयी अभिमान, नि देशावरची निष्ठा या राष्ट्रवादातील अत्यावश्यक घटकांना कसे टाळता येईल? राष्ट्रीय भावना समाजात प्रदीप्त करावयाची असेल तर या घटकांचे साहाय्य घ्यावे लागेल. (हिंदूत्व, भारतीयत्व नि निधर्मी शासन – ज. द. जोगळेकर, पृष्ठ ४५)
लोकमान्य टिळक यांनाही हिंदू-मुस्लीम ऐक्य अपेक्षित होते परंतु त्यांनी सरफराझ मोहम्मद यांस जे पत्र लिहिले त्यात ते म्हणतात ‘हिंदू आणि मुस्लीम यांची एकी व्हावी अशी माझी इच्छा आहे परंतु त्यासाठी वैदिक मेंदू आणि इस्लामी शरीर याची साम्यजोड व्हायला हवी.’
स्वा. सावरकरांनी हिंदी राष्ट्रवादात मुस्लीम मनापासून सहभागी झाले नाहीत, याची ऐतिहासिक कारणे दिली आहेत. (१) मुस्लिमांना असे वाटले की, काँग्रेसने पुरस्कारलेला हिंदी राष्ट्रवाद त्यांची वांशिक, धार्मिक नि सांस्कृतिक महत्त्वाकांक्षा ज्यात आहे त्या मुस्लीम राष्ट्रवादाला उखडून टाकणार. (२) ख्रिश्चन, ज्यू हे समाज किताबी आहेत. म्हणजे त्यांचे धर्मग्रंथ काही प्रमाणात मुस्लिमांच्या धर्मग्रंथांसारखे आहेत. हिंदू त्या वर्गात बसत नसल्याने ते सर्वात निंद्य आहेत. (३) हिंदूस्तानकडे ते स्वदेश किंवा स्वराष्ट्र या दृष्टीने पाहत नाहीत. ही भूमी परकीय दाल-उल- हरब आहे. ती दार-उल-इस्लाम नाही.
सावरकरांनी हिंदी राष्ट्रवाद अयशस्वी होण्यात मुस्लिमांची भूमिका कशी कारणीभूत आहे याचे वरील प्रकारचे विवेचन करताना एका महत्त्वाच्या ऐतिहासिक परिस्थितीचा उल्लेख केला आहे. ते म्हणतात, ‘सगळा मुस्लीम समाज आणि विशेषत: हिंदूस्थानातील मुस्लीम आत्यंतिक धर्मनिष्ठेच्या ऐतिहासिक टप्प्यांतून व धर्माधिष्ठित शासनाच्या कल्पनेतून बाहेर पडले नाहीत,’ (समग्र सावरकर वाङ्मय, खंड-६, पृष्ठ ३११)
हमीद दलवाई यांनी ‘मुस्लीम पॉलिटिक्स इन इंडिया’ हे पुस्तक लिहिले. त्यात त्यांनी मुस्लिमांची राष्ट्रनिष्ठा का विवाद्य ठरते, याचे विश्लेषण केले आहे.
युरोपमध्ये राजकारण आणि संप्रदाय यामध्ये पूर्ण फारकत झाल्याने ख्रिस्ती समाजावर परिणाम झाला, परंतु इस्लाममध्ये संप्रदाय आणि राजकारण या जीवनाच्या दोन अविभाज्य बाजू आहेत. इस्लामी जगतात तुर्कस्तान आणि इजिप्त हे देश सोडले तर संप्रदायाचे ‘डिपॉलिटायझेशन’ झाले नाही. हिंदूंना हिंदी करण्यात काँग्रेस नेतृत्वाला अडचणी आल्या नाहीत कारण सहजीवन, साहचर्य व सहअस्तित्व ही हिंदू समाजाची वैशिष्टय़े आहेत. परंतु मुस्लिमांनी हिंदी व्हावे, यासाठी मुस्लीम नेतृत्वाकडून अशा प्रकारचे कष्ट कोणीही घेतले नाहीत. काँग्रेस नेतृत्वाने तसे स्पष्टपणे सांगितलेही नाही. मुस्लीम समाजातील एक नेते एम. एस. फोसिल हे मात्र याला अपवाद होते, पण अशा अपवादांचे प्रमाण तुरळकच!
१९३० मध्ये कूर्ग येथे मुस्लीम परिषद झाली. त्यात एम. एस. फोसिल यांनी मुस्लीम समाजास १०० टक्के हिंदी होण्याचे आवाहन केले होते. ‘हिंदूस्तान ही हिंदूंप्रमाणेच आपलीही मातृभूमी आहे’, असे मुस्लिमांना उद्देशून म्हटले होते. परंतु त्यांचे आवाहन निष्फळ ठरले.
एकीकडे मुस्लिमांच्या राजकारणाची व त्यांच्या मनोभूमिकेची तत्कालीन काँगेस नेतृत्वाने कधीच मीमांसा केली नाही व दुसरीकडे इंग्रजांनी मुस्लिमांच्या पृथक वृत्तीस खतपाणी घातले व त्यांना हिंदूंपासून वेगळे ठेवण्याचा नेहमी प्रयत्न केला. त्यामुळे हिंदी राष्ट्रवाद हे मृगजळ ठरले.
२४ जानेवारी १९४८ रोजी तत्कालीन पंतप्रधान पं. नेहरू अलीगड मुस्लीम विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभास उपस्थित होते. त्या वेळी त्यांनी मुस्लीम विद्यार्थ्यांपुढे भाषण केले. ते म्हणतात, ‘भारताला बौद्धिक आणि सांस्कृतिक श्रेष्ठत्व मिळवून देणाऱ्या आपल्या पूर्वजांविषयी व आपल्याला मिळालेल्या वारशाविषयी मला अभिमान वाटतो हे मी आपणास सांगितले. तुम्हाला या भूतकाळाविषयी काय वाटते? तुम्ही याचे भागीदार आणि वारसदार आहात असे तुम्हाला वाटते का? माझ्याप्रमाणे हा भूतकाळ आपलाही आहे, असे वाटून त्याविषयी आपल्याला अभिमान वाटतो का? का हा इतिहास तुम्हाला परकीय वाटतो आणि त्याचे आकलन होत नाही? महान संपत्तीचे आपण विश्वस्त आणि वारसदार आहोत या विचाराने जे स्फुरण येते, ते न येता आपण पुढे निघून जाता का?’ पं. नेहरूंना उशिराने का होईना, ही जशी उपरती झाली तशीच इतर काँगेस नेत्यांना स्वातंत्र्यपूर्व काळात झाली असती तर कदाचित या देशात वेगळे चित्र दिसले असते.
लेखक रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे महासंचालक आणि सावरकर दर्शन प्रतिष्ठानचे सचिव आहेत.
ravisathe64@gmail.com