डॉ. उज्ज्वला दळवी
निरामयतेची आस माणसाला आदिकाळापासून आहे, त्यात आधुनिक वैद्यकामुळे काय फरक पडला नि कसा, याचा वेध घेणारे नवे सदर..
जयाच्या रिक्षाला अपघात झाला. बराच मुका मार लागला. ती वेदनेने कळवळली. पण, ‘‘मी अॅलोपॅथीचं औषध घेणार नाही!’’ म्हणून तिने फक्त दु:खदबाव लेप लावला आणि आर्निकाच्या गोळय़ा घेतल्या. त्याच जयाला त्यानंतर काही वर्षांनी कॅन्सर झाला. तेव्हा मात्र तिने केमोथेरपीचे सगळे त्रास सोसून ती नवी औषधं बिनतक्रार घेतली. तसं तिचं मतपरिवर्तन का झालं?
तसा विरोधाभास बहुसंख्य लोकांच्या वागण्यात दिसतो. काय कारण असतं त्याच्यामागे?
प्राणिमात्राला आजारातून बरं व्हायचंच असतं. पोट दुखलं की मांसाहारी कुत्रीमांजरं गवतसुद्धा खातात. पुरातन काळी आजार म्हणजे भूतबाधा आणि वैद्यकीय उपचार म्हणजे जादूटोणाच असे. ठिकठिकाणचे मांत्रिक- शामान- कहूना- मुंडुनुगू वगैरे उपचारकर्ते भूत काढण्यासाठी रोग्याला फटकेही मारत. रोगी केवळ बरं होण्याच्या आशेने ते फटके सोसत असे. नंतर चिनी, सुमेरियन औषधशास्त्र आलं, आयुर्वेद आला. शेकडो वनस्पतींचं निरीक्षण करून त्यांच्यापासून हजारो औषधं बनली. ‘त्या वैद्यराजांचा अनुभव फार मोठा आहे. त्यांची नाडीपरीक्षा बिनचूक असते. त्यांचा हातगुण उत्तम आहे,’ अशा वैयक्तिक थोरवीला महत्त्व आलं. वैद्यकशास्त्राला कलेचं स्वरूप आलं.
त्या थोर वैद्यराजांकडे जुने ग्रंथ आणि एका माणसाच्या आयुष्यात गोळा होईल एवढाच अनुभव असे. गुरूंकडून मिळालेली काही ऐकीव शिदोरी असे. दाखले देताना त्या जुन्या ग्रंथांतले तेच ते मुद्दे उगाळले जात. दहाबारा माणसांनी त्यांच्या व्यक्तिगत पद्धतींनी घेतलेला अनुभव आणि त्याच्यावरून वैद्यराजांनी काढलेलं स्वत:चं अनुमान इतक्या भांडवलावर त्यांचे उपचार अवलंबून असत. गुण आला तर बोलबाला होई. आला नाही तर नशिबाला बोल लावत रोगी घराच्या कोपऱ्यात, अंथरुणाला खिळून राही. सामान्यजनांचा वैद्यराजांवरचा आणि त्यांच्या औषधांवरचा विश्वास अबाधित राही. सतराव्या-अठराव्या शतकापर्यंत थोडय़ाफार फरकाने जगभर, पिढय़ानपिढय़ा तशाच उपचारपद्धती चालू राहिल्या. स्थानिक परंपरांचा, घरगुती संस्कृतीचा भाग झाल्या. भारतात निदान वेगवेगळी आसवं-अरिष्टं-चरूण असत. अमेरिकेतल्या घरांत तर एकाच ‘मेडिसिन’ची बाटली असे. कान दुखणं, पाय मुरगाळणं, बाळंतवेणा कशालाही तेच ‘मेडिसिन’ श्रद्धेनं घेतलं जाई. श्रद्धेमुळेच बरं वाटे.
सगळय़ा जुन्या पद्धतींत आजाराच्या कारणांमध्ये कफ-वात-पित्ताचं असंतुलन, दूषित हवा, दुष्ट शक्ती अशा अनेक अमूर्त गोष्टी होत्या. त्यांच्यावर मनानं विश्वास ठेवला तरी त्या बुद्धीला पटत नव्हत्या. पण त्या काळात ‘कावळा ओरडला की पाहुणा येतो’, ‘शिडीखालून गेलं की अपमृत्यू येतो’, वगैरे अनेक न पटणाऱ्या गोष्टींवर विश्वास ठेवायची जगभरातल्या लोकांना सवय होती. साथीचे रोग दूषित हवेतून पसरतात असं थोरांचं म्हणणं होतं. म्हणून युरोपातली प्लेगची साथ आटोक्यात आणायला तिथे सुगंधी द्रव्यं वापरली! हाहाकार माजला. ‘शेजारच्या गावात जे जे मेले त्या सगळय़ांनी टोमॅटो खाल्ला होता,’ या निरीक्षणावरून ‘टॉमने टोमॅटो खाल्ला. म्हणजे तो आता मरणार,’ असा थेट निगामी अनुमानाचा (डिडक्टिव्ह लॉजिकचा) संबंध जोडला जाई. निरीक्षण ते निष्कर्ष प्रक्रियेत त्या वेळी कसोटय़ा आणि शिस्त नव्हती.
सतराव्या शतकात सर फ्रान्सिस बेकन (१५६१- १६२६) यांनी सर्वसाधारण विचारपद्धतीलाच शिस्त लावायचा प्रयत्न केला. त्यात त्यांनी विगामी अनुमान (इंडक्टिव्ह लॉजिक) पद्धतीत अपवादांचाही विचार करून निष्कर्ष कसा काढायचा ते समजावलं.
उदाहरण द्यायचं तर :
निरीक्षण १ : लसूण घालून चटणी छान लागते.
निरीक्षण २ : लसूण घालून सोलकढी चांगली लागते.
निरीक्षण ३ : लसूण घालून मासे चांगले लागतात.
अटकळ : लसूण घालून खाद्यपदार्थ चांगले लागतात.
निरीक्षण ४ : लसूण घालून श्रीखंड चांगलं लागत नाही.
निष्कर्ष : अटकळ चुकली.
निरीक्षण ५,६,७,८ : लसूण घालून ठेचा, पिठलं, मुळय़ाची भाजी, मटकीची उसळ चांगले लागतात.
अटकळ : लसूण घालून तिखटामिठाचे पदार्थ चांगले लागतात.
अनेकांनी केलेल्या अनेक प्रयोगांवरून एक निष्कर्ष ठरवायचा, मग तो अनेकांसाठी लागू करायचा. त्याच्यात चूक आढळली तर निष्कर्ष बदलून पुन्हा नवे प्रयोग करायचे, नवा निष्कर्ष काढायचा. तसं करत राहिलं की बहुसंख्य गोष्टींना लागू पडणारा निष्कर्ष काढणं जमतं. प्रयोग चालू रहातो. सतत सुधारणा होत राहाते. इंडक्टिव्ह लॉजिकची ती शिस्तशीर पद्धत सर फ्रान्सिस बेकन यांनी सतराव्या शतकात सुचवली. त्यांच्या मते एका गटातल्या पंचवीस जणांनी काढलेला निष्कर्ष हा पहिला टप्पा झाला. तशा अनेक गटांनी इतर अनेक पर्याय वापरून प्रयोग केले आणि जर निष्कर्ष तसाच निघाला तरच त्याला मान्यता द्यावी.
बेकनच्या तशा नियमावलीमुळे सगळय़ा वैज्ञानिक प्रयोगांसाठी इंडक्टिव्ह लॉजिकची एक आखीव, साचेबंद पठडी मिळाली. विचारांसाठी वैज्ञानिक शिस्त ठरली. युरोपातल्या सुशिक्षितांच्या विचारांवर तिचा परिणाम झाला. त्यांच्यात डॉक्टर मंडळीही होतीच. त्यांनीही प्रयोग केले.
१७७४-७५ मधली गोष्ट. हृदय कमकुवत झाल्यामुळे अंगाला सूज आलेली, एक अतिशय आजारी स्त्री कुण्या आजीबाईने दिलेला काढा पिऊन बरी झाली. ती नवलाईची कथा विदिरग नावाच्या इंग्लिश डॉक्टरने ऐकली. त्या काढय़ाने नेमकं कसं काम केलं ते शोधायचा त्याने ध्यास घेतला. त्याला वनस्पतिशास्त्राचं ज्ञान होतं. आजीबाईच्या काढय़ातल्या मालमसाल्यातून फॉक्सग्लव्हची मुळी त्याने नेमकी हेरली. पुढची दहा वर्ष त्याने त्या झुडपाचा हृदयाच्या कामावरचा परिणाम समजून घ्यायला झटून संशोधन केलं. त्याने त्याच्या मुळीतून डिजिटॅलिस हे मुख्य कामसू रसायन शुद्ध करून वेगळं काढलं. विदिरगने पुन:पुन्हा ताळा-पडताळा करत १५८ रुग्णांवर त्या औषधाचे साचेबंद प्रयोग केले, त्यांच्या नोंदी केल्या आणि औषधाचा योग्य डोस ठरवला. त्यांच्यातल्या १०१ लोकांना त्याने बरं वाटलं. तशा हृदयविकाराच्या बहुसंख्य लोकांना डिजिटॅलिसने बरं वाटतं हे सिद्ध झालं. त्या सगळय़ा अभ्यासाचा शोधनिबंध १७८५त प्रकाशित झाला. त्यानंतर अनेकांनी डिजिटॅलिसचा उपयोग केला आणि प्रत्येक वेळी तसाच फायदा झाला.
बुद्धीला पटणाऱ्या शिस्तबद्ध औषधशास्त्राची सुरुवात तिथून झाली. त्या औषधांनी बरं वाटल्यामुळे ते बुद्धिप्रामाण्य सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचलं. तरीही सुरुवातीला जिच्याबद्दल सांगितलं त्या जयाच्या, किंबहुना अनेक भारतीयांच्या वागण्यात विरोधाभास का?
बिरबलाच्या चातुर्यकथा कुठेही लागू पडतात. त्याने एका माकडिणीला तिच्या पिल्लासह हौदात उभं केलं आणि हौदातल्या पाण्याची पातळी हळूहळू वाढवत नेली. पाणी माकडिणीच्या नाकातोंडाशी येईतो तिने हात उंचावून पिल्लाला हवेत वर धरलं. पण पाणी नाकातोंडात जायला लागल्यावर मात्र तिने पिल्लाला पायाखाली घेतलं आणि स्वत:चा जीव तेवढा वाचवला.
जयाच्या मनाने दिलेला कौल त्या माकडिणीसारखाच होता. सहनशील जयाला अपघातानंतरच्या वेदनांचं भय वाटलं नाही. त्यांच्यासाठी नव्या औषधांना झिडकारायची, जुन्यांचा मन राखायची िहमत तिला होती. पण जेव्हा कॅन्सरचं निदान झालं तेव्हा तिचा जुन्यावरचा विश्वास डळमळला. तिने स्वत:ला निमूटपणे नव्या उपचारांच्या हवाली केलं.
सर्वसाधारण माणूस हुशार असतो. त्याला नवं तर्कशुद्ध औषध वापरायचं असतं. पण ती नवी औषधं पाश्चात्त्य आहेत अशी सर्वसाधारण समजूत असते. नव्या औषधांविषयी त्याच्या मनात परकेपणा, अढी असते. आपण आपली पारंपरिक औषधं अव्हेरून ती वापरतो म्हणून त्याला अपराधी वाटतं. नव्या औषधांना नावं ठेवणं हे त्याच अपराधी मनोवृत्तीचं काम असतं. म्हणून किरकोळ वाटणाऱ्या आजारपणासाठी आपलीशी वाटणारी जुनीच औषधं चालू राहातात. मोठय़ा आजारांसाठी, जेव्हा जिवाची बाजी लागलेली असते तेव्हा मात्र त्याला बुद्धीला पटणारे, अनेक निकषांच्या, कायद्याच्या अग्निपरीक्षेतून टिकून राहिलेले नवे उपाय अधिक पसंत पडतात.
ठीक आहे. ‘जो जे वांछील तो ते लाहो.’ जुन्यातलं सोनं घ्यावं, नव्यातली नवरत्नं वेचावी. पण जे काही करायचं ते अपराधी भावनेतून न करता चोखंदळपणे, बुद्धी वापरून करावं.
लेखिका वैद्यकीय व्यवसायात होत्या, तसेच गेल्या १२ वर्षांत त्यांची दोन पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत.
ujjwalahd9@gmail.com