भारत-पाकिस्तान यांच्यात १९७१ मध्ये झालेल्या युद्धाची परिणती पाकिस्तानच्या विभाजनात झाली. हे युद्ध दोन्ही आघाडय़ांवर लढले गेले. भारताच्या तिन्ही सैन्यदलांनी परिणामकारक संयुक्त कार्यवाहीतून पाकिस्तानचा निर्णायक पराभव केला. पाकिस्तानच्या ‘पीएनएस गाझी’ पाणबुडीचा विध्वंस करीत या युद्धाला कलाटणी देणारे युद्धनायक कमांडर इंदर सिंग (निवृत्त) यांचे नुकतेच हरियाणात निधन झाले. युद्धातील कामगिरीबद्दल त्यांना वीरचक्र शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
हेही वाचा >>> व्यक्तिवेध : कार्तियानी अम्मा
रोहतकजवळील अनवली हे त्यांचे मूळ गाव. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या इंदर सिंग यांची नौदलातील कामगिरी विलक्षण ठरली. प्राथमिक शिक्षण घेताना मैदानी खेळाकडे ते आकृष्ट झाले. आठवी उत्तीर्ण झाल्यानंतर ते सोनीपतच्या जाट स्कूलमध्ये दाखल झाले. स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजे दुसऱ्या महायुद्धादरम्यान ते शाही भारतीय नौदलात नाविक म्हणून भरती झाले. प्रशिक्षण संपल्यानंतर लगोलग पूर्व भागात त्यांची नियुक्ती झाली. या महायुद्धात त्यांचे जहाज ब्रिटिशांच्या जहाजांना संरक्षण कवच पुरवत होते. जहाज हाताळणी शाखेत असणाऱ्या इंदर यांना नंतर दुसऱ्या जहाजावर थेट मलाक्काच्या सामुद्रधुनीत पाठविले गेले. एकदा इराकलाही बदली झाली. या काळात वरच्या पदांवर बढती मिळू लागली. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतीय नौदलात आपल्या प्रतिभेच्या बळावर १९५७ मध्ये त्यांची अधिकारी पदावर नियुक्ती झाली. १९६१ मध्ये गोवा मुक्ती लष्करी कार्यवाहीत त्यांनी सक्रिय भूमिका बजावली.
हेही वाचा >>> व्यक्तिवेध : चार्ल्स फीनी
१९६५ च्या युद्धात ते पूर्व विभागात नियुक्त होते. १९७१ च्या भारत-पाक युद्धातील इंदर यांच्या धाडसी कामगिरीचा ‘वीरचक्र’ या तिसऱ्या सर्वोच्च शौर्य पुरस्काराने गौरव करण्यात आला. १९७१ च्या युद्धात ‘पीएनएस गाझी’ला जलसमाधी देणे हा महत्त्वाचा क्षण ठरला. पाकिस्तानी नौदलाचे लक्ष भारतीय नौदलाच्या आयएनएस विक्रांत विमानवाहू नौकेला नष्ट करण्यावर होते. या मोहिमेसाठी त्यांनी ‘पीएनएस गाझी’ला मार्गस्थ केले. तेव्हा ‘आयएनएस राजपूत’ची जबाबदारी इंदर सिंग यांच्याकडे होती. त्यांच्यावर आत्मघाती कार्यवाहीची जबाबदारी देण्यात आली. ‘पीएनएस गाझी’ला संभ्रमित करण्याची ही योजना होती. आयएनएस विक्रांतला सुरक्षित करण्यासाठी आयएनएस राजपूतला तिची भूमिका निभवायची होती. सिंग यांनी निडरपणे ही जबाबदारी स्वीकारली. आपण परतलो नाही तरी ‘आयएनएस विक्रांत’ सुरक्षित राहील, असे वरिष्ठांना सांगून ते रवाना झाले आणि गाझीला नष्ट करीत मोहीम फत्ते केली. अमेरिकेने पाकिस्तानला भाडेपट्टय़ावर दिलेली ही पाणबुडी होती. तेव्हा भारताकडे एकही पाणबुडी नव्हती. पाकिस्तानचे महत्त्वाचे शस्त्र निकामी करत भारतीय नौदलाने सागरावर आपले प्रभुत्व सिद्ध केले. त्यांची कामगिरी सैन्य दलातील प्रत्येकास प्रेरणा देणारी आहे.