रवींद्र माधव साठे

मुस्लीम हा पृथक समाज आहे आणि त्याचे स्वतंत्र राष्ट्र निर्माण झाले पाहिजे, ही मागणी काँग्रेसने स्वीकारली. हिंदी राष्ट्रवादाचा नवविचार या भूमीत रुजला नाही, तो त्यामुळेच!

prime minister narendra modi dedicates two frontline naval warships and submarine to the nation
आत्मनिर्भरतेने भारत सागरी शक्ती ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन, दोन युद्धनौका, एका पाणबुडीचे लोकार्पण
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
MVA rift grows as Shiv Sena ubt announces independent poll strategy
महाविकास आघाडीत धुसफुस; शिवसेनेच्या स्वबळाच्या नाऱ्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादीचीही स्वतंत्र लढण्याची तयारी
This is nation of Hindus their interests come first says Nitesh Rane
हे हिंदूंचे राष्ट्र, त्यांचे हित प्रथम – नितेश राणे
What Omar Abdullah Said?
India Alliance “..तर इंडिया आघाडी बंद करा”; ओमर अब्दुल्लांंचं वक्तव्य, आघाडीत वादाच्या ठिणग्या का पडत आहेत?
Image Of Zeenat Tigress
‘झीनत’मुळे का सुरू आहे पश्चिम बंगाल-ओडिशामध्ये वाद? एका वाघीणीमुळे दोन राज्यांमध्ये राजकीय तणाव!
Bandra Bharatnagar sra action
Mumbai : “अदाणी समूहाला पैशांनी…”, मुंबईतल्या वांद्रे भागात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा पाडकामाविरोधात जोरदार राडा
Former Chief Minister Prithviraj Chavan regrets the misinformation spread about Dr Manmohan Singh
डॉ. मनमोहन सिंग यांच्याबाबत अपप्रचार; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची खंत

चौदाव्या आणि पंधराव्या शतकांत इंग्लंड आणि फ्रान्समध्ये एक प्रदीर्घ संघर्ष झाला. तो ‘हंड्रेड इअर्स वॉर’ या नावाने प्रसिद्ध आहे. या संघर्षांमुळे या दोन देशांना राष्ट्र म्हणून आकार मिळाला. या उदाहरणांचा इतर युरोपीय समाजांवर अप्रत्यक्ष परिणाम झाला. पुढे १७८९ मध्ये फ्रेंच राज्यक्रांती होऊन राष्ट्रवादाला बळकटी मिळाली. १९ व्या शतकात युरोपातील अनेक समाज राष्ट्रपदी आरूढ होण्याच्या प्रयत्नांत होते. भौगोलिकदृष्टय़ा इटली १८६१ मध्ये जवळजवळ एकात्म झाला. जर्मनी १८७१मध्ये एकसंघ राष्ट्र म्हणून उभा राहिला.

युरोपातल्या राष्ट्रनिर्मितीच्या या प्रक्रियेचा आपल्या हिंदी नेतृत्वाच्या मनावर परिणाम झाला. त्यातूनच हिंदी राष्ट्रवादाच्या विचारसरणीने आकार घेतला. हिंदी लोकांच्या राजकीय आकांक्षा व्यक्त करण्याचे व्यासपीठ म्हणून काँग्रेसची स्थापना झाली. राजकीय अधिकाराची मागणी एकमुखी असावी म्हणून हिंदी राष्ट्रवादाची विचारधारा निर्मिली गेली. काँग्रेसने स्वराज्यापूर्वी स्वीकारलेल्या हिंदी राष्ट्रवादाची पार्श्वभूमी ही अशी.

१८५७ च्या स्वातंत्र्यसमरात इंग्रजांचे भारतातील राज्य शस्त्रबळावर नष्ट करण्याचा प्रयत्न झाला. त्यात अपयश आले. कारण इंग्रजांकडे लांब पल्ल्याची शस्त्रे, दळणवळणाची आधुनिक साधने व अद्ययावत शासनयंत्रणा होती. पुन्हा सैनिकी उठावाची शक्यता नजीकच्या काळात संपली होती. सनदशीर चळवळीशिवाय दुसरा मार्ग उरला नव्हता. राजकीय मागण्या व गाऱ्हाण्यांना तोंड फोडण्यासाठी घटनात्मक चळवळ म्हणून १८८५ मध्ये काँग्रेसची स्थापना झाली. मुंबईत काँग्रेसचे पहिले अधिवेशन झाले. त्यात हिंदी राष्ट्रवादाचा संकल्प सोडण्यात आला. ब्रिटिश सरकार धूर्त असल्यामुळे काँग्रेस अधिवेशनात पुढे आलेल्या राजकीय मागण्या या समाजातील मूठभर लोकांच्या आहेत, अशी सबब ब्रिटिश सांगतील हे निश्चित होते. ब्रिटिशांनी भारत हे राष्ट्र नाही असाही सिद्धांत शिक्षण पद्धतीतून मांडला होताच. या दोन्ही मुद्दय़ांचा विचार करून सर्वसमावेशक राष्ट्रवाद मांडण्याची कल्पना पुढे आली आणि त्यातून आपण सर्व जण हिंदी-इंडियन आहोत या कल्पनेचा उगम झाला.

न्यायमूर्ती रानडे यांनी राष्ट्रवादाची विचारप्रणाली मोजक्या शब्दांत प्रथम मांडली. ते म्हणतात : ‘उद्याच्या हिंदी राष्ट्रात कुठल्याही प्रकारच्या वंश, धर्म वा वर्णभेदाला स्थान असणार नाही. आम्ही सर्व स्वत:ला हिंदी समजतो आणि चिरकाल असेच समजणार. इतके दिवस हे ज्ञान आम्हास न झाल्याने आम्ही एक संघटित हिंदी राष्ट्र निर्माण करू शकलो नाही.’ (न. र. फाटक: न्या. रानडे यांचे चरित्र – पृ. ५९१) न्या. रानडे यांनी ‘हिंदी समाज’ या नवीन कल्पनेच्या आवश्यकतेची मीमांसा केली व तिला प्रतिष्ठा मिळवून दिली. याचा परिणाम काँग्रेसच्या नेत्यांच्या मनावर किती खोल झाला याचे प्रतििबब ना. गोखले यांच्या १९०५ च्या भाषणातून दिसते. ते म्हणाले, ‘समान परंपरा, समान अडचणी, समान इच्छा आणि आकांक्षा यांच्या पायावर आधारलेल्या एकराष्ट्रीयत्वाच्या जाणिवेची गेल्या ५० वर्षांत झालेली वाढ मोठी लक्षणीय आहे. आपण सर्वप्रथम हिंदी-इंडियन- आहोत आणि नंतर हिंदू, मुस्लीम, पारसी, ख्रिस्ती आहोत याची जाणीव वाढत्या प्रमाणात होत आहे. एकात्म व नवस्वरूपाचा हिंदूस्थान जगातील राष्ट्रमालिकेत त्याच्या पूर्वपरंपरेला शोभेल असे स्थान घेण्यासाठी प्रयत्नशील झाला आहे.’ (‘ब्रिटिश पॅरॅमाउंट्सी अँड इंडियन रेनेसान्स’, भाग २ पृ. ४९५ )

१८९९ मध्ये लखनौ येथे ‘इंडियन नॅशनल सोशल कॉन्फरन्स’ भरली होती त्यात न्या. रानडे यांनी भाषण केले, त्याचे शीर्षकच होते, ‘मी हिंदू नाही वा मुसलमानही नाही.’ इंग्रजी शिक्षण घेतलेल्या हिंदू समाजातील मंडळींना हा विचार आकर्षक वाटला. जसे ब्रिटिशांचे ब्रिटन तसा हिंदी लोकांचा हिंदूस्थान. ‘हिंदी राष्ट्र’ या कल्पनेत काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत पसरलेल्या भूमीत  सर्व जातींचा समावेश अभिप्रेत आहे. या राष्ट्र कल्पनेत भिन्न-भिन्न जातींनी आपले पृथक अहंकार सोडले आहेत आणि त्या हिंदी राष्ट्रीय जीवनाच्या प्रवाहात मिसळून गेल्या आहेत, असे गृहीत धरावे लागते. परंतु प्रत्यक्षात असे घडले नाही, हे ऐतिहासिक सत्य आहे. हिंदू समाज मूळात आध्यात्मिक असल्यामुळे त्याने हिंदी राष्ट्रवाद स्वीकारला. परंतु हिंदू समाजाने ज्या दिवशी तो स्वीकारला त्या दिवशी त्याचे सामूहिक व सार्वत्रिक राजकीय धर्मातर झाले. काँग्रेसची हिंदित्वाची  व्याख्या व कल्पना भाबडी असून मुस्लीम समाज यात कधीच सहभागी होणार नाही, असा विचार सावरकरांनी प्रथम मांडला होता.

प्रारंभापासून काँग्रेसने ज्या हिंदी राष्ट्रवादाचा पुरस्कार केला होता, त्या विचारप्रणालीला विरोध केला तो अलीगड मुस्लीम युनिव्हर्सिटीचे संस्थापक सर सय्यद अहमद यांनी. बद्रुद्दिन तय्यबजींना सन १८८८ मध्ये लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात, ‘नॅशनल काँग्रेस या शब्दांचा अर्थ मला समजत नाही. हिंदूस्थानात राहणाऱ्या भिन्न जाती किंवा संप्रदायी समाज यांचे एक राष्ट्र आहे किंवा त्यांचे एक राष्ट्र होईल आणि त्यांचे उद्देश आणि आकांक्षा एकच आहेत असे समजावयाचे का? मला हे अशक्य वाटते, त्यामुळे नॅशनल काँग्रेससारखी गोष्ट असू शकत नाही किंवा सर्व लोकांना तिचा सारखाच उपयोग होणार नाही. या संस्थेचे कार्य हिंदूस्थानच्या भल्यासाठी आहे असे तुम्हाला वाटते. पण तिचे कार्य आपल्या समाजाच्या हिताविरुद्ध आहे; इतकेच नाही तर देशाच्याही हिताच्या विरुद्ध आहे. हिंदूस्थान एक राष्ट्र आहे, अशी भूमिका घेणाऱ्या काँग्रेसला मग तिचे स्वरूप काहीही असो, माझा विरोध आहे.’ (‘सोर्स मटिरिअल फॉर ए हिस्टरी ऑफ द फ्रीडम मूव्हमेंट इन इंडिया’, खंड २ पृ. ७१ गव्हर्नमेंट ऑफ बाम्बे)

१८८८ मध्ये पुन्हा मेरठ येथे सर सय्यद अहमदखान यांनी भाषण केले. ते म्हणतात ‘हिंदू आणि मुस्लीम ही दोन स्वतंत्र आणि युद्धमान राष्ट्रे आहेत. त्यांचे सहजीवन अशक्य आहे. ब्रिटिश येथून निघून गेल्यानंतर सत्ता कोणाच्या हातात देणार हे निश्चित होत नाही तोपर्यंत काँग्रेसच्या स्वातंत्र्यलढय़ाला मुस्लीम समर्थन देणार नाहीत.’ खरे म्हणजे द्विराष्ट्रवादाचे सर सय्यद अहमदखान हे जनक. परंतु स्वा. सावरकरांवर द्विराष्ट्रवादाचा चुकीचा आरोप केला जातो. १८८८ मध्ये सर सय्यद यांनी द्विराष्ट्रवादाची भूमिका मांडली त्या वेळी सावरकर अवघे पाच वर्षांचे होते. सर सय्यद अहमदखान यांच्या विचारांवर कोणाही काँग्रेस नेत्याने आत्मचिंतन केले नाही. वस्तुत: हिंदी राष्ट्रवादाच्या पराभवाची आणि पाकिस्तान निर्मितीची बीजे त्यातच रुजली होती.

काँग्रेसने मांडलेल्या हिंदी राष्ट्रवादाची कल्पना रम्य होती. दादाभाई नवरोजी, ना. गोखले, टिळक आदी मान्यवर मंडळंनाही या संकल्पनेचा मोह होणे स्वाभाविक होते. तैयबजी, मझरूल हक्क, डॉ. सुऱ्हावर्दी यांच्यासारखे मुस्लीम नेते काँग्रेसच्या हिंदी राष्ट्रवादाच्या मागे उभे राहिले. परंतु बहुसंख्य मुस्लीम नेत्यांनी काँग्रेसला साथ दिली नाही. अशाही स्थितीत त्या काळी रानडे, टिळक, गोखले, गांधी प्रभृतींना असे वाटत राहिले की पुढील काळात मुस्लीम समाज आपली भूमिका बदलेल व हिंदी राष्ट्रवादात ते सहभागी होतील, पण प्रत्यक्षात ते घडलेच नाही.

लोकमान्य टिळक हयात असताना हिंदू-मुस्लीम ऐक्य हा प्रयोग होता. यातूनच १९१६ साली लखनौ करार झाला. लोकमान्यांनी त्याला मान्यता जरूर दिली होती परंतु त्याआधी १८९३-९४ मध्ये हिंदूंमध्ये जागृती आणण्यासाठी लोकमान्यांनी शिवजयंती व गणेशोत्सव हे सार्वजनिकरीत्या साजरे करण्यास सुरुवात केली होती, हेही आपण विसरून चालणार नाही. १९२० नंतर मात्र हिंदू-मुस्लीम ऐक्याच्या प्रयोगाऐवजी हिंदू-मुस्लीम ऐक्य हे काँग्रेस नेतृत्वाचे ध्येय झाले. राष्ट्राविषयी भ्रांत संकल्पना पुढे आल्या. स्वातंत्र्याचे अग्रक्रम बदलले. मुस्लीम अनुनय सुरू झाला. मुस्लीम हा पृथक समाज आहे आणि त्यांचे स्वतंत्र राष्ट्र निर्माण झाले पाहिजे ही मागणी काँग्रेसने जेव्हा स्वीकारली तेव्हाच, हिंदी राष्ट्रवादाचा नवविचार या भूमीत रूजला नाही, याची कबुली दिली गेली.

मुस्लीम लीगची १९०६ साली स्थापना झाली. केवळ मुस्लिमांचा राजकीय पक्ष सुरू झाला व त्यांच्यासाठी स्वतंत्र मतदारसंघांची मागणी करण्यात आली. लखनौ करार (१९१६), देशबाह्य निष्ठा असलेल्या खिलाफत आंदोलनास काँग्रेसचे समर्थन (१९२१), वंदे-मातरम् ची काट-छाट, हिंदी ऐवजी उर्दू मिश्रित हिंदूस्थानी भाषेचा स्वीकार या सर्व मुस्लीम अनुनयाच्या घटना पुढील काळात घडत गेल्या. १९४० साली स्वतंत्र पाकिस्तानचा ठराव होऊन १९४७ साली भारताचे विभाजनही झाले हा देशाचा इतिहास आहे.

काही अपवाद वगळता हिंदूस्थानातील बहुसंख्य मुस्लिमांनी काँग्रेसप्रणीत हिंदी राष्ट्रवादाचा पाठपुरावा केला नाही. आपण मुस्लीम आहोत ही जाणीव त्यांनी सोडली नाही. हिंदी राष्ट्रीयत्वाच्या प्रवाहात ते मिसळून गेले नाहीत. तेव्हाच हिंदी राष्ट्रवादाचा प्रयोग फसला होता. स्वा. सावरकरांनी काँग्रेसच्या हिंदी राष्ट्रवादाच्या पराभवाची उत्तम मीमांसा केली. ते म्हणतात ‘सर्वसामान्य हिंदूंनी काँग्रेसला मोठय़ा उत्साहाने पाठिंबा दिला व प्रादेशिक राष्ट्रवादाच्या तत्त्वांना संपूर्ण निष्ठा अर्पण केली. परंतु मुस्लिमांना आकर्षित करण्यात  या तत्त्वाला यश आले नाही. हिंदू हे हिंदी झाले व मुस्लीम हे पूर्वीपासून अखेपर्यंत मुस्लीम राहिले, ते कधीही मनाने हिंदी झाले नाहीत.

लेखक रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे महासंचालक आणि सावरकर दर्शन प्रतिष्ठानचे सचिव आहेत.  

ravisathe64@gmail.com

Story img Loader