ऐ अहले-सियासत ये कदम रुक नहीं सकते

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रुक सकते हैं फनकार कलम रुक नहीं सकते..

अशा काहीशा बंडखोर वळणानेच आयुष्यभर होत राहिला मुनव्वर राणांच्या शायरीचा प्रवास. प्रेमाची ‘शमा’ सजवून मैफिलीत वाचलेले विरहाचे कशिदे म्हणजे शायरी, ही उर्दू शायरीची व्याख्या मान्य नव्हती राणांना. म्हणून त्यांनी सुरुवातीपासूनच वेगळी वाट निवडली. शायरीपासून अस्पर्शित असलेले विषय उदा. आईची माया, बहिणीचे प्रेम, समाजासमोर उभा राहिलेला वैचारिक दुभंग, धर्माचे अवास्तव स्तोम, फाळणीचे दु:ख यांना राणांनी आपल्या शब्दांचा आधार दिला, त्यांना उर्दू शायरीच्या दुनियेत सर्वमान्यता मिळवून दिली. दुरूनच लक्ष वेधून घेणारा काळा सदरा, काळया सुरमाने सजलेले काळेभोर डोळे, बंगाली विडयाने रंगलेले ओठ आणि त्या ओठांवर थेट हदयातून अवतरणारी शायरी आता यापुढे अनुभवता येणार नाही. कारण, राणा आता गेलेत. ७१ वर्षांच्या शब्दमहोत्सवाची अखेर सांगता झाली. पण, मुनव्वर राणांच्या वादळी आयुष्याचे किस्से इतक्यात विसरले जाणे शक्य नाही. याचे कारण, जशी त्यांची शायरी आहे तशीच त्यांनी वेगवेगळया प्रसंगी घेतलेली राजकीय भूमिकाही आहे.

हेही वाचा >>> आसा नही था ‘मुनव्वर’ होना…!

मुनव्वर राणा आणि वाद यांचे गहिरे नाते होते. २०२२ मध्ये उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक होण्याआधी राणा म्हणाले होते की, योगी आदित्यनाथ पुन्हा मुख्यमंत्री झाले तर मी उत्तर प्रदेशात राहणार नाही, त्यांच्या या वक्तव्याने मोठे वादळ उठले. त्यांच्या राष्ट्रीयतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले. उर्दू साहित्यातल्या अमूल्य योगदानासाठी २०१४ मध्ये राणा यांना त्यांच्या ‘शाहदाबा’ या काव्यसंग्रहासाठी साहित्य अकादमी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. तसेच २०१२ मध्ये त्यांना ‘माटी रतन सन्मान’ प्रदान करण्यात आला.

परंतु, २०१५ मध्ये त्यांनी देशातल्या असहिष्णुतेचा मुद्दा मांडला. उत्तर प्रदेशच्या दादरी येथे अखलाकचा झुंडबळी गेल्यानंतर, राणा यांनी एका वृत्तवाहिनीवरील थेट चर्चेदरम्यान त्यांचा साहित्य अकादमी पुरस्कार परत करण्याची घोषणा केली होती. देशातील वाढती असहिष्णुता हे त्यांनी या निर्णयामागचे कारण सांगितले होते.

हेही वाचा >>> प्रसिद्ध शायर मुनव्वर राणा यांचं निधन, बंडखोर कवी काळाच्या पडद्याआड

एवढंच नाही तर यानंतर आपण कुठलाही सरकारी पुरस्कार स्वीकारणार नाही, अशीही प्रतिज्ञा त्यांनी घेतली आणि ती आयुष्यभर जपली. शेवटच्या दिवसात राणांना अनेक गंभीर आजारांनी घेरले होते. परंतु, त्यांना त्या आजारांपेक्षा त्यांच्या स्वकीयांनी कौटुंबिक संपत्तीसाठी जो त्रास दिला त्याचे दु:ख जास्त होते. या दु:खातून ते अखेपर्यंत सावरलेच नाहीत आणि अखेर काल त्यांनी या जगाचा निरोप घेतला. असा निरोप अटळ आहे, हे राणांना ठाऊक होते म्हणून त्यांनी स्वत:च्या मृत्यूबाबत लिहून ठेवले होते..

‘हम से मोहब्बत करने वाले रोते ही रह जाएंगे

हम जो किसी दिन सोए तो सोते ही रह जाएंगे..’

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article about journey of poet munawwar rana shayari zws
Show comments