केरळच्या एर्नाकुलम आणि इडुक्की जिल्ह्यांच्या सीमेवरल्या थट्टेकडच्या जंगलातून गेल्या २४ वर्षांत सुधाम्मा कधी फारशा बाहेरच पडलेल्या नाहीत. एकविसाव्या शतकात आजवर त्यांचा व्यवसाय या जंगलावरच अवलंबून आहे. थट्टेकड पक्षी अभयारण्यातल्या त्या मार्गदर्शक- ‘गाइड’ आहेत. ६४ वर्षांच्या सुधाम्मा यांनी याच अभयारण्यात पक्ष्यांच्या एकंदर १६५ प्रजाती पाहिल्या आहेत… आणि जगभरच्या पक्षी-निरीक्षकांना इंग्रजीत या पक्ष्यांची माहिती दिली आहे. यंदा त्यांच्या या कामाचा गौरव, ‘पी व्ही. थम्पी स्मृती पर्यावरण-रक्षण पुरस्कारा’ने होणार आहे.
हा पुरस्कार तसा साधाच- त्याची रक्कमही फार नाही… ५० हजार रुपये रोख. पण गेली २७ वर्षे दिल्या जाणाऱ्या या पुरस्काराची प्रतिष्ठा केरळसाठी मोठीच आहे. हिरव्याकंच वनराजीने नटलेल्या या राज्याचे नैसर्गिक वेगळेपण राखण्यासाठी जे साधेसुधे लोक निष्ठेने कार्यरत असतात, त्यांनाच हा पुरस्कार दिला जातो! तरुणपणीच हुशारी दिसणे नाही, शिष्यवृत्त्या नाहीत, पुढे संधीही नाहीतच… असा अगदी साधा जीवनप्रवास असलेल्या व्यक्तीसुद्धा प्रेरणास्थान ठरू शकतात, हेच हा पुरस्कार जगाला दाखवून देतो. त्यात सुधाम्मांचा संघर्ष दुहेरी, त्यामुळे त्यांचा जीवनप्रवास अधिकच प्रेरक.
हेही वाचा >>> व्यक्तिवेध : पं. रामनारायण
विवाहानंतर १९७१ साली त्या थट्टेकडच्या जंगलात आल्या. त्यांचे पती चहाचा ठेला चालवत. इथे पक्षी अभयारण्य १९८३ साली घोषित झाले, त्याआधी फारसे पर्यटक नसत. पण पर्यटकांचा ओघ वाढला, तोच पतीचे निधन झाले. सुधाम्मांनी वृद्ध आईच्या मदतीने चहाचा ठेला तर चालवलाच शिवाय खाद्यापदार्थ रांधून त्यांची विक्रीही सुरू केली. मग इथे ‘पक्षीनिरीक्षण शिबिरा’साठी येणाऱ्या शहरी लोकांना जेवण- चहानाश्ता देण्याचे काम त्या करू लागल्या. रांधणे-वाढण्याचे काम संपल्यावरही, शिबिरार्थींशी मार्गदर्शकांचे सुरू असलेले इंग्रजी संभाषण सुधाम्मा कुतूहलाने ऐकू लागल्या. ज्येष्ठ पक्षीनिरीक्षक आणि शिबीर-मार्गदर्शक आर. सुगथन यांनी हे कुतूहल- आणि त्यामागचे स्थानिक ज्ञानही- हेरले आणि पक्ष्यांबद्दल इंग्रजीत बोलण्यास प्रोत्साहन दिले. काही काळ शिकून सुधाम्मा परदेशी पक्षी-निरीक्षकांनाही या अभयारण्याची माहितीपूर्ण सफर घडवू लागल्या. हल्ली त्या ‘होमस्टे’देखील चालवतात. मल्याळम आणि इंग्रजी बोलणाऱ्या सुधाम्मांना फ्रेंच, तमिळ, हिंदी संभाषणही समजते; आणि बऱ्याचदा तर पक्ष्यांची भाषासुद्धा कळते! मध्यंतरी सुधाम्मांना गर्भाशयमुखाचा कर्करोग झाला. पाचदा केमोथेरपी, २५ किरणोत्सार-उपचार हे करावेच लागले तरी ‘जंगल सोडून जाऊ कुठे?’ हेच त्या म्हणत राहिल्या. ‘लाभार्थी’ होण्याऐवजी स्वत:च्या जगण्याचा अर्थ निसर्गाच्या आधाराने शोधणारे सुधाम्मांसारखे लोक केरळमध्ये आजही आहेत, हे त्या राज्याचे खरे वैभव!