९१ वर्षांचे आयुष्य, त्यापैकी ७० वर्षे सातत्याने लेखन आणि ४२ वर्षे ‘मातृभूमी’ या मल्याळम नियतकालिकाच्या कथा विभागाचे संपादक अशा एम. टी. वासुदेवन नायर ऊर्फ ‘एम. टी.’ यांच्या दीर्घ कारकीर्दीला मृत्यूनेच विराम दिला. मल्याळम भाषेतल्या त्यांच्या नऊही कादंबऱ्यांची, १९ लघुकथा संग्रहांची, तीन बाल-पुस्तके, तीन लेखसंग्रह, चार आत्मपर पुस्तके, दोन भाषणसंग्रह, कथा या साहित्यप्रकाराबद्दल लिहिलेली तीन पुस्तके… यांपैकी एकाचेही नावसुद्धा मराठी वाचकांना माहीत नसेल; कारण भारतीय भाषांतून परस्परानुवाद होणे तसे मंदच. पण ‘‘कोरडीठाक पडली तरी पुराने पुष्कळून जाण्याचे स्वप्न पाहणारी ती त्याची नदीदेखील, रक्ताचा थेंबही न उरलेल्या एखाद्या निश्चेष्ट शरीरासारखी त्याच्या मागेच पडून होती’’ यासारख्या नायर यांच्या वाक्यांशी जगातल्या कुठल्याही भाषेप्रमाणेच मराठीचेही नाते आहे. हे नाते फक्त नदीमुळे, निसर्गामुळे, मातीमुळे नसते तर माणसामुळे, माणसाच्या दु:खांमुळेही ते वैश्विक असते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> व्यक्तिवेध : ब्रिगेडियर अमिताभ झा

५४ मल्याळम चित्रपटांच्या पटकथा लिहिणाऱ्या आणि त्यापैकी सहा चित्रपटांचे दिग्दर्शनही करणाऱ्या ‘एम. टी.’ यांनी मानवी दु:खाशी नाते जोडले, ते आजच्या मानवी संघर्षातून. परंपरेने किंवा जुन्या समाजव्यवस्थेने माणसामाणसांत पेरलेल्या विषमतेची जाणीव आपल्या काळातच जिवंत झाली, या जाणिवेनेच अगदी वैयक्तिक, कौटुंबिक किंवा गावकीच्या पातळीवरही बंडाची निशाणे रोवली गेली; हे बंड कधी यशस्वी झाले तर कधी या समाजातले आपले स्थान शोधू पाहणाऱ्यांची गत कोरड्याठाक नदीसारखी- निश्चेष्ट- झाली, या वास्तवाकडे पाहण्यासाठी ‘एम. टी.’ यांना लांब जावे लागले नाही. केरळच्या गावागावांत त्यांना ही कथानके दिसली. त्या वेळचे केरळ हे मुख्यमंत्री ईएमएस नंबूद्रिपाद यांच्या साम्यवादी अजेंड्याने भारलेले. पण माणसांनी वैयक्तिक पातळीवर केलेल्या बंडाचा संबंध कधी कुणा मार्क्स, लेनिनशी नसतो, त्यामागे आत्मशोधाची प्रेरणा असते, हे ‘एम.टीं.’नी नेमके ओळखले होते. त्यामुळेच राजकीय- सामाजिक- वैयक्तिक कृतींचा थेट सांधा जोडू पाहणारे आदल्या पिढीतले मल्याळम लेखक वायकोम मोहम्मद बशीर किंवा ताकाळ्ळि शिवशंकर पिल्लै यांच्यापेक्षा ‘एम.टी.’ निराळे ठरले. पुढेही कधी कोणत्या पक्षाचा शिक्का त्यांनी स्वत:वर मारून घेतला नाही.

कथेतल्या पात्रांचा झगडा अधिक महत्त्वाचा मानणारे ‘एम.टी.’ साहजिकच चित्रपटांतून लोकांशी संवाद साधू शकले. त्यांची पहिली कथा महाविद्यालयीन जीवनातच – म्हणजे ते रसायनशास्त्र घेऊन बी.एस्सी. होत असताना- लिहिली गेली. या कथेलाच पुढे आंतरराष्ट्रीय पारितोषिक मिळाले. मग अनेक नियतकालिकांत त्यांच्या कथा प्रकाशित होऊ लागल्या. पहिली कादंबरी त्यांनी ३५व्या वर्षी लिहिली, तिला केरळ साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. ‘ज्ञानपीठ पुरस्कार’ त्यांच्या समग्र साहित्यसेवेसाठी (१९९५) देण्यात आला, त्यानंतर १० वर्षांनी ते ‘पद्माभूषण’ ठरले. आधुनिकतेने मातीत रुजावे लागते, त्यासाठी प्रसंगी माणसांनाही किंमत मोजावी लागते, हे त्यांच्या लिखाणाचे सूत्र गेल्या काही वर्षांत पर्यावरणापर्यंत गेले… केवळ लेखणीतून नव्हे तर सक्रिय सहभागातूनही ते अनावश्यक ‘विकास’ प्रकल्पांना, विशेषत: अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध करू लागले. त्यांच्या निधनाने आधुनिकतेची देशीयता ओळखणारा एक महत्त्वाचा लेखक हरपला आहे.