डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मोहम्मदअली जीना, जमशेदजी कांगा, नानी पालखीवाला, सोली सोराबजी, फली नरीमन या विविध पिढ्यांतल्या नावांमधले साम्य म्हणजे, या साऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात वकिलीची कारकीर्द केली… वकील किती यशस्वी यापेक्षा किती न्यायप्रिय आहे यावरच वकिली कारकीर्दीचे मोजमाप होत असते, याची जाण पुढल्या पिढीनेही जपली. इक्बाल छागला हे त्या पुढल्या पिढीपैकी ज्येष्ठ. पण वकिलीच्या उज्ज्वल कारकीर्दीत जे आदल्या पिढ्यांमधील कुणीही केले नाही, ते करण्याची धमक या इक्बाल छागलांनी दाखवली- उच्च न्यायालयातले न्यायाधीशही भ्रष्ट असू शकतात, अगदी मुख्य न्यायाधीशही पैशाच्या मोहात अडकू शकतात… अशा भ्रष्टांनी पदावरून हटलेच पाहिजे, असा ठाम आग्रह इक्बाल छागला यांनी धरला. ‘छागला’ हे आडनाव उच्चारताच अनेकांना ‘रोझेस इ डिसेंबर’ (मराठी अनुवाद : ‘शिशिरातील गुलाब’) या गाजलेल्या आत्मचरित्राचे लेखक आणि मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले भारतीय मुख्य न्यायमूर्ती मोहम्मदअली करीम ऊर्फ एम.सी. छागला आठवतात, ते या इक्बाल छागलांचे वडील. त्या पुस्तकातल्या प्रसंगांतून सारासार विचाराचे, विवेकाचे जे धडे वाचकांना मिळतात, त्यांपैकी अनेक प्रसंगांचे इक्बाल हे साक्षीदार. वडिलांप्रमाणेच इक्बाल छागलांनाही न्यायमूर्तीपद मिळणार होते, तेही सर्वोच्च न्यायालयात.

‘मी ते स्वीकारले असते तर, सन २००३ पर्यंत सेवाज्येष्ठतेनुसार मी भारताच्या सरन्यायाधीशपदी आलो असतो… बराच विचार केला. अखेर ‘व्यक्तिगत कारणांसाठी नकार’ कळवून टाकला,’ असे इक्बाल छागला सांगत. एरवीही अनेक प्रथितयश वकील, भरमसाट ‘फी’ऐवजी न्यायाधीशांच्या तनख्यावर समाधान मानावे लागू नये अशा हिशेबाने हे पद नाकारतातच… तसेच इक्बाल यांनाही वाटले असेल म्हणणाऱ्यांनी त्यांचे ‘न्यायपालिकेतील पेशांचा वारसा’ या विषयाबद्दलचे विचार जरूर पाहावेत. आदली पिढी न्यायपालिकेत उच्च पदांवर असल्यास तुमच्या कारकीर्दीची सुरुवात अत्यंत सुकर होते… पण पुढे आदल्या पिढीचा लौकिक राखण्याचीच नव्हे तर वाढवण्याची अदृश्य जबाबदारी तुमच्यावर येते’ असे इक्बाल छागला म्हणत. न्यायाधीशांनी स्वच्छ असावे, या आग्रहाला जागून त्यांनी एकप्रकारे, ‘शिशिरातील गुलाबां’चा सुगंध द्विगुणित केला!

हेही वाचा >>> पहिली बाजू : डॉ. आंबेडकरांची संघ शाखा भेट प्रेरक

‘न्या. यशवंतराव चंद्रचूड आणि न्या. पी. एन. भगवती या दोघांपैकी कुणालाही देशाचे सरन्यायाधीशपद देऊ नका… ऐन आणीबाणीत, ‘एडीएम जबलपूर’ खटल्यात या दोघांनी कचखाऊ निर्णय दिला, म्हणून ते नकोत यासाठी तुम्ही आग्रह धरा’ अशी गळ चाळिशीच्या उंबरठ्यावर असताना इक्बाल छागला यांनी थेट जयप्रकाश नारायण यांना घातली होती. या आग्रहाला तोवर निवृत्त झालेल्या एम. सी. छागलांचाही पाठिंबाच होता म्हणतात. ‘जयप्रकाशजी तयार झाले, त्यांनी तसे निवेदन काढण्याचे वचन आम्हाला (स्वत:सह ए. जी. नूरानी यांना) दिले होते,’ असे इक्बाल छागलांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या ‘आयडिया एक्स्चेंज’ उपक्रमातील मुलाखतीत सांगितल्याची नोंद आहे. पण पुढे चक्रे फिरली आणि सरन्यायाधीशपदेही ठरली. जानेवारी १९७८ च्या सुमारास इक्बाल छागला हे चंद्रचूड वा भगवतीं विरोधात नसून, न्याय्य कारभाराची हमी देणाऱ्या सरकारने न्यायपालिकेचे नैतिक पावित्र्यही जपावे, हा त्यांचा तत्त्वाग्रह होता. तो मंजूर झाला नाही.

न्यायपालिकेचे पावित्र्य जपण्याची जबाबदारी सरकारवर कशी, याचे भान इक्बाल छागलांना होते. १९८१ मध्ये तत्कालीन केंद्रीय कायदामंत्री पी. शिवशंकर यांच्या ‘निम्मे न्यायमूर्ती राज्याबाहेरील असावेत, यासाठी सर्वांकडून नियुक्तीआधीच ‘बदलीस हरकत नाही’ अशी पत्रे घ्या,’ या आदेशवजा पत्रावर रीतसर याचिकेद्वारे त्यांनी घेतलेले आक्षेप. ‘तुमचा संबंधच काय’ असा पवित्रा घेऊन इक्बाल यांना सरकारने बेदखल करू पाहिले; तेव्हा त्यांचे उत्तर वाचण्याजोगे ठरते, कारण त्यातून न्यायपालिकेवरला जन-विश्वास, नैतिकता हे टिकवण्यात वकिलांचा वाटा असतोच, हे स्पष्ट होते. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आनंदमय भट्टाचारजी यांच्या कथित भ्रष्टाचाराविरोधात वकील संघटनेचा ठराव आणण्याचे आयुध इक्बाल छागलांनीच, त्या संघटनेचे अध्यक्ष म्हणून वापरले. १९९०च्या सुमारास पाच न्यायाधीशांना त्यांच्या सजगपणामुळे पदावरून जावे तरी लागले किंवा बदली घ्यावी लागली. ‘इतका तत्त्वाग्रहीपणा आज दिसतो का?’ या प्रश्नावर वयाची ऐंशी पार केलेल्या इक्बाल यांनी दिलेले उत्तर- हल्ली सर्वांना लोकप्रियता टिकवायची असते, मग सारे गोडच बोलतात- अशा अर्थाचे होते. रविवारी (१२ जाने.) झालेल्या निधनानंतर त्यांना आदरांजली वाहताना, लोकप्रियतेपेक्षा न्यायप्रियता महत्त्वाची, याचे भान आल्यास बरेच!

Story img Loader