‘खेळ कुणाला दैवाचा कळला’ हे रवींद्र महाजनी यांच्या ‘देवता’ चित्रपटातील (वंदना विटणकर लिखित) गाणे दुर्दैवाने त्यांच्या वास्तव आयुष्यातही तंतोतंत लागू ठरले. मराठीतील देखणा, रुबाबदार अभिनेता म्हणून १९७५ ते १९९० हा काळ फक्त त्यांचा होता. इतके यश मिळाल्यानंतरही स्थिर आर्थिक उत्पन्न असावे या हेतूने चित्रपट कमी करण्याचे ठरवून ते बांधकाम व्यवसायात उतरले. स्वतंत्र व्यवसाय उभा करण्याचे त्यांचे गणित फार यशस्वी ठरले नाही.
रवींद्र महाजनी यांचे वडील ह. रा. महाजनी हे स्वातंत्र्यसैनिक आणि ‘लोकसत्ता’चे माजी संपादक. घरात सतत विचारवंत आणि नावाजलेल्या लोकांचा वावर कायम असायचा. पण या प्रभावळीच्याही बाहेर, महाविद्यालयीन शिक्षण घेतानाही खुद्द रवींद्र महाजनी यांनाही नाटक- चित्रपटांत रस असणाऱ्या समविचारी, समवयस्कांची साथ मिळाली होती. शेखर कपूर, अवतार गिल, अशोक मेहता अशा त्यांच्या प्रत्येक मित्राने चित्रपट क्षेत्रात जे जे काम करायचे ठरवले होते ते ते साध्य करण्यात त्यांना यश मिळाले. महाजनी यांचेही अभिनेता होण्याचे स्वप्न पूर्ण झाले खरे, मात्र त्यांना त्यासाठी नाही म्हटले तरी नऊ वर्षे अथक प्रयत्न करावे लागले. त्यांच्याकडे चेहरा होता, अभिनयाची ओढ होती, मात्र एक संधी मिळायचा अवकाश होता. ती संधी त्यांना मधुसूदन कालेलकर यांच्या ‘जाणता अजाणता’ या नाटकाने दिली. महाजनी यांची पहिलीच भूमिका लोकप्रिय ठरली. त्यांचे रूप आणि व्यक्तिमत्त्व लक्षात घेत कालेलकर यांनी खास त्यांच्यासाठी ‘तो राजहंस एक’ हे नाटक लिहिले. याच भूमिकेत त्यांना व्ही. शांताराम यांनी पाहिले आणि त्यांना ‘झुंज’ हा पहिला चित्रपट मिळाला. महाजनी यांचा चेहरा शहरी तरुणाचा आहे आणि अशा नायकाचा चित्रपटही यशस्वी होतो आहे, हे ‘झुंज’चे जिंकणे! तोवर तमाशापट आणि ग्रामीण बाजात रमलेला मराठी चित्रपट पुन्हा शहरात आला.. रवींद्र महाजनींसाठी शहरी भूमिका घेऊन निर्माते पुढे आले. तोपर्यंत रांगडा आणि देखणा नायक म्हणून सगळय़ांची पसंती अभिनेते अरुण सरनाईक यांना होती- मग तो तमाशापट असो की ‘घरकुल’सारखा चित्रपट. सरनाईक यांच्या निधनानंतर त्यांच्या नाटकातील भूमिकाही महाजनी यांनी केल्या होत्या.
रवींद्र महाजनी यांच्या देखणेपणामुळे, ‘ते (नेहमीच) मुख्य भूमिकेत आणि आम्ही साहाय्यक भूमिकेत’ अशी आठवण अभिनेते अशोक सराफही सांगतात, असा तो काळ! पण त्यांच्या या देखणेपणामुळे एका ठरावीक साच्यातील भूमिका वगळता वैविध्यपूर्ण चित्रपट त्यांच्या वाटय़ाला आले नाहीत. चॉकलेट हिरो, संसारी नायक असे विषय केंद्रस्थानी असलेले चित्रपट आणि त्या अनुषंगाने त्यांच्यावर चित्रित झालेली सुंदर प्रेमाची गाणी या सगळय़ा बाबी जुळून आल्या आणि एका पिढीसाठी ते त्यांचे आवडते नट ठरले. पुढे त्यांनी चरित्र भूमिका केल्या, मालिका केल्या, दिग्दर्शनाचा प्रयत्नही करून पाहिला. मात्र मराठीतील एके काळचा देखणा नट हीच त्यांची ओळख शेवटपर्यंत कायम राहिली.