‘भौतिक शास्त्रज्ञ वित्तव्यवहार आणि भांडवली बाजार यांविषयी शिकू शकतात, त्यातही पारंगत होऊ शकतात… पण वित्त क्षेत्रातल्या कितीही पारंगत लोकांना भौतिकशास्त्रासारख्या क्षेत्रात स्थान मिळवता येणार नाही!’ अशा शब्दांत स्वत:च्या यशाचे आणि त्यांनी स्थापलेल्या गुंतवणूक-कंपनीतही गणितज्ञ, भौतिक शास्त्रज्ञ यांनाच ‘गुंतवणूक विश्लेषक’ म्हणून का ठेवण्यात आले, याचेही इंगित जिम सायमन्स यांनी २०२२ मध्ये सांगितले होते. गणितज्ञ म्हणून नावलौकिक मिळवण्याची हातची वाट सोडून वयाच्या चाळिशीत सायमन्स यांनी गुंतवणूक कंपनी स्थापन केली आणि २०१० मध्ये ते दैनंदिन कामकाजातून निवृत्त झाले, तेव्हा त्यांची संपत्ती होती ११ अब्ज डॉलर! ही कमाई त्यांनी जरी भांडवली बाजारातून केली असली तरी त्यामागे गणिताचे ज्ञानच कामी आले होते, म्हणून सायमन्स हे विशेष ठरतात.
हेही वाचा >>> व्यक्तिवेध : सुशीलकुमार मोदी
‘क्वान्टिटेटिव्ह इन्व्हेस्टिंग’ची पद्धतीदेखील बाजाराच्या यशाकडे नेऊ शकते, याचे सैद्धान्तिक विश्लेषण मुळात नोबेल- (१९९०)मानकरी अर्थशास्त्रज्ञ हॅरी मार्कोवित्झ यांनी १९६० च्या दशकात केले होते, फिशर ब्लॅक आणि मायरॉन शोल्स यांनीही १९६८ मध्ये डेरिव्हेटिव्ह अंदाजांसाठी केवळ गणिती प्रारूप वापरता येते हे सिद्ध केले होते आणि ब्लॅक-शोल्स सिद्धान्त ऑप्शन्स व्यवहारातही वापरता येतो हे अन्य नोबेल (१९९७) मानकरी रॉबर्ट मेर्टन यांनी दाखवून दिले होते. याउलट, सायमन्स यांनी सिद्धान्त मांडले नाहीत. त्यांनी १९७४ पासून थेट दुकानच थाटले… न्यू यॉर्कच्या लाँग आयलंड भागातील आडबाजूच्या मॉलमधल्या एका गाळ्यात ‘रेनेसाँ टेक्नॉलॉजीज’ या कंपनीची स्थापना करून त्यांनी गुंतवणूकदारांना गणिताधारित सल्ले देणे सुरू केले. अवघ्या दीड दशकात या कंपनीने, स्वत:चे पाच म्युच्युअल फंड स्थापण्यापर्यंत प्रगती केली. तीन दशकांत या फंडांचा परतावा सर्वाधिक (सरासरीने ६६ टक्के) असल्याचा बोलबाला झाला आणि प्राध्यापकीऐवजी दुकानदारीचा पर्याय निवडणारे सायमन्स स्व-मालकीच्या १० कोटी डॉलर किमतीच्या ‘यॉट’मधून जलप्रवास करताहेत, न्यू यॉर्कच्या फिफ्थ अॅव्हेन्यूवर मोठे घर आणि लाँग आयलंडमध्ये १४ एकराची इस्टेट अशा ठिकाणी राहताहेत, हेही लाँग आयलंडच्या ‘स्टोनी ब्रूक युनिव्हर्सिटी’तील त्यांच्या एकेकाळच्या सहकारी अध्यापकमंडळींनी पाहिले! या विद्यापीठात आठ वर्षे गणित शिकवणाऱ्या आणि १९७५ मध्ये तिथेच गणित विभागाचे प्रमुखही झालेल्या सायमन्स यांनी १९७८ मध्ये प्राध्यापकी सोडली होती. पण याच विद्यापीठाला २०११ मध्ये १५ कोटी डॉलर, तर २०२३ मध्ये ५० कोटी डॉलर अशा देणग्या त्यांनी दिल्या. मध्यंतरी त्यांच्यावर करचुकवेगिरीचा आरोप झाला होता, पण ते बालंट टळलेही होते.