मोसमी पाऊस येतो, तसा आंग्ल पुस्तकप्रेमींच्या देशांमध्ये ग्रंथांचा पाऊस कोसळतो. ९८ ते १०० अंश फॅरनहाइट इतके तापमान असलेल्या इथल्या काही प्रदेशांत उकाड्याने हाश्श-हुश्श करणारे लोक सालाबादप्रमाणे यंदाही समुद्रकिनारी क्रेटांच्या हिशेबात बीअर आणि ‘उन्हाळ पुस्तकां’चे बास्केट घेऊनच निघालेली दिसताहेत. म्हणजे आपल्याकडे दिवाळी अंकांतील कथा-कादंबऱ्यांचा सुगीचा काळ जसा, तसाच नेमका अमेरिकेतील (आणि काही प्रमाणात ब्रिटनमधीलही) ‘समर’ कालावधीतील साहित्याचा बाजार तोलावा. पण आपल्याकडे खादाडीसोबत गांभीर्याने अंक वाचणे, त्यावर चर्चा करणे, चांगल्या वाचलेल्यावर चर्चेची परंपरा नाही. तिकडे याउलट वातावरण.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> अन्वयार्थ: चंद्राबाबूंचे चोचले चालतील?

दोन आठवड्यांपासून सारी माध्यमे ‘समर फिक्शन’च्या आवर्जून वाचण्यासाठीच्या याद्या झळकवत आहेत. न्यू यॉर्कर आणि इतर महत्त्वाच्या नियतकालिकांचे कथाविशेषांक येण्यासाठी थोडाच अवधी शिल्लक असताना खूपविक्या लेखकांची वाचनऋतूला ओळखून साहित्यनिर्मिती होत असते. सुझान रिंडल यांची ‘समर फ्रायडेज’, ॲनाबल मोनाहन यांची ‘समर रोमान्स’ आणि एलिसा फ्रिडलॅण्ड यांची ‘जॅकपॉट समर’ या तीन कादंबऱ्या या तिथल्या उन्हाळी वातावरणाला कथेत परावर्तित करणाऱ्या यंदाच्या उन्हाळा स्पेशल कादंबऱ्या आहेत. एकात १९९९ सालातील उन्हाळ्यात घडणाऱ्या अनेक गमतीदार गोष्टी आहेत तर इतर दोन समांतर काळांत कथा घडवते. या मोसमी पुस्तकांमध्ये रोमान्स, थ्रिलर, भूतकथा, रहस्यकथा असला सारा ऐवज असतो आणि त्याला उन्हाळ्याशी जोडण्याची कलाकुसरही लेखकांना अवगत असते. आपल्याकडला आणि तिथला फरक हा की असा वाचनऋतू आपल्याकडे कोणता (दिवाळी अंकाला धरता येत नाहीच) हे आपल्यातल्या वाचकांनाही ठरवता येत नाही आणि प्रकाशकांनाही. त्यामुळे तिथे असे घडते, याबाबत आ वासून आश्चर्य व्यक्त करण्यापलीकडे आपण काही करू शकत नाही.

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article about summer special novels zws