भारताचा पहिला नकाशा जेम्स रेनेल यांनी १७८३ मध्ये प्रकाशित केला. त्यापूर्वी भारतात काढलेला, भारताच्या कोणत्याही भूभागाचा, गावाचा, नदीचा किंवा कोणताही नकाशा अजून तरी उपलब्ध झालेला नाही.
भूगोलाच्या इतिहासाचा फेरफटका आज समारोपाच्या टप्प्यावर आहे. कथा, कादंबऱ्या, चरित्रे, कविता इ. वाचताना माणूस देहभान विसरतो. भूगोल व विज्ञानाचा अभ्यास करतानाही कथा कादंबरीसारखी रोमांचित अवस्था येते. विश्वनिर्मिती, कृष्णविवर, प्लेट टॅक्टोनिक्स, मान्सून, एल निनो इ. संकल्पना व सिद्धांतातून मी दिव्य ज्ञानप्राप्तीचा आनंदस्पर्श अनेकदा अनुभवला आहे. त्यामुळे शास्त्रज्ञ व भूगोल संशोधक हे मला ज्ञानाचा साक्षात्कारी अनुभव संक्रमित करणारे महापुरुष वाटतात. त्या असंख्य ज्ञात अज्ञात संशोधकांचे आपण काही देणे लागतो ही माझ्या मनात बालपणापासून रुजलेली भावना आहे. ‘भूगोलाचा इतिहास’ या लेखनामागे ही एक महत्त्वाची प्रेरणा आहे.
३३ वर्षे भूगोलाचे अध्यापन करताना या विषयाचे मानवी जीवनातील असाधारण स्थान व महत्त्व मला उलगडत गेले. तसेच या जीवनकेंद्री विषयाची आपण केलेली उपेक्षा व दुर्लक्षही जाणवत गेली. या उपेक्षेलाही हजारो वर्षांचा इतिहास आहे. भारताचा पहिला नकाशा जेम्स रेनेल यांनी १७८३ मध्ये प्रकाशित केला. त्यापूर्वी भारतात काढलेला, भारताच्या कोणत्याही भूभागाचा, गावाचा, नदीचा किंवा कोणताही नकाशा अजून तरी उपलब्ध झालेला नाही. सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीच्या ‘पेरिप्लस ऑफ दि एरिथ्रीयन सी’ या ग्रीक नोंदवहीत भारतातील अनेक गावांची स्थाने व त्यांची अंतरे दिली आहेत. ११ व्या शतकातील अलबेरुनीनीही भारताची अशी भौगोलिक माहिती दिली आहे. पण भारतातील गावांचे, पर्वतांचे, स्थान अंतरे, नद्या, शिखरे, त्यांची उंची इ. भौगोलिक माहिती देणारा १८ व्या शतकापूर्वीचा भारतीय ग्रंथ अजून तरी उपलब्ध नाही.
हेही वाचा >>> बुकमार्क : वाचनविश्वातील मुशाफिरी…
खगोलशास्त्र, नकाशे, भूशास्त्र, हवामान व लोकजीवन इ. चा वेगवेगळा अभ्यास जगात प्राचीन काळापासून चालू आहे. युद्धे व भूप्रदेश जिंकण्यासाठी, तो ताब्यात ठेवण्यासाठी आणि तेथील व्यापार व बाजारपेठ यावर ताबा मिळवण्यासाठी लोकजीवन व साधन संपत्ती यांचा अभ्यास निर्णायक ठरू लागला. अलेक्झांडर तर मोहिमेवर जाताना इतिहासकार, भूगोलतज्ज्ञ व नकाशाकारही घेऊन फिरत असे. पुढे इतर राजेही तसे करू लागले. अशा प्रकारे भूगोल विषयाचे महत्त्व वाढू लागले. मात्र भूगोलाला विषय म्हणून स्वतंत्र व अधिकृत स्थान देण्याचे श्रेय नेपोलियनला जाते. त्याने सोर्बोन विद्यापीठात भूगोलाचे स्वतंत्र अध्यासन स्थापन केले. त्यानंतर युरोपातील इतर देशांनीही विद्यापीठातून भूगोल हा विषय सुरू केला. जिंकलेल्या भूप्रदेशाचा सर्व्हे, नकाशे वगैरेसाठी विशेष मोहिमा व प्रकल्प घेण्यात येऊ लागले. अर्थात त्यामागे तेथील साधन संपत्तीचा शोध हा जेत्यांचा उद्देश असला तरी यातूनच अनेक देशांचा भौगोलिक अभ्यास सुरू झाला.
१९ व्या शतकाच्या उत्तरार्धात इंग्लंडमधील प्राथमिक शाळेत, तर १९०२ मध्ये तेथील हायस्कुलात भूगोल विषय सुरू झाला. भारतातील शिक्षणात भूगोल विषयाचा अंतर्भाव इंग्रज अमदानीत विसाव्या शतकात करण्यात आला. १९२० च्या दशकात पंजाब व अलिगढ विद्यापीठात भूगोल विभाग सुरू झाला आणि आपल्या शिक्षणात भूगोल विषयाला अधिकृत स्थान मिळाले. शाळांतूनही गणित व इंग्रजी यासोबत भूगोल हा विषय सुरू करण्यात आला. मराठीतील ‘भूगोल व खगोल संवाद’ हे पुस्तक पुणे येथे १८४१ मध्ये तर विनायक नारायण भागवत यांचे ‘भूगोलविद्या’ हे पुस्तक १८६१ मध्ये मुंबई येथे छापले गेले. रामचंद्र जनार्दन गोखले यांचे ‘भूवर्णन भाग १ व २’ हे १९१४ मध्ये पुणे येथे प्रकाशित झाले. पण त्या काळातील पुस्तके इंग्लंडमधील पाठ्यपुस्तकांवर आधारित होती किंवा त्यांचा अनुवाद होती. त्यात मुख्यत: जगाच्या व इंग्लंडच्या भूगोलाची माहिती असे. भारताच्याच भूगोलाला भारतातील पाठ्यक्रमात विशेष स्थान नसण्याचे कारण हे होते, की त्याचा अभ्यासच झालेला नव्हता. १९ व्या शतकात ग्रेट आर्क प्रकल्प, भूसर्वेक्षण खाते, जिओलॉजिकल सर्व्हे, भारतीय हवामान खाते इ. चे कार्य सुरू झाल्यावर संपूर्ण भारताची भौगोलिक माहिती संकलित होऊ लागली. आणि मगच भारतीय मुलांना भारताचा भूगोल शिकावयास मिळू लागला.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भूगोल हा विषय सक्तीचा पण इतिहासासोबत एक उपविषय म्हणून शाळेत शिकवला जाऊ लागला. गेल्या ७० वर्षांत भारताच्या भूगोलाची बरीच माहिती, नकाशे इ. उपलब्ध झाले तरी आजही ‘सामाजिक शास्त्रे’ अंतर्गत ४० गुणांचा विषय एवढेच स्थान भूगोलाला आहे. शास्त्रीय विषय असूनही त्याची निरीक्षण व प्रात्यक्षिकापासून करण्यात आलेली फारकत अजूनही कायम आहे. परिणामी एक निरस पण अटळ विषय, हीच भूगोलाची प्रतिमा पिढ्यानपिढ्या राहिली.
‘‘आम्हाला असे लोक भेटले की आपल्याच प्रांताच्या भूगोलाकडे त्यांचे लक्ष नाही. भूगोल नावाचे एक शास्त्र आहे, हेही त्यांना माहीत नाही. कोणत्याही नव्या गोष्टीप्रमाणे ते भूगोलालाही दूर ठेवतात.’’ १९ व्या शतकात पंजाब प्रांताचे शिक्षण संचालक विलियम डी. अर्नोल्ड यांनी हा अभिप्राय दिला होता. दुर्दैवाने दोन शतकांनंतरही त्या स्थितीत फारसा फरक पडलेला नाही.
ज्यांनी भूगोल ज्ञानाला महत्व दिले तेच राज्यकर्ते वा देश यशस्वी व श्रेष्ठ ठरले, हा जगाचा इतिहास आहे. आपण भूगोलाची युगानुयुगे केलेली उपेक्षा हेच आपल्या देशाच्या इतिहासातील व वर्तमानातील अनेक समस्यांचे मूळ आहे. वरील सर्व पार्श्वभूमीवर जनमानसातील भूगोलाचे महत्त्व, आस्था व आकर्षण वाढावे यासाठीची एक संधी या भूमिकेतून मी ह्यभूगोलाचा इतिहासह्ण या सदराचे आव्हान स्वीकारले.
बहुतेक संकल्पित विषयांना या सदरात स्पर्श झाला. पण भूगोलाचे व्यामिश्र स्वरूप व प्रचंड व्याप्ती यामुळे इच्छा असूनही अनेक संकल्पित विषयावरचे लेख समाविष्ट होऊ शकले नाहीत.
जनमानसात विशेष कुतूहल व आकर्षण नसलेल्या एका अभिनव विषयावर वर्षभर सदर चालवणे हे खरोखरच एक आव्हान होते. परंतु वाचकांच्या कल्पनातीत प्रतिसादामुळे हे आव्हान पेलता आले. या निमित्ताने भूगोलात दूरपर्यंत व ज्ञानसागरात खोलवर मनसोक्त विहार करण्याची संधी मला भूगोल कोशानंतर पुन्हा एकदा मिळाली. माझी पत्नी चंद्रकला व माझे विद्यार्थीमित्र डॉ. अनुराग लव्हेकर यांचे या लेखनात मोलाचे सहकार्य लाभले.
पृथ्वीमाते मंगले गे अन्न तू माते दिले
अन कृपेच्या अमृताने प्राण माझे पोशिले
असे एका कवीने म्हटले आहे. खरोखरच आपण सर्व या भू-गोलाचे ऋणी आहोत. आणि तिचे संशोधन करणाऱ्या संशोधकांचेही. थोर ऋषीमुनी हे शास्त्रज्ञच होत, असे आपल्याकडे अनेकांचे मत आहे. याच विधानाचा व्यत्यास म्हणजे संशोधक व शास्त्रज्ञ हे ऋषीमुनीच आहेत. अशा असंख्य भूगोल ऋषींचे आपण सगळेच देणे लागतो. त्यांचाही समावेश नित्यस्मरणीय ऋषी व विभूतींच्या यादीत करणे व त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन भूगोलाची उपेक्षा दूर करून त्याचा अभ्यास करणे, हाच त्यांचे ऋण फेडण्याचा मार्ग आहे. या सदरातून त्यासाठी काही जणांना जरी तशी दिशा व प्रेरणा मिळाली असेल तर तीच या सदराची सार्थकता आहे.
lkkulkarni @gmail.com
लेखक भूगोलाचे अभ्यासक आणि निवृत्त शिक्षक आहेत.