डॉ. उज्ज्वला दळवी

प्रत्येकालाच कधी ना कधी उदास वाटतं, पण औदासीन्य काही महिन्यांतच ओसरतं. त्याहून अधिक रेंगाळलं, तर त्यावर पुरेसे उपचार घ्यावे लागतात..

Two hundred patients of hair loss problem ICMR team in Shegaon
केसगळतीचे रुग्ण दोनशेच्या घरात; ‘आयसिएमआर’चे पथक शेगावात…
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी वैद्य खडिवालेंनी सांगितलेलं सोपे पथ्य
Hundreds of poor patients are receiving free dialysis services at health department hospitals
दुर्गम भागातील रुग्णांसाठी आरोग्य विभागाची ‘टेलीमेडिसिन’ सेवा ठरतेय संजीवनी! सव्वा लाख रुग्णांना झाला फायदा…
Naturopathic Medical Treatment know Ayurvedic Herbal Natural remedies at home
औषधं, गोळ्या घेऊन कंटाळला आहात? जाणून घ्या घरच्या घरी औषधाविना आयुर्वेदिक उपचार कसे कराल?
interesting facts about formation of the himalayas
कुतूहल : हिमालयाची निर्मिती
Winter: Tips to Maintain Respiratory Health
हिवाळ्यात श्वास घेण्यास त्रास होतोय? श्वसनाशी संबंधित आरोग्य कसे जपावे? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात
health benefits of Tilache Laddoos
हिवाळ्यात भरपूर प्रमाणात तिळाचे लाडू का खावेत? वजन कमी करण्यापासून ते रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यापर्यंत तज्ज्ञांनी सांगितले फायदे

चुणचुणीत कवनचा शाळेत दुसरातिसरा नंबर असे. तो उत्तम चित्रं काढी; पोवाडे गाई; वक्तृत्व स्पर्धाही गाजवी. मित्रांचा लाडका होता. कॉलेजात गेल्यावर त्याचा उत्साह घटला. अधूनमधून त्याचा अभ्यास, गाणं, चित्रकला सगळयातला रस जाई; कुठलंही काम एकाग्रतेने जमेनासं होई; उगाचच रडू येई. रात्रीची झोप लागत नसे; दिवसा थकवा येई; भूक जाई; कुठलीही हालचाल करणं त्याच्या जिवावर येई. तीन-चार आठवडय़ांचा तसा कमालीचा निरुत्साही काळ गेला की तो जरा ताळयावर येई; अभ्यासाला लागे; त्याला परीक्षा जेमतेम झेपत. हळूहळू तो एकलकोंडा होत गेला; पंचविशी उलटली तरी लग्नाला तयार होईना. सतत कुठल्याशा जुन्या-दु:खद आठवणी उगाळून, ‘‘मी कमनशिबी आहे; प्रत्येक वेळी घोडचूक करून हातची संधी घालवली. माझं जगणं निरर्थक आहे,’’ म्हणू लागला. त्याचे मित्र तुटले. नातेवाईकही वैतागून त्याच्यापासून दूरच रहू लागले. रात्री तीन वाजता त्याची झोप उडे; जेवणखाण अगदी कमी झालं; वजन घटत चाललं. अलीकडे तो, ‘‘हे निरर्थक जिणं संपवतोच,’’ म्हणू लागला; त्याचे दादा- वहिनी घाबरले; त्याला डॉक्टरांकडे घेऊन गेले.

प्रत्येकालाच कधी ना कधी उदास वाटतं. घटस्फोट; जिवलगाचा मृत्यू, अपयश, अपघाताने आलेलं अपंगत्व वगैरे उघड कारणांमुळे येणारं नैराश्य ही तात्पुरती प्रतिक्रिया असते. ती काही महिन्यांनी आपल्या आपण ओसरते. ती त्याहून अधिक रेंगाळली तरच तिच्यावर उपचार करावे लागतात. पण कवनचा त्रास कारणाशिवाय, अंतर्मनातून उद्भवलेला, अधिक गंभीर, व्यापक होता. त्याला कॉलेजपासूनच अंतर्जात नैराश्याचा ‘आजार’ होता. खोकला- ताप- सांधेदुखी वगैरे ‘राजमान्य’ आजारांवर ताबडतोब उपचार केले जातात. नैराश्याचा त्रास सुरू झाल्यापासून तो आजार असल्याचं मान्य होईपर्यंत सरासरी पाच वर्ष वाया जातात. त्यानंतर सामाजिक बाऊमुळे मनोविकारतज्ज्ञाकडे जाण्यात आणखी दिरंगाई होते.

हेही वाचा >>> चिंतनधारा : एक तरी असु दे अंगी कला!

समाजात मनोविकार लांच्छनास्पद मानले जातात. नैराश्याच्या रुग्णांत प्रचंड न्यूनगंड असतो. ते आपलं नैराश्य सांधेदुखी, डोकेदुखी, अपचन वगैरे शारीरिक व्याधींत लपवतात. त्या छुप्या नैराश्यावर उपचार करायला अनुभवी, जाणते, मनकवडे फॅमिली डॉक्टर लागतात. मग वेळोवेळी मनोविकारतज्ज्ञांच्या सल्ल्याचीही जोड मिळते. शाळकरी नैराश्याची लक्षणंच दिशाभूल करणारी असतात. आठवीतल्या किंजलला विनाकारण अपराधी वाटत होतं. उगाचच भांडून, खोटया बढाया मारून तो शिक्षा ओढवून घेई. ‘अभ्यासात लक्ष नाही; बकाबका खातो; दिवसभर झोपतो,’ म्हणून आईवडलांचा मार खाई. फॅमिली-डॉक्टरांनी नैराश्याचं नेमकं निदान केलं. पण ‘आमच्या मुलाला मानसिक आजार होणं शक्यच नाही!’ ही अजाण आईवडलांची शहामृगी वृत्ती उपचारांच्या आड आली. किंजल एकटा पडला. त्या मानसिक एकटेपणाचं पर्यवसान आत्मघातात झालं. नैराश्यग्रस्तांच्या आत्महत्येचा निर्णय अंतर्जात असतो. त्याला काहीही आणि कोणीही जबाबदार नसतं. जेव्हा आत्मघाताची दांडगी शक्यता वाटते तेव्हा रात्रंदिवस झटणाऱ्या, राष्ट्रीय हेल्पलाइन्सशी आप्तेष्टांनी संपर्क साधावा. गरजेला केटामीन नावाचं नवं औषध किंवा ईसीटी म्हणजे शॉक दिल्याने झपाटयाने सुधारणा होते. 

सध्या जगातल्या २८ कोटी लोकांना नैराश्याचा आजार आहे. तो आजार बहुधा बालपणात-तारुण्यात उगम पावतो. यावर उत्तम औषधं आहेत. पण उपचार सुरू होईपर्यंत उमेदीची बरीच वर्ष फुकट गेलेली असतात. मग आत्महत्येचे मार्ग शोधले जातात. रुग्णासोबत त्याचं सगळं कुटुंबही त्या फुफाटयात होरपळतं. जगभरात दरवर्षी सात लाखांहून अधिक निराश लोक आत्महत्या करतात. १५ ते २९ वर्ष वयोगटातल्या मृत्यूंच्या कारणांत आत्महत्येने चौथा क्रमांक पटकावला आहे. हृदयविकार, पार्किन्सन्स, कर्करोग वगैरेंच्या सोबत नैराश्य असल्यास मृत्युदर दुप्पट होतो. पण अजूनही भारतासारख्या देशात ७५ टक्के नैराश्यग्रस्तांवर उपचार होत नाहीत. 

हेही वाचा >>> व्यक्तिवेध : शोभा भागवत

ज्यांच्या जवळच्या नातेवाईकांना नैराश्याचा आजार असतो; ज्यांचे आई-वडील बालपणीच वारलेले असतात; आप्तेष्टांचाही आधार नसतो; ज्यांचं लहानपण फार कष्टाचं-खडतर गेलेलं असतं; फारसं शिक्षण झालेलं नसतं; ज्यांच्यावर अनेक आघात झालेले असतात; जे चिंतातुर जंतू असतात; ज्यांना वेगवेगळी व्यसनं असतात; ज्यांना जुन्या दु:खद गोष्टी कारणाशिवाय उगाळत बसायची सवय असते; ज्यांचा स्वाभिमान रसातळाला गेलेला असतो अशा लोकांना नैराश्य यायची मोठी शक्यता असते.

भूक मंदावणं किंवा खाखा सुटणं, निद्रानाश वा अति झोपाळूपणा; सारखी चुळबुळ करणं किंवा न हालता बसून राहणं; अपार थकवा वाटणं; जिणं व्यर्थ वाटणं; अपराधी वाटणं; मनाची एकाग्रता अशक्य होणं; सतत आत्महत्येचे विचार येणं यांच्यातली किमान चार लक्षणं दररोज, सतत, निदान दोन सलग आठवडे तरी चालू राहिली आणि त्याशिवाय, पूर्वी आवडणाऱ्या गोष्टींत-छंदांत मुळीच रस वाटेनासा झाला किंवा मन:स्थिती सतत उदास, चिडचिडी राहिली तरच नैराश्याचं निदान करता येतं. त्याला मानसिक आजार म्हणतात खरा पण नैराश्यात मेंदूमध्येही बरेच फेरफार होतात. भावभावनांवर नियंत्रण ठेवणाऱ्या मेंदूकेंद्रांतल्या पेशींमध्ये एरवी सतत विजेरी-रासायनिक संवाद चालतो. त्यासाठी एका पेशीकडून येणाऱ्या विजेरी तारांचे हात दुसऱ्या पेशींच्या  हातांशी जुळलेले असावे लागतात. नैराश्यात त्या पेशींचे ते हात एकमेकींपासून सुटतात; नाहीसेच होतात. पेशींमधला संपर्क तुटतो. संवाद-रसायनांचं मेंदूतलं प्रमाण कमी कमी होत जातं. शिवाय त्या भावनाकेंद्रांचे आकार घटत जातात. नैराश्य जेवढा अधिक काळ उपचाराशिवाय राहतं तेवढं नुकसान अधिक होतं. हे अलीकडच्या नव्या शास्त्रांमुळे, तंत्रांमुळे स्पष्ट होऊ लागलं आहे.

गरोदरपणात-बाळंतपणानंतर सुमारे १० टक्के स्त्रियांना नैराश्य येतं. बाळावर दुष्परिणाम होईल म्हणून त्या औषधं घेत नाहीत; नैराश्यामुळे स्वत:च्या आणि बाळाच्याही प्रकृतीची हेळसांड करतात; बाळाचं कुपोषण होतं; काही वेळा गर्भपात होऊ शकतो; आत्महत्याही संभवते. गर्भावर किंवा स्तनपान करणाऱ्या बाळावर दुष्परिणाम न करणारी औषधं आता डॉक्टरांच्या सल्ल्यानं सहज मिळतात. 

औषधोपचारांसोबत  मानसोपचाराचाही नैराश्यग्रस्तांना फायदा होतो. सौम्य नैराश्यासाठी आधी मानसोपचारच वापरले जातात. मानसोपचारतज्ज्ञ रुग्णाचं मनोगत शांतपणे ऐकून घेतात. तेवढयानंही त्याच्या मनाला आधार मिळतो (सपोर्टिव्ह थेरपी). नैराश्यामुळे प्रत्येक घटनेला रुग्णाकडून नकारात्मक प्रतिक्रिया मिळते आणि नैराश्य वाढत जातं. ते त्याला समजावून त्याची वागणूक सुधारणं म्हणजे कॉग्निटिव्ह- बिहेवियरल- थेरपी ऊर्फ सीबीटी. रुग्णाला भोवतालच्या माणसांचे दृष्टिकोन समजून घ्यायला; आयुष्यातल्या समस्या उकलायला; जुन्या दु:खद आठवणींचा निचरा करायला शिकवणं ही मानसोपचारांची इतर उद्दिष्टं. त्याच थेरपी-काळात रुग्णाला आत्मघातापासून कसं जपावं याबद्दल कुटुंबाचंही शिक्षण होतं. सहा ते आठ आठवडय़ांत फायदा झाला नाही तर औषधं द्यावी लागतात.

हेही वाचा >>> लोकमानस : .. मग ‘उपराजधानी’ या दर्जाला अर्थ काय?

नैराश्यावरच्या औषधांचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यांच्यातल्या सिटॅलोप्रॅम, सट्रॅलिन वगैरे औषधांचा गुण चांगला येतो. त्यांनी सुरुवातीला काहीजणांचं पोट बिघडू शकतं पण गंभीर दुष्परिणाम क्वचितच होतात. त्यांच्यामुळे गर्भाला-बालकांनाही धोका अतिशय कमी असतो. कधी कधी, काही लहान मुलांत-पौगंडावस्थेत त्या औषधांनी सुरुवातीला आत्महत्येचा संभव वाढू शकतो. पण औषध सुरूच न केल्यास आत्महत्येचा धोका अधिकच वाढतो. म्हणून औषधं सुरूच ठेवून त्या काळात मुलांवर विशेष लक्ष ठेवावं लागतं. 

नैराश्यावरची औषधं सुरू केली की संवाद-रसायनं ताबडतोब वाढतात. पण पेशींचे हात हळूहळू वाढून सगळे हस्तमिलाप पूर्ववत व्हायला दहा-बारा आठवडे जातात. त्याच काळात उलटया-जुलाब वगैरे दुष्परिणाम छळतात. ‘‘महिनाभर औषध घेतलं. फायदा दूर, तोटाच झाला,’’ म्हणून रुग्ण औषध बंद करतात. संवाद-रसायनांचं प्रमाण एकाएकी खाली येतं; नैराश्य उफाळून येतं. मेंदूपेशींचा संवाद पूर्ववत व्हायला नैराश्यावरची औषधं काही महिने तरी घेऊन नंतर हळूहळू डोस घटवून बंद करावी लागतात. काहीजणांत त्यानंतरही नैराश्य वाढतं. त्यांनी औषध जन्मभर सुरू ठेवावं.

नैराश्य दारूत बुडत नाही; तरंगून उफाळून येतं. दारूने आत्महत्येचा विचार वाढतो. त्याऐवजी रोज ध्यान करावं, दिवसाढवळया, उन्हात मित्रांबरोबर बागेत फिरायला जावं. त्याचा फायदा होतो. नैराश्य निबिड अंधाऱ्या काळरात्रीसारखं भयावह असतं. पण ध्यान, मित्र, मानसोपचार, औषधं यांच्यामुळे तेजस्वी शुक्रताऱ्याचा प्रकाश दिसतो; आशेच्या-आनंदाच्या पहाटेची चाहूल लागते.

लेखिका वैद्यकीय व्यवसायातून निवृत्त आहेत.

ujjwalahd9@gmail.com

Story img Loader