सिद्धार्थ खांडेकर

मुहम्मद अली व पेले या दोन महान खेळाडूंचे मोठेपण नेमके कशामध्ये आहे?

hitendra thakur slams bjp for marathon
मॅरेथॉन घेण्याची ताकद आहे का? राजकारण करणार्‍या भाजपला हितेंद्र ठाकूरांचा सवाल
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
India vs Australia Border Gavaskar Trophy Australia dominate in second Test sport news
पिछाडीनंतर पडझड, भारतीय फलंदाजांकडून निराशाच; हेडच्या शतकामुळे ऑस्ट्रेलियाचा दबदबा
IND vs AUS Controversial Umpiring Over R Ashwin LBW Appeal as Mitchell Marsh Given Out KL Rahul DRS b
IND vs AUS: राहुल आऊट अन् मार्श नॉट आऊट, तिसऱ्या पंचांचा पुन्हा एकदा भारताविरूद्ध निर्णय; मैदानात नेमकं काय घडलं?
Gus Atkinson Hattrick in Test First Bowler At Basin Reserve in New Zealand vs England Test
Gus Atkinson Hattrick: कसोटी हॅटट्रिक! गस अ‍ॅटकिन्सनने वेलिंग्टनमध्ये घडवला इतिहास, ‘ही’ कामगिरी करणारा ठरला जगातील पहिला गोलंदाज
Jasprit Bumrah becomes first bowler to pick 50 Test wickets in 2024 joins Kapil Dev Zaheer Khan in elite list
IND vs AUS: जसप्रीत बुमराहच्या भेदक गोलंदाजीची कमाल, २०२४ मध्ये कसोटीत ‘ही’ कामगिरी करणारा जगातील पहिला वेगवान गोलंदाज
KL Rahul and Kane Williamson Both Survives on No Ball After Getting Out in IND vs AUS & ENG vs NZ Test
नो बॉल अन् ३७ धावा! ॲडलेड आणि वेलिंग्टन कसोटीत १२ मिनिटांच्या फरकाने घडली आश्चर्यचकित करणारी घटना
Mitchell Starc Gets His Revenge Against Yashasvi Jaiswal After Being Called Slow Watch Video IND vs AUS
IND vs AUS: ‘स्लो बॉल?’ स्टार्कने पहिल्याच चेंडूवर जैस्वालला बाद करत घेतला बदला, पर्थमध्ये मारला होता टोमणा, पाहा VIDEO

गतवर्ष सरताना २९ डिसेंबर रोजी एडसन आरांटेस डो नासिमेंटो यांनी या जगातून एग्झिट घेतली. परवा १७ जानेवारी रोजी कॅशस मार्सेलस क्ले ज्युनियर यांचा ८१ वा जन्मदिन होता. जग या दोघांना अनुक्रमे ‘पेले’ आणि ‘मुहम्मद अली’ या चिरपरिचित नावांनी ओळखते. सध्या ‘गोट’ (ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम – जी-ओ-ए-टी) नामक जे खूळ उठले आहे, ते बिरुद पहिल्यांदा या दोघांनाच तर मिळाले होते ना! दोघेही काळे. १९५० चा उत्तरार्ध आणि जवळपास संपूर्ण १९६० चे दशक त्यांनी भिन्न क्रीडाप्रतलांत हुनर दाखवली. पेलेंनी फुटबॉलच्या मैदानात, तर अली यांनी बॉक्सिंगच्या रिंगणात. तीन वेळा जगज्जेतेपदाची ट्रॉफी जिंकणारे पेले एकमेव. तर हेविवेट बॉक्सिंगमध्ये तीनदा जगज्जेते ठरलेले मुहम्मद अली पहिलेच. यापलीकडे या दोहोंच्या कर्तृत्वाची नेत्रविस्फारक आकडेवारी मांडण्याचा प्रस्तुत लेखाचा उद्देश नाही. ती सर्वत्र भरभरून उपलब्ध आहेच. परंतु त्यांच्या कर्तृत्वाचा प्रभाव त्यांच्या कार्यक्षेत्राबाहेर किती प्रमाणात झिरपला, हे जोखण्याचा हा एक प्रयत्न. दोघेही केवळ क्रीडापटू (स्पोर्ट्समेन) नव्हते, तर क्रीडादूतही (स्पोर्ट्स अँबॅसॅडर) होते. दृश्यकला, संगीत, साहित्य यांच्याप्रमाणेच क्रीडा हाही मानवी संस्कृतीचा अविभाज्य घटक असतो. विशिष्ट सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक, सामाजिक इतकेच नव्हे तर वैचारिक पार्श्वभूमीचे प्रतिबिंब कलाकार, लेखक यांच्याइतकेच क्रीडापटूंमध्ये उमटलेले दिसते. पेलेंचा प्रताप पहिल्यांदा जगासमोर आला, १९५८ मधील विश्वचषकाच्या निमित्ताने. स्वीडनमध्ये झालेल्या त्या स्पर्धेत १७ वर्षीय पेलेंनी उपान्त्य आणि अंतिम सामन्यात गोल झळकावून ब्राझीलच्या पहिल्यावहिल्या जगज्जेतेपदासाठी मोलाचे योगदान दिले. दोनच वर्षांनी रोम ऑलिम्पिक १९६० मध्ये मुहम्मद अलींनी सुवर्णपदक जिंकले. पहिल्याने १७ व्या वर्षी विश्वचषक जिंकला. दुसऱ्याने १८ व्या वर्षी ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकले. दोन महानतम खेळाडूंच्या प्रवासाला जवळपास समांतर सुरुवात झाली, पण त्यांच्या वाटा आणि लढा मात्र पूर्णपणे भिन्न ठरला.

आफ्रो-ब्राझिलियन पेलेंना ब्राझीलच्या गौरबहुल सरकारने ब्राझीलबाहेर खेळूच दिले नाही. पेलेंना ‘राष्ट्रीय संपत्ती’ ठरवले गेले आणि या संपत्तीचे संपूर्ण ‘राष्ट्रीयीकरण’ केले गेले! युरोपात जाऊन सधन होण्याचा पर्यायच पेलेंसमोर उपलब्ध नव्हता. ब्राझीलपेक्षा तुलनेत अधिक उदारमतवादी आणि लोकशाही अमेरिकेत जन्माला येऊनही वर्णद्वेषाचे चटके मुहम्मद अली यांनी लहानपणापासून अनुभवले. या वर्णद्वेषाला, अमेरिकेत त्या वेळी प्रचलित असलेल्या वर्णाधारित विलगीकरणाला चवताळून विरोध करणाऱ्या विविध समूहांचा हुंकारही मुहम्मद अली यांनी जवळून अनुभवला आणि आत्मसात केला. त्यांनी १९६१ मध्ये इस्लाम धर्म स्वीकारला आणि १९६४ मध्ये कॅशस क्ले या ख्रिस्ती नावाचा त्याग करून मुहम्मद अली हे इस्लामी नाव स्वीकारले. कॅशस क्ले हे नाव गुलामगिरीचे प्रतीक (अलींचे वाडवडील ज्या मळय़ात गुलाम म्हणून राबले, त्याच्या मालकाचे नाव) असल्याचे आणि म्हणूनच ते त्यागल्याचे ते जाहीरपणे सांगायचे. पुढे व्हिएतनाम युद्धासाठी सैन्यभरती नाकारून त्यांनी सामाजिक व्यवस्थेबरोबरच राजकीय व्यवस्थेलाही आव्हान दिले. व्हिएतनाम युद्धाला आपला सदसद्विवेकबुद्धी अधिष्ठित विरोध असून, आपल्या धर्मात अशा युद्धाला स्थान नाही असे सांगितल्यामुळे १९६७ मध्ये अली यांच्याविरुद्ध खटला दाखल करण्यात आला. ‘आमच्या लुइसव्हिलमध्ये काळय़ांना जेथे अमानुष वागणूक मिळते, त्या व्यवस्थेने मला गणवेश चढवून हजारो मैल लांब राहणाऱ्या गहुवर्णीयांवर बॉम्ब आणि गोळय़ांचा वर्षांव करण्यास कशासाठी भाग पाडावे? व्हिएतकाँग माझे शत्रू नाहीत. मी हे करणार नाही,’ अशी त्यांची रोखठोक भूमिका होती.  

१९७१ मध्ये अमेरिकी सर्वोच्च न्यायालयाने  ८-० अशा मताधिक्याने खटला रद्दबातल ठरवला खरा, पण तोपर्यंत सरकारी बंदीमुळे मुहम्मद अलींची उमेदीची वर्षे वाया गेली. विरोध केवळ व्यवस्थेकडून होता अशातला भाग नाही. तत्कालीन बहुतांश गोऱ्या प्रस्थापितांनी मुहम्मद अलींना देशविरोधी ठरवले. ख्रिस्तीबहुल आणि गौरबहुल माध्यमांचा यात मोठा वाटा होता. मुहम्मद अलींनी इस्लाम स्वीकारल्यापासून जी कुजबुज सुरू झाली होती, ती युद्धविरोधानंतर अधिक तीव्र झाली. पण अली बधणाऱ्यांतले नव्हतेच. त्यांनी गर्जना केली : ‘मी अमेरिका आहे. या देशाचा असा भाग, जो तुम्हाला मान्य नसेल. पण.. सवय करून घ्या! (मी असा) काळा, धीट, उद्धट.. माझे नाव. तुमचे नव्हे. माझा धर्म. तुमचा नव्हे. माझी स्वप्ने, माझीच.. (तुम्हाला) सवय करून घ्यावी लागेल!’ सत्तरच्या दशकात पुढे मुहम्मद अलींनी अनेक अविस्मरणीय लढती जिंकल्या, काहींत ते पराभूतही झाले. त्यांच्या तऱ्हेवाईक वागण्याचे किस्से तर असंख्य. पण आपल्या भूमिकेवर ठाम राहूनही त्यांनी कित्येक विरोधकांना कालौघात आपलेसे करून घेतले. अलींनी व्यवस्थेला शिंगावर घेतले. पेलेंवर तशी वेळच आली नाही. पण का?

वर्णद्वेषाचे चटके पेलेंनाही सोसावे लागलेच. ब्राझीलमध्ये १८८८ मध्ये गुलामगिरीला कायद्याने मूठमाती मिळाली. अमेरिका खंडात हे पाऊल उचलणारा तो शेवटचा देश होता. वर्णद्वेषाला कायद्याने बंदी होती, पण ब्राझीलमध्ये गोऱ्यांच्या मानसिकतेत तो टिकून होता. आमच्या देशात सारे काही शांत आहे आणि वर्णीय वा वांशिक भेदाभेद अस्तित्वात नाही, असा एक सिद्धांत तेथे पेलेंच्या जन्माच्या काळात मांडला जाऊ लागला. ब्राझील ही पोर्तुगीजांची वसाहत होती. पोर्तुगीजांमध्ये वंशद्वेष, वर्णद्वेष इतका टोकाचा नव्हता, असे तेथील गोरे विचारवंतच सांगायचे. त्यामुळे अमेरिका किंवा दक्षिण आफ्रिकेसारख्या वर्णद्वेषविरोधी चळवळी तीव्र होण्याची गरजच ब्राझीलमध्ये नव्हती, असा त्यांच्या म्हणण्याचा रोख. ‘वांशिक लोकशाही’ असा शब्दप्रयोग पेलेंच्या उदयाच्या काळात ब्राझीलमध्ये प्रचलित होता. हा शब्दप्रयोग वास्तवाशी पूर्णपणे प्रतारणा करणारा होता, असे गेली अनेक वर्षे ब्राझीलमधील गौरेतर विचारवंत, पत्रकार आणि खेळाडू म्हणू लागलेत. युरोपातून केवळ गोऱ्यांनीच स्थलांतर करून ब्राझीलमध्ये वास्तव्यास यावे, यासाठी धोरणे आखली गेली होती. फुटबॉलमध्येही गोऱ्यांचे वर्चस्व होते. १९४० आणि ५० च्या दशकात गोरे प्रस्थापित आणि श्रीमंत होते. तर काळे, मूलवासी आणि मिश्रवर्णीय प्रामुख्याने दरिद्री होते. अगदी सुरुवातीच्या काळात काळय़ांना फुटबॉल खेळण्यासही मनाई केली जायची. ज्या काळात पेलेंचा उदय झाला तेव्हा – म्हणजे ५० च्या दशकात – फुटबॉल खेळणारे गोरे होते, माध्यमांमध्ये गोरे होते आणि ब्राझीलचे सत्ताधीशही गोरेच होते. अशांविरुद्ध वर्णद्वेषाच्या मुद्दय़ावर टक्कर घेतल्यास पराभव आणि निराशा ठरलेली आहे, हे पेले जाणून होते. त्याऐवजी आपल्या खेळातून प्रत्येक टप्प्यावर – क्लब, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय – पेलेंनी त्यांची उपयुक्तता आणि अपरिहार्यता सिद्ध केली. विश्वचषक १९५८ मध्ये जगासमोर झळकलेले १७ वर्षांचे चपळ, निरागस पेले ब्राझीलमधील एका अख्ख्या उत्थानेच्छुक गौरेतर पिढीचे प्रतिनिधित्व करत होते. त्यांनी १९७१ मध्ये निवृत्ती घेतली, त्या वेळी नाराज सरकारने त्यांचे निरोपसामने रद्द केले होते. १९७४ मधील विश्वचषक स्पर्धेत त्यांनी खेळावे यासाठी दबाव आणला गेला. परंतु पेलेंची प्रतिभाच अशी होती, ज्यामुळे एका मर्यादेपलीकडे त्यांना त्रास देणे वेळोवेळीच्या सरकारांना शक्य झाले नाही. वर्णद्वेषाच्या बाबतीत ठोस भूमिका घेतली नाही, या आक्षेपाविषयी महत्त्वाचे विधान पेलेंनी २०१४ मध्ये केले : वर्णद्वेषी टोमणे सहन करायचे नाहीत, त्याविरुद्ध आवाज उठवायचा असे मी ठरवले असते, तर प्रत्येक सामना थांबवावा लागला असता!

मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर, माल्कम एक्स यांनी आफ्रिकन वंशीयांच्या चळवळीचे नेतृत्व केले. परंतु पहिल्यांदा ऑस्कर जिंकणारे सिडनी प्वाटय़े (१९६४), पहिल्यांदा अमेरिकन ओपनसारखी ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा जिंकणारे आर्थर अ‍ॅश (१९६८) आणि मुहम्मद अली व पेले यांच्या कर्तृत्वाने एका मोठय़ा वंशसमुदायाला आनंदाचे आणि आत्मविश्वासाचे क्षण दाखवले हे नाकारता येत नाही. पेले आणि अली हे या मांदियाळीतील दोन ध्रुवतारे त्यांना परस्परांविषयी नितांत आदर आणि परस्परांच्या संघर्षांविषयी कौतुक होते. ते सार्वकालिक महानतम ठरतात, कारण स्वत:च्या कार्यक्षेत्राबाहेरील त्यांचा प्रभाव वैश्विक आणि चिरंतन आहे.

sidhharth.khandekar@expressindia.com

Story img Loader