‘अ‍ॅण्ड माइल्स टु गो बिफोर आय स्लीप..’ या रॉबर्ट फ्रॉस्टच्या ओळी, कर्तव्याची सातत्यानं जाणीव करून देणाऱ्या. त्या म्हणे, स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्या कार्यालयीन मेजावरल्या काचेखाली नेहमीसाठी होत्या. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांच्या शपथग्रहण प्रसंगी अमेरिकेच्या मुक्तिलढयाविषयीची ‘द गिफ्ट आउटराइट’ ही जी कविता फ्रॉस्ट यांनी व्यासपीठावरून सादर केली, त्यात ‘द डीड ऑफ गिफ्ट वॉज मेनी डीड्स ऑफ वॉर’ अशी- अगदी आत्ताच्या गाझा-शिरकाणापर्यंत खरी ठरणारी ओळ होती. याच रॉबर्ट फ्रॉस्टच्या निवडक कवितांच्या संग्रहाची पहिली प्रत, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली (जून २०२३ मधल्या त्या भेटीत मोदींनीही बायडेन यांना छापील ग्रंथ दिला- श्रीमद्भगवद्गीता.).. असा एकंदर रॉबर्ट फ्रॉस्टचा दबदबा असूनही समीक्षक मात्र त्याला ‘सामान्यांचा कवी’ म्हणूनच ओळखतात. अमेरिकेचा ‘राष्ट्रकवी’ भले त्याच्या आधीच्या पिढीतला वॉल्ट व्हिटमन असेल; पण अमेरिकी कवितेचा इतिहास समजून घेण्यासाठी रॉबर्ट फ्रॉस्टसुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. त्यामुळे नोंद घेण्याजोगं हे की, सान दिएगो इथं बुधवारपासूनच रॉबर्ट फ्रॉस्टच्या स्मृत्यर्थ जंगी काव्योत्सव सुरू झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> व्यक्तिवेध: मार्चेलो गांदीनी

म्हणजे सकाळपासून नवोदित कवींसाठी कार्यशाळा, भर दुपारी व्याख्यान, उतरत्या दुपारी काव्यवाचन, संध्याकाळी महत्त्वाचे अभ्यासक आणि नामवंत कवी यांचं व्याख्यान आणि प्रश्नोत्तरं आणि अगदी रात्री नऊनंतरच पुस्तकांवर स्वाक्षऱ्या वगैरे घेण्यासाठी वेळ, असे कार्यक्रम सान दिएगोत २५ मार्चपर्यंत चालणार आहेत. रॉबर्ट फ्रॉस्टची जन्मतारीख २६ मार्च १८७४.  त्याच्या आधीचे सहाही दिवस कार्यक्रम. यातल्या एका चर्चेच्या सत्रात भारतीय वंशाचे अमेरिकी कवी- कादंबरीकार अमित मजुमदार यांचाही समावेश आहे. ‘रॉबर्ट फ्रॉस्ट सोसायटी’ ही या कार्यक्रमाची आयोजक आहे. या संस्थेची स्थापना १९७८ मध्येच झाली असली आणि ‘द रॉबर्ट फ्रॉस्ट रिव्ह्यू’ या नावाचं नियतकालिकही या संस्थेतर्फे तेव्हापासूनच निघत असलं, तरी सन २००० पर्यंत या संस्थेला जागाच नव्हती. अखेर सान दिएगोच्या सार्वजनिक वाचनालयानं या संस्थेला आपल्याच इमारतीत कायमस्वरूपी जागा दिली, म्हणून हा उत्सवही रॉबर्ट फ्रॉस्ट जिथं वाढला, राहिला त्या मसाच्युसेट्स, न्यू हॅम्पशायर यांसारख्या राज्यात किंवा उत्तरायुष्य त्यानं जिथं घालवलं त्या बॉस्टन शहरात न होता कॅलिफोर्नियात भरतोय.

या निमित्तानं भारतातही रॉबर्ट फ्रॉस्टची आठवण काढायला हरकत नाही. ‘द रोड नॉट टेकन’ला २०१५ मध्ये १०० वर्षे पूर्ण झाली, तेव्हाही ‘लोकसत्ता- बुकमार्क’नं ती काढली होतीच.  पण १५० व्या वाढदिवशी फ्रॉस्टला आठवताना, जनसामान्यांच्या ओठी ज्यांच्या कवितांच्या ओळी आजही असतात अशा कवींची स्मारकंही आठवून पाहावीत.

डार्टमाउथ कॉलेजात १९४३ ते ४९ पर्यंत फ्रॉस्ट व्याख्याते म्हणून येत, त्यांच्या तेव्हाच्या विद्यार्थ्यांनी देणगी देऊन १९९६ मध्ये त्यांचा पूर्णाकृती पुतळा त्या कॉलेजच्या आवारात बसवला. तो आजही तिथं आहे. पण त्याखेरीज फ्रॉस्ट यांचं घर, स्मारक वगैरे काही नाही. जिथं रॉबर्ट फ्रॉस्टच्या कविता आठवतील, तिथंच त्याचं स्मारक. आपल्या विजय पाडळकरांनी मराठीत या फ्रॉस्टवर लिहिलेलं पुस्तक (‘कवितेच्या शोधात : रॉबर्ट फ्रॉस्ट – जीवन आणि काव्य’; राजहंस प्रकाशन; २०१९) हा तर या कवीचा महाराष्ट्रातही नित्य चालणारा उत्सव! तेव्हा सान दिएगोत काय तो सप्ताह वगैरे होऊदे, पण आपण ‘बुकमार्क’चा लेख तरी पुन्हा वाचू शकतो. त्या लेखाचा दुवा :  https://www.loksatta.com/lokprabha/bloggerskatta/ poetry-robert-frost-the-road-not-taken-1263532/

हेही पाहा

‘पर्सिपोलिस’ ही चित्रकादंबरिका लिहून आणि त्यावर सिनेमा बनवून इराणी-फ्रेंच लेखिका मरजॉन सतरापी वाचकप्रिय झाली. इतकी की या पुस्तकाच्या २० लाखांहून प्रती विकल्या गेल्या. इस्लामी राजवट अचानक आल्यानंतर बदललेल्या स्त्रियांच्या आयुष्यावर ही चित्रकादंबरिका आहे. आत्ता ही लेखिका काय करीत आहे? केवळ हिजाब न घातल्याने नैतिक पोलिसांच्या मारहाणीत माहसा अमीनी या इराणी मुलीचा मृत्यू आणि त्यानंतरची निदर्शने, याबद्दलचे सतरापी हिचे नवे काम कसे आहे? याचा चित्रमय तपशील असलेला लेख.

https://shorturl.at/fHX04

गेल्याच आठवडयाच्या सुरुवातीला टेलर स्विफ्ट या अमेरिकी गायिकेच्या ‘फॅन बुक’ची सातवी आवृत्ती आली. स्विफ्टविषयी सारे काही असलेल्या या पुस्तकाची विक्री प्रचंड आहे, कारण जगभरातील कानाकोपऱ्यात अगदी भारतीय शहरात, उपनगरांत आणि गावांत तिची गाणी ऐकणारे चाहते आहेत. देशोदेशी तरुणाईत या फॅनबुकची खरेदी होते. पण ही गायिका टाइमची २०२३ सालाची ‘पर्सन ऑफ द इयर’देखील आहे. तिच्याविषयी भलीमोठी माहिती देणारा टाइममधला लेख अद्याप मोफत उपलब्ध आहे: 

https://shorturl.at/rDI58

ब्रिटनमधील स्वान्झी विद्यापीठाकडून डिलन थॉमस या कवीच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार दरवर्षी चर्चेत असतो. कारण विविध देशांतून लघुयादीत आलेले लेखक-लेखिका यांना मिळणारी पुरस्कार रक्कम २० हजार पौंडाची असते. (बुकरच्या साधारणत: ४० टक्के ) शिवाय त्यातील विजेते पुढे मुख्य धारेतील खूपविके लेखक बनतात. यंदा आपल्यासाठी महत्त्वाचे काय तर नमिता गोखले (त्याच जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलची संकल्पना रुजविणाऱ्या) या पुरस्कारासाठी निवड मंडळाच्या अध्यक्षपदी आहेत. त्याचे वृत्त : https://shorturl.at/mCDLX

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article about poet robert frost analysis of poet robert frost s life and writings zws