‘आतापर्यंत जे लिहिलंय ते श्रेष्ठ नाही’ असं समजूनच लिहितं राहणाऱ्या विनोदकुमार शुक्ल यांना ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार जाहीर झाल्यानंतरही त्यांचा साधेपणा कायम आहे…

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत वाचा

‘मला खूप लिहायचं होतं पण मी फारच कमी लिहू शकलो. आपल्या आयुष्याचा पाठलाग लेखनाच्या माध्यमातून करावा असं मला मनोमन वाटतं पण आयुष्य मोठ्या गतीनं कमी होण्याच्या मार्गाला लागलेलं आहे, लेखनाचा वेग मात्र मी तेवढा वाढवू शकत नाही…’ ज्ञानपीठ जाहीर झाल्यानंतर विनोदकुमार शुक्ल यांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेत कमालीची सहजता आहे. सामान्यपणे एखादा मोठा सन्मान जाहीर झाल्यानंतर संबंधिताच्या प्रतिक्रियेत अनेकदा अभिनिवेश जाणवू लागतो. आता तर साधं चार माणसांत बोलतानाही जणू कायम आपल्यासमोर कॅमेरेच लागलेले आहेत अशा देहबोलीत माणसं व्यक्त होतात.

स्वत:च्या लेखनाबद्दल जराही चढा सूर न लावता, बाजारातल्या सगळ्या गजबजाटापासून स्वत:ला कमालीचं अलिप्त ठेवूनच विनोदजी यांनी मौलिक असं लिहिलं आहे. त्यांच्या गद्या लेखनाची जी भाषा आहे ती प्रवाही, नितळ आणि पारदर्शी… त्याच भाषेत ते बोलतात. वर्ध्याच्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठात अतिथी लेखक म्हणून काही काळ विनोद कुमार शुक्ल यांचं वास्तव्य होतं. त्याचवेळी त्यांना भेटणं झालं नाही. २०१९ च्या फेब्रुवारीत २३-२४ ला गजानन माधव मुक्तिबोध यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने छत्तीसगडमधल्या राजनांदगावला चर्चासत्र होतं. तोवर विनोदजी महाराष्ट्रातले वास्तव्य संपवून रायपूरला परत गेले होते.

राजनांदगाव ते रायपूर ७० ते ८० किलोमीटर. कवीमित्र प्रफुल्ल शिलेदार यांनी त्यांच्याशी संपर्क साधला. रायपुरातल्या शैलेंद्र नगरात त्यांचं घर गाठलं. समोर साक्षात विनोदजी… पुढचे तीन- चार तास त्यांच्या जादूई अस्तित्वाने भारलेले. त्या गप्पांवर आधारित ‘आकाश धरती को खटखटाता है’ या शीर्षकाचा एक दीर्घ लेख त्याच वर्षीच्या ‘लोकसत्ता’च्या दिवाळी अंकात आहे. (पुढे तो हिंदीत अनुवादित होऊन ‘ज्ञानोदय’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाला.)

विनोदजी कवी म्हणून श्रेष्ठ आहेतच पण त्यांच्या कादंबऱ्यांची मौलिकताही तेवढीच आहे. या दोन्ही साहित्य प्रकारांवर त्यांची खास अशी मुद्रा आहे. नजरेच्या एका टप्प्यात मोठ्या पटलावरचं दृश्य दिसावं पण त्या दृश्यात झळाळणारं, अद्भुुत चमकणारं काहीतरी चटकन नजरेत यावं अशी ही कविता आहे. एखादी गोष्ट क्षणिक चकाकून जावी आणि अदृश्य व्हावी; पण ती अनुभूती मात्र कायम आपल्या जवळच राहावी अशी जादू या कवितेत आहे. गद्या ओबडधोबड असतं पण कवितेचं तसं नाही. कवितेत एक सघनता असते. गद्या लिहायला घेता येतं पण असं कवितेच्या बाबतीत होत नाही. त्यांच्याच शब्दात आणखी स्पष्ट करून सांगायचं झालं तर ‘गद्या एक बहाना है कविता लिखने का’… खळाळत्या प्रवाहासारखी विनोदजींची कविता वाहती आहे. तिच्यात सहजता आहे.

मानवी संबंधांमधली ओल कायम टिकावी यासाठी ही कविता माणसाच्या अस्तित्वाशी जोडलेल्या आकांक्षांचा वेध घेते. मानवी जीवनासंबंधीची कमालीची आस्था हा या कवितेचा विशेष आहे. ‘मुझे बचाना है एक एक कर अपनी प्यारी दुनिया को’ ही या कवितेची आशा आहे. या कवितेच्या साधेपणात एक विलक्षण सौंदर्य आहे आणि वाचकाला स्तिमित करण्याचं सामर्थ्यही. ‘आजकल मैं उठने के लिए सिर्फ नींद पर भरोसा करता हूं’, ‘अपने हिस्से में लोग आकाश देखते है’, ‘परछाई को नदी के पानी में तैरना आता है’ या वेगवेगळ्या कवितांमधल्या काही ओळींवरूनही याची प्रचीती येईल. गेल्याच वर्षी त्यांचा ‘एक पूर्व में बहुत से पूर्व’ हा कवितासंग्रह आला, त्यात आदिवासी जीवनाला स्पर्श करणाऱ्या कविता मोठ्या संख्येनं आहेत.

‘दीवार में एक खिडकी रहती थी’ ही विनोदजी यांची चर्चेतली कादंबरी. वास्तव आणि कल्पिताच्या अद्भुुत अशा रचनेतून ती साकारलेली आहे. या कादंबरीत ना उलथापालथ आहे ना वेगवान अशा नाट्यपूर्ण घडामोडी. रघुवरप्रसाद आणि सोनसी हे एक नवविवाहित जोडपं. रघुवर प्रसाद हे प्राध्यापक. एका छोट्या खोलीतला असलेला दोघांचा संसार. याच खोलीच्या भिंतीत एक छोटी खिडकी आहे, जिच्यातून उडी मारून रघुवरप्रसाद आणि सोनसी बाहेर पडतात. या खिडकीच्या पलीकडे असलेल्या जगात नदी आहे, डोंगर आहेत, तलाव आहे, त्या तलावात फुललेली कमळं आहेत. हे जग जणू स्वप्नवत आहे.

‘नौकर की कमीज’चं कथानक विनोदजींच्या खास आस्थेचं. एका कनिष्ठ मध्यमवर्गीयाची ही गोष्ट. संतूबाबू हे एका सरकारी कार्यालयातले कारकून. ते इमानदार आहेत पण त्यांचं तसं असणंच मुळात व्यवस्थेत गैरलागू ठरतं. घर ते कार्यालय या दोन टोकांवरचा संतूबाबूंचा प्रवास. कार्यालयाला ज्या दिवशी सुट्टी असते त्या दिवशीही ते अस्वस्थ असतात. हा दिवस त्यांना बेकारीची आठवण करून देतो. सुट्टीच्या दिवशीही कार्यालयात जाऊन ते आपली नोकरी सुरक्षित असल्याची खातरजमा करत असतात. व्यापक अर्थानं पाहिलं तर सामान्य माणूस आणि व्यवस्था यांच्यातल्या झटापटीचं सूत्र या कादंबरीला आहे असं लक्षात येईल. ‘कितना सुख था की हर बार घर लौटकर आने के लिए मैं बार-बार घर से निकलूंगा’ या बिंदूपासून ही कादंबरी सुरू होते. आतून कुरतडलेलं नोकरशाहीचं जग आणि या व्यवस्थेशी विद्रोह करणारा सामान्य माणूस यामुळे ही कादंबरी वाचकांच्या लक्षात राहाते.

‘नौकर की कमीज’च्या मराठी अनुवादाच्या पहिल्या आवृत्तीला विष्णू खरे यांनी जी प्रस्तावना लिहिली त्यात त्यांनी ‘कनिष्ठ मध्यमवर्गाची विसंगती गाथा’ असं या कादंबरीचं वर्णन केलं आहे. या कादंबरीच्या निर्मितीमागचं कारणही उल्लेखनीय आहे. विनोदजी यांना मुक्तिबोध फेलोशिप मिळाली होती. एक वर्षाची सुट्टी घेऊन ही कादंबरी लिहायची होती. त्यावेळी महिन्याला एक हजार रुपये मिळणार होते. १९७० च्या दशकात हे पैसे खूप होते. बरेच लोक टायपिंग मशीनवरच लिहितात तर आपणही टायपिंग शिकावं या विचारातच त्यांचे सहा महिने निघून गेले. कादंबरीची एकही ओळ लिहून झाली नाही. त्यावेळचेे सांस्कृतिक सचिव अशोक वाजपेयी यांना त्यांनी कळवलं की सहा महिने झाले तरी मी काहीही लिहिलं नाही. हे सहा हजार रुपये मी परत करू इच्छितो. त्यावर तुम्ही लिहा किंवा लिहू नका, आम्ही तुम्हाला ही फेलोशिप दिलीय. असं वाजपेयी यांचं उत्तर आलं. अजूनही आपल्या हातात सहा महिने आहेत असा विचार विनोदजींनी केला आणि ही कादंबरी पूर्ण केली.

‘खिलेगा तो देखेंगे’ या कादंबरीतला गाव, त्या गावातली माणसं एकाच वेळी वास्तवाच्या पटलावर आणि कल्पनेतही जगत असतात. वास्तवातल्या जगाचे कोणतेच रूढ नियम या माणसांना नाहीत. जणू एका जादूई गावातच कादंबरीचं कथानक घडतं. कादंबरीच्या प्रत्येक प्रकरणाची सुरुवात काव्यात्म अशा ओळींनी होते.

अतिशय कमी लघुकथा लिहून विनोदजींनी या साहित्य प्रकारातही आपले वेगळेपण कायम ठेवलं आहे. ‘महाविद्यालय’ हे त्यांचे लघुकथांचे संकलन याचे उदाहरण आहे. ‘बोझ’ आणि ‘रुपये’ या त्यांच्या कथा पुन्हा कनिष्ठ मध्यमवर्गीय जीवनाचेच चित्रण करतात. या माणसांच्या आयुष्यात पैशाला असलेले मोल आणि आपल्या मिळकतीसाठी त्यांना करावा लागणारा संघर्ष मुळातून वाचावा असा आहे. ‘पेड पर कमरा’ ही त्यांची कथा माणूस आणि निसर्गाच्या साहचर्याची कथा आहे. अतिशय संक्षेपाने ते वैशिष्ट्यपूर्ण असा अनुभव कथेच्या माध्यमातून वाचकांसमोर ठेवतात.

मणि कौल यांनी त्यांच्या ‘बोझ’, ‘पेड पर कमरा’ या कथांवर लघुपटांची निर्मिती केली. ‘नौकर की कमीज’वरसुद्धा त्यांनी चित्रपट केला. ‘दीवार में एक खिडकी रहती थी’ या कादंबरीवरही मणि कौल यांना चित्रपट करायचा होता. त्यांनी इंग्रजी पटकथाही लिहून ठेवली होती. पण एके दिवशी विनोदजींना त्यांचा फोन आला. म्हणाले, मी आता तुमच्याकडे येऊ शकणार नाही आणि हा चित्रपटही आता बनवणं शक्य नाही. विनोदजींना वाटलं चित्रपटासाठी काही आर्थिक अडचण असेल. तुम्हाला जेव्हा चित्रपट करायचा तेव्हा करा असं त्यांनी सांगितलं. त्यावर मणि कौल यांचं उत्तर विनोदजींनाही चटका लावणारं होतं. ‘हा चित्रपट आता मी करू शकणार नाही. माझी पटकथा सांभाळून ठेवा, कोणाला देऊ नका, दाखवू नका… मला कॅन्सर झालाय. आता मी तुमच्याशी बोलतोय पण मला बोलतानाही खूप त्रास होतोय.’

या पटकथेचं आता पुढं काय असं जेव्हा खुद्द विनोदजींना विचारलं होतं तेव्हा त्यांनी सांगितलं, ‘मणि कौल यांची मुलगी शांभवी यांच्याकडे ती स्क्रिप्ट मी देऊन टाकली. त्या स्क्रिप्टची झेरॉक्स प्रत माझ्याकडे आहे पण ती असून नसल्यासारखी. मी ती कोणालाही दाखवत नाही.’ …श्रेष्ठ साहित्याबद्दल आपणास काय वाटतं या प्रश्नावर अतिशय साधं जीवनमान असलेल्या आणि कायम जमिनीवर असणाऱ्या या लेखकाचं उत्तर असतं, ‘आपण आतापर्यंत जे लिहिलंय ते श्रेष्ठ नाही असं समजूनच चाललं पाहिजे. कोणताच लेखक त्याच्या आयुष्यातलं सर्वश्रेष्ठ लेखन करत नाही. पुन्हा पुन्हा लिहिण्याचं तेच तर कारण असतं. आपण लिहिलेलं वजा करून सर्वश्रेष्ठ असं लिहिण्याची जबाबदारी ही येणाऱ्या पिढ्यांची आहे असं मानलं पाहिजे.’

लेखक साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त साहित्यिक आहेत.

aasaramlomte@gmail.com

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article about simplicity of hindi writer vinod kumar shukla after selected for 59th jnanpith award zws