योगेन्द्र यादव

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुरोगामी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते आणि स्वराज इंडिया अभियानाचे महासचिव संजीव साने म्हणजे आम्हा सगळ्यांचे संजूभाई. आपल्या सहकाऱ्यांना वैचारिक धाकाबरोबरच प्रेमाच्या धाकात बांधून ठेवण्याचे कौशल्य त्यांच्याकडे होते.

मृत्यूच्या काही तास आधी संजीव साने यांनी त्यांचा मुलगा निमिष याला फोन करून कागद आणि पेन मागितले. दीड वर्ष कॅन्सरशी झुंज देत असलेले संजीव साने आयसीयूमध्ये दाखल होते, ऑक्सिजनवर होते, त्यांना बोलता येत नव्हते. त्यांचे हृदय आणि यकृत प्रतिसाद देईनासे झाले होते. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्याची चर्चा सुरू होती. या परिस्थितीत त्यांनी आपला अंतिम निर्णय आपल्या हस्ताक्षरात लिहून दिला. तो या लेखासोबत पत्ररूपात आहे. त्यांच्या कुटुंबाने त्यांच्या इच्छेचा आदर केला. दुसऱ्या दिवशी म्हणजेच २८ ऑक्टोबर रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

असे होते संजीव साने; म्हणजेच आम्हा सर्वाचे संजूभाई. मी त्यांना पहिल्यांदा भेटलो ते ३० वर्षांपूर्वी. त्यांच्या माध्यमातूनच मला महाराष्ट्राची समाजवादी परंपरा कळली. या परंपरेत वाढलेल्या अनेक आदर्शवादी तरुणांबद्दल मला त्यांच्याकडूनच समजले. राजकारणात संस्कृती आणि सौंदर्य कसे सामावून घेतले जाऊ शकते, तत्त्वांमधील खंबीरपणा आणि संघटनात्मक वर्तनातील उदारता यांचे महत्त्व मी त्यांच्या माध्यमातूनच शिकलो. आयुष्याच्या अखेरीस नियतीला कसे सामोरे जायचे असते, याची प्रेरणादेखील मला त्यांच्याकडूनच मिळाली आहे.

मला आठवते की, मी पहिल्यांदा त्यांच्याकडे आकर्षित झालो ते त्यांच्या गाण्यामुळे. बऱ्याचदा चळवळींच्या वेगवेगळय़ा समूहांमध्ये वेगवेगळी गाणी गायली जातात, परंतु ती अशा आवेशपूर्ण पद्धतीने गायली जातात की ती ऐकणे त्रासदायक वाटते. संगीत, कला आणि साहित्य यांच्याकडे चळवळींमध्ये केवळ उपयोगितावादातून बघितले जाते.  वेळ घालवण्यासाठी आणि वातावरणात उत्साह निर्माण करण्यासाठी गाण्यांचा वापर केला जातो. अशा परिस्थितीत मी संजूभाईंनी गायलेला महात्मा फुले यांचा ‘स्त्री-पुरुष सर्व कष्टकरी व्हावे’ हा अखंड ऐकला तेव्हा माझ्यासाठी ते सुखद आश्चर्य होते. संध्याकाळच्या मैफिलीत त्यांनी गझलही ऐकवली. हळूहळू मला समजायला लागले की ते फक्त उत्तम गायक नव्हते, तर संगीत हा त्यांच्या राजकारणाचा अविभाज्य भाग होता आणि त्यांच्या राजकारणात नेहमीच एक प्रकारचे माधुर्य होते.

त्यांच्या माध्यमातून माझी ओळख युवक क्रांती दल, समता आंदोलन आणि राष्ट्र सेवा दलाशी झाली. त्या दिवसांत मी किशन पटनायक यांच्या नेतृत्वाखालील समता संघटनेचा सदस्य होतो आणि राष्ट्रीय समाजवादी पक्ष सुरू करण्याच्या चर्चेतही सहभागी होत होतो. अशा परिस्थितीत महाराष्ट्राच्या समाजवादी आघाडीची स्थापना झाली आणि भाई वैद्य यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम तरुण समाजवादी कार्यकर्त्यांची ओळख झाली. युक्रांदचे सुभाष लोमटे, समता चळवळीतील महम्मद खडस, निशा शिवूरकर, संजय मंगो, गजानन खातू यांना जाणून घेण्याची संधी माझ्यासाठी खूप मोठी होती. त्याआधी माझा परिचय होता तो उत्तर भारतातील समाजवाद्यांशी, विशेषत: लोहियांच्या अनुयायांशी. ते सगळे आदर्शवादी होते आणि त्यांनी सगळय़ांनी प्रखर संघर्ष केलेला होता. पण असे असूनही, त्यांच्या कामाच्या पद्धतीत एक प्रकारची अराजकता आणि बेशिस्त होती. ती मला अजिबात आवडायची नाही. महाराष्ट्रातील समाजवाद्यांमध्ये मला त्यांच्या संघर्षांसोबतच शिस्त दिसली, मर्यादित शब्द वापरूनही आपले म्हणणे नीटपणे मांडण्याचा वैचारिक खंबीरपणा दिसला, पद्धतशीरपणे काम करण्याची त्यांची शैलीही जाणवली.

आम्ही सगळय़ांनी मिळून १९९५ मध्ये समाजवादी जन परिषदेची स्थापना केली. त्याचे पहिले संमेलन ठाणे या मुंबईशेजारच्या शहरातच झाले. संजूभाई तिथेच राहात. तिथले त्यांचे काम पाहून मी त्यांचा चाहता आणि मित्र झालो. तिथे त्यांच्या कुटुंबाशीही ओळख झाली. त्यांची पत्नी आणि त्यांच्या संघर्षांतील त्यांची जोडीदार नीता यांचा सहवास आणि स्नेह मिळाला. हळूहळू त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे इतर पैलू उलगडू लागले. रेिमग्टन या कंपनीत काम करताना त्यांनी तेथील कर्मचाऱ्यांना संघटित केले होते. हे संघटन इतके जबरदस्त होते की वेळ आल्यावर कंपनी चालवण्याची जबाबदारीदेखील या कर्मचाऱ्यांनी स्वत:च्या खांद्यावर घेतली. ठाणे शहरात कधीही, कसलीही अडचण आली तर संजूभाई २४ तास उपलब्ध होते. कोविडच्या काळात सुरुवातीचे काही महिने संजूभाईंनी जवळपास ७०० स्थलांतरित मजुरांना नियमितपणे जेवण पुरवले. त्या काळात अनेक कामगारांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला होता. त्यांच्यासाठीदेखील संजूभाई पहाडासारखे उभे राहिले. सुरुवातीचे सहा महिने त्यांनी ७५ कार्यकर्त्यांना दरमहा पाच हजार रुपये दिले.

संजूभाई आपल्या तत्त्वांबाबत, भूमिकांबाबत अत्यंत ठाम असत. पण या ठामपणातून येणारा कडवटपणा त्यांच्यात नव्हता. त्यामुळे आपल्या सहकाऱ्यांबाबत त्यांच्या मनात कमालीचा जिव्हाळा होता, प्रेम होते. त्यांच्या या स्वभावामुळेच समाजवादी परिवारामध्ये संजूभाईंना विशेष स्थान होते. प्रदीर्घ राजकीय प्रवासात त्यांचा सोबती होण्याचे भाग्य मला लाभले. आधी समाजवादी जन परिषदेत, मग आम आदमी पक्षात आणि नंतर स्वराज अभियान आणि स्वराज इंडियात आम्ही एकमेकांबरोबर होतो. माझ्यासाठी ते एखाद्या मोठय़ा भावासारखे होते. राजकारणातील गुंतागुंतीच्या प्रश्नांवर मी नेहमीच त्यांच्याकडून सल्ला घ्यायचो. वैचारिक मतभेद व्यक्त करायला त्यांनी कधीच मागेपुढे पाहिले नाही. स्वराज इंडियामध्ये काम करताना महाराष्ट्र केंद्राकडून एखादा असहमतीचा प्रस्ताव येईल याची आम्हाला खात्री असायची आणि त्याची भीतीही वाटायची. कारण महाराष्ट्र केंद्राकडून एखादा असहमतीचा प्रस्ताव येणे म्हणजे काय ते आम्हाला माहीत असायचे. त्या असहमतीच्या भूमिकेमागे असलेल्या संजूभाईंच्या बुद्धीचा आम्हाला धाक असायचा. पण अनेक गोष्टींबाबत मतभेद असले तरी एखादी गोष्ट तुटेपर्यंत ताणायचा आग्रह त्यांनी कधीच धरला नाही. त्यांच्या स्वभावातील या वैशिष्टय़ामुळे त्यांचे संबंध केवळ समाजवादी चळवळी आणि संघटनांपुरते मर्यादित नव्हते, तर कम्युनिस्ट चळवळी आणि इतर पक्षांमध्येही त्यांच्याविषयी विशेष आदर होता. त्यामुळेच त्यांच्या अंत्ययात्रेत ‘लाल सलाम’च्या घोषणाही देण्यात आल्या.

संघटनेच्या सर्व प्रकारच्या कामांमध्ये व्यग्र असतानाही संजूभाईंनी वैचारिक भूमिका घेण्यासाठीच्या तयारीचे महत्त्व कमी होऊ दिले नाही. कार्यकर्त्यांच्या वैचारिक प्रशिक्षणाला त्यांनी नेहमीच महत्त्व दिले. फुले-आंबेडकर तसेच गांधीवादी विचारसरणी पुढे नेण्यात संजूभाई नेहमीच अग्रेसर असत. दर एक-दोन महिन्यांनी मला त्यांच्याकडून निरोप यायचा की अमुक ठिकाणी व्याख्यानमाला आहे, आणि तुम्हाला तिथे जाऊन भाषण करायचे आहे. मला त्यांच्या या प्रेमळ आदेशाचे पालन करावेच लागायचे. त्यांच्यामुळे आणि इतर समाजवादी मित्रांमुळे मला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन तेथील राजकीय तसेच बौद्धिक क्षेत्रातील लोकांना भेटण्याची संधी मिळाली.

काही महिन्यांपूर्वी संजूभाईंची शेवटची भेट झाली तेव्हा त्यांना कॅन्सरचे निदान झाले होते. त्यांची केमोथेरपीची एक फेरी झाली होती. ते नेहमीसारखेच मजेत होते. त्यांच्या आजारपणाबाबत थोडा वेळ चर्चा केल्यानंतर ते म्हणाले, आता ते सगळे सोडा आणि देशात काय चालले आहे ते सांगा. जातीवाद आणि फॅसिझमच्या वाढत्या धोक्याची चिंता सतत त्यांच्या मनात असे. त्यांच्याबरोबर बराच वेळ घालवून मी परत निघालो तेव्हा मी त्यांना म्हणालो की, आपण आपले एकत्र छायाचित्र काढू या. तेव्हा ते खुर्चीवर बसले होते. मी त्यांना म्हणालो की आपण बसूनच छायाचित्र काढू या. पण त्या आजारापणातही बसून छायाचित्र काढायचे नाकारून ते उभे राहिले. ते छायाचित्र अजूनही माझ्या मनात कोरलेले आहे. संजूभाई आयुष्यभर प्रत्येक आंदोलकाच्या पाठीशी ठाम राहिले. त्यांच्या जाण्याने केवळ महाराष्ट्रातीलच नाही तर देशभरातील पुरोगामी चळवळीची कधीही भरून न येणारी हानी आहे.

अलविदा संजूभाई, तुमचे संगीत माझ्या कानात नेहमी गुंजत राहील.

लेखक ‘जय किसान आंदोलन’ आणि ‘स्वराज इंडिया’चे संस्थापक आहेत.

yyopinion@gmail.com

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article about social worker and general secretary of swaraj india abhiyan sanjeev sane zws