वर्गात गणितासारखा विषयही अतिशय रंजकपणे शिकवणाऱ्या अध्यापिका म्हणून मालिनीबाई राजूरकर नक्कीच विद्यार्थीप्रिय ठरल्या असत्या. कदाचित मालिनीबाईंनाही ते आवडणे शक्य होते, पण त्यामुळे भारतीय अभिजात संगीताचे फार मोठे नुकसान झाले असते! संगीतात एक अतिशय सुरेल आणि दमदार कलावती म्हणून अधिराज्य गाजवले खरे, त्या स्वत: मात्र संगीताच्या स्वरसप्तकातच रममाण राहिल्या. संगीतात, त्यातही अभिजात संगीताच्या क्षेत्रात कलावंत म्हणून रसिकमान्यता मिळणे ही किती अवघड गोष्ट असते, याचा प्रत्यय या देशातील हजारो कलावंतांना सतत येत असतो. मात्र कलावंत म्हणून नावारूपाला आल्यानंतर याच कलावंतांचे जे ‘नखरे’ सुरू होतात, तेही आता सर्वाच्या अंगवळणी पडू लागले आहेत.
संगीतातील कलावंतांना ‘सेलिब्रिटी’ची ओळख मिळण्याचा काळ सुरू होण्यापूर्वीच मालिनीबाई रसिकांच्या मनात पोहोचलेल्या होत्या. वर्गात गणित शिकवता शिकवता फळा स्वच्छ पुसून थेट रंगमंचावर येऊन आपल्या स्वच्छ, खुल्या आणि आकारयुक्त सुरेल स्वरांनी मैफलीला सुरुवात करावी आणि वर्गातल्या मुलांप्रमाणेच समोर बसलेल्या हजारोंच्या मनाचा क्षणात ताबा घ्यावा, असे आक्रीत त्यांच्या प्रत्येक मैफलीत अनुभवायला मिळत असे. इतका साधेपणा आणि तेवढाच नम्रपणा, त्यात आपल्या संगीतसाधनेसाठीच्या खडतर तपश्चर्येचा लवलेशही असू नये, हे मालिनीबाईंचे स्वभावविशेष. ते तसेच त्यांच्या गायनात मात्र उमटत नाहीत. स्वराला लडिवाळपणे कुरवाळत असतानाच, त्यातील आक्रमकतेला सर्व सामर्थ्यांनिशी भिडण्याची कलात्मकता त्यांच्या गायनात सतत लक्षात येते. ज्या ग्वाल्हेर घराण्याची पताका त्या आयुष्यभर खांद्यावर घेऊन फडकवत राहिल्या, त्या घराण्यातील सगळय़ा गुणवैशिष्टय़ांची ओळख त्यांना करून दिली वसंतराव राजूरकर यांनी.
हेही वाचा >>> अन्वयार्थ: पुंडांच्या आघाडीत..
राजस्थानात बालपण गेलेल्या मालिनीबाईंनी गणित विषयात पदवी मिळवल्यानंतर त्याच विषयाचे अध्यापनही अल्पकाळ केले. त्याच वेळी संगीतासाठीची शिष्यवृत्ती मिळाल्यामुळे त्यांनी वसंतरावांकडे गायन शिकायला सुरुवात केली. पुढे त्यांच्याशीच विवाह झाला आणि संगीत हेच जीवनध्येय झाले. भारतीय अभिजात संगीताची गंगोत्री मानल्या जाणाऱ्या ग्वाल्हेर घराण्याच्या गायकीची सारी वैशिष्टय़े आत्मसात करता करता त्यामध्ये स्वप्रतिभेच्या सर्जनाची जोड देण्यासाठी मालिनीबाईंनी ग्वाल्हेरच्या गायकीतील प्रासादिकता सांभाळली, मात्र त्याला भावाच्या अभिव्यक्तीची सुरेख जोड दिली. समजायला सोपी आणि त्यामुळे श्रोत्यांचे हमखास रंजन करणारी ही गायकी पेचदार करत त्यामध्ये तानांचे नवनवे प्रयोग त्यांनी केले. त्यामुळे जोरकसपणा आणि मृदुता यांचा एक सुरेख संगम त्यांच्या गायनात प्रतीत होत गेला. ख्याल गायनातील सर्व अंगांना (आलाप, बाल आलाप, बोल बढत..) न्याय देत मालिनीबाई राग सादर करत. त्यातील त्यांचे वेगळेपण असे की, त्यामध्येही त्यांची स्वत:ची उपज आणि त्यामागील सांगीतिक विचाराचे देखणे दर्शन होत असे. पंधराव्या शतकात राजा मानसिंह तोमर यांच्या काळात संगीतकलेचा मोठा विस्तार झाला. धृपद गायनातून ख्याल गायकीकडे आणि त्यातील नव्या सौंदर्य तत्त्वाकडे याच घराण्याने लक्ष दिले.
हेही वाचा >>> अन्वयार्थ: पर्यावरण- दुर्लक्षाची कबुली..
नथ्थन पीरबक्ष, हद्दू-हस्सू खाँ यांनी घराण्याच्या शैलीचा प्रारंभ करून ती विकसित केली. तेथपासून आजपर्यंत ही गायकी भारतीय संगीतात सतत प्रवाही राहिली आहे. मालिनीबाईंचे वैशिष्टय़ असे की, त्यांनी या घराण्याच्या शैलीचा केंद्रबिंदू जराही ढळू न देता, त्यामध्ये नवनवीन प्रयोग केले. त्यामध्ये अधिक रंजकता आणण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या आधीच्या अनेक दिग्गज कलावंतांनी नेमके हेच केले म्हणून हे घराणे काळाच्या कसोटीवरही टिकू शकले. पंडित कुमार गंधर्व हे त्याचे अतिशय महत्त्वाचे आणि बिनीचे कलावंत. मालिनीबाईंनी आपल्या गायनात ख्याल गायनाबरोबरच टप्पा आणि तराणा या संगीतप्रकारांवर कमालीची हुकुमत मिळवली. त्यांचा टप्पा रसिकांच्या मनात स्वरलयीचे सुंदर कारंजे निर्माण करतो. याचे कारण, त्यात लयीशी केलेला प्रेमळ संवाद जसा आहे, तसा स्वरांचा लगाव आणि त्यातून व्यक्त होणाऱ्या ध्वनींचे अप्रतिम नक्षीकाम यांचे मनोज्ञ दर्शन होते. त्यातील चपळता जशी रसिकांना भुरळ घालते, तेवढीच त्यातील छोटी पण अतिशय दमदार स्वरवाक्येही लक्षवेधी ठरतात. टप्पा हा गायनप्रकार गायनासाठी अतिशय अवघड समजला जातो. मालिनीबाई तो सादर करतात, तेव्हा त्यातील सौंदर्याचीच अशी काही भुरळ पडते की, त्यातील अवघडपणा लक्षातच येत नाही. हीच गोष्ट तराण्याची. समग्र गायन म्हणून ग्वाल्हेर गायकीचे नेतृत्व त्यांनी केले. घराण्याची लोकप्रियता उंचावत नेली. त्यांच्या निधनाने संगीतामधील एक ‘टप्पा’च थांबला आहे!