योगेन्द्र यादव

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सत्य महत्त्वाचे आहे, यावर विश्वास ठेवण्यासाठी रवीश कुमार लोकांना प्रेरित करतो. तो लोकांना प्रश्न विचारायला भाग पाडतो की सत्य इतके एकटे असावे का? ते इतके धोकादायक आणि इतके कर्कश असावे का?

रवीश कुमारचे रॅमन मॅगसेसे पुरस्कार घेतानाचे भाषण ऐकताना मला त्याचा अभिमान वाटत होता आणि त्याच वेळी मी अस्वस्थही झालो होतो. आपल्या देशातल्या एका पत्रकाराला हा पुरस्कार मिळाला आहे, म्हणून मला अभिमान वाटला होता असे नाही (प्रामाणिकपणे सांगायचे तर मी एकुणातच पुस्कारांना फारसे महत्त्व देत नाही.), तर रवीश कुमारसारख्या माणसाला हा पुरस्कार मिळाला म्हणून मला तो वाटला होता. आणि मी अस्वस्थ झालो होतो ते तो जे काही बोलला त्यापेक्षाही जे बोलला नव्हता त्यामुळे. 

रवीश कुमारची पत्रकारिता आपल्या काळातील वेदनादायक सत्याचा दाखला आहे. सत्य महत्त्वाचे आहे, यावर विश्वास ठेवण्यासाठी तो तुम्हाला प्रेरित करतो. तो तुम्हाला प्रश्न विचारायला भाग पाडतो की सत्य इतके एकटे असावे का? इतके धोकादायक आणि इतके कर्कश असावे का?

हिंदी माध्यमे

तो त्या भाषणात लहान शहरे आणि खेडय़ांमधील ‘ज्ञानाच्या असमानते’बद्दल बोलत असताना माझे मन १९९४-९५ मध्ये गेले. मी नुकताच चंदीगडहून दिल्लीत आलो होतो आणि दिल्ली विद्यापीठ परिसरात भाडय़ाच्या फ्लॅटमध्ये राहत होतो. येथेच मला हुशार आणि उत्साही विद्यार्थ्यांचा एक गट भेटला.  त्यातले बहुतके जण बिहारमधल्या लहानलहान शहरांमधून आणि खेडय़ांतून आले होते आणि पदवीचे शिक्षण घेत होते. त्यांना एक गंभीर हिंदी मासिक, म्हणजे हिंदीमध्ये ईपीडब्ल्यूसारखे काहीतरी सुरू करायचे होते. त्यांच्यातच एक होता, सडसडीत शरीरयष्टीचा, तरतरीत रवीश कुमार.

हा गट अनेकदा माझ्या फ्लॅटवर भेटत असे आणि आमच्यात भरपूर चर्चा वादविवाद होत. दिल्लीतील सांस्कृतिक आणि भाषिक दरीच्या टोकाला आपण आहोत, या भावनेने आम्हाला एकत्र आणले होते. दिल्लीत आमच्यासारख्यांचा उल्लेख ‘हिंदी माध्यमवाले’ असा व्हायचा.  मी पण तसाच होतो, पण थोडा वरिष्ठ होतो आणि इंग्रजी वर्तुळात माझी थोडीफार दखल घेतली जाऊ लागली होती. कालांतराने त्यांनी ‘देशकाल’ हे मासिक सुरू केले. मी त्यात लिहिलेदेखील. पण अशा अनेक प्रयोगांप्रमाणे ते लवकरच बंदही पडले.

मी रवीश कुमारच्या अगदी जवळचा नव्हतो, पण आम्ही दोघेही एकमेकांशी जोडलेले होतो. मी त्याला पदवीधर होताना बघितले. संशोधक ते बातमीदार आणि नंतर अँकर या सगळय़ा टप्प्यांवर मी त्याला हरएक प्रकारच्या  अडचणींविरुद्ध संघर्ष करताना पाहिले. आम्ही संपर्कात होतो, तसेच आमचे कुटुंबीयही (पत्नी, मुले) नोकरीव्यवसाय, शाळा यानिमित्ताने एकमेकांच्या कायम संपर्कात होते. आम्ही एकमेकांचे मित्र म्हणवून घेण्याइतपत जवळ आहोत, परंतु त्याचा आमच्या व्यावसायिक नातेसंबंधांवर परिणाम व्हावा इतकी जवळीक आमच्यात कधीही नव्हती. माझ्या घरी टेलिव्हिजन नाही, त्यामुळे मी स्वत:ला रवीशचा निष्ठावंत प्रेक्षक म्हणवून घेऊ शकत नाही. परंतु मॅगसेसे पुरस्काराच्या भाषणात त्याने त्याच्या कामाबद्दल ज्या गोष्टींचा उल्लेख केला आहे, त्या सगळय़ा त्याला करताना मी पाहिले आहे.

तो ताठ उभा राहून इंग्रजीत ते भाषण देत होता तेव्हा त्याच्यामधला काहीसा अस्वस्थपणाही मला जाणवला होता, असे मला आता आठवते आहे. तिथे रवीश कुमार नाही, तर हिंदी भाषाच ताठ, उंच उभी आहे, असे मला त्या वेळी वाटले. स्वातंत्र्यानंतर हिंदी पत्रकारितेला आकार देणाऱ्या राजेंद्र माथूर, रघुवीर सहाय आणि प्रभास जोशी यांची मला आठवण झाली. दूरदर्शनवर ‘आजतक’ नावाने ज्यांनी २० मिनिटांचे बुलेटिन सुरू केले त्या सुरेंद्र प्रताप सिंग किंवा ‘एसपी’ यांचीही मला आठवण झाली.  (१९९७ मध्ये त्यांचे निधन झाले. त्यांनी मला दूरचित्रवाणीच्या दुनियेत नेले). इंग्रजीला प्राधान्य आणि हिंदी दुय्यम असे न राहता हिंदी ही प्राधान्याची भाषा असावी, हा त्यांचा ध्यास होता. एसपीने ‘आजतक’साठी ज्यांना निवडले ते सगळे पत्रकार नंतर हिंदीतील उत्तम टीव्ही पत्रकार ठरले. रवीश कुमार त्यातला नव्हता. पण त्याला बघितले असते तर एसपीच्या डोळय़ात त्याच्याबद्दल बोलताना चमक आली असती आणि तो म्हणाला असता, ‘‘मोतिहारी गावचा आहे’’

आशय हाच हुकमाचा एक्का

मॅगसेसे पुरस्कार सोहळय़ात रवीशच्या टेलिव्हिजन कार्यक्रमातील काही क्लिप वाजल्या गेल्या. त्या पाहून एसपीला नेमके काय हवे असायचे, ते जाणवले. ते म्हणजे आशय हाच हुकमाचा एक्का असतो. रवीशची लोकप्रियता हा या गोष्टीचा जिवंत पुरावा आहे. प्राइम टाइमच्या कार्यक्रमाची सुरुवात करताना तो जे काही लांबलचक प्रास्ताविक करत असे ते मी पहिल्यांदा पाहिले तेव्हा मला खरे तर त्याची भीती वाटली. कारण काही सेकंदांपेक्षा जास्त वेळ स्क्रीनवर बोलणे हे टेलिव्हिजन व्याकरणाच्या प्राथमिक नियमांचे उल्लंघन करणारे असते. पण तीनपाच मिनिटांची त्याची प्रस्तावना प्रेक्षकांना खूप आवडे. त्यात भरपूर आकडेवारी असे, तपशील असत,  विडंबन आणि उपहास असे. सत्ताधाऱ्यांची खिल्ली उडवलेली असे. रवीशच्या कार्यक्रमांच्या यशामधून हे सिद्ध झाले की ज्याच्याकडे चांगला आशय असतो त्याला कुणाची नक्कल करायची गरज नसते. तो स्वत:च हा आशय विकसित करत नेतो.

रवीशने लाखो प्रेक्षकांचे आभार मानले तेव्हा मला त्यांचे चेहरे दिसत होते. खरे सांगायचे तर, मला प्राइम टाइमचा टीआरपी काय आहे हे माहीत नाही, आणि मला ते माहीत करून घ्यायचेही नाही. पण मला हे माहीत आहे की मी दिल्लीबाहेर फिरतो आणि आदर्शवादी तरुणांशी, महत्त्वाकांक्षी पत्रकारांशी किंवा तळागाळात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांशी बोलतो तेव्हा माझ्या लक्षात येते की अगदी रवीशलाही भीती वाटेल अशा पद्धतीने ते रवीशची भक्ती करतात.

‘‘सर, ज्याच्यामध्ये खरे बोलण्याची हिंमत आहे, असा तो माणूस आहे’’ ही रवीशबद्दलची सगळीकडे ऐकायला येणारी प्रतिक्रिया आहे. अर्थात असे म्हणणे हे हिंदीमधल्याच नाही तर इतर सगळय़ाच भाषांमधल्या अनेक पत्रकारांवर अन्याय करणारे आहे. कारण तेदेखील तितकेच धाडसी आणि सत्यवादी आहेत. पण त्यांना रवीशला मिळाले तसे एनडीटीव्हीसारखे व्यासपीठ मिळत नाही की संस्थात्मक पािठबा मिळत नाही. आणि हाच मुद्दा रवीशने त्याच्या भाषणात मांडला हे मला फार महत्त्वाचे वाटते.  त्यामुळेच रवीश कुमारसारख्या पत्रकारांचा पंथ आपल्याला खात्री देतो की सत्योत्तर काळ (पोस्ट-ट्रुथ एज) असे काहीही असत नाही (सत्योत्तर राजकारण आणि सत्योत्तर माध्यमे या दोन्ही गोष्टी वेगवेगळय़ा आहेत.), तर फक्त सत्याची भूक असते.

भारतीय माध्यमांमधला अंधकार

रवीश म्हणाला की, ‘‘बातमी खरी असते, सच्ची असते, तेव्हाच लोकशाही विकसित होऊ शकते’’. या वर्षी माध्यम स्वातंत्र्याच्या जागतिक निर्देशांकात भारत १३८ व्या क्रमांकावरून १४० व्या स्थानावर (१८० देशांपैकी) घसरला आहे. रवीशने काश्मीरमधूनही बातमीदारी केली आहे. पण तो म्हणतो हे सगळे तिथल्या बातमीदारीपुरते नाही, हे सगळीकडेच आहे. आठवडय़ाभरापूर्वीच, शाळांमधील मध्यान्ह भोजनाबद्दल सत्य सांगणाऱ्या पत्रकाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. रवीशने या प्रसंगाचा उल्लेख केला. तडजोड न करणाऱ्या पत्रकारांची दुर्दशा अधोरेखित करून अशा पत्रकारांना वृत्तसंस्थांनी त्यांच्या नोकऱ्यांमधून काढून टाकले आहे, हे सांगितले.

गेल्या १० वर्षांमध्ये अशा नोकरी सोडावी लागणाऱ्यांची संख्या मोठी आहे. अजित अंजुम आणि स्मिता शर्मा यांनी टीव्ही नाइन भारतवर्ष सोडले, फेय डिसोझा यांनी मिरर नाऊमधील त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आणि नितीन सेठी यांनी बिझनेस स्टँडर्ड सोडले. त्यांना हुसकावून लावण्यासाठी कोणीही मालक किंवा सरकारला दोष दिलेला नाही. पण या घटनांमधून जाणारा संदेश मोठा आणि अशुभ आहे. आपण प्रामाणिकपणाची तेजस्वी ठिणगी म्हणून रवीशचे कौतुक करतो, पण आज भारतीय प्रसारमाध्यमांमध्ये त्याच्याभोवती असलेल्या अंधारावर आपण भाष्य करत नाही, त्याचे काय?

याबाबतीत मी काहीच करू शकत नाही, पण माझ्या लक्षात आले की रवीशचे केस अकाली पांढरे झाले आहेत. त्याला पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्याच्या काही समव्यावसायिकांकडून त्याला त्रास दिला गेला. त्याचे पद्धतशीरपणे ट्रोलिंग झाले, शिवीगाळ झाली. धमक्या दिल्या गेल्या. हे सगळे वर्षांनुवर्षे सुरू असेल तर त्याचा परिणाम होणे यात नवल ते काहीच नाही.

आणि शेवटी त्याच्या भाषणामधला तो दु:खद पण अंतिम मुद्दा: ‘‘सर्व युद्धे जिंकण्यासाठी लढली जात नाहीत. काही युद्धे युद्धभूमीवर कोणीतरी आहे हे जगाला कळावे म्हणून लढली जातात.’’ रवीशबाबतचा माझ्या उशिरा लक्षात आलेला हाच मुद्दा आहे का? त्याला झालेला निराशेचा स्पर्श.. तो जरा जास्तच तीक्ष्ण स्वरात येतो आहे का?

त्याला हे एकदा विचारायला हवे.

लेखक ‘जय किसान आंदोलन’ आणि ‘स्वराज इंडिया’चे संस्थापक आहेत.

yyopinion@gmail.com